निरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 8

Love Story


सायली घराबाहेर पडून एकदाची टॅक्सीत बसली. मैत्रिणींच्या तावडीतून जरा सुटका झाल्याने तिला थोड रिलॅक्स वाटलं. मैत्रिणी फक्त तिला भेटायला आल्या नव्हत्या तर दोन दिवस सायलीच्या घरि आईला मदत करण्यासाठी राहायचं या इराद्याने आल्या होत्या. दिवाळी जवळ आली होती. सगळ्यांमध्ये उत्साह संचारला होता. पण तिला मात्र दरवर्षीसारखा उत्साह वाटेना. आई- बाबांवर ती अजूनही नाराज होती. त्यांच्यासोबत नेहमीसारखं वागावं,बोलावं असं तिला मनातून वाटतं होतं पण तिच्या या शरणागतीचा पुन्हा चुकीचा अर्थ त्यांनी काढला असता आणि डायरेक्ट शुभमला उत्साहाच्या भरात होकारही कळवला असता जे तिला नको होतं. घरि तर मैत्रिणी आणि आईने फराळाची तयारी सुरु केली होती. लाडू, करंजा,शंकरपाळे किती काय काय बनवत होत्या आणि सायलीलाही त्यांच्यासोबत हट्टाने बसवून घेत होत्या. एरव्ही असं सगळ्यांसोबत बसुन फराळ बनवणं,गप्पा मारणं तिलाही आवडलं असतं पण आता नको वाटतं होतं. या सगळ्यात समरला फोन करायला तिला वेळच मिळाला नव्हता. ती त्याच्या फोनची,मेसेजची आतुरतेने वाट पाहत होती पण त्यांचं भेटायचं ठरुनही ती गेली नाही त्या दिवसापासुन त्याचा फोन नव्हता. घरून कॉल करणार मग भेटायला मी निघणार त्यातून याही वेळी काही गोंधळ नको व्हायला म्हणून तिने बाहेर पडूनच त्याला कॉल करुन भेटायचं ठरवलं तरिही ती बाहेर पडताना मीना,जुई म्हणतच होत्या,आम्हीही येतो पण श्रद्धाने त्यांना मदतीला थांबवून घेतलं आणि ती आकाशकंदिल खरेदी करण्याच्या बहाण्याने बाहेर पडली. 
तिने त्याला कॉल केला पण पलिकडून त्याने कट केला. मग तिने मॅसेज पाठवला,'भेटूया का ?' त्यावर लगेच त्याचा रिप्लायही आला. तिने खुशीने मेसेज ओपन केला तर त्यात लिहिलं होतं,' Not possible today, I'm bussy,Sorry' तिला वाईट वाटलं ते वाचून. काय चाललंय हे ! आपण या लग्नाला नकार देऊन टाकावा असं तिचं मन म्हणालं पण दुसरं मन म्हणत होतं,' काय कारण सांगणार ! शुभम खरंच चांगला मुलगा आहे हे आपल्यालाही माहित आहे,आपण आईबाबांची एकुलती एक मुलगी. एवढं लाडाकोडात त्यांनी आपल्याला वाढवलं. आता फक्त चांगला जावई असावा एवढीच त्यांची इच्छा आहे यात काय चुकलं त्यांचं! शुभमला नकार दिला तर ते दुसरं स्थळ पाहतीलच कि ! या विचारासरशी तिने कपाळाला हात लावला. 
" मॅडम, इथेच उतरणार ना तुम्ही !" एका दुकानासमोर टॅक्सी थांबवत ड्रायव्हर म्हणाला तशी ती भानावर आली आणि टॅक्सीतून उतरली.
.............................
सायलीचा मेसेज येऊन गेल्यापासुन समर पुन्हा अस्वस्थ झाला. त्या दिवशी तास दोन तास वाट पाहूनही ती कॅफेमध्ये भेटायला आली नाही. त्या दिवशी घरि आल्यानंतर त्याने बराच विचार केला. आपण का सतत सायलीचा विचार करत राहतो,काय केलं कि ती खुश होईल.काय केलं कि तिला वाईट वाटतं. व्हाय?आपण आपला वेळ असाच वाया घालवणार आहोत का कि कामावरही लक्ष देणार आहोत ? त्याने स्वतःलाच हा प्रश्न विचारला. त्याच्याच मनाने त्याची समजूत घातली,' सायलीचं आता लग्न ठरतंय. तिचा विचार करणं, सारखं तिच्यासोबत बोलणं,भेटणं हे कमी करायला हवं. मैत्री होती, आहे आणि असेल पण तिचा मार्ग आता वेगळा आहे.' या निर्णयाप्रत येऊन त्याने तिचा विचार न करण्याचं ठरवलं होतं. आणि आज तिचा मेसेज पाहून त्याने मन घट्ट करुन न भेटण्याचं सांगितलं. शुभमला तिच्यासाठी पेंन्टिंग गिफ्ट द्यावसं वाटलं. तिच्या आवडी जपणारा, तिचा आनंद पाहणारा असा आहे शुभम! त्यांच्यात आपण मध्ये पडणं योग्य नव्हे असंच त्याचं मन त्याला आताही सांगत होतं. पण का कोणास ठाऊक त्याला शुभम आवडला असला तरि सायली - शुभम हे नवं नातं त्याच्या पचनी पडत नव्हतं. हे लग्न थांबाव असं आतून वाटतं होतं पण हा विचार तो झटकून टाकायचा. इतक्यात बाबा रुममध्ये त्याला बोलवायला आले,
" अरे, असा बसलायस काय ! दिवाळी आली, घराची साफसफाई नको का करायला ?"
" अ....हा "
तेवढ्यात बाबा समोर आले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत भावूक होऊन बोलू लागले," समर, इतकी वर्ष झाली तुझी आई वारल्यानंतर या घरात ना कुठला सण साजरा झाला ना कसलं सेलिब्रेशन झालं. उत्साहाने सकाळपासुन घरभर वावरणारं, हक्काने किचन ताब्यात घेऊन ' तुम्ही लूडबुड नका हा करु ' म्हणून दटावणारं, प्रेमाने खाऊपिऊ घालणारं असं कुणीच नाही या घरात! फक्त तू आणि मी. घर पण वाट पाहतंय कुणाच्यातरि प्रेमळ स्पर्शाची. पण आता थोडेच दिवस हे असे काढावे लागतील !"
" म्हणजे बाबा " त्याने आश्चर्याने विचारलं.
" म्हणजे हेच कि समरराव आमच्यासाठी सुनबाई आणण्याच मनावर घ्या आता !" बाबा हसत म्हणाले. बाबांच्या डोक्यातही हा विचार येऊ शकतो हे त्याच्या लक्षातच आलं नव्हतं इतके दिवस. तो बाबांकडे पाहत राहिला.
" चल ते बघू नंतर आधी दिवाळीची तयारी करु, चल कम अॉन " बाबा उत्साहाने म्हणाले आणि डोळे पुसत निघुन गेले. बाबांना आईची आठवण सणाच्या दिवशी येतेच. ते भावूक होतात हे त्याला माहित होतं म्हणून बाबांसोबत आता जास्त वेळ घालवायचा, स्वतःच्या डोक्यातले विचार बाजूला ठेवायचे असं त्याने ठरवलं.
..............................
" आता कुठे निवांत वेळ मिळाला दमले गं बाई मी " सायलीची आई सोफ्यावर निवांतपणे बसत म्हणाली. समोर बाबा पेपर वाचत बसले होते.
" काय झाला का मग फराळ " बाबांनी विचारलं.
" हो झाला, असं काय मघाशीच शंकरपाळे खाल्लेत कि तुम्ही आणि छान, मस्त अशी शाबासकी पण दिलीत मुलींना." 
" हो हो आहे माझ्या लक्षात ! विसरायला मी काय वयस्कर नाही झालेलो " बाबा आईला टोमणा मारत म्हणाले.
" बरं झालं पण या मुली आल्या. मला मदत झाली पण महत्वाचं हे कि तुमची लेक तरि तिच्या विश्वातुन जरा बाहेर आली त्यानिमित्ताने दोन दिवस." 
" हा माझी लेक. एरव्ही तुझी साऊ आणि अगाऊपणा केला तिने जरा कि 'माझी लेक '! वा रे वा !" बाबांनी आईला लगेच उत्तर दिलं.
" तसं नाही हो,पण हल्ली तिचं काय चाललंय तेच नाही कळत.बरं शुभम तिला नाही आवडलाय असं ती स्पष्टपणे काही सांगत नाही. काय समजायचं मग आपण ?" आईने त्राग्याने म्हटलं.
" तू जरा शांत हो. बोलेल ती आपल्याशी डोन्ट वरी." बाबांनी तिला धीर दिला.
" अहो पण कधी ?"  
इतक्यात दारावरची बेल वाजली. आईने दरवाजा उघडला तर समोर शुभम ! त्याला पाहून ती आश्चर्यचकितच झाली.
" शुभम तू कसा अचानक इकडे,ये ना " आईच्या तोंडून 'शुभम ' ऐकल्यावर बाबाही उठून पुढे आले.
" अरे शुभम ये ये " बाबांनी त्याला पुढे होत आत बोलावलं.
तो आत आला. आईने पाणी दिलं आणि ती सायलीच्या बाबांच्या शेजारी उभी राहिली. शुभम काय बोलणार याकडे दोघांचं आता लक्ष होतं. क्षणांत आईच्या कानांवर शब्द पडले," बाबा, मला सायली आवडली " आई खूश झाली खरी पण बाबांच्या " काय ! अरे पण का ?" या मोठ्या किंचाळणीसदृश आवाजाने ती भानावर आली. म्हणजे मघाचे शब्द तो बोललाच नाही. बापरे ! कायतरी भलतंच झालं वाटतं. बाबा त्याला वारंवार विचारत होते,"अरे का पण" त्यावर तो बोलला," होय बाबा,तुम्हाला हे ऐकून धक्का बसणे साहजिक आहे. पण मला वाटतं आपण हे लग्न करु नये.बाबा मी काय सांगतो ते आता नीट ऐका." तो सोफ्यावरुन पुढे सरकत बाबांचे हात हातात घेत म्हणाला. आई तिच्या स्वप्नरंजनातून आता पुरती बाहेर आली होती. तीही शुभमचं म्हणण कान देऊन ऐकू लागली.
" बाबा, सायली चांगलीच मुलगी आहे. न आवडण्यासारखं तिच्यात खरंच काहीच नाही."
" अरे पण तूच तर" बाबांना थांबवत तो पुढे बोलू लागला.
"हो तरिही हे लग्न मी करायला तयार नाही कारण मला नाही वाटतं ती या लग्नाने खूश होईल. आणी हो हे ती मला काही बोलली नाही. हे सगळं मला वाटतंय."
" अरे पण का ?"  शुभमच्या या निर्णयाने गोंधळलेले बाबा म्हणाले.
" कारण बाबा मी आता काही दिवसांपूर्वी एकदा तिला भेटलो आणि तुम्ही आमचं लग्न लावून द्यायला निघालात मग ती गेली पाच सहा वर्ष ज्याला ओळखते,ज्याला आपला 'बेस्ट फ्रेंण्ड ' मानते, ज्याच्यासोबत प्रत्येक घडणारी गोष्ट शेअर करते. त्याचं काय?"
" कोण ? कोणाबद्दल बोलतोस तू ?" आई आश्चर्याने बाबांकडे पाहत म्हणाली.
" समर "
" नाही रे, तुझा काहीतरी गैरसमज होत असेल ते फक्त मित्र आहेत. कॉलेज फ्रेंण्ड्स फक्त.आणि समरच काय तिचे बाकी मित्रमैत्रिणी पण घरि येतात, हे लोक एकत्र भेटतात." बाबांनी एक्सप्लेनेशन दिलं.
" नाही बाबा, समरविषयी तिच्या मनात वेगळी जागा आहे आणि हे तिलाही रिअलाईझ नाही झालेलं अजून." पुढे त्याने आपण पहिल्यांदा घरी आल्यानंतर रुम पाहताना सायली समर विषयी किती बोलत होती. तो समरच्या घरि गेला होता तेव्हा त्याला जाणवलेली समरची जेलसि, इनसिक्युरिटी या सगळ्याविषयी त्याने आईबाबांना सांगितलं.
" बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा. हे लग्न नको व्हायला प्लीज. तुम्ही तिच्याशी शांतपणे बोला. तिचं मन जाणून घ्यायचा प्रयत्न करा सगळी कोडी उलगडतील." तो ज्या निश्चयाने बोलत होता ते पाहून बाबांनीही त्याच्या हातावर आश्वासकपणे थाप मारत हो म्हटलं. 
" बरं मीही निघतो आता ती आली तर उगीच तिचा गैरसमज होईल मला पाहून." तो निघण्यासाठी उठला.
" तुला कसं माहित ती घरी नाही !" बाबा
" मी त्याची खात्री करुनच आलो " तो हसत म्हणाला " आणि हो बाबांचं टेंन्शन नका घेऊ तुम्ही.आय वील मॅनेज." आईबाबांना यावर काय बोलावं तेच सुचत नव्हतं. त्यांचा निरोप घेऊन तो बाहेर पडला. ते अवाक होऊन पाहत राहिले.
...................
बाहेर पडल्या पडल्या त्याने श्रद्धाला मेसेज केला.' थँक्स मिशन फत्ते '. बाबा खुश होतील त्याला मनातुन वाटलं आणि त्याला बाबांचं बोलणं आठवलं. समरच्या घरुन आल्यानंतर रात्री तो उदास होऊन कव्हर केलेल्या त्या पेंन्टिंगकडे पाहत बसला होता इतक्यात बाबांनी खांद्यावर हात ठेवला.
" काय रे एवढा कुणाचा विचार करतोस ?"
" सायलीचा "
" अरेवा ! लग्नाआधीपासुनच इतका विचार " बाबा चिडवत त्याला म्हणाले.
" तसं नाही बाबा. पण का काय माहित काहीतरी चुकतंय. समजून घेण्यात चूक होतेय काहीतरी."
" हो पण काय म्हणतोयस तु "
" बाबा, शी इज नॉट हॅपी फोर दिस रिलेशन."
" व्हाय ? काय झालं?"
" मला वाटतं तिला दुसरं कुणीतरी आवडतं."
" कोण ? आणि मला विश्वास नाही काही बोलला याविषयी "
" त्यांना कुठे कळायला ! अजून ती स्वतःच गोंधळलेली आहे."
" म्हणजे " तो काय म्हणतोय ते बाबांना कळतच नव्हतं.
" बाबा, तिचा एक कॉलेज फ्रेंन्ड आहे समर. कॉलेजपासुनची मैत्री आहे त्यांची आजही आहे. बाबा ते दोघ एकमेकांना आवडतात पण त्यांनाच हे उमगत नाही आहे."
" पण तुला कसं कळलं ?"
" मी पाहिलं ते प्रेम त्यांच्या नजरेत. इन फॅक्ट मी समरलाही भेटलोय. " त्याने घडलेली सर्व हकिकत बाबांना सांगितली आणि त्यांना ते पेंन्टिंग उघडून दाखवलं.
" वा ! खरंच खूपच सुंदर आहे. मनस्वी मुलगा दिसतोय हा आणि तू इतकं म्हणतोयस तर असेलही."
" बाबा मी त्यांना छोटी हेल्प करु का ?"
" शुअर ,आलं माझ्या लक्षात. कर कर शेवटी त्यांचं नातं पुढे गेलं तर चांगलंच आहे कि." बाबांनी हसत त्याच्या खांद्यावर थाप मारली.
" हा पण शुभम तुला चालेल ना! आयमीन तुला सायलीचं स्थळ आलं होतं.आणि आता तूच"
" बाबा डोन्ट व्हरी. ती चांगली मुलगी आहे आणि एकदाच तर मी भेटलोय. त्यामुळे प्रेमभंग वगैरे नाही झाला माझा काही." हसत तो म्हणाला तसे तेही निश्चिंत झाले. त्यानंतर मात्र तो सायलीच्या घरि आला तेव्हा तिच्या मैत्रिणी आल्याचं त्यानं पाहिलं. शेवटी आत न जाण्याचं त्यानं ठरवलं. सायलीच्या फ्रेंन्ड्सची नावं त्यानं तिच्या तोंडून ऐकली होती. शेवटी एक दोनदा चकरा टाकल्यानंतर श्रद्धाशी त्याने ओळख काढली आणि त्याचं सगळ म्हणणं तिला ऐकवलं त्यावर तीही मदत करायला तयार झाली. सायलीच्या घरुन त्या कधी निघणार ते तिनंच त्याला कळवलं होतं. त्याला हे सगळं आठवलं. त्याने एकवार मागेवळून घराकडे पाहिलं. " आय नो आईबाबा तुम्ही योग्य तेच कराल.बाय." एवढं बोलून छानशी स्माईल देत तो गाडीत बसला.
क्रमशः

🎭 Series Post

View all