निरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 2

Love Story


" अरे समर व्हॉट अ प्लेंझट सरप्राईज! तू केव्हा आलास?" अंकुश समरला पाहून आश्चर्यचकित झाला. दरवाजातून आतमध्ये येताच त्याने अत्यानंदाने प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. 
"अरे, कसा आहेस मित्रा ?"            अंकुश
" मी मस्त एकदम. तू काय म्हणतोस?"    समर
" माझं नेहमीचंच रुटीन जॉब आणि घर."    अंकुश
" तू पनवेलला असतोस ना !"     समर
" हो ना रे. आमच्या आयुष्यात कुठे बेंगलोर, चेन्नईला जाण्याचा योग!" समरच्या हातावर टाळी देत हसत तो म्हणाला.
" मग आता कधी परत चाल्लायस ?" अंकुशचा पुढचा प्रश्न.
" नाही, आय मीन मुंबईलाच पोस्टिंग झालं माझं आता." 
" वाव! दॅट्स ग्रेट यार. काँग्रॅस."  दोघांच्या गप्पा सुरु असताना जुई , श्रद्धा, मीना, तन्मय सगळेजण घोळक्याने आत आले आणि समरला पाहताच खुश झाले. बर्‍याच वर्षांनी सगळे एकत्र भेटत होते. त्यामुळे गप्पांना जोरदार सुरुवात झाली. कॉलेजनंतर कुणी काय काय केलं, कोण कुठे असतं, मुंबईत कोण कोण आहे एक ना अनेक विषय. इतक्यात सायलीही बाहेर आली. 
" आय अॅम सो सॉरी हिचा बर्थ डे आणि हिलाच विसरलो आपण." जुई म्हणाली तसं सगळे सायलीच्या दिशेने वळले. प्रत्येकाने गिफ्टसह शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. 

" ए मीना, तू  गिफ्ट विसरलीस कि काय आपण ठरवलेलं." अंकुशने शंकास्पदरित्या मीनाला विचारलं.
" नाही, एकच मिनिट हा " ती आठवल्यासारखं करित म्हणाली आणि धावतच बाहेर गाडीपाशी गेली आणी लगेच आत आली. एक क्युट, गुबगुबीत टेडीबेअर सायलीच्या हातात दिला.
" हे आमच्या कडून गिफ्ट."
" वाव! थँक्यु सो मच. आपण ह्याचं नाव 'पपी ' ठेवू. चालेल ना रे 'पपी '? सायलीने टेडीबेअरचे दोन कान पकडत त्याला विचारण्याची अॅक्टींग केली तसे सगळे मोठ्याने हसले.
" ए, चला चला केक कापूया लवकर " सायलीचे बाबा उत्साहाने म्हणाले तसे सगळे डायनिंग टेबलपाशी सायलीभोवती गोळा झाले. 
" पण एक आहे हा! केक कापल्यानंतर कुणी कुणाच्या चेहर्‍याला लावायचा नाही उगीच."
" ओके बॉस " तिच्या बोलण्याला सगळ्यांनी दुजोरा दिला तसा तिने केक कापला.'हॅपी बर्थ डे टु यु साऊ' च्या शब्दांसह सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवल्या. फुगे फोडले. सायलीने केकचा तुकडा आधी आई बाबांना भरवला मग सगळ्या मित्रमैत्रीणींना. आईच्या हातचा केक, पिझ्झा, श्रीखंडपुरी पाहून सगळ्यांच्या जिभेला पाणी सुटलं. सायलीचे बाबाही मुलांमध्ये जाऊन गप्पा मारायला बसले. आईने सगळ्यांना आनंदाने काय हवं नको ते डिशमध्ये वाढलं. घरगुती बर्थडे पार्टितल्या घरगुती पदार्थांवर सगळ्यांनी यथेच्छ ताव मारला. समरच्या येण्याने तर सगळे अजुनच खुश होते. तोही सगळ्यांमध्ये एन्जोय करत होता. त्याचं अॉफिस,फ्रेंन्ड्स यांचे फोटोज मोबाईलवरून दाखवत होता. सायली थोडावेळ त्यांच्यात येऊन बसायची पुन्हा आईला डिशेस सर्रव करायला मदतही करायची. तिच्याकडे पाहताना त्याचं मन अस्वस्थ होत होतं. आनंदाने भारलेल्या या वातावरणात त्याने मघाचा विषय डोक्यातून काढून टाकला. कॉर्पोरेट कल्चर,मुंबईतले जॉब,कंपन्या इथपासुन ते बॉस,कलिंग्ज इथपर्यंत बर्‍याच विषयावर गप्पा रंगल्या होत्या. शेवटी संध्याकाळी उशीरा सगळे निघाले. सगळ्यांनी पुन्हा भेटूया म्हणत एकमेकाचा निरोप घेतला. वाढदिवसाचे ढिगभर फोटोज एकमेकांना शेअर करित, कुणी कोणाला घरी सोडणार यावर चर्चा करित सगळे घरातून बाहेर पडले. अंकुश,तन्मय सोबतच समर बाहेर पडला. सायली सगळ्यांना टाटा करण्यासाठी दरवाजापाशी आली. समरला बोलायचं होतं पण हि योग्य वेळ नव्हती म्हणून तोही टाटा करून बाकी सगळ्यांसोबतच तिथुन निघाला.

     हसणारं- खिदळणारं घर एकदम शांत झालं. सगळं आटोपेपर्यंत रात्र झाली. आता पुन्हा जेवण्याचा मुड कुणाचा नव्हता. आईने किचनमधलं सगळं आवरायला घेतलं. सायलीही आईच्या मदतीला गेली. पण तू जा,उद्या अॉफिस आहे म्हणत आईने तिला झोपायला पाठवलं. आई बाबांना 'गूड नाईट' म्हणून ती रुममध्ये गेली. रुममध्ये पाऊल टाकताच तिनं बेडवरती अंग टाकलं तोच शेजारी ठेवलेल्या गिफ्टकडे तिचं लक्ष गेलं. या सगळ्या घाईगडबडीत दुपारचं समरचं गिफ्ट तिनं अजुन पाहिलंच नव्हतं. तिने उत्सुकतेनं ते हातात घेतलं आणि कव्हर उघडलं. ती एक फ्रेम होती पण तिने पाहताच आश्चर्य आणि आनंद तिच्या चेहर्‍यावरुन ओसंडत होता. तिने पुन्हा वेगवेगळ्या अँगलने ती हातात धरून पाहिली. "किती सुंदर ! जणू माझंचं प्रतिबिंब मी आरश्यात पाहतेय कि काय असंचं वाटतंय. माझं चित्र इतकं सुंदर. माझ्यापेक्षाही ह्या चित्रातली मी जास्त छान आहे." 
सायलीचा गार्डनमध्ये उभा असलेला एक फोटो तिने तिच्या प्रोफाईलला ठेवला होता. तो फोटो पाहून त्याने हे चित्र साकारलं होतं. तिला नेहमी वाटायचं, त्याच्याशी रंग, रेषा बोलतात. त्याच्या हातात जादू आहे. आज पुन्हा तिला तेच वाटलं आणि इतक सुंदर गिफ्ट आपण उशीरा पाहिलं म्हणून स्वतःचा रागही आला. त्या पेंन्टिंगवरुन तिने हळुवार हात फिरवला आणि 'थँक्यु समर ' असे शब्द आपसुकच तिच्या ओठी उमटले. उद्या या सुंदर भेटीसाठी समरला थँक्यु म्हणावं म्हणून त्याला भेटण्याच्या निश्चयानेच ती झोपी गेली.
क्रमशः

( आता सायली समरला भेटणार आहे तेव्हा समर तिच्याशी काय बोलेल,बोलेल कि बोलणार नाही. त्याच्या मनातली चलबिचल तिला कळेल का? पाहुया तिसर्‍या भागात पुढील सगळे भाग चुकवू नका हा )

🎭 Series Post

View all