दुर्लक्ष करायला शिका म्हणजे सुखी व्हाल....

सुखी होण्याचा कानमंत्र.
नाती म्हटलं की अपेक्षा आल्याच आणि अपेक्षा भांगाच दुःख पण आलंच. काही नाती जन्मताच येतात तर काही नाती आपण आपल्या मर्जीने निर्माण केलेली असतात. काही नाती ही आयुष्यात त्रास देण्यासाठीच जन्माला आलेली असतात. मग ती रक्ताची असो किंवा आपण निर्माण केलेली. आपण प्रत्येक वेळी प्रत्येक नात्याला योग्य तो न्याय आणि सारख्या प्रमाणात आनंदी ठेवू शकत नाही. तशी अपेक्षाच मुळात चुकीची आहे. थोडे कमी जास्त होणार कधीतरी कुणीतरी आनंदी होणार तर कधी कोणी दुःखी. पण म्हणून काय कोणी नाती सोडून देत नाही किंवा संपवून टाकत नाही. हाताची पाची बोटं सारखी नाहीत त्यामुळे सगळेच छान आनंदी कसे राहू शकेल ?? 

नात्यात प्रेम,विश्वास,आपुलकी,जबाबदारी,आपलेपणा,समंजसपणा हा असायलाच हवा. तो ही दोन्ही बाजूंनी. तरच ते नाते टिकून रहाते,जीवंत रहाते. एकाने आग झाले तर दुसऱ्याने पाणी व्हावे लागते, समोरच्या व्यक्तीचे नेमके म्हणणे काय आहे, समोरच्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे ओळखून घ्यायला हवे. एकमेकांना नीट ओळखून घेण्यासाठी ठराविक काळ जायला हवा तरच सगळ्या गोष्टी साध्य होतील. 

पण कधी कधी सगळे काही करूनही काही नाती टिकत नाहीत आणि टिकवता येत नाहीत. त्यामुळे ताण तणाव निर्माण होतो, मानसिक खच्चीकरण होते अगदी डिप्रेशन मधे जाण्याची वेळ येते. हे का होते कारण त्या नात्यांची गरज फक्त त्रास करून घेणाऱ्याला असते दुसऱ्या व्यक्तीला नाही. काही लोकांना सवय असते किंवा स्वभाव असतो पटकन विश्वास ठेवण्याचा, एखाद्याला अगदी जवळचे मानण्याचा आणि अशा व्यक्ती आयुष्यातून निघून जात आहेत ही कल्पनाच सहन होत नाही आणि करता येत नाही. अशा स्वभावाचा लोक गैरफायदा घेतात आणि उगाच त्रास द्यायाला सुरुवात करतात. घरातही अशी बरीच माणसं असतात जी उगाच कुरबुर करत राहतात. सासू सुनेचे , नवरा बायको चे, बॉस नोकर, मालक कामगार तर कधी कधी मैत्रीत पण असे होते की एखादा उगाच छोट्या छोट्या गोष्टी वरून वाद घालत रहातो आणि दुसरा वैतागून जातो नेहमीच्या कटकटल. पण रोजचे मडे त्याला कोण रडे असे होऊन जाते. या लोकांचा रोजच संबंध येतो आणि कसे हाताळावे समजत नाही. अशा वेळी सरळ दुर्लक्ष करावे म्हणजे आयुष्यात सुखी व्हाल...