काही काळ अलिप्तता हे मानसिक अस्वस्थेतेवर एक गुणकारी औषध आहे..

माहितीपूर्ण लेख.

'काही काळ अलिप्तता' हे मानसिक अस्वस्थतेवर एक गुणकारी औषध.

अजिंक्य अत्यंत हुशार आणि देखणा मुलगा. शेखर आणि अजिंक्य हे खास मित्र. शेखरला अजिंक्यचा स्वभाव खूपच आवडत होता. आपल्या थोड्या चीडक्या स्वभावाच्या बहिणीला असाच हुशारीने हाताळणारा मुलगा हवा म्हणून एकदा त्यानेच आवर्जून आपल्या बहिणीची म्हणजेच शिवानीची भेट अजिंक्य सोबत घडवून आणली. शिवानी पण चुणचुणीत आणि हुशार होतीच. पण कोणत्याही गोष्टीवर पटकन रिऍक्ट होण्याचा आणि रागीट असा तिचा स्वभाव होता. पण हळू हळू शेखरच्या अंदाजाप्रमाणे शिवानी आणि अजिंक्यच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. शेखरने त्यांचे लग्न धूमधडाक्यात लावून दिले. 

अजिंक्यची फॅमिली मोठी होती. म्हणजे घरात आई, बाबा, काका, काकू,त्यांची मुले, आजी, आजोबा सगळेच होते. त्यात अजिंक्य हुशार असल्याने सगळ्यांचा लाडका होता आणि त्याच्यामुळे शिवानी पण सगळ्यांची लाडकी सून झाली होती. बघता बघता दिवस जात होते. शेखर आपल्या लाडक्या बहिणीला सुखात पाहून मनोमन सुखावला होता. तर शेखरचा निर्णय योग्य ठरल्याने त्याचे आई बाबा पण आनंदी होते. 

अजिंक्यची फॅमिली मोठी असल्याने शिवाय तोच सगळ्यात मोठा असल्याने घरातल्या बऱ्याच जबाबदाऱ्या तो स्वतः हुन पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता. त्याची भावंडे त्याच्या पेक्षा लहान होती आणि शिकत होती त्यामुळे त्यांना काय हवं नको ते अजिंक्य बघत असे. शिवाय आजी आजोबाचे वय झाल्याने त्यांचा दवाखाना ही अजिंक्यच करत होता. अर्थातच त्यामुळे शिवानीचे पाहिजे तितके हट्ट तो पुरवू शकत नव्हता. त्यात शिवानीचा स्वभाव सडेतोड बोलणारा असल्याने तिला काही खटकले की ती सरळ अजिंक्यला सुनावत होती. मग आपण कुठे आहोत, कोणासमोर बोलतोय याचे भान तिला रहात नव्हते. एकदा तिने अजिंक्यला नवे मेकअप किट हवे आहे असे सांगितले आणि नेमके त्याच वेळी त्याच्या भावाची एक्झाम फी भरायची होती त्यामुळे अजिंक्यने ती फी भरण्यासाठी पैसे दिले. त्याचा शिवानीला राग आला आणि सगळ्यांसमोर तिने अजिंक्यला बरेच सुनावले.

त्यामुळे अजिंक्य ही चिडला आणि बेडरूममध्ये आल्यावर तो शिवानीला म्हणाला, लहानपणी बाबा फारसे कमवत नव्हते तेंव्हा काकानेच माझ्या शिक्षणाचा सगळा खर्च केला. कधीच मला कोणत्या गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. एकवेळ त्यांनी स्वतःची मुलं बाजूला ठेवली पण मला काहीही कमी पडू दिलं नाही. आज भलेही बाबा कमवत आहे आणि काकाचा अपघात झाल्यामुळे तो कमवत नाही मग अशा वेळी मी काकासाठी माझ्या भावांसाठी काही केलं तर बिघडलं कुठं ?? तुझा मेकअप किट महत्त्वाचा होता की परीक्षा फी ?? तुला घेईन मी किट पण जरा थांब ना. लगेच सगळ्या गोष्टी कशा मिळतील ?? पण शिवानी चिडली होती ती चिडलीच होती. माझ्यापेक्षा अजिंक्यला त्याचीच फॅमिली कशी महत्त्वाची आहे हे तू पुन्हा दाखवून दिलं असेच ती म्हणत होती. तुझी फॅमिली तर तुझ्या सोबत आहेच आणि असणार पण मी तुझ्यासाठी माझे घर सोडून आले त्याचे तुला काहीच नाही असे म्हणत होती. आणि शिवानीला कसे समजून सांगावे हे काही अजिंक्यला समजत नव्हते. शेवटी त्याने सगळा प्रकार शेखर सोबत डिस्कस केला पण त्यानेही त्याच्याच बहिणीची बाजू घेतली आणि त्याला चुकीचे ठरवले. माझा घट्ट मित्रच मला समजून घेऊ शकला नाही ही सल मात्र अजिंक्यला खूप अस्वस्थ करून गेली होती.

जसे दिवस जात होते तसेच शिवानी आणि अजिंक्यमधे मतभेद वाढत होते पण त्याचा परिणाम त्याच्या मानसिक स्वास्थ्यावर होत होता. घरातल्याना त्याची मानसिक घालमेल समजत होती आणि शक्य तितके ते अजिंक्यला समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी घरातल्या लोकांनी इथून पुढे तू घरातल्या सगळ्या जबाबदारीतून मोकळा हो आणि तुझी बायको म्हणते तस् तिच्या इच्छा पुरव असे सांगितले पण त्याला काही ते मान्य होईना. एकीकडे घरातली लोकं कुठेतरी दुखावली होती, जवळचा मित्र समजून घेत नव्हता आणि जिच्यावर प्रेम केले त्या अर्धांगिनीने मनाच्या चिंध्या केल्या होत्या. या सगळ्यामुळे अजिंक्य मनाने खचला आणि या सगळ्यांवर उपाय म्हणून ट्रान्स्फर मागून घेतली. ती पण अशा ठिकाणी जिथे शिवानी त्याच्या सोबत येणार नाही. कारण एकमेकांच्या जवळ राहून वादात भर घालण्यापेक्षा सगळ्यांपासून काही काळ अलिप्तता ठेवूनच नात्यांची आणि मानसिक आरोग्याची घडी नीट बसेल हे त्याला माहीत होते. कारण त्याचे बाबा त्याला नेहमी सांगत 'काही काळ अलिप्तता' हे मानसिक अस्वस्थतेवर एक गुणकारी औषध आहे.