
निरागस मन
आई आणि तिची मुलगी गेट मधून बाहेर पडून मार्केटच्या दिशेने जात होत्या ,तिथे एक म्हातारी बाई उभी होती,म्हणत होती,ताई ,दहा रुपये द्या ,वडापाव खायला .ती तशीच पुढे जाणार ,तर मुलीने हाताला धरून तिला मागे खेचत,तिला म्हणाली ,आजीला दे ना दहा रुपये ,तूच तर सांगतेस ना की ,दुस-यांना मदत करायची. ती आजी बाई जवळ गेली ,तिला म्हटलं, पैसे नाही देणार ,हवं तर वडापाव घेऊन देते. इथे मुलीला दिलेला शब्द पाळायचा होता आणि अजून काही सांगायचे होते,जवळच वडापावची गाडी होती ,तिथं जाऊन ऑर्डर देणार तर आजी बाई बोलली ,दोन सांगा ,माझ्या मालकाला पण होईल,कुठे आहेत ते ,असं विचारलं.
तिने मघाशी ,ती जिथे उभी होती तिथं बोट दाखवलं,तसं तिने वडापाववाल्या काकांना म्हटलं,चार वडापाव द्या आणि चाळीस रुपये दिले. त्यांनी वडापाव दिले ,ते मुली करवी ,तिने त्या आजींच्या हातात दिले,तसं आजीने तिच्या तोंडावरुन हात फिरवत नजर काढल्या सारखं केलं.
मुलगी- हे काय करताय तुम्ही आजी
आजी -नजर काढते,तू लई गुणाची हाय पोरी,आज तुझ्यामुळे तुझ्या आईने मला खायला दिलं
मुलगी- आई देणारच,कारण तिच सांगते आजी आजोबा लोकांची मदत करायची
आजी-बरं बरं,सुखात रहा पोरी
तिथून त्या पुढे निघाल्यावर मुलीने तिला प्रश्न विचारला ,मी तर तुला दहा रुपये द्यायला सांगितले होते आणि तू तर चाळीस रुपये खर्च केले.
आई - मी वडापाव घेऊन देऊ का ,असं विचारल्यावर त्या लगेच हो म्हणाल्या ,कारण त्यावेळी त्यांना खरच भूक भागवण्यासाठी जेवणाची गरज होती ,हे लक्षात आलं आणि आता जेवणाची वेळ पण आहे ,म्हणून दोन दोन प्रत्येकाला वडापाव दिले,ज्यांना गरज असते त्यांना निसंकोच पणे दिले पाहिजे पण काही लोक मात्र पैसे द्या असे म्हणतात,म्हणजे ते पैशासाठी बहाणा करत असतात,त्यांना जर खरच भूक नसती ,तर ते म्हणाले असते पैसेच द्या ,त्यामुळे आपण जी मदत करतोय ती योग्य ठिकाणी पोहोचली ह्याचे समाधान मिळते ,नाहीतर काही जण अशा गोष्टींचा फायदा करून घेणारे ही असतात.
मुलगी- आई फायदा म्हणजे काय ग्ं
आई- अजून तू लहान आहेस ,जशी मोठी होशील तसं कळेल,सध्यातरी तू मनाने निरागस आहेस ,तशीच रहा ,एकदा का फायदा तोट्याच्या चक्रात माणूस अडकला की माणूसकी
विसरून जातो,तू मोठी झाली तरी माणूसकी मात्र विसरू नकोस
मुलगी- नाही आई ,मी नाही विसरणार
काय माहित तिला माणूसकी या शब्दाचा अर्थही कळाला होता की नाही,पण आई जे सांगते ते बरोबरच असते ,हा विश्वास मात्र तिच्या मनात होता ,कारण तिच मन निरागस होतं , अजून तिने बाहेरच जग कुठे अनुभवलं होतं.
ही कथा जर आवडली असेल तर नावासहित शेअर करू शकता,हसत रहा,वाचत राहा,आनंदात रहा आणि अभिप्राय अवश्य द्या.
रुपाली थोरात