निरागस मैत्रीची गोड गोष्ट ला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद... तुमच्यासाठी या कथेचे हे दुसरे पर्व ' निरागस प्रेमाची गोड गोष्ट ' ही आता सायली - समरच्या मैत्रीच्या पुढची गोष्ट असेल. त्यांचं नातं नव्या वळणावरती जाईल तेव्हा नक्की वाचा.
"सायली काय हे! मी पाहतेय त्यावर माझाच विश्वास बसत नाही. तू चक्क मी न ओरडता तुझी रुम आवरलीस." सायलीची आई रुमच्या दरवाजातून आत येत म्हणाली. कौतुकमिश्रित आश्चर्याचे भाव तिच्या चेहर्यावर होते.
"अरे वा! साऊबाई बेडवर नवी बेडशिट्स, पिलोकव्हर्स आणि हे काय ! फुलदाणीतली फुलंही किती सुंदर आहेत ! कधी आणलीस?" सायलीच्या आईने आश्चर्याने रूमवरून नजर फिरवली. सायली शांतपणे फुलदाणीतली फुलं सजवत होती आणि फुलदाणी कुठे ठेवू म्हणजे उठुन दिसेल असा प्रश्न तिला पडला.
"बघ आई, तू नेहमी म्हणतेस ना ! मी आळशीपणा करते. आज बघ. आवडली की नाही माझी रुम. हि इतकी सुंदर रुम बघून तुलाही इथेच रहावसं वाटेल." ती स्वतःलाच शाबासकी देत म्हणाली.
"हो..... हो....तर " आईने कपड्यांचा ढीग कपाटात ठेवण्यासाठी कपाट उघडलं तर तिथेही आश्चर्य चक्क सगळे ड्रेस हँगरला व्यवस्थित लटकवलेले होते. ड्रेसच्या व्यवस्थित घड्या घातलेल्या होत्या. इतका सगळा टापटीपपणा बघून आई तर आश्चर्यचकितच झाली.
"काय गं काय स्पेशल?"
" काही नाही. आई तू विसरलीस! अगं माझा वाढदिवस जवळ आला ना! मग सगळे फ्रेंड्स येणार तयारी नको का करायला?"
" ओह......आत्ता लक्षात आलं." आई मुद्दामहून आठवल्यासारखं करत म्हणाली. "बरं बाई, कोण कोण येणार आहेत ? तुमचं कॉलेजचं मित्रमंडळ ते सांग म्हणजे मला मेन्यु ठरवायला बरं पडेल."
" हं......... सगळेच येतील गं. मीना, अंकुश, श्रद्धा, तन्मय, जुई. जुई आणि श्रद्धा येतच असतात अधूनमधून. तन्मय आता पुण्याला असतो जॉबला पण येणार आहे म्हणाला तो. बाकी मीना आणि अंकुश पनवेलला आहेत. ते एकाच कंपनीत आहेत. सो देय वील मॅनेज." भिंतीवरच्या फोटो फ्रेम्स उतरवत तिने मित्रमैत्रिणींच्या आगमनाविषयीचं वृत्त आईला ऐकवलं. "ओके ओके " आई हसत म्हणाली आणि निघून गेली. सायलीने टिपलेली छायाचित्रं बाबांनी फ्रेम करून घेतली होती आणि मोठ्या कौतुकाने आई बाबांनी आपल्या हाताने सायलीच्या रूममध्ये लावली होती. रुमच्या भिंती त्या छायाचित्रांनी भरुन गेल्या. आज साफसफाईच्या निमित्ताने तिने त्या फ्रेम काढल्या होत्या. एकुणच रूम छान,प्रसन्न वाटत होती.
दोन दिवसांनी सायलीचा वाढदिवस
" मेनी मेनी हॅपी रिर्टसन्स अॉफ दि डे डियर सायली."
" थँक्यु समर ! "
सकाळपासुन शुभेच्छांचे मेसेज वॉट्सअॅपवर सुरु झाले. सकाळी उठताच आधी तिने सगळ्यांना थँक्युसह स्माईलीचे स्टिकर्स पाठवले. नंतर फ्रेश होऊन बाहेर येते तोच मघापासुन दोन तीन मिसकॉल्स मोबाईलवर झळकत होते. तेवढ्यात पुन्हा मोबाईलची रिंग वाजली. फोन उचलताच पलिकडून ओळखीचा आवाज आला आणि ती खुश झाली. खरंतर समर बेंगलोरला गेला तो तिकडचा झाला. फारशी रजा नसल्याने मुंबईला येण व्हायचं नाही. आला तरि सायलीला भेटणंही वर्षातून एक दोनवेळाच व्हायचं. तीन वर्ष अशीच गेली. पण फोन, मेसेजवरुन ते नेहमी संपर्कात असायचे. एकमेकाच्या वाढदिवसाला आवर्जून एकमेकाला फोन करायचे. आदल्या दिवशी रात्री पासुनच ती फोनची वाट पाहत होती. त्यामुळे सकाळी समरचा फोन पाहून ती खुश झाली.
"मग आज काय प्लॅन ?"
" आज येणार आहेत सगळे घरी. बघू, आई काय मेन्यु करतेय."
"बरं, मग संध्याकाळी एक सरप्राईज तुला माझ्याकडून. बी रेडी."
" म्हणजे तू मुंबईला आला आहेस. केव्हा आलास. संध्याकाळी येणार आहेस का? सांग ना." ती भरभर बोलत होती.
" हो. हो येतो मी. भेटू. बाकी किती बोलतेस तू पिठाची गिरणी !"
" असु दे. ओ.के. बाय बाय " ती चिडक्या स्वरात ती म्हणाली आणि समर येणार असल्याची बातमी आईला सांगायला किचनमध्ये पळाली.
संध्याकाळी समर थोडा लवकरच सायलीच्या घरी पोहचला. त्याची गाडी गॅलरीतून पाहताच ती धावत खाली आली.
" हॅल्लो. मेनी मेनी हॅपी रिटर्नस अॉफ दि डे." छानसा पुष्पगुच्छ सायलीच्या हातात देत त्याने शुभेच्छा दिल्या.
" हाउ आर यु? केव्हा आलास ?" ती पुष्पगुच्छावरुन हात फिरवत म्हणाली.
" काल संध्याकाळीच आलो. बाकी सगळे नाही आलेत का ?"
" नाही. म्हणजे पोहचतील इतक्यात."
" ओके. वेट अ मिनिट." त्याने पुन्हा गाडीपाशी जातं विंडिओमध्ये डोकावून सिटवरुन काहीतरी बाहेर काढलं.
" हे काय! " सायली पुढे येत कुतुहलाने म्हणाली.
" सरप्राईज. युवर गिफ्ट " ते गिफ्ट तिच्या हातात देत तो म्हणाला. काहीतरी चौकोनी फ्रेमसारखं असावं असं तिला जाणवलं.
"काय आहे यात?"
" बघ उघडून नंतर. मी कसं सांगू ?"
" बरं, चल आत ये." ती छानसं हसली.
" आई, समर आलाय."
" अरे, केव्हा आलास मुंबईत." आई आतून पाण्याचा ग्लास घेऊन येत म्हणाली.
" कालच आलो संध्याकाळी "
" बरं, तुमचं चालु दे. आई मी हे आत ठेवून येते." सायली रुममध्ये निघून गेली.
" काय मग समर साहेब काय म्हणतंय तुमचं बेंगलोर?" आई सोफ्यावर गप्पा मारायला बसली.
" मस्त. कंपनी छान आहे. कलिग्ज चांगले आहेत.अजून काय हवं!" तो हसत म्हणाला
" आणि एक गुडन्युज माहितीय का? कंपनीच्या मुंबईच्या शाखेत मी रुजु होणार आहे."
"अरे व्वा! अभिनंदन. बरं झालं तुझे बाबाही घरी एकटेच असतात." आईने त्याचं अभिनंदन केलं.
" मग पुढे काय प्लॅन?" आई रिकामा ग्लास उचलून किचनमध्ये गेली.
" म्हणजे ? "
" हेच रे लग्नाचं वगैरे! मी पण सायलीच्या मागे लागून कंटाळले. तिच्यासाठी स्थळं पाहायला हवी आता. तिच्या बाबांच्या कानावर घातलंय मी पण बाईसाहेबांचा मूड पाहून विषय काढू." आई आतून आमटीला फोडणी देत बोलत होती. पण ते शब्द समरच्या कानावरून फक्त वार्यासारखे फिरत होते. 'सायलीचं लग्न ' या कल्पनेनंच त्याचा उत्साह, आनंद गळून पडला. आपण काय ऐकतोय ते त्याचं त्यालाच उमगत नव्हतं. ती बोलत होती आणि मधून मधून समरचं म्हणणं विचारत होती. तो आईच्या बोलण्याला होहो म्हणाला आणि स्तब्ध बसुन राहिला.आई आतून बोलतच राहिली........
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा