इन्फिनिटी-भाग 1

कथामालिका

कथेचे शीर्षक: इन्फिनिटी - भाग 1

विषय: सामाजिक कथा

राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा

टीम: अमरावती

© डॉ समृद्धी रायबागकर, अमरावती


 "आत्मा अमर आहे, अविनाशी आहे. आत्म्याला कुणी जन्म देऊ शकत नाही तसेच कुणी पूर्णतः संपवू पण शकत नाही. एका शरीरातून दुसरीकडे त्याचे गमन होत राहते....,"  संदीप भैय्या धीरगंभीर आवाजात प्रवचन देत होते आणि मंदिरात त्यांच्यासमोर बसलेला अमर एकाग्रतेने ऐकत होता.

 "हा तर थर्मोडायनॅमिक्सचा सिद्धांत आहे,"  त्याच्या मनाने लगेच तुलना सुरू केली.

"एनर्जी कॅन नायदर बी क्रीएटेड नॉर बी डिस्ट्रोईड, इट कॅन ओन्ली बी कन्व्हरटेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर...., येस...हा तर कॉन्झरवेशन ऑफ एनर्जी चा सिद्धांत आहे..."  अमरला खूप आश्चर्य वाटले आणि त्याची उत्सुकता पण वाढली.

 "म्हणजे विज्ञानाने जे काही दशके आधी सिद्ध केलं ते आमच्या धर्माला आधीपासूनच ज्ञात होते? पूर्वजांना कल्पना होती? कसं शक्य आहे हे?"  अमर विचारात गढला.

 "आत्मा म्हणजे एक पवित्र ऊर्जा, ऊर्जेचा अखंड स्त्रोत...,"  संदीपभैयाचे हे शब्द ऐकून तर अमर अस्वस्थ झाला.

 "ऊर्जा म्हणजे एनर्जी....म्हणजेच आत्मा?"  त्याचे विचारचक्र वेगाने फिरू लागले.

 "धर्मामध्ये विज्ञान आहे? काय खरे काय खोटे समजेनासे झाले आहे अगदी,"  अमरच्या मनाची चलबिचल सुरू होती आणि खरंतर आपल्यासारख्या निरीश्वरवादी माणसाला असा विचार करणे भाग पडते आहे हे त्याला स्विकारताच येत नव्हते किंबहुना त्याला स्वीकारायचेच नव्हते. तो हादरला होता.

विचार करता करता सगळा भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागला होता.

(काही वर्षांपूर्वी)

 "अमर, ये अमर...कुठे कडमडलास?," अमरचे बाबा रागाने ओरडून आवाज देत होते.

शाळेत जायची तयारी करणारा अमर बाबांच्या समोर जाऊन उभा राहिला.

"अरे मूर्खा, या कलशात देवाच्या अभिषेकासाठी दूध ठेवले होते, कुठे आहे ते? कलश रिकामा कसा?"

"बाबा, आई तापाने फणफणली आहे, दोन दिवस झाले तिच्या पोटात अन्नाचा कण नाही, जेवण जात नाही आहे तिला, म्हणून दूध मीच दिले तिला प्यायला," अमर निडरपणे बोलत होता.

"अरे देवा, काय म्हणावे आता तुला? देवा, तूच सांग बाबा आता याला कसे समजवावे?," डोक्यावर हात मारत बाबा देवापुढे जाऊन उभे राहिले.

"देवा, माफ कर. आज तुला दुधाचा अभिषेक करू शकलो नाही. कोपू नकोस, तुझी कृपादृष्टी ढळू देऊ नकोस," हात जोडून अमरच्या बाबांची देवाला आळवणी सुरू होती.

त्यांचे विचार ऐकून अमरला हसायला आले.

"असा कसा देव हो तुमचा? भक्त उपाशी मेला तरी चालेल पण माझी दुधाने आंघोळ झालीच पाहिजे, नाहीतर मी कोपणार, असे म्हणणारा? मला तर वाटते बाबा की देव खुश झाला असणार, गरजवंताला मदत केली म्हणून, भुकेल्या आईला दूध प्यायला दिले म्हणून, तो अशिर्वादच देत असणार."

हे ऐकून बाबाच्या रागाचा पारा चढला.

"आता तू मला अक्कल शिकवणार? देवाच्या या पुजाऱ्याला? बंद कर तुझं थोबाड आणि चालता हो इथून, निघ लवकर. "

आईच्या तब्येतीची साधी चौकशीही न करणाऱ्या बाबांबद्दल आता त्याला घृणा वाटू लागली होती.

त्याचे बाबा एक अतिशय कर्मठ असे पुजारी. दारिद्र्य पाचवीला पुजलेले.मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या दोन छोट्या खोल्या म्हणजे त्यांचे घर. अतिशय कडक सोवळे, धर्मिकविधी पाळणारे त्याचे बाबा समाधानी मात्र अजिबात नव्हते, त्यामुळे सतत चिडचिड करायचे.

सतत देव, देव आणि फक्त देवच! बायको, पोरं यांच्याविषयी ना प्रेम, ना कर्तव्य अशी वागणूक.

अमर मोठा होत होता तसे तसे त्याला देव, धर्म आणि त्याचे बाबा यांबद्दल अढी निर्माण झाली होती.

त्याच्या आईला मिळणारी कस्पटासमान वागणूक, बायको म्हणजे फक्त घरातली धुणी-भांडी करणारी बाई असे बाबाचे वागणे, बोलणे किशोरावस्थेत असलेल्या अमरला अजिबात सहन व्हायचे नाही.
त्यांची चिडचिड सुरू झाली की त्याच्या माथ्यावरची शीर उडायला लागायची. पण आईचे संस्कार त्याला चूप बसवत होते.

लहानपणापासून आईने बिंबवले होते की काहीही झाले तरी मोठ्यांचा अनादर करायचा नाही, त्यांना उलटून बोलायचे नाही. आई बद्दल असणारा आदर आणि प्रचंड प्रेम यामुळे तीव्र संताप येऊनही तो चूप बसायचा.

पण तो वडलांपासून मनाने कधीचाच दूर गेला होता, आणि दूर गेला होता तो देव, धर्म, क्रियाकांड या सगळ्यांपासून!

केवळ औपचारिकता म्हणून देवाला हात जोडायला मंदिरात जायचा, तेही आई जबरदस्तीने पाठवायची म्हणून.
पण त्याच आईला होणारा त्रास हा या देवामुळेच आहे, असं कुठेतरी त्याच्या मनात ठसठसत होते. कारण देवाला, धर्माला पूर्णपणे वाहून घेतलेले त्याचे बाबा आज त्या सगळ्यांचे असते जर हा देव आणि धर्म नसता अशी त्याची ठाम समजूत होत चालली होती.

कोवळ्या मनावर परिस्थितीचे घाव बसत होते आणि अमर घुम्या होत चालला होता. हट्टी तो होताच आणि त्यादिवशी आईच्या तब्येतीपेक्षा देवाच्या अभिषेकासाठी हळहळणारा बाप बघून तर त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती.

त्या नंतर तो कधीही देवळातल्या गाभाऱ्यात गेला नाही. पायरीवरूनच देवाला हात जोडायचा, तेही फक्त आई म्हणायची म्हणून, आणि निघून जायचा.

अश्या परिस्थितीत जगता जगता त्यांच्या कुटुंबात त्याच्या छोट्या भावाचे आगमन झाले आणि तो आनंदून गेला. बाळाच्या अवतीभोवती राहायचा, त्याला सांभाळायचा, आईला मदत करायचा. छोटा भाऊ म्हणजे त्याचा जीव की प्राण. एक दिवस बाबा घरी आले तेच मुळी खूप सारे पूजेचे साहित्य घेऊन.

"अमरची आई, तयारी करा. सर्वांनी शेजारच्या गावात जायचे आहे, घृष्णेश्वराला," आईच्या काळजात धस्स झाले. त्यांच्या वाक्याचा अर्थ तिला कळला होता.

नवजात बालकाला घृष्णेश्वराच्या मंदिरात काही फूट उंचीवरून खाली फेकले जायचे आणि खाली झेलले जायचे. फारच भीतिदायक, अघोरी प्रकार पण देवभोळ्या लोकांची प्रचंड श्रद्धा असणारा!

देवावर अगाध श्रद्धा असणारे लोक या प्रकाराला देवाची कृपा समजायचे, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक जणू तिथे नाहीसा झाला होता.

आईने आणि अमरने खूप विरोध करूनही बाबांनी ऐकले नाहीच आणि अघटित घडले.

बाळाला वरून फेकले तेव्हा अपघात झाला आणि त्यात ते बाळ दगावले.

आईचा आणि अमरचा आक्रोश बघवत नव्हता. रडून रडून बेहाल झालेली आई बेशुद्ध पडली. तिच्या मनावर इतका जबरदस्त आघात झाला होता की ती सतत आजारी राहू लागली.

आघात अमरच्या मनावरही झाला होताच, मनातल्या मनात सतत कुढत राहून तो अगदी कोडगा झाला होता. आता बाबांची भीती त्याला वाटत नव्हती आणि देवळाच्या पायरीवर जाणे सुद्धा त्याने सोडले होते. देव आणि धर्म यांबद्दल तीव्र द्वेष त्याच्या मनात उत्पन्न झाला होता. त्यातच एक दिवस आई सुद्धा हे जग सोडून गेली आणि तो एकटा पडला.

इतकं होऊनही बाबाचं देव देव करणं खरंतर अंधश्रद्धा पाळणं काही बंद झालं नव्हतं.

शेवटी कंटाळून एक दिवस अमर देवासमोर उभा राहिला, "मजा वाटत असेल ना तुला आता देवा. काय मिळवलंस तू माझ्या आईला आणि भावाला मारून? हो, तूच मारलंस त्यांना आणि माझं जीवन उध्वस्त केलंस. माझे बाबा सतत तुझ्याजवळ नसते, आमच्याकडे लक्ष देऊ शकले असते पण नाही...त्यांची जेवढी चुकी आहे तेवढीच तुझी सुद्धा आहे देवा..."

अमर चिडून बोलत होता. बोलता बोलता त्याच्या अश्रूंचा बांध फुटला.

थोड्यावेळाने शांत झाला. काहीतरी मनाशी ठाम निश्चय त्याने केला होता.

"तू माझ्या जवळच्यांना दूर करून माझे अस्तित्वच संपवण्याचा प्रयत्न केलास. ज्यांच्यामुळे मी होतो आणि ज्यांच्यासाठी मी जगत होतो ते कारणच संपवलेस ना तू, ठीक आहे, तुझ्यासमोर आज मी स्वतःलाच चॅलेंज देतो की मी तुझे आणि तुझ्या धर्माचे अस्तित्व, तुझे महत्त्व पुसून टाकेन, आणि तेव्हाच पुन्हा या मंदिराची पायरी चढेन, तेव्हा तुला नक्की भेटायला येईल... "

एका दृढ निश्चयाने, काहीतरी पक्के ठरवून, तो देवळातून बाहेर निघाला.

क्रमशः


(अमर नेमके काय करणार आणि कसे, जाणण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा)


© डॉ समृद्धी रायबागकर, अमरावती

🎭 Series Post

View all