शांताबाई शेळके यांची मराठीतून माहिती(Information About Marathi Poetess Shantabai Shelke)

Information About Marathi Poetess Shantabai Shelke
प्रिय सखये l तव संगतीत मी
रंगविले अवघे मम जीवन
स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभता
पाझर फुटले पाषाणातून

शांताबाई असं कवितेशी असणारं त्यांचं नातं आपल्याला उलगडून सांगतात. शांताबाईंच्या कविता म्हणजे भावगीत आणि भावकविता यांचा सुंदर मिलाफ.

शांताबाईंना कवितेकडे ओढून नेणारी पहिली गोष्ट शब्द हीच होती. त्यांचा साहित्य विश्वातला प्रवास शब्दावरून अर्थाकडे आणि नंतर गीतांकडे झाला.

शब्द या विषयावर गप्पा मारायला शांताबाई शेळके यांना खूप आवडत असे. डोईवरचा पदर उजव्या हाताने सावरत, चष्म्याआडचे डोळे मोठे करत, त्या शब्दांच्या गमती सांगत. झक्कपैकी मांडी घालून बसत. स्वतःच्या रेखीव अक्षरातले टीपण बाजूला ठेवलेले. नादयुक्त स्वरात त्या सांगत "अगदी लहान असल्यापासूनच मला शब्दांच आकर्षण होतं. म्हणूनच मी साहित्याकडे वळले असावे. वेगळा शब्द कानावर पडला की, मी भारून जायची. लिमिट ची गोळी लहान मुलं चघळतात ना तसा तो शब्द मनात घोळवत राहायची. आता पहा 'चेटूक चांदणं' म्हणजे पहाटेच्या वेळी पडणार शुक्राच चांदण. पक्षी त्याला फसतात. पहाट झाली समजून आकाशात उडतात. चांदणं चेटूकच करतो ही कल्पना किती छान आहे नाही."

पैठणी, चंद्रकळा यासारख्या कवितांमधून शांताबाई स्त्रीच्या नाजूक मनाचे अनेक पदरी पैलू वाचकांना उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करतात.


फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करून
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग तिचा सुंदर धानी

शांताबाई आपल्या पैठणी या कवितेत आपल्या आजीचे म्हणजेच त्या काळच्या गृहिणीचे छान शब्दचित्र रेखाटतात. आजीच्या त्या पैठणीचा पदर नारळाच्या नक्षीचा, चौकडा असणारा आणि धानी रंगाचा म्हणजेच हिरव्या रंगाचा आहे. त्या कल्पना करतात की, त्यांची आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली असेल. डोक्यावरचा पदर सांभाळत, साऱ्यांच्या पाया पडली असेल. मंगळागौर, हरतालिका आणि त्यानंतरच्या प्रत्येक सणावाराला अजीनेही पैठणी नेसून अनेक पूजा आणि व्रते केली असतील.

लग्न, मुंज, बारसं प्रत्येक वेळी आजीने पदरला खस, हिनाचं अत्तराचे बोट लावलं असेल. अंबाड्यात शेवंती आणि मोगरा, चमेलीचा गजरा माळतांना आजोबांनी तिला डोळे भरून पाहिलं असेल.

अल्लड वयात लग्न होऊन सासरी गेलेली आजी मग आपसूक संसारात रमली असेल. संसारात रमतांना आयुष्याचे चढ-उतार झेलताना आजीचा हट्टी, शिस्तप्रिय, कडक आणि आग्रही स्वभाव प्रेमळ, मऊ झाला आणि मग एक दिवस सौभाग्याचं लेणं लिहून आजी निवर्तली.

या कवितेतील शेवटचं कडवं फारच बोलकं आणि भावविभोर करणार आहे.

कधीतरी ही पैठणी
मी धरते उरी कवळून
मऊ रेशमी स्पर्शामध्ये
आजी भेटते मला जवळून
मधली वर्षे गळून पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यांनो
आजीला माझ्या कुशल सांगा

आज ही अनेक वर्षानंतर कवयित्री आजीची ती पैठणी आपल्या दोन्ही हातात छातीशी घट्ट धरते. त्या पैठणीच्या मऊ, रेशमी, तलम धाग्यातून मग आजी कवयित्रीला भेटते. दोघींचा स्पर्श संवाद होतो आणि कवयित्रीचे क्षेम कुशल आजीला सांगण्याचे काम पैठणीचे धागे अगदी इमानदारीने पार पाडतात.

अशीच आणखीन एक सुंदर कविता म्हणजे 'चंद्रकळा'

आठवणीतील चंद्रकळेचा
गर्भ रेशमी पोत मऊ
गर्भ रेशमी पदरापोटी
सागर गोटे नऊ खाऊ

खरंतर काळी चंद्रकला ही महाराष्ट्रीयन स्त्रिया संक्रांतीच्या सणाला, त्यातल्या त्यात नव्या नवरीच्या पहिल्या संक्रांत सणाला घालतात. त्याची आठवणच जणू शांताबाईंनी या कवितेतून पुन्हा एकदा ताजी केली आहे.

पूर्वीच्या काळी मुलींचं लग्न अगदी लहान वयातच व्हायचं. अगदी खेळ खेळण्याच्या वयात, म्हणूनच कवयित्री म्हणते की, तिची चंद्रकळा आहे ना तिचा पोत कसा होता? तर अगदी गर्भ रेशमी आणि हाताला मऊसूत वाटत होता‌ अगदी लोण्यासारखा आणि त्याच्या पदराभोवती काय करत होतो आम्ही? तर सागर गोटे खेळत होतो.

त्या काळ्या चंद्र कळेवर इतकी सुंदर पांढऱ्या रंगाची नक्षी होती, जणूकाही तिळगुळानेच ती रेखाटली होती, आणि कवयित्रीला असं वाटतं की ती नक्षी ती वारंवार हाताने स्पर्श करून बघते आहे. नवीन कोऱ्या कपड्याचा येणारा तो मंद हलकासा दरवळ कवयित्रीला अगदी हवाहवासा वाटतो आणि तो जो सुंदर परिमळ आहे ना! त्यानेही कवयित्रीचे मन अजूनही तरुण होतं.

आजच्यासारख्या त्याकाळी मुलींना हसण्या बोलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं म्हणून मग आपल्या ओठांसमोर तो पदर धरून मैत्रिणी काहीतरी खुसखुसू करायच्या आणि लाजऱ्या, बुजऱ्या होऊन पुन्हा गोड हसायच्या.

या कवितेच्या शेवटच्या कडव्यात शांताबाई म्हणतात-

आठवणीतील चंद्रकळेवर
हळदी कुंकू डाग पडे
संक्रांतीचे वाण घ्यावया
पदर होत असे सहज पुढे

संक्रांतीच्या सणात ही काळी चंद्रकळा नेसून, सगळ्या मैत्रिणी मग एकमेकींच्या घरी जायच्या. एकमेकींना हळदीकुंकू लावायच्या आणि संक्रांतीचे वाणही लुटायच्या. हे सगळं करताना सहाजिकच त्या हळदीकुंकवाचे डाग पदराला लागायचे आणि मग संक्रांतीचे वाण पदरात घेऊन त्या आपापल्या घरी परतायच्या.


नववर्षाला आपण सगळेजण एकमेकांना शुभेच्छा देतो आणि नववर्ष सुख समाधानाचे जावो याविषयी अभिष्टचिंतन करतो, पण सरत्या वर्षा विषयी आणि मागे पडलेल्या काळाविषयी शांताबाईंची कविता काय म्हणते ते बघा…


कुठले पुस्तक कुठला लेखक
लिपी कोणती कसले भाकीत
हात एक अदृश्य उलटतो
पाना मागून पाने अविरत
स्वतः स्वतःला देत दिलासा
पुसत डोळे हसता हसता
उभी इथे मी पसरून बाहू
नववर्षा रे तुझ्या स्वागता
शांता शेळके.


दरवर्षी 31 डिसेंबरच्या रात्री आपण नववर्षाचे जल्लोषात स्वागत करतो आणि येत्या वर्षासाठी आप्तेष्टांना शुभेच्छा देतो. सरत्या वर्षाने काय दिले आणि येणाऱ्या वर्षाचे संकल्प असा सगळा हिशेब सारेच जण मनात मांडत असतात.

पण खरंच काही गोष्टी गुढ अनाकलनीय आणि मानवी आवाक्याच्या बाहेरच्या असतात. त्यांचा कितीही शोध आणि बोध घ्यायचा प्रयत्न केला तरी हाती काहीच येत नाही.

वर्षा मागून वर्ष धावत असतात. त्याच्यासह आपणही पळत असतो. पण काळ-वेळ-पैशाचा ताळेबंद कधीच लागत नाही.

वरच्या कवितेत शांताबाईंनी मानवी मनाचे छान चित्रण केले आहे. आयुष्याची पाने भराभरा उलटत काळ पुढे सरकतो आहे, काही सुखद काही वेदनादायी आठवणींच्या ठेवी मनाच्या कुपीत आरक्षित होत आहेत. परिस्थिती कितीही विपरीत असली तरी आपण सारे स्वतःच्या मनाला दिलासा देत पुढे जात राहतो हो ना? येणारे वर्ष सुख समाधानाचे आणि समृद्धीचे असेल या आशेच्या सुंदर फुलपाखरा मागे आपण सारी दुःख विसरतो.


कवितेशी असलेले शांताबाईंचे नाते सर्वात जवळचे. रविकिरण मंडळाच्या प्रभावातून बाहेर पडल्यावर त्यांची कविता अधिक अंतर्मूख, चिंतनशील व प्रयोगशील होत गेली. चित्रपटात गाणी कशी लिहावीत याचा वस्तू पाठ त्यांना भालजी पेंढारकरांनी दिला.

भलजींच्या स्वराज्याचा शिलेदार साठी ची गाणी जमेना म्हणून शांताबाई आल्या तेव्हा भाजी त्यांना म्हणाले, "सिनेमाची गाणी अगदी सोपी हवीत आपण एकमेकांशी बोलत आहोत अशा भाषेत लिहा आपोआप सुचेल". त्यानंतर चित्रपटासाठी कितीतरी अविस्मरणीय गीते शांताबाईंनी लिहिली. हृदयनाथ मंगेशकरां सोबत त्यांची सर्वात गाजलेली आणि लोकप्रिय झाली ती कोळीगीते.

माझी या शब्दांवरी माझा ठसा माझा ठसा
हे शब्द माझे चेहरे आणि हे शब्द माझा आरसा

असं म्हणणाऱ्या शांताबाईचा ठसा त्यांच्या सर्वच लेखन प्रकारावर उमटलेला आहे.


'माझे लेखन कशासाठी?' या आत्मपर लिखात शांताबाई म्हणतात, "जगण्यासाठी मी जी धडपड केली, तिच्या खालोखाल साहित्यासाठी मी धडपडत राहिले. आणि कित्येकदा तर साहित्यच मला जगण्यासाठी उपयुक्त ठरले. साहित्याइतके दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने मला कधी भारून टाकले नाही. बालपणापासून मी शब्दांच्या प्रेमात पडले. शब्दांनी नादवून गेले. शब्दांशी खेळत राहिले. नदीच्या मुखातून समुद्रात शिरावे तसे, मी लिपी ओळखू लागण्याच्या आधी ऐकलेल्या शब्दांच्या द्वारा अर्थाच्या साम्राज्यात प्रविष्ट झाले. शहरातूनच पण शहरांच्या पलीकडे जावे असे मला वाटते. शब्द हा मला जगाशी जोडणारा सर्वात मोठा दुवा आहे. माझ्या कवितेतून चाललेला हा माझा आणि माझ्या संदर्भात जगाचा शोध कधीच संपू नये असे मला वाटते.

या माझ्या दीर्घ लेखन उद्योगाची फलश्रुती काय?, किती यश पदरात पडले?, शेवटी मी काय कमावले?, काय गमावले?, आणि यश म्हणजे तरी नेमके काय?, माझ्या दृष्टीने या प्रश्नांना फारसे महत्त्व नाही. महत्त्व आहे ते माझ्या छंदांचे, आनंद आहे, कृतर्थता आहे. ती त्याच्या अखंड साधनेत. सततच्या पाठपुराव्यात. हा पाठपुरावा कधीही संपू नये असे वाटते.

शांताबाई आयुष्यभर हा पाठपुरावा करत राहिल्या.

मला वाटते रे नवा जन्म घेवू
नवा विश्वास गुंफू नवे गीत गावू
अशी वाहते मी स्वरांच्या प्रवाही
मिळो तिर किंवा दरी खोल जावू
जुना गाव राहे कुठे दूर मागे
नव्या पावलांनी नवी वाट देवू
नवे चित्र साकारूनी ये समोरी
उभी स्वागता मी उभारून बाहू

शांता शेळके.


©® राखी भावसार भांडेकर