Jan 28, 2022
भयपट

मोह भाग २

Read Later
मोह भाग २
किर्र अंधारी रात्र. दिवसाही कोलाहल वैगेरेंशी बिलकुल संबंध नसणाऱ्या या भागात आता अगदी शुकशुकाट होता. मन्या फाटक पार करूनआत उभा होता. रस्त्याच्या अलीकडे, डाव्या आणि उजव्या बाजूला थोड्या अंतरावर असलेल्या दिव्याच्या खांबांवरील दिव्यांचा उजेड बंगल्याच्या दर्शनी भागावर पडला होता. दिवसा दिमाखात उठून दिसणारा तो त्या अंधुक प्रकाशात स्वतःच्याच कोषात गुरफटल्यासारखा गूढ भासत होता.
मिनिटभरच त्याच्याकडे बघून तो भरभर चालू लागला. नेमका त्याच वेळी बंगल्याच्या वरच्या मजल्यावरील \"त्या\" खिडकीच्या आतील रूमच्या लाईट्स लागून बंद झाल्या.

आत येताच त्याने आपल्या मागे दरवाजा कडी लावून बंद केला. पाठीवर घेतलेली पोतडी कोपऱ्यात ठेवून बिनदिक्कत टॉर्च शिलगावला. संपूर्ण हॉलमधून तिचा झोत फिरवताच त्याच्या ध्यानात आले की हॉल बराच मोठा आहे. फर्निचर चांगल उंची होत. सामानही त्याच्या अपेक्षेप्रमाणे किमती होतं. बऱ्याच अॅन्टीक वस्तू होत्या. मोठ्ठ घड्याळ, कोपऱ्यांतील मेजांवरच्या मुर्त्या इ. भिंतीवर निरनिराळ्या सुंदर पेंटिंग्स लावल्या होत्या. लॅन्डस्केप्स होत्या, अॅबस्ट्रॅक्ट होत्या. एक प्रौढ वयीन रूबाबदार पुरूषाचं फ्रेम केलेलं हॉलमधील एकमेव पोर्ट्रेट होतं. फ्रेमला हार घातला होता. एका भिंतीला देवघर होतं. त्यात देवांच्या चांदीच्या छोट्या मुर्त्या होत्या. शाळीग्राम होता. त्याने पटापट वस्तू, पेंटिंग्स पोतडीत भरायला सुरुवात केली. त्या फ्रेमवरील हार काढून खाली टाकला. फ्रेम भिंतीवरून उतरवत असताना किचनमधून दोन-तीन भांडी पडल्याचा आवाज झाला. बंद खिडक्यांची तावदाने थडथडू लागली. वारा सुटला होता. तो हळूवारपणे फ्रेम उतरविण्यात मग्न असल्यामुळे, अचानक झालेल्या आवाजाने दचकला. क्षणभर थांबून त्याने फ्रेम खाली घेतली. देवघरातील मुर्त्या उचलताना, त्याचा तळहात दिव्याला लागून जरासा भाजला. सगळ्या मूर्ती आणि शाळीग्राम त्याने पोतडीत भरल्या. खालच्या सगळ्या खोल्या पाहिल्या. तळमजल्यावर फक्त किचन, साठवणीची खोली वैगरे होतं. मग मन्या जिन्याने वर निघाला. घरात पाऊल ठेवल्यापासून कुणीतरी आपल्यावर नजर ठेवून असल्यासारखं वाटत होते. क्षणाक्षणाला ही जाणीव अधिक प्रकर्षाने होऊ लागलेली. जिना चढताना खालच्या पायऱ्यांवरून पावलांचा आवाज येत होता. त्याने थांबून झटकन मागे पाहिलं. मागे कुणीच नव्हते. फारसा विचार करायच टाळून तो घाईघाईने बाकी पायऱ्या चढून वर आला. पण मनावर हळूहळु भीतीचं मळभ चढू लागल होतं.
डाव्या बाजूला दोन खोल्या होत्या. आणि उजव्या बाजूला मध्यभागी एक खोली होती. आधी मन्या ने ती खोली उघडून खोलीतून टॉर्चचा झोत फिरवला. खोलीच्या एकंदर रचनेवरून ती स्टडी रूम असल्याचं दिसत होतं. त्याने दरवाजा बंद करून डावीकडील पुढच्या खोलीजवळ आला. कडी लावून दरवाजाला धक्का दिला. दार उघडल नाही. त्याने मग बराच प्रयत्न केला, पूर्ण ताकद लावली : पण फायदा झाला नाही. शेवटी कंटाळून तो प्रयत्न सोडून दिला, आणि दुसऱ्या खोलीजवळ आला. कडी काढून जराशा साशंकतेनेच त्यानं दरवाजा ढकलला, अन् तो अलगद उघडला गेला. त्याला हायसं वाटलं. समोरच्या भिंतीला टेकून एक मोठा पलंग होता. त्याच्या शेजारी एक ड्रेसर. डावीकडे एक खिडकी होती. पडदा एका बाजूला सारलेला असल्यामुळे काचेतून रस्त्यावरच्या दिव्याचा उजेड आत आलेला. त्याला एक गोष्ट लक्षात आली. दुपारी त्याला ज्या खिडकीतून कुणी आपल्याकडे बघत असल्याचा भास झाला होता, ती हीच होती. नाही म्हटलं तरी मनात थोडी चलबिचल झाली. उजव्या भिंतीला लागून एक मोठ कपाट होते. ते दिसताच मनातली चलबिचल विसरून मन्या आनंदला. तो झटकन वळाला. एक दोन पावलं पुढे गेला होता, तोच त्याला हळूच खुसखुसल्या सारखा आवाज आला. तो क्षणभर जागीच थबकला. मग सावकाश वळून त्याने आवाजाच्या दिशेने बघीतले. त्याचे डोळे विस्फारले. तोंडचा आ वासला गेला. शरीराला कंप सुटला. पाय लटपट कापू लागले. पलंगाच्या डोक्याशी उशीला टेकून एक व्यक्ती बसला होती. जेव्हा मन्या खोलीत शिरला होता तेव्हा बेड रिकामा होता, हे त्याला स्पष्ट आठवत होतं. त्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा अर्ध्या भागावर बाहेरच्या दिव्याचा उजेड पडला होता. हॉलमधून त्याने ज्याचं फ्रेम केलेलं पोर्ट्रेट भिंतीवरून काढून पोतडीत भरल होतं, तोच तो पुरूष असल्याचं समजायला मन्याला उशीर लागला नाही. \"तो\" थंड ( मृतवत ) नजरेने मन्याकडेच पाहत होता. ओठांवर भेसूर स्मितहास्य होतं ; पण ते त्याच्या डोळ्यांपर्यंत पोहोचत नव्हतं. त्याच्या हसण्याचाच आवाजाने मन्याचे त्याच्याकडे लक्ष गेलं होतं. मन्या बधीरपणे जागीच उभा होता. टॉर्चवरची हाताची पकड सुटून तो जमिनीवर आपटला. त्या आवाजाने दचकून तो भानावर आला. कसंबसं खाली वाकून त्यानं टॉर्च उचलला. सरळ होता होता पलंगावर नजर टाकली, अन समोरच्या दृश्याने त्याचं काळीज थरथरल. तो तसाच मागे कोलमडला. समोरचा \"तो\" ओणवा होऊन, हातांच्या तळव्यांवर, आणि गुडघ्यांवर बसला होता. दोघेही एकमेकांकडे पाहत होते. त्याच्या ओठांवरच हास्य विरत गेलं. आणि.. आणि एकदम त्याने मन्याच्या अंगावर झेप घेतली.

आवडल्यास ग्रुपला भेट द्या :-
https://www.facebook.com/groups/758165158061766/permalink/993360487875564/?app=fbl
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Prathmesh Kate

Writer

Like to writing