इन्फिनिटी- भाग-2

कथामालिका


कथा: इन्फिनिटी-भाग 2
विषय : सामाजिक कथा
राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा
टीम : अमरावती


अमर मुळातच अतिशय बुद्धिमान होता. शाळा, अभ्यास हे त्याच्या आवडीचे. विज्ञान म्हणजे त्याचा जीव की प्राण, प्रचंड आवडता विषय. विज्ञानातले विविध शोध, त्यातला इतिहास त्याला तोंडपाठ होते. नवनवीन प्रयोग करून बघायला त्याला आवडायचे.

रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत तो रमायचा आणि आता तर देव, धर्म यांच्याशी वैर पत्करल्यामुळे विज्ञानासोबतची त्याची गट्टी अधिक पक्की होत चालली होती कारण देवाला हरवायचे तर विज्ञान हेच एकमेव शस्त्र ही त्याची ठाम समजूत होती.

तो अधिकाधिक वेळ प्रयोगशाळा आणि ग्रंथालय इथे रमू लागला आणि त्याचे बाबा आता जास्तीत जास्त वेळ देवळातच थांबू लागले होते. सगळ्या प्रथांचा इतका पगडा त्यांच्या मनावर होता की सतत त्यातच ते अडकून रहायचे.

नंतर नंतर तर दिवस आहे की रात्र हे भान सुद्धा त्यांना राहत नव्हतं, सतत देवपूजा फक्त. आणि देव देव करतच एके दिवशी त्यांचा देवळाच्या पायरीवरचं दुर्दैवी मृत्यू झाला.

अमरच्या मागचे सगळे पाश तुटले होते आणि त्याने अभ्यासात स्वतःला झोकून दिले.

अतिशय उत्तम गुणांनी दहावी उत्तीर्ण होऊन त्याने मामाच्या मदतीने शहरातील कॉलेजमध्ये प्रवेश मिळविला. आता त्याचे जग विस्तारले होते आणि त्याची अभ्यासाची भूक पण वाढली होती.

संशोधन कार्य करणाऱ्या वरिष्ठ विद्यार्थ्यांना तो मदत करायचा आणि स्वतःचे वेगवेगळे प्रयोग सुद्धा करत असायचा. विज्ञान, तंत्रज्ञानातील प्रगती त्याला अचंबित करत होती. त्यांच्या साहाय्याने जीवनात यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे हे त्याचे ध्येय बनले होते पण देवाधर्माबाबतची तिडीक त्याच्या डोक्यात अजूनही कायम होती.

दिवस जात होते, अमर यशाची एक एक पायरी चढत यशोशिखराकडे वाटचाल करीत होता. स्वबळावर, स्कॉलरशिप मिळवून उच्च शिक्षणासाठी त्याने अमेरिका गाठले.

तिथेही त्याच्या बुद्धिमत्तेचे, हुशारीचे नाणे खणखणीत वाजले आणि त्याने कधी मागे वळून बघितले नाही.

आणि आज अमर एका प्रतिथयश संस्थेत सिनियर वैज्ञानिक होता. सगळ्यांना त्याच्या हुशारीचे कौतुक होते, त्याच्याप्रति आदर होता.
त्याचेही वागणे, बोलणे अदबीचे होते. अहंकाराने त्याला स्पर्शही केला नव्हता.

संस्थेत त्याच्याही पेक्षा एक सिनियर वैज्ञानिक होते, राकेश, ते सुद्धा भारतीय त्यामुळे त्या दोघांत एक छान मैत्रीपूर्ण नाते निर्माण झाले होते. पण अमर त्यांचा योग्य मान राखून वागायचा, बोलायचा.

अमरने सगळं मिळवलं होतं. मान, सन्मान, प्रतिष्ठा, पैसा...जगातले सगळे सुख त्याच्या पायाशी लोळण घेत होते. पण तरीही तो खुश नसायचा, अस्वस्थ असायचा. हे राकेश सरांच्या लक्षात आले होते.

झपाटल्यासारखा अमर संशोधन करतोय, कसल्यातरी प्रयोगात गढला आहे हे राकेश सर बरेच दिवसांपासून बघत होते. शेवटी एक दिवस त्यांनी अमरला विचारलेच आणि त्यानेही हातचे काहीही राखून न ठेवता त्याचा भूतकाळ त्यांना सांगितला आणि त्याचे ध्येय देव-धर्म यांचे अस्तित्व अमान्य करणारे, त्याला ते सिद्ध करायचं हे ऐकून राकेश सर काळजीत पडले.

राकेश सर वैज्ञानिक होते तरी त्यांच्या आयुष्याला धर्माचे अधिष्ठान होते. अंधश्रद्धा नक्कीच नाही पण ईश्वरी शक्तीवर त्यांची श्रद्धा नक्कीच होती.

" अमर, काय बोलतो आहेस तू? धर्म त्याच्या जागेवर आणि विज्ञान त्याच्या. यांची तुलना होऊ शकत नाही, विज्ञान श्रेष्ठ असते तर आज इतकी वैज्ञानिक प्रगती होऊन सुद्धा धर्माचे स्थान अबाधित राहिले नसते.
धर्मातील संकल्पना काळानुसार बदलू शकतात पण त्याचं अस्तित्व संपुष्टात येणे शक्य नाही."

"नाही सर, प्रयत्न केला तर देव आणि धर्माचे अस्तित्व नाही, त्याशिवायही आपण जगू शकतो हे सिद्ध होऊ शकते, नव्हे, ते मी करणारच आहे. त्यादृष्टीने माझे संशोधन हे अंतिम टप्प्यात पोहोचले आहे सर," अमर उत्साहाने बोलत होता.

"एक शेवटचा प्रयोग राहिला आहे आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा इथे उपस्थित असावे असे मला वाटते."

"अरे, मी उपस्थित राहीन, निश्चित. पण तू अजून एकदा विचार कर. तू करतोय ते योग्य आहे का? समाजमनावर त्याचा काय परिणाम होईल? आणि एक सांगतो अमर, लहानपणापासून देव-धर्म यावरील श्रद्धा ही आपल्या जवळच्या वडीलधाऱ्या व्यक्तींकडून मनात बिंबविली जाते आणि त्यामुळे ती श्रध्दा अमर आहे, ती पुसल्या जाणार नाही..."

"नाही सर,"त्यांचे बोलणे मधेच तोडत अमर म्हणाला,
"वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे धार्मिक अंधश्रद्धा, कुप्रथा मोडून टाकता येतात.

इतिहास बघा ना सर, किती अंधश्रद्धा होत्या त्या काळात. म्हणजे अगदी भूकंप, प्लेग, ज्वालामुखी इतकंच काय तर बदलणारे ऋतू सुद्धा देव करत असतो अशी समजूत होती. पण जसे जसे मानवाचे ज्ञान वृध्दिंगत होत गेले तसे तसे या विचारांमधील फोलपणा लक्षात आला आणि त्यांना पुराणकथेत सोडून देण्यात आले."

"पण तरीही श्रद्धाळू लोकांच्या भावनांशी खेळण्याचा हक्क तुला नाही अमर."

"मला भावनांशी खेळायचे पण नाही आहे सर. मला पुराव्यानिशी सिद्ध करायचे आहे की मनुष्य किंवा जीव कुठून आला यांत देव- धर्म यांचा रोल नाही."

"जीव कसा उत्पन्न झाला, याचा शोध घेण्याचा आजपर्यंत कितीतरी लोकांनी प्रयत्न केला अमर पण यश मिळाले नाही. बिग बँग थिअरी, तो प्रयोग यशस्वी नाही होऊ शकला, तुला माहिती आहे."

"हो सर, कारण त्यात अमर्याद उष्णता, घनता निर्माण झाली आणि आपले मन अमर्याद ही संकल्पना अजूनही समजू शकत नाही. इन्फिनिटी...अनंत म्हणजे काय हे समजणे सोपे नाही," राकेश सर एकाग्रतेने त्याचे बोलणे ऐकत होते.

अमर पुढे बोलू लागला, " प्रत्येक घटनेचा अर्थ मेंदू लावत असतो पण त्याला ते कार्य स्मूथली झालेलं आवडते, कारण त्या अर्थातून त्याला त्या घटनेचे ज्ञान मिळते. पण त्याला एखाद्या गोष्टीचा अर्थ नाही लावता आला तर तो गोंधळतो आणि मेंदू गोंधळला तर सगळंच डिस्टर्ब होणार म्हणून आपले जे अप्रगत पूर्वज होते त्यांनी न उलगडलेल्या घटनांना देव संकल्पनेशी जोडून टाकले आणि मेंदूतील गोंधळाला शांत केले. पण आपण आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सगळ्या घटनांचा अर्थ लावू शकतो तेव्हा देव धर्म कशाला हवा?"
अमरचे त्वेषाने बोलणे ऐकून राकेश सर विचारात हरवले.

"सर, लवकरच माझा प्रयोग यशस्वी होणार आहे, वेट अँड वॉच..."

राकेश सरांना धर्म आणि विज्ञान यांच्यातल्या संघर्षाची चाहूल लागली होती आणि पुढे काय होईल या विचाराने ते गंभीर झाले.


क्रमशः

(पुढे काय होईल? वाचा पुढील भागात)

कथेतील ऐतिहासिक आणि वैज्ञानिक संदर्भ स्रोत: गुगल(साभार)

© डॉ समृद्धी रायबागकर

🎭 Series Post

View all