मोह, अंतिम भाग

Is It Infatuation ?
मोह
भाग ३ 

   लंगडत लंगडत शक्य तितक्या वेगाने पावले टाकत तो बाहेर आला. जरा उसंत घेण्यासाठी व्हरांड्यातील खांबाला खांदा टेकवून उभा राहिला. घाईघाईने पळत आल्यामुळे श्वास फुलला होता. छाती जोरात धडधड करत होती. चोरी करण्यासाठी घातलेला अंगावरचा काळा पोशाख जागोजागी फाटला होता. रक्ताने भिजला होता. एका पायाचा गुडघा फुटलेला. नजर कुठेतरी शुन्यात लागलेली. त्याच्या नजरेसमोर आत घडलेल्या गोष्टी येत होत्या. कसं बसं त्याने स्वत:ला सावरल. त्याच्या लक्षात आलं की त्याची पोतडी पळताना निसटून हॉलमध्येच पडली होती तो विचार त्याच्या मनात येतो न येतो तोच आत मधून काही आवाज येऊ लागले. अवजड वस्तू जमिनीवर इकडून तिकडे घरंगळत असल्यासारखा, सपाट वस्तू (जसे की त्या पेंटिंग्स) जमिनीवरून घासत गेल्यासारखे आवाज. पण मागे वळून दरवाजातून आत डोकावण्याचा विचारही त्याच्या मनात आला नाही तो तसाच डोळे मिटून उभा राहिला आतले आतले आवाज थांबले. तो हळूहळू डोळे उघडू लागला इतक्यात काहीतरी वजनदार वस्तू त्याच्या पाठीवर आदळली तो घाबरून ओरडला पण ते त्याचीच पोतडी होती मग मात्र तो क्षणभरही तिथे थांबला नाही पोतडी ( ती उघडी कशी याकडे त्याने लक्ष दिलं नाही ) पाठीवर टाकून पायऱ्या उतरून तो पळू लागला. एक वयस्क गृहस्थ आत येत होते त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना धक्का देऊन तो तिथून निसटला. 
       ते गृहस्थ कसेबसे उभे राहिले रस्त्यावर येऊन पाहिलं तर तो बराच लांबवर गेला होता त्यांनी पुन्हा आत येऊन बंगल्याकडे नजर टाकली, अन् त्यांचं शरीर झटका बसल्यासारखं थरथरलं. ते अचंब्याने व भीतीने समोर पाहतच राहीले बंगल्यातील खालच्या व वरच्या मजल्यावरील सर्व खोल्यातल्या लाईट्स लागून बंद होत होत्या तो बंगला एखाद्या रुबाबदार पण संतापून रौद्र रूप धारण केलेल्या वीर पुरुषासारखा भासत होता.

••• ••• •••

" मी लगोलग पोलिसांना कॉल करून बोलावून घेतलं." ते शेजारी राहणारे गृहस्थ बंगल्याच्या मालकाच्या नुकत्याच आलेल्या मुलीला सांगत होते. त्यांची मुलगी हैदराबादला जॉब करत होती. जवळ जवळ महिन्याभरा पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हा ती इथे आली होती. वडलांचे सर्व अंत्यविधी झाल्यावर आपल्या आईला घेऊन ती थोड्या दिवसांसाठी हैदराबादला गेली. त्यानंतर आज घरी परतली होती. आता ती इथेच स्थायिक होणार होती. ती ज्या कंपनीत कामाला होती तिच्या मुंबईतल्या ब्रांचला तिने बदली करून घेतली होती.
ती साधारण सत्तावीस अठ्ठावीस वर्षांची असावी. उंच, गोरीपान, अन गोड, हसऱ्या चेहऱ्याची होती. आता ती, तिची आई व शेजारचे ते गृहस्थ त्या बंगल्यातील हॉलमध्ये उभे होते.
" त्यांनी येऊन पूर्ण घराची तपासणी केली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे " :
     
   शेवटच्या पायरी पर्यंत रक्त सांडलेल होतं. त्यात उमटलेले पावलाचे पुसटसे ठसे दिसत होते. वर वर जात व्हरांड्यात ते आधिक क्लिअर दिसत होते. मोठा दरवाजा उघडून त्यांनी आत प्रवेश केला. हॉलमधील किंमती शो पीसेस, पेंटिंग्स, देवघरातील देवांच्या चांदीच्या मूर्ती इकडे तिकडे विखुरलेल्या होत्या. चोराने हे सर्व चोरण्याचा प्रयत्न तरी नक्की केला होता. पण मग काय झालं असावं ते समजत नव्हते. त्या रक्तात उमटलेल्या पावलांचा मागोवा घेत पोलिस जिन्याने वरच्या मजल्यावर गेले. ते डाग तुझ्या वडलांच्या रूममध्ये त्यांच्या बेडसमोर फूटभर अंतरावर थांबत होते. तिथून तो रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवरून खुरडत, सरपटत दरवाजा पर्यंत आला असावा असं खुणांवरून वाटत होतं. बाकी सगळी बेडरूम ठिकठाक होती. समोरची स्टडी रूम, आणि शेजारी असलेली तुझी बेडरूमही व्यवस्थित होती. पोलिस गेल्यावर मी सगळं घर स्वच्छ करून घेतलं. सामान जागच्या जागी नीट ठेवून दिले."

मग थोडावेळ गप्प राहून ते म्हणाले -

" हे बघ बाळा, मला माहित आहे तुझा अशा गोष्टींवर विश्वास बसणार नाही ; पण मला असं वाटतं तुझ्या वडिलांचा फारच कमी वयात अकाली मृत्यू झाला. त्यांना या आयुष्याचा, त्यांनी कमावलेल्या गडगंज संपत्तीचा पुरेपूर उपभोग घेता आला नाही. म्हणून त्यांचा अतृप्त राहिलेला आत्मा या संपत्तीच्या वासनेने, मोहाने या बंगल्यातच अडकून राहिला असावा. तुम्ही एकदा घराची शांती करून घ्या."
एवढं बोलून तिच्या पाठीवरून हात फिरवून ते गेले. ती संथपणे चालत वडलांच्या फोटोजवळ आली. मनातल्या मनातच त्यांच्याशी मूक संवाद साधू लागली.

" पपा, काकांनी घडलेल्या घटनेचा योग्य अर्थ लावला. मलाही असं वाटतं. नाही माझी खात्रीच आहे की तुम्ही इथे आहात ; पण ते तुम्हाला नीट ओळखू शकले नाहीत. तुम्हाला या प्रॉपर्टीचा, पैशांचा बिलकुल मोह नव्हता. तो तर त्या चोराला होता, जो त्याला नडला. तुमचा जीव जर कशात अडकला असेल, तर तो माझ्यात. तुम्हाला मोह झाला असेल, तर तो मला आणि आईला या आपल्या घरात सुखाने राहताना पाहण्याचा. हो ना पपा. मी आता इथेच राहील. आपल्या घरात ; पण.. पण तुम्ही हवे होतात पपा. तुम्ही का आम्हाला इतक्या लवकर सोडून गेलात." तिचा उत्साही चेहऱा उदासीन झाला. भावनिक झालेल्या तिच्या अंतर्मनात केवळ हेच चार शब्द उमटले.

" आय मिस यू, पपा."

समाप्त

आवडल्यास ग्रुपला भेट द्या - https://www.facebook.com/groups/758165158061766/permalink/993360487875564/?app=fbl

@ प्रथमेश काटे

धारपांच्या कादंबरीतील प्रसंगावर स्वतंत्रपणे, माझ्या पद्धतीने कथा लिहीण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला कि नाही हे कमेंट्स द्वारे नक्की कळवा.किडनॅ.

🎭 Series Post

View all