इन्फिनिटी- भाग-4 (अंतिम)

कथामालिका

कथा: इन्फिनिटी-भाग 4 (अंतिम भाग)
विषय : सामाजिक कथा
राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा
टीम : अमरावती



अमर साशंक मनाने राकेश सरांसोबत निघाला. मंदिराच्या प्रशस्त आवारात गाडी शिरताच थंड हवेची झुळूक त्याला स्पर्श करून गेली आणि एकाएकी प्रसन्न वाटू लागले.


तो पार्किंग मध्ये थांबला आणि राकेश सर त्याला आग्रह न करता मंदीरात निघून गेले.

मंदिराचा परिसर एकदम स्वच्छ, नीटनेटका, डेरेदार वृक्षांनी सजलेला होता. अगदी कुणाचंही मन प्रफुल्लित करण्याची किमया त्या वातावरणात होती.

अमरला सुद्धा एकदम उत्साह वाटू लागला, मनाला उभारी वाटू लागली. आत जावे का? असा विचार क्षणभर त्याच्या मनात आला आणि तो चमकला.

अचानक त्याच्या लक्षात आले की प्रयोगशाळेच्या आवारातही त्याला असेच वाटते, उत्साही, प्रसन्न आणि आत शिरण्याची तीव्र इच्छा.

"राकेश सर म्हणाले तसे असेल का? मंदिर म्हणजे प्रयोगशाळा?
नाही, नाही, नाही... का भरकटतो आहे मी?
मंदिर, देव, धर्म थोतांड होते, आहे आणि राहणार..."

भूतकाळातली जखम भळभळत होती.

तितक्यात आरतीचे मंजुळ स्वर ऐकू येऊ लागले. अगदी तालात, मृदंगाच्या लयीत, घंटेच्या नादात, टाळ-चिपळ्यांच्या आवाजात सगळे वातावरण पवित्र ऊर्जेने भारून गेले होते जणू.

एका अनामिक ओढीने त्याचे पाय आपसूकच मंदिराकडे वळले.
मंदिराच्या प्रवेशद्वारात तो उभा होता आणि तितक्यात मंत्रपठण सुरू झाले.

एकसारख्या लयीत, शब्दांवर आघात देत, धीरगंभीर पण शांततेत होणारे एकसारखे उच्चार वातावरणात कंपन निर्माण करीत होते.

तरंग आणि ध्वनी यांच्याशी संबंधित भौतिकशास्त्रातील सगळे सिद्धांत अमरच्या मनात तरळून गेले.

असे ध्वनीचे कितीतरी प्रयोग त्याने प्रयोगशाळेत केले होते आणि जणू तेच प्रयोग सर्वसामान्यांनी करावेत म्हणून तर हे मंत्रपठण नसेल?

आवाज होता पण गोंधळ नाही तर, मनाला एक काहीतरी समाधानी व शांत वाटत होते, सुकून म्हणता येईल असे...

तितक्यात मंत्रपठण संपून संदीपभैया बोलू लागले,
"मंत्रपठण आपल्या आरोग्याशी निगडित आहे बरं का. एखाद्या अँटिव्हायरस सारखं हे काम करतं, मनाला शुद्ध आणि स्थिर करण्याचं. आणि मन शुद्ध, प्रसन्न असेल तर शरीरसुद्धा निरोगी राहतं..."

त्यांचे विचार, त्यांचा मृदू पण खणखणीत आवाज, प्रचंड आत्मविश्वास त्यांच्या ज्ञानाची साक्ष देत होते.

त्यांचं विद्वत्तापूर्ण बोलणं अमरला पटू लागले होते. खरंतर तो आश्चर्यचकित झाला होता, की एखाद्या धर्माचा अभ्यासक किंवा पंडित तर्काला धरून बोलतोय? विज्ञानाचे बोट पकडून चालतोय?
अमरसाठी हे नवीन होते कारण आतापर्यंत त्याने धर्म म्हणजे कुप्रथा किंवा कर्मकांड हेच बघितले होते, तेच त्याच्या मनात लहानपणापासून ठसले होते.

राकेश सरांनी अमरला दरवाज्यात बघितले. मंद हसत ते त्याच्याकडे गेले आणि त्याला आत घेऊन आले.

समोर फलकावर लिहिले होते, "वीतराग विज्ञान."

अमरला वाचून पुन्हा आश्चर्य वाटले. विज्ञान? आणि धर्मात?


पंडीत संदीपभैया "धर्म आणि विज्ञान" यावर आठ दिवस प्रवचन देणार होते.

अमरला आता उत्सुकता वाटू लागली होती आणि राकेश सरांसोबत तो सुद्धा 8 दिवस आता मंदिरात येणार होता, एक मानसशास्त्रीय प्रयोग म्हणून!

संदीपभैया रोज धर्मातील विज्ञान उलगडून सांगण्याचा प्रयत्न करीत होते. यात अमरला इंटरेस्ट वाटू लागला होता.

आपल्या प्राचीन काही धर्मग्रंथातील श्लोक, ओव्या यांत आयुर्वेद, आरोग्यविज्ञान, शरीरशास्त्र आहे हे त्याला माहिती होते पण अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या त्याला माहीती नव्हत्या हे आता त्याला उलगडत होते.

"अभिषेकासाठी वापरण्यात येणाऱ्या दूध, दही इ. वस्तू एका विशिष्ट पी.एच. च्या असतात. पी. एच. म्हणजे आम्लता मोजण्याचे परिमाण. त्यातून अनायन, निगेटीव्ह चार्ज असणारे, शरीरात जाऊन रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये जातात आणि रक्त शुद्धीकरण होण्यास मदत होते.

हे निगेटिव्ह आयन अभिषेकाव्यतिरिक्त फक्त निसर्गाच्या सानिध्यात, प्रदूषण नसेल तरच उत्पन्न होतात बाकी कुठे उत्पन्न होत नाही, म्हणूनच देवालय निसर्गरम्य ठिकाणी असले तर जास्त प्रसन्न वाटतं, नाही का?"


संदीपभैयाचे बोलणे ऐकून अमर प्रभावित झाला होता. या गोष्टींचा विचार या दृष्टीने त्याने कधी केलाच नव्हता. तो ऐकू लागला...

"मंदिरातील घंटा, पंचधातूनी बनलेली असते, त्यातील ध्वनी आरोग्यासाठी उत्तमच असतो तसेच मंदिरात लावतो ते तुपाचे दिवे सुद्धा वैज्ञानिक दृष्टीकोनातून महत्त्वाचे...."

"बापरे, किती विचार आहे या सगळ्या गोष्टींमागे. धर्माची ही बाजू तर मला माहीतच नव्हती, खूप चांगल्या गोष्टींना मुकलो मी नको त्या धारणा मनात पाळून, " अमरचे विचार सुरू होते.


रोज त्याला नवनवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या, त्याही अगदी तर्कशुद्ध पद्धतीने.

फक्त आरोग्यविज्ञान, मानसशास्त्रचं नाही तर खगोलशास्त्रातील बऱ्याच घटनांचा संदर्भ सुद्धा धार्मिक शास्त्रात सांगितला आहे, हे अमरला प्रथमतः चं कळत होते.

"लाखो वर्षांपूर्वी धर्मग्रंथात सांगितले गेले की लोकाकाश काय आहे, मनुष्य त्यातल्या फक्त एका भागात राहू शकतो, ते अतिविशाल आहे आणि बऱ्याच भागाचा शोध अजूनही लागला नाही...."

"अगदी बरोबर बोलत आहेत भैयाजी तर. आपल्या ग्रहमालेसारख्या इतरही ग्रहमाला अवकाशात आहेत, त्यावर संशोधन सुरूच आहे, त्या शोधण्यासाठी धर्मग्रंथातील ज्ञानाचा वापर नक्कीच करता येऊ शकेल....,"अमरचा धर्मावरचा विश्वास नकळत वाढू लागला होता.

पुढे संदीपभैयाने जे सांगितले ते ऐकून तर त्याला आतापर्यंत आपण किती मूर्ख होतो असे वाटायला लागले.

संदीप भैया सांगत होते, " धर्मग्रंथात कालाचे भेद सांगितले आहेत. सुषमा-सुषमा म्हणजे सुखच सुख, नंतर सुषमा, मग येतो सुषमा- दुषमा म्हणजे सुख आणि दुःख आणि नंतर दुषमा काळ म्हणजे फक्त दुःख व शेवटी दुषमा-दुषमा म्हणजे दुःखच दुःख असणारा काळ. जसा जसा काळ बदलला तसे तसे मनुष्याची उंची, शरीररचना, आयुष्य सगळेच कमी कमी होत गेले आणि आज आपण दुषमा काळात जगत आहोत."

"हे तर डार्विन ने सिद्ध केले होते ना? हा तर उत्क्रांतीवाद आहे. आधी डायनोसोर होते, मनुष्याचे पूर्वज ज्याला म्हटल्या जाते ते चिंपांझी सुद्धा शरीराने बरेच मोठे होते, हळूहळू त्यापासून आजचा मनुष्य उत्क्रांत होत गेला," अमर गोंधळला होता आणि खुश सुद्धा झाला होता.

"ग्रेट, जे आपल्याला बरीच वर्षे आधीपासून ज्ञात होते तेच आता विज्ञान सिद्ध करीत आहे.

राकेश सर,मला तर वाटते की जिथे संशोधन होऊ शकत नाही आहे, अडचणी येत आहेत तिथे धर्मग्रंथ मदत करू शकतील.

किती अफाट गोष्टी सांगितल्या आहेत यांत. मी चुकीचा होतो सर. माझ्या धर्मविषयक कल्पना चुकीच्या होत्या.

संदीपभैयाला भेटून जाणवतंय की विज्ञान त्या रटाळ भाषेत कदाचित सर्वसामान्यांना कळणे शक्य झाले नसते म्हणून विज्ञानात श्रद्धेचा एलिमेंट ऍड करून धर्माचे नाव दिले असावे का? आणि मग त्याचा बॉस म्हणजे देव. जेणेकरून सर्वसामान्य लोक श्रद्धेच्या नावाखाली सगळं आपलंसं करतील."

अमरचे बदलते विचार राकेश सरांना सुखावत होते. कारण अमरची प्रचंड बुद्धिमता त्याने विधायक कार्यासाठी वापरावी अशी त्यांची तीव्र इच्छा होती.

"अमर, संदीपभैया फक्त धर्मपंडितच नाहीत तर आधी भारतातल्याच एका प्रसिद्ध संस्थेत संशोधक होते, दोन्ही क्षेत्रातलं अफाट ज्ञान आहे त्यांचेकडे."

हे ऐकून तर अमरला आपण खुजे आहोत असे वाटू लागले.


"इतकंच नाही अमर, धर्मातून विज्ञान किंवा धर्मातील विज्ञान शिकवतानाच आज ज्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांच्या नावाखाली हिंसा, कुप्रथा सुरू आहेत, नरबळी, पशुबळी सारखे अघोरी कृत्य सुरू आहेत, त्यांचे उच्चाटन करण्याचे सामाजिक कार्य सुद्धा संदीपभैयानी हातात घेतले आहे.

उद्बोधनातून, काही छोटे प्रयोग करून ते समाजाला अंधश्रद्धेच्या गर्तेतून काढून श्रध्दामार्गाने प्रगतीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचे ध्येयचं ते आहे."

हे ऐकून अमरचा भैयाविषयीचा आदर दुणावला.


"सर, मी पूर्णतः समजून चुकलो आहे की मी एकांगी विचार करून माझ्यासोबत समाजाचेही नुकसान करत होतो.

पण धर्माची ही दुसरी बाजू खरंच आनंद देणारी आहे.

सर, मलासुद्धा संदीपभैयांच्या या कार्यात सहयोगी बनायचे आहे.
धर्माचा हात धरून विज्ञान आणि तंत्रज्ञानात यशाचे शिखर गाठायचे आहे.

अर्थात, यासाठी आधी सगळ्या धर्मग्रंथांचा नीट अभ्यास करणार आहे मी."

एका नव्या उमेदीने अमरचे डोळे लकाकत होते, राकेश सर त्याच्यासाठी खुश होते आणि तो ज्ञान प्रवासाला निघणार होता, पुन्हा शून्यातून इन्फिनिटीकडे....


समाप्त.
© डॉ समृद्धी रायबागकर, अमरावती

(वैज्ञानिक आणि धार्मिक माहिती: गुगल आणि काही धर्मग्रंथ)





🎭 Series Post

View all