इंद्रायणी काठी

साहित्य क्षेत्रातील चौर्यकर्म या बाबतीत विनोदी अंगाने रंगवलेली कथा!

                                                      इंद्रायणी काठी!
          'मी सज धजके चमके 'अॅड ही अॅड' या वाहिनीच्या स्टुडिओमधून आपणा सर्व प्रेक्षक, रसिक जनांचे स्वागत करते. 'घटना आधी की बातमी आधी' हा वसा अंगिकारलेली ही आमची वाहिनी नेहमीच सर्वात आधी बातम्या देण्यासाठी जगामध्ये क्रमांक एक वाहिनी म्हणून ओळखली जाते.
आजही आम्ही आपणासाठी अशीच एक ताजीतवानी, प्रफुल्लीत, आनंदमय बातमी घेऊन हजर झालो आहोत.
        आपणास सांगायला आम्हाला अत्यंत आनंद होतो की, नुकतेच शासनाचे वाङ्मय पुरस्कार जाहीर झाले असून आपल्या शहरातील एक नामवंत, प्रतिभावान साहित्यिक विश्वास धसे यांच्या 'हे सारे तुमचेच' या कादंबरीस राज्य शासनाचा विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. अर्ध्या तासापूर्वी सरकारच्यावतीने घोषित झालेल्या पुरस्कारप्राप्त लेखकांपैकी आपल्या सर्वांच्या विश्वासास पात्र ठरलेले विश्वासजी धसे यांना आम्ही लगोलग रसिकांच्या भेटीसाठी आणले आहे. 'अॅड ही अॅड' वाहिनीच्या स्टुडिओत आपले स्वागत आहे. विश्वासजी, 'खूप खूप अभिनंदन!'  असे म्हणत सज धजके चमकी या अँकरने धसे यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.
"धन्यवाद! भी आपला, आपल्या वाहिनीचा रसिकांचा आणि शासनाचा आभारी आहे. आत्ताच आपण म्हणालात की, आम्ही लगोलग धसेंना रसिकांच्या भेटीला आणले आहे. कसं आहे, एखाद्या महाविद्यालयात एखाद्या सुंदर तरूणीने प्रवेश घ्यावा. 'पाहता ती बाला, कलेजा खल्लास झाला!' अशी अवस्था झालेल्या चार - पाच मित्रांनी पैज लावावी, की सर्वात अगोदर मी त्या सुंदर तरूणीला पटवतो. त्याप्रमाणे स्पर्धेच्या युगामध्ये इतर वाहिन्यांच्या तुलनेत तुम्ही मला पटवले."
"इश्श! तुमचं आपलं काही तरीच..." मधाळ आवाजात, मानेला सुंदर झटका देत, चेहऱ्यावर आलेली बट मागे सारत चमकी म्हणाली. अगोदरच्या सुंदर, गौरवर्णीय चेहऱ्यावर एक मोहक लाली पसरली. लेखक विश्वास तिच्याकडे पाहतच राहिले. दुसऱ्याच क्षणी सज धजकेला तिचे कर्तव्य आठवले. ती म्हणाली, 
"मला सांगा विश्वासजी, हा पुरस्कार तुम्हाला मिळणार याबाबत तुम्हाला खात्री होती?"
"खात्री तर होतीच परंतु विश्वासही होताच, स्वतःवर, स्वतःच्या साहित्य कृतीवर आणि घेतलेल्या कष्टावर..."
"कष्टावर? विश्वास, स्पष्ट विचारते, आपण कोणत्या कष्टाबाबत बोलत आहेत ?
साहित्य निर्मितीच्या कष्टाबाबत की पुरस्कार पदरात पडावा म्हणून घेतलेल्या कष्टाबाबत?"
"नाही नाही. तुमचा काही तरी गैरसमज होतोय. 'हे सारे तुमचेच' या माझ्या साहित्यकृतीला जन्म घालताना मी जे कष्ट घेतलेत त्याबाबतीत म्हणालो. तुम्हाला सांगतो, माझी स्वत:ची अशी भूमिका आहे, की प्रत्येक साहित्यकृती हे त्या साहित्यिकाचे अपत्य असते. स्त्रीच्या मातृत्व वेदनांशी इतर कोणत्याही वेदनांची तुलना होऊच शकत नाही. मात्र, मला असे वाटते की ज्याप्रमाणे तुम्हाला अपत्यास जन्म देतांना..."
"इश्श! विश्वास ठेवा, विश्वासजी, मी अजूनही सिंगल आहे."
"सो सॉरी! 'तुम्हाला' हा शब्द वापरताना माझ्या दृष्टीसमोर माझ्या साऱ्या माता-भगिनी होत्या. आईला तिच्या संततीला जन्म घालताना जो त्रास होतो, जे डोंगराएवढे कष्ट उपसावे लागतात.
तेवढे कष्ट पडत नसतील आम्हाला परंतु भरपूर कष्ट घेतल्यानंतर पुस्तकरूपाने एखादे साहित्य जन्मास येते."
"वा! सुंदर विचार आहेत. मला असे म्हणायचे होते, की आजकाल पुरस्कार मिळविण्यासाठी खूप धडपड करावी लागते, तडजोड करावी लागते, वशिला लावावा लागतो, पैसा खर्च करावा लागतो. असे काही प्रयत्न आपणास करावे लागले?" 
"नाही...नाही मुळीच नाही. हा चुकीचा समज कुणीतरी पसरवला आहे. कसे आहे, इतर शर्यतीप्रमाणे ही पण एक शर्यत असते, स्पर्धा असते. स्पर्धा, शर्यत म्हटलं की, कुणी तरी जिंकणारा असतो, कुणी तरी हरणारा असतो. विजय-पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. होते काय, जिंकणाराच्या तुलनेत पराभूत होणारांची संख्या जास्त असते. एखाद्या नामांकित कंपनीमध्ये मुलाखती असतात एका जाणेसाठी हजारभर अर्ज आलेले असतात. निवड मात्र एकाचीच होते.
बाकी नऊशे नव्याण्णव उमेदवारांची निवड न झाल्यामुळे ते सारे नाराज होतात, हताश होतात. याच नाराजीतून मग वेगवेगळी मतं, आरोप पसरवले जातात. पराभव स्वीकारणे ही बाब खिलाडूवृत्तीची द्योतक असते.."
"कदाचित तुमचे बरोबर असेल. आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत, आपल्याच जिल्ह्यातील एक ज्येष्ठ आणि दोन वर्षांपूर्वी ज्यांच्या 'हे सारे माझेच' या कादंबरीस राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला असे लेखक विलास भरोसे. विलासजी, नमस्कार, अॅड ही अॅड या वाहिनीवर तुमचे स्वागत आहे. नुकतेच राज्य शासनाचे पुरस्कार जाहीर झाले असून आपल्या जिल्ह्यातील विश्वास धसे यांच्या 'हे सारे तुमचेच' या कादंबरीस शासनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तुमची कादंबरी 'हे सारे माझेच' आणि विश्वास यांची कादंबरी 'हे सारे तुमचेच' दोन्ही साहित्य कृतींना राज्य शासनाचा पुरस्कार... काय सांगाल ?"
"काय सांगणार ? ज्या व्यक्तीचे तिच्या डोळ्यासमोर सारे लुटले जाते आणि त्या चोराचा सत्कार त्याच्याच हस्ते होतो, अशा व्यक्तीला काय वाटणार हो..."
"ए- ए- एक मिनिट, भरोसेजी, हे आपण काय बोलत आहात? अहो मी शासनाच्या वाङ्मय पुरस्कार संदर्भात बोलते आहे."
"मीही त्याच विषयी बोलतोय, मिस सज धजके चमकी...."
"विलासजी, मला काही समजले नाही. स्पष्ट बोलाल का?"
"मी गुढकथा लेखक नाही. विनोदी लेखक आहे. आत्ता जे बोलतोय ते अतिशय गांभीर्याने, जबाबदारीने आणि परिणामाचे भान ठेवून बोलतोय. स्पष्टच सांगायचे झाले, तर एका चौर्य साहित्यकृतीला हा पुरस्कार.."
"भरोसे, काय बोलताय हे? आपणास असे म्हणायचे आहे का, की विश्वास धसे यांनी ही कादंबरी चक्क चोरली आहे? ती कादंबरी धसे यांची नाही."
"होऽय! विश्वास यांनी जनतेचा, सरकारचा प्रचंड विश्वासघात केला आहे. ती कोणती 'हे सारे तुमचेच' ही त्यांची कादंबरी माझ्या 'हे सारे माझेच' या कादंबरीची झेरॉक्स प्रत आहे. ज्याप्रमाणे त्यांनी शीर्षकामध्ये मामुली बदल केलाय त्याचप्रमाणे त्यांनी पात्रांच्या नावामध्येही बदल केलाय. शीर्षक बदलतानाच 'हे सारे तुमचेच' म्हणजे माझे या या विलास भरोसे यांचेच हे मान्य केलेच आहे. मी म्हणतो 'हे सारे माझेच' तर ते म्हणतात 'हे सारे तुमचेच' हे लक्षात घ्या ना..."
"ए ..एक मिनिट. विश्वास धसे, तुमच्यावर विलास भरोसेंनी फार मोठ्ठा, घणाघाती आरोप केलाय. काय सांगाल?"
"मी आत्ताच म्हणालो त्याप्रमाणे भरोसे यांच्या प्रतिक्रियेवरून त्यांच्या अखिलाडूवृत्तीचे दर्शन होते आहे. त्यामागे कारण असे की, या वर्षीही त्यांची एक कादंबरी स्पर्धेत होती. परंतु त्यांना पुरस्कार मिळाला नाही म्हणून ते नाराज असल्यामुळे असे विष ओकत आहेत." 
"पण विश्वास, तुम्ही अजूनही त्यांच्या आरोपाचे समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यांनी स्पष्टपणे असा आरोप केला आहे की, त्यांच्या कादंबरीमध्ये मामुली बदल करून तुम्ही तुमची कादंबरी लिहिली आहे..."
"आरोपाचे काय हो, मिस सज धजके, मी पण छातीठोकपणे सांगतो की, मी ही कादंबरी चार वर्षापूर्वी लिहिली आहे आणि भरोसेंनी माझे हस्तलिखित चोरले, त्यात थोडेफार फेरबदल करून, प्रकाशकाला भरपूर पैसे देऊन ती कादंबरी छापून आणली. स्पर्धा पाठवून दिली. तिथेही भरपूर..."
"थ.. थ .. थांबा विश्वास ! हे काय चाललय भरोसे? तुम्ही म्हणता विश्वास चोर आहेत तर ते म्हणतात तुम्हीच त्यांचे हस्तलिखित चोरले, स्वत:च्या नावावर छापलेत.एवढाच आरोप करून धसे थांबत नाहीत तर पुढे जाऊन महाभयंकर असा आरोप करीत आहेत की, दोन वर्षांपूर्वी तुम्हाला जो पुरस्कार मिळाला, तो तुम्ही चक्क विकत घेतला ? आपण काय उत्तर द्याल ?"
"बोलणार काय? चोर तो शिरजोर! दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल. माझी कादंबरी बाजारात येऊन अडीच वर्षे झाली आहेत. त्यांच्या कादंबरीस प्रकाशित होऊन जेमतेम सहा महिने झाले आहेत."
"बरोबर आहे, भरोसे तुमचे. साहित्याचा बाजारच केलात तुम्ही. कांदे, बटाटे विकत घेतल्याप्रमाणे अनेक पुरस्कार तुम्ही पैसा फेकून भक्षरश: विकत घेतले आहेत.."
"विsश्वाऽस, भलतेसलते, बिनबुडाचे आरोप करू नका."
"बरोबर आहे. ज्याला भरभक्कम बुड नाही त्याला हे सारे बिनबुडाचेच वाटणार."
"ए-एक मिनिट, विश्वास, एक मिनिट भरोसे, असे आरोप प्रत्यारोप करू नका. त्यामुळे रसिकांचा साहित्यावरचा विश्वास आणि लेखकांवरचा भरोसा उडतोय. विश्वास, मला एक सांगा, तुम्ही आत्ताच म्हणालात, की तुमचे हस्तलिखित भरोसेंची कादंबरी प्रकाशित होण्यापूर्वी तयार होते आणि विलास यांचे पुस्तक येऊन दोन वर्षे झाली आहेत. मला एक सांगा, या दोन वर्षांमध्ये आपल्या हस्तलिखितावरून ही कादंबरी छापण्यात आलीय हे तुमच्या लक्षात आले नाही?"
"नाही. मी त्यांचे पुस्तक वाचलेच नाही. मी माझ्या स्वत:च्या लिखाणात एवढा दंग असतो, ना की मला इतरांचे साहित्य वाचायला वेळही नसतो आणि इंटरेस्टही नसतो." .
"ठीक आहे. क्षणभर आपण तुमच्या म्हणण्यावर विश्वास ठेवू. पण मग शीर्षकाचे काय? दोन्ही कादंबऱ्यांचे शीर्षक मिळते जुळते आहे. यावरून तुमच्या लक्षात आले नाही?"
"अहो, मिस चमके, यांनी शीर्षकच काय परंतु त्यावेळी कादंबरीच्या कथानकाचे अक्षरही लिहिले नव्हते. धसे, उगाच बाता मारू नका. सरळ-सरळ ही कादंबरी तुमची नाही हे मान्य करून मोकळे व्हा."
"मी तरी दुसरे काय म्हणतोय? भरोसे, माझे म्हणणे तुम्ही मान्य करा. विश्वास धसे यांच्या हस्तलिखितावरून मी माझी कादंबरी लिहिली हे कबूल करा. मनाचा मोठेपणा दाखवा. "
"माझ्या घरातून चोरीला गेलेला माल माझ्या डोळ्यासमोर असताना हा माल माझा नाही असे कसे म्हणू मी?"
"ठीक आहे. आता मी हा प्रश्न सरळ रसिक वाचकांच्या दरबारात नेते. रसिकांनो, आपण आत्ताच विश्वास आणि भरोसे या दोघांचेही मत, भांडणं ऐकलेत. आपण कुणाची बाजू घ्याल? कोण प्रामाणिक आहे असे वाटते? तुमचे प्रामाणिक मत नोंदवताना विश्वासांवर भरोसा असल्यास एक अंक टाईप करा आणि भरोसे यांच्यावर विश्वास असेल तर दोन लिहा... आता या चर्चेमध्ये अजून दोन साहित्यिक सहभागी होत आहेत. राज्यातील प्रसिद्ध लेखक हकमारे आणि दुसरे साहित्यिक म्हणजे साहित्य ! होय, लेखन सुरू केल्यानंतर ह्यांनी स्वत:चे आडनाव बदलून साहित्य हे आडनाव धारण केले आहे. साहित्य आणि हक्कमारे आपणा दोघांचेही या कार्यक्रमात स्वागत आहे. दोघांच्याही कथासंग्रहास राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सध्या विश्वास आणि भरोसे यांच्यामध्ये जो वाद चालू आहे त्यामध्ये दोन बाजू आहेत. एक म्हणजे साहित्याची चोरी आणि दुसरे म्हणजे पुरस्काराची खरेदी! तुमचे प्रांजळ मत काय? स्पष्टच विचारायचे म्हणजे चोरी आणि खरेदी या संदर्भात तुमचा स्वत:चा अनुभव काय? थोडे जास्त स्पष्ट विचारायचे म्हणजे तुमचे साहित्य कधी चोरीस गेले काय किंवा तुम्ही कधी कुणाचे साहित्य चोरण्याचे पापकर्म केले काय? तुम्ही कधी कोणता पुरस्कार खरेदी केला काय? अगदी पैसाच ओतला नसेल परंतु कधी कुणाचा वशिला, लग्गेबाजी, ओळख, नातेसंबंध अशा भुमिकेतून कधी पुरस्कार मिळविला काय ? हक्कमारे,तुम्हाला स्पष्ट विचारायचे म्हणजे तुम्ही कधी कुणाचा म्हणजे आपल्यापेक्षा सकस, वास्तव कलाकृतीचा हक्क मारून स्वत.चे उखळ पांढरे करून घेतले आहे काय?"
"चमकीजी, तुम्ही जी काही प्रश्नपत्रिका माझ्यासमोर ठेवली आहे त्यातील एकूणएक प्रश्नाचे उत्तर मी केवळ एकाच शब्दात देईन तो म्हणजे नाही ! नाही !! नाही !!!"
"म्हणजे तुम्हाला असा कोणताही..."
"अनुभव मुळीच नाही. चमचेगिरी, पुढे पुढे करणे, लाळ घोटेपणा मला आवडतच नाही. माझ्या आडनावावरून तुम्ही एक कोटी केलीत, त्यानुसार मी कोणाचेही हक्क मारलेले नाहीत. पुरस्कार गल्लीतला असो की दिल्लीतला माझी पंजिका तयार असते. 'प्रस्ताव पाठवा' अशी बातमी येताच मी माझा प्रस्ताव पाठवून देतो आणि शांत बसतो. त्यासंदर्भात कुणाशीही संपर्क साधत नाही. मी पुरस्कारार्थ कुठे प्रस्ताव पाठवलाय हे माझ्या बायकोलाही माहिती नसते. अनेकदा प्रस्तावासोबत अमक्या-तमक्याची शिफारस पाठवा अशी अट असते पण मी कोणाचेही पत्र न जोडता माझा प्रस्ताव पाठवून देतो. सोबत स्वत.चे असे एक पत्र जोडतो की, शिफारसपत्र पाठवा अशी अट टाकून आपण साहित्यिकांना शरमिंदे होण्यासाठी प्रोत्साहित करीत आहात."
"तर मग असे पुरस्कार तुम्हाला मिळत नसतील?"
"न का मिळेनात, पुरस्कार चालत आपल्याकडे आले पाहिजेत या मताचा मी आहे. अनेकवेळा असे होते की, मी प्रस्ताव पाठवून देतो आणि ती बाब विसरूनही जातो. पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र येताच आठवण येते.."
"म्हणजे पुरस्कार खरेदी केला जातो ही गोष्ट आपणास..."
"माझ्या स्वत:च्या बाबतीत नाही. पण, कसे आहे, आजकल सब चलता है।"
"म्हणजे पुरस्काराचा लिलाव होतो असे म्हणायचे आहे का?''
"जे सत्य आहे ते सत्यच आहे. धूर उगीच निघत नाही. वाहन गेल्याशिवाय किंवा हवा सुटल्याशिवाय धुरळा उडत नाही. पाऊस पडल्याशिवाय जमिनीत पाणी मुरणार नाही."
"ठीक आहे. मी आत्ता साहित्य यांच्याकडे जाते."
"वा! वा! सज धजके चमकीजी, माझ्याकडे येत आहात? किती वेळ लागेल ? परमभाग्य आमचे! आज तुम्ही म्हणजे आमच्या घरी दिवाळी बाप्पा! 'सेलीब्रेटी, सौंदर्यवती येती घरा, तोची दिवाळी दसरा!' एक सांगू का, तुम्ही आज येण्याचा आजचा दिवस निवडलाय ना तो माझ्यासाठी अगदी उत्तम आहे. माझ्या ग्रहमंडळात कायमस्वरूपी ठाण मांडून बसलेला 'पत्नी' हा ग्रह आज सकाळीच माहेरी गेलाय."
"ए-ए-एक मिनिट ! साहित्य, हे काय बडबडताय? दिवसाढवळ्या स्वप्न पाहू नका. तुमच्याकडे येतेय याचा अर्थ इथे स्टुडिओत बसून तुमच्याशी चर्चा करणार आहे. मला एक सांगा, आत्ता जी चर्चा चालू आहे, त्याबद्दल तुमचे मत काय आहे?"
"चर्चेचा विषय काय आहे? आजकाल टिव्हीवरच्या चर्चांमध्ये चर्चा कमी, आरडाओरडा जास्त असतो. सहभागी व्यक्ती तर ओरडतातच परंतु, तुमच्यासारखे अँकर जास्तच मोठ्याने बोलतात. एकाचा पायपोस एकाला नसतो."
"इथे साहित्य विषयी....."
"माझ्याविषयी चर्चा चालू आहे? मग आधी सांगायचे ना? मी आवाज "म्यूट' करून तुमचा सुंदर चेहरा पाहात कशाला बसलो असतो?"
"थांबा. मिस्टर साहित्य, थांबा. इथे साहित्य पुरस्काराविषयी, पुरस्कार खरेदी केले जातात आणि इतरांचे कथानक चोरून स्वत:च्या नावावर प्रकाशित केले जाते अशी चर्चा चालू आहे."
"त्यात नवीन काय आहे? या क्षेत्रात हे प्रकार सर्रास होतात."
"तुम्हाला हे मान्य आहे तर..."
"एकशे एक टक्का मान्य आहे. आत्ता तुमच्या वाहिनीवर चालू असलल्या चर्चेमध्ये सहभागी असलेले भरोसे नावाचे लेखक आहेत ना, त्यांना पुरस्कार मिळविण्याच्या प्रवृत्तीने पछाडलंय. एक असाध्य रोग झालाय म्हणा ना. त्यांच्या कादंबरी शासनाचा पुरस्कारमिळाला तो काय त्यांना उत्कृष्ट साहित्यकृतीला मिळालाय असं तुम्हाला वाटतय का? मुळीच नाही. त्यांनी तो दोन लाख रूपये मोजून खरेदी केलाय."
"काऽय  हे- हे तुम्ही काय म्हणताय? असं कसं शक्य आहे?"
"का शक्य नाही? तुम्हाला सारं खरं सांगतो, काय झालं, ज्या वर्षी भरोसेंना राज्य पुरस्कार मिळाला त्याच वर्षी माझी 'मी मिळवणारच..' ही कादंबरी शासनाकडे पाठवली होती."
"मग मिळाला का तुम्हाला पुरस्कार?"
"कसा मिळणार ? तुमच्या भरोसेंनी खरेदी केला ना. झालं काय, तसा मी या अशा गोष्टी करीत नाही, मला आवडतही नाहीत. पण साधा शब्द टाकावा, जमलं तर जमलं म्हणून त्या काळातील एका मंत्र्याच्या कार्यालयात गेलो ते पुरस्कार निवड समितीवर होते. मी तिथे पोहचलो तेव्हा भरोसे मंत्र्याच्या दालनात जात होते. त्यांनी मला पाहिले नाही. ते आत गेले. दारावर उभ्या असलेल्या शिपायाला मी सांगितले, की आत्ता आत गेले त्यांच्या सोबत मी आहे. मी आत गेलो. भरोसे मंत्र्याच्या समोरच्या खुर्चीवर बसले होते. त्यांना काहीही समजू न देता मी त्यांच्या मागच्या खुर्चीवर बसलो. मंत्र्यानाही असे वाटले असावे की, मी भरोसेंसोबत आलो आहे. दोघांची चर्चा सुरू झाली आणि बोलता-बोलता ती चर्चा देण्याघेण्यावर गेली. दोन लाख रुपयांना तो पुरस्कार भरोसे यांनी चक्क विकत घेतला."
"एक-एक मिनिट हा तर प्रचंड घणाघाती आरोप आहे. भरोसेआपण ऐकलेच असेल. साहित्य यांच्या 'आँखो देखा हाल' वर आम्ही विश्वास ठेवावा का? आपण काय म्हणाल? थांबा. विश्वासजी, खूप वेळापासून बोलायची इच्छा व्यक्त करताहेत. आपण आधी त्यांचं मत जाणून घेऊ या आणि मग भरोसेकडे जाऊ या. बोला. विश्वास बोला. तुम्ही जो भरोसेंवर आरोप केला होता त्याला साहित्य यांनी उचलून धरले आहे."
"आता तरी माझ्यावर विश्वास ठेवाल काय? साहित्य हे स्वत: चश्मदीद गवाह आहेत. ज्याप्रमाणे त्यांनी पुरस्कार खरेदी केलाय. त्याचप्रमाणे त्यांनी माझं हस्तलिखित चोरलं हेही सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे."
"मला एक सांगा विश्वास, तुमचं हस्तलिखित चोरीला कसं गेलं?"
"काय झालं, साहित्य क्षेत्रात भरोसे हे माझ्यापेक्षा आधी आले आहेत. काही तरी सटर फटर, र ला ट जोडून वात्रटिका करीत होते. साहित्य क्षेत्रात पदार्पण केल्याबरोबर मी 'हे सारे तुमचेच...' कादंबरी लिहिली. कसे आहे, साहित्य क्षेत्रात मला कुणी गॉडफादर, पाठीराखा नाही. भरोसे यांचे नाव ऐकून माझ्या काही मित्रांनी मला असे सुचविले की, मी पहिलीवहिली कादंबरी लिहिलीय तेव्हा ती प्रकाशित करण्यापूर्वी भरोसे यांचा सल्ला घ्यावा. त्याप्रमाणे मी माझ्या, हस्तलिखिताची झेरॉक्स काढून भरोसे यांच्याकडे गेलो. त्यांना ते बाड दिले. त्यांनीही ते ठेवून घेतले. नंतर त्यांच्याकडे अनेक चकरा मारल्या. आठ दिवसांनी या, दहा-बारा दिवसांनी या असे त्यांनी वेळकाढू धोरण स्वीकारले. तब्बल वर्षभर त्यांच्याकडे चकरा मारून मी थकलो आणि शेवटी त्यांच्याकडे जाण्याचे सोडून दिले. दोन -चार कार्यक्रमात त्यांची भेट झाली, पण त्यांनी ओळख दाखवली नाही. मग मीही पिच्छा सोडला. नंतर माझेही साहित्य नेमाने प्रकाशित होत गेले. मी ते हस्तलिखिताचं विसरूनही गेलो. परंतु भरोस ते विसरले नाहीत. त्यांनी माझ्याच साहित्यावर पारितोषिक खरेदी केलं आणि चोराच्या उलट्या बोंबा या प्रमाणे..."
"विsश्वाऽसऽऽ, उगाच काही तरी बरळू नका. एक तर माझी कादंबरी चोरलीत आणि मलाच चोर म्हणता. मिस सज धजके, जरा विश्वासला समज द्या. आवरा त्यांना. मी ऐकून घेतोय म्हणून उगीच आरोप करू नका. 'कानामागून आले आणि तिखट झाले' याप्रमाणे काल परवा या क्षेत्रात येऊन ध चा म जोडणारे माझ्यावर आरोप करतात. जरा स्वत:चं तोंड आरशात पहा. स्वतःच स्वत:ला ओळखू शकणार नाहीत आणि म्हणे... कादंबरी कशाला म्हणतात, कादंबरीचा फॉर्म काय आहे, इतकेच काय पण कादंबरी कशी लिहितात याचे साधे ज्ञान तरी आहे का?"
"तुम्ही म्हणताय ती माहिती आहे का नाही हा भाग सोडा परंतु, इतरांचे साहित्य चोरून ते स्वत:च्या नावावर छापून त्या कादंबरीसाठी पुरस्कार विकत घेणे हे ज्ञान मात्र निश्चितच नाही."
"एक-एक- ऐका. असे भांडू नका. भरोसे - विश्वास तुम्ही दोघेही थोडं थांबा. आपल्या सोबत मुंबईहून प्रसिद्ध साहित्यिक मुंबईकर आहेत. मुंबईकर, नमस्कार. इथं साहित्याचं चौर्यकर्म आणि पुरस्काराची खरेदी-विक्री या विषयी घणाघाती चर्चा सुरू आहे."
"होय. मी बराच वेळापासून अॅड ही अॅड वाहिनीवर चाललेली चर्चा ऐकतोय. आपण मला बोलायची संधी कधी देताय ही वाट बघत होतो. कसं आहे. राज्यातल्या कोणत्याही क्षेत्रातलं भांडण शेवटी मुंबईपर्यंत येतं आणि आम्हा मुंबईकरांना शेवटी तो तंटा मिटवावाच लागतो. कसं आहे, शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न असतो. मला आलेला अनुभव तुम्हाला येईलच असे नाही. शिवाय तुमच्या भाषेत ही जी चर्चा सुरू आहे त्यात खरेदी-विक्रीचे असे ठोस पुरावे कोणी देऊ शकणार नाही. कुणी तसा पुरावा दिलाच तर त्यावर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आजकाल प्रत्यक्ष पुरावा सुद्धा तोडून मोडून ज्याला हवे तसे सादर करता येतात. अगदी मी न बोललेले शब्द माझ्याच तोंडून ऐकविले जातात."
"खरे आहे तुमचे. परंतु आपण आत्ताच भरोसे-विश्वास यांचा वाद ऐकलाच असेल. या दोघांपैकी आपण भरोसा ठेवाल की विश्वास संपादन कराल? या ठिकाणी 'दोन व्यक्ती एक कथानक' मात्र दोन्ही साहित्यकृतींची नावे अलग-अलग असली तरी तशी साम्य दाखविणारी. 'हे सारे तुमचेच' आणि 'हे सारे माझेच' या दोन पुरस्कार प्राप्त साहित्य कृतीपैकी आपण कोणती कादंबरी वाचली आहे?"
"नाही. मी कोणतेही पुस्तक वाचलेले नाही. कसे आहे. माझा स्वत:च्या लिखाणाचा व्याप एवढा मोठा आहे ना की, मला इतरांचे साहित्य सोडा परंतु, वाचकांनी मला पाठविलेली प्रशंसापत्रं, भ्रमणध्वनीवर आलेले रसिकांचे संदेश वाचायला वेळ मिळत नाही."
"पण मग हा तिढा सुटणार कसा? का मग शेवटी न्यायालयाचा मार्ग अवलंबवावा लागेल?"
"नाही. न्यायालयात हा वाद सुटेल असे मला वाटत नाही.दोघानी समोरासमोर बसूनच वाद मिटवावा."
"हे कसे शक्य आहे, मुंबईकर? समजा, विश्वास आणि भरोसे समोरासमोर बसतीलही. कदाचित वादही मिटेल. परंतु मग दोन्ही साहित्यकृतींना मिळालेल्या पुरस्कारांचे काय? मुंबईकर, थोडं थांबा पुण्याहून आगामी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष अठ्ठावीस हे या वादावर बोलताहेत. हॅलो . हॅलो, सर, आपण हा इथला वाद ऐकलात का?"
"होय. ऐकला. समजला. कसे आहे, हे असे वाद साहित्याच्या प्रांतामध्ये अधूनमधून चालूच असतात. कोण खरे, कोणाचे खोटे हे ठरविणे अवघड असते. यावर तोडगा म्हणाल तर दोघांनीही एखाद्या परीक्षेस सामोरे जावे."
"परीक्षा ? थोडं स्पष्ट सांगाल काय?"
"होय. सांगतो. उदाहरण द्यायचेच तर अगदी पुराण काळातील देता येईल. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीत बुडविण्यात आल्याची घटना आपणास माहिती आहेच. परंतु, ती गाथा म्हणजे खणखणीत नाणे होते. प्रत्यक्ष विठू माऊलीचा वरदहस्त लाभलेल्या संत तुकारामांच्या लेखणीचा अविष्कार होता तो. त्या गाथांचा मुक्काम प्रत्यक्ष इंद्रायणी मातेच्या उदरामध्ये होता. त्यामुळे काना, मात्रा, उकार कशाचेही नुकसान न होता ती गाथा जशीच्या तशी वर आली. मला हे सांगायचे की, प्रामाणिकपणातून साकारलेले ते दिव्य होते."
"अठ्ठावीसजी, आपणास असे तर सुचवायचे नाही की, भरोसे आणि विश्वास या दोघांच्याही कादंबरीची जलपरीक्षा घेण्यात यावी. पण कुठे? कशी?"
"सोप्पे आहे. दोघेही पुण्यात राहतात, तिथून देहू काही फार दूर नाही."
"म्हणजे जिथे प्रत्यक्ष तुकाराम महाराजांच्या गाथांची परीक्षा झाली तिथेच इंद्रायणी नदीत?"
"होय. थोडा वेगळा प्रकार करावा लागेल. पुण्याला साहित्य संस्थांची संख्या भरपूर आहे. एखाद्या साहित्य संस्थेला प्रायोजकत्व द्या. सायंकाळी इंद्रायणी मातेच्या कुशीत त्या दोघांचेही साहित्य सोडा. रात्रभर वाट पाहू. दुसऱ्या दिवशी ज्यांचे साहित्य इंद्रायणी मातेच्या आशीर्वादाने तरंगत वर येईल ते साहित्य आणि तो लेखक खराखुरा! जो तरेल तोच पुरस्कारास वरेल !"
"रात्रभर का? दिवसा का नको?"
"कसे आहे, माझ्या अध्यक्षीय भाषणामध्ये मी एक मुद्दा मांडणारच होतो तो या निमित्ताने मांडतोय. सध्या भारतीयांच्या मनावर एक दिवसीय आणि त्यातही डे - नाइट क्रिकेटचं प्रचंड वेड आहे. आता तर कसोटी सामनेही रात्री खेळवले जात आहेत. त्याच धर्तीवर मला असे वाटते की, आता साहित्य संमेलनेही रात्रभर व्हावीत. सायंकाळी चार नंतर सुरू झालेले कार्यक्रम सकाळी चार-पाच वाजेपर्यंत चालावीत..."
"मिस्टर अठ्ठावीस, ते बरोबर आहे. तो वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे."
"एक - एक मिनिट, मिस सज धजके, मला पूर्ण तर करू देत. या या नाविन्यपूर्ण प्रयोगाची सुरुवात करण्यासाठी या वादाची पार्श्वभूमी घ्यावी. सायंकाळी या दोघांचे साहित्य इंद्रायणीच्या हवाली करून इंद्रायणीच्या काठी साहित्य संमेलन घ्यावे.''
"वा! अठ्ठावीसजी, वा ! फार अभिनव उपाय सांगितला. मी आता भरोसे आणि विश्वास दोघांनाही विचारते, अठ्ठावीस यांनी सुचविलेल्या पर्यायासाठी, तशा आगळ्यावेगळ्या परीक्षेसाठी आपण तयार आहात का?"
"इंद्रायणी .... अठ्ठावीस या शब्दांनाच फार महत्व आहे. स्वत: पंढरीचा विठुराया अठ्ठावीस युगे विटेवरी उभा आहे. त्यामुळे अठ्ठावीस यांनी सुचविलेला हा प्रयोग म्हणजे प्रत्यक्ष विठूमाऊलीचा आशीर्वाद असे मी मानतो. शिवाय परीक्षेत मी जिंकणारच त्यामुळे इंद्रायणी मातेने मला दिलेला कौल म्हणजे इतर कोणत्याही पुरस्कारापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे." विश्वास अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाले.
"मी पण या प्रयोगासाठी तयार आहे." भरोसेही तेवढ्याच आत्मविश्वासाने म्हणाले.
"एक-एक मिनिट, औरंगाबादहून एक रसिक फार वेळापासून वाट पाहत आहेत. बोला. औरंगाबादकर, बोला."
"नमस्कार. मी एक वाचक असून मला वाचनाचे प्रचंड वेड आहे. गाजलेल्या लेखकांसोबत, मी नवोदित लेखकांच्या कादंबऱ्या, कथासंग्रह आवर्जून वाचतो. मी दहा वाचनालयाचा सदस्य आहे.
दरवर्षी जे राज्य पुरस्कार जाहीर होतात ती सारी पुस्तके मी विकत आणतो. काही वेळेपूर्वी विश्वास धसे यांच्या 'हे सारे तुमचेच' या कादंबरीला जसा पुरस्कार जाहीर झाला तसा मी स्कुटीवर टांग
मारून माझे नेहमीचे पुस्तकाचे दुकान गाठले. जाहीर झालेली सर्व पुरस्कारप्राप्त पुस्तके मी विकत घेऊन आलो.. हे बघा... " असे म्हणून त्यांनी सारी पुस्तके कॅमेऱ्यासमोर धरली.
"व्वा!औरंगाबादकर, वा! आपल्याकडे भरोसे यांची पुरस्कार प्राप्त 'हे सारे माझेच' ही कादंबरी असेलच...."
"आहेच. ही बघा... " असे म्हणत औरंगाबादकरांनी भरोसेंची कादंबरी कॅमेऱ्यासमोर धरली आणि पुढे म्हणाले, "पुस्तके घेऊन घरी आलो, तुमची वाहिनी लावली. नेहमीप्रमाणे तुमचा आकर्षक, सुंदर, हसरा आणि सज धजके चमकणारा चेहरा दिसला. काही क्षणात भरोसे-विश्वास यांचा वाद सुरू झाला. विश्वास यांची कादंबरी समोरच होती. लगेच कपाटातून भरोसेंची कादंबरी शोधून काढली. तुमची चर्चा ऐकत ऐकत दोन्ही कांदबऱ्यांचे पान न पान चाळले. तुम्हाला काय सांगू मॅडम, अगदी डिट्टो, सेम टू सेम, एक ओरिजिनल तर दुसरी झेरॉक्स एवढे साम्य आहे. आता कुणी कुणाची झेरॉक्स काढलीय ते नाही सांगता येत. फक्त पात्रांची नावे वेगवेगळी आहेत. दोन्ही कादंबऱ्यांच्या पानांची संख्या प्रत्येकी चारशे वीस! ज्याला इंटरेस्ट असेल त्याने शब्दांची संख्या मोजली ना तर शंभर टक्के सांगतो, शब्दांची संख्या तंतोतंत जुळेल."
"कमाल आहे तुमची. मि. औरंगाबादकर, किती सुक्ष्म निरीक्षण केलेय तुम्ही. पण मी थोडा वेळ तुम्हाला थांबवतेय. पुण्याहून एकजण फोनवर आहेत. बोला पुणेकर."
"नमस्कार. मी पुणेकरच बोलतोय. मी 'अग्रिपरिक्षा' या साहित्य संस्थेचा अध्यक्ष आहे. मुंबईकर म्हणाले की, सारे वादविवाद मुंबईत मिटविले जातात. परंतु त्यांनीच हा वाद पुणे येथे पाठवलाय. त्यामुळे मी पुण्याचे वेगळे महत्व सांगायची गरज नाही. 'जे कुणी मिटवत नाही ते मिटवते पुणे!' तर अठ्ठावीस यांनी सुचविल्याप्रमाणे विश्वास आणि भरोसे यांचे अग्निदिव्य पार पाडण्याची जबाबदारी अग्निपरीक्षा ही संस्था आनंदाने घेऊ इच्छिते. त्यासाठी एक राष्ट्रीय साहित्य संमेलन घेण्याचीही आमची तयारी आहे."
"वा ! क्या बात है ! विश्वास, भरोसे अग्रिदिव्यसाठी अग्निपरीक्षा नावाचे खंबीर व्यासपीठ तात्काळ मिळाले आहे. आपण तयार आहात?"
"होय. मी तयार आहे." दोघांचाही सूर जुळाला.
"पुणेकरजी, दोन्ही स्पर्धक तयार आहेत. कुठे, कधी ठेवणार?"
"कुठे कशाला? 'इंद्रायणी तीरी, साधू या तीर पुस्तकावरी!' इंद्रायणी मातेसारखी दुसरी माता कोण असेल जी योग्य न्यायनिवाडा करेल. आज आहे सोमवार, गुरूवारी सायंकाळी पाच वाजता विश्वास आणि भरोसे यांचे साहित्य अठ्ठावीसांच्या हस्ते इंद्रायणीच्या स्वाधीन करून लगेच मुंबईकरांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन घेऊया. " पुणेकर रूपरेषा सांगत असताना सज धज के यांनी त्यांना मध्येच थांबवून विचारले,
"अठ्ठावीस, मुंबईकर आपणास पुणेकरांचा प्रस्ताव मान्य आहे का?"
"मान्य आहे." दोघे एका आवाजात म्हणाले.
"ठरले तर पुणेकर लागा तयारीला."
"तयारी काय करायची? सारे तयार आहे. मी अॅड ही अॅड वाहिनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना, भरोसे, विश्वास, मुंबईकर, अठ्ठावीस यांच्यासह राज्यातील तमाम साहित्यिक आणि रसिकांना या आगळ्यावेगळया संमेलनाचे आमंत्रण देत आहे. येणाराची हवी तशी अवस्था आम्ही करू... इच्छाभोजनासहित!" पुणेकर म्हणाले. सज धजके चमके यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपवला.
            गुरुवारचा दिवस उजाडला, विश्वास जिंकणार की भरोसा? विश्वास तुटणार की भरोसा हरणार? असे प्रश्न मनाशी घोळवत राज्यातील साहित्यिक, रसिक, प्रेक्षक... हौसे, गवसे, नवसे, सारे बुधवारपासून देहूच्या दिशेने मिळेल त्या वाहनाने निघाले. गुरूवारी दुपारपर्यंत राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड प्रमाणात रसिक साहित्यनगरीत दाखल झाले. जिकडे पाहावे तिकडे माणसेच माणसे! अक्षरश: पाय ठेवायला जागा नाही अशी अवस्था! सज धजके चमकी ही निवेदिका अॅड ही अॅडच्या संपूर्ण चमूसह गुरुवारी भल्या पहाटेच दाखल झाली होती. विश्वास आणि भरोसे हे दोन्ही स्पर्धक आपल्या साहित्यासह इंद्रायणीकाठी अग्निपरीक्षा संस्थेने लावलेल्या समोरासमोरच्या तंबुमध्ये बसले होते. दोघांसोबत त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळी होती. तंबुबाहेर संस्थेचे स्वयंसेवक त्यांना काय हवे काय नको ते विचारत होते. दोन्ही साहित्यिकांनी इंद्रायणीनदीला अर्पण करण्यासाठी आपापली ग्रंथसंपदा आणली होती. पुणेकरांच्या कार्यकर्त्यांनी ते सारे ग्रंथ वेगवेगळ्या तलम रेशमी, भगव्या कपड्यांमध्ये गुंडाळून तो गठ्ठा विश्वास आणि भरोसे यांच्या हाती सुपूर्त केला होता. पाच वाजता म्हणता-म्हणता प्रचंड गर्दीमुळे मुंबईकर आणि अठ्ठावीस यांना इंद्रायणीकाठी पोहचण्यासाठी सायंकाळी साडेसहा वाजले. मुंबईकर, अठ्ठावीस, विश्वास, भरोसे या सर्वांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन पुणेकरांनी सत्कार केला. स्मृतिचिन्ह अतिशय सुंदर होते. त्यावर सुबक अक्षरात 'इंद्रायणी गाथा अर्पण सोहळा!' असे कोरले होते.
"चला तर मग, या आगळ्यावेगळ्या सोहळ्यास आपण सुरूवात करू या...." पुणेकर बोलत असताना विश्वास मध्येच म्हणाले,
"थांबा, थांबा. थोडं थांबा!" ते ऐकून सारे विचारात पडले असताना भरोसे यांनी तोफ डागली,
"काय झाले? हातपाय डगमगत आहेत काय? स्वतःचे चौर्यकर्म जगासमोर येणार या भीतीने अंगावर काटा आला काय? स्पर्धेत उतरण्यापूर्वीच मैदान सोडणार काय?"
"जे मैदान मारणारे असतात ते मैदान सोडत नाहीत. मी मैदान सोडणारच आहे पण मैदानात जाऊन, प्रतिस्पर्ध्याला चित करून, आसमान दाखवून. मुंबईकर, अठ्ठावीस, पुणेकर आणि हो मिस सज धजके चमकी सर्वांना माझी विनंती आहे की, आमची ग्रंथसंपदा इंद्रायणीस अर्पण करण्यापूर्वी त्यांची मिरवणूक काढावी."
"पराभव समोर दिसत असतानाही मिरवणुकीत मिरवायची इच्छा आहेच का?"
"एक मिनिट भरोसे, त्यांचा प्रस्ताव बरोबर आहे."
"पण मुंबईकर, सायंकाळ होते आहे. वेळ कमी आहे..'' पुणेकर बोलत असताना सज धजके पुढे येत म्हणाली,
"नियोजनाप्रमाणे दोन्ही स्पर्धक, अध्यक्ष, उद्घाटक, आमची टीम, पुणेकर ही मंडळी नावेतून थोडेसे अंतर आत जाऊन ग्रंथसंपदा इंद्रायणीस अर्पण करणारच आहोत. मी असं म्हणते की, एका नावेत आपण सारेजण आणि ज्यांना कुणाला या ग्रंथ वरातीमध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांनी दुसऱ्या नावेमधून यावे. ही वरात इंद्रायणीमातेच्या मध्यभागी नेऊया. तिथे जल-परीक्षेस भरपूर पाणी मिळेल."
"मॅडम, बरोबर आहे. आमच्या विनंतीस मान देऊन कालच इंद्रायणीमध्ये भरपूर पाणी सोडले आहे. आपण तसेच करू." पुणेकर म्हणाले आणि ती आगळीवेगळी ग्रंथदिंडी इंद्रायणीकडे निघाली. नदीच्या मध्यभागी पोहचताच सर्वांनी त्या ग्रंथांची पूजा केली. नंतर मुंबईकर आणि अठ्ठावीस यांनी एक-एक करत सारे ग्रंथ इंद्रायणीस अर्पण केले. त्या मातेनेही ती सारी पुस्तके स्वत:च्या उदरामध्ये सामावून घेतली. काही क्षणात ती सारी मंडळी माघारी फिरली. काठावर येताच भरोसे आणि विश्वास आपापल्या तंबुमध्ये गेले. बाजूलाच साहित्य संमेलनाचे व्यासपीठ आणि मंडप उभारला होता. सारे प्रेक्षक घाईघाईने त्या मंडपात शिरले. मुंबईकर,अठ्ठावीस, पुणेकर आणि त्याचे कार्यकर्ते व्यासपीठावर पोहचले. ते सारे पुढील कार्यक्रमाची चर्चा करीत असताना प्रेक्षकांनी ठेका धरला, "नको कथा, नको कविता, भाषण, परिसंवाद तर नकोच नको. होऊन जाऊ द्या झक्कास लावण्या."
पाठोपाठ कानाकोपऱ्यातून एकच आवाज आला,
"लावणी s.., लाऽवऽणी..."
शेवटी प्रेक्षकांच्या इच्छेनुसार बेधुंद करणाऱ्या, डोळ्याची पारणे फेडणाऱ्या तर कानठाळ्या बसविणाऱ्या फक्कड लावणीचा कार्यक्रम सुरू झाला. त्यावेळी शिट्ट्यांचा महागजर, टाळ्यांचा कडकडाट झाला. अनेकांनी डोक्यावरचे फेटे, टोप्या आणि ज्यांच्या शिरी फेटे, टोप्या नव्हत्या त्यांनी खांद्यावरचे रुमाल, खिशातल्या दस्त्या काढून हवेत भिरकावल्या. एका पाठोपाठ एक नशिल्या लावण्या सादर करताना प्रेक्षकांना वेडावणारे लावण्यवतींनी प्रचंड धुमाकूळ घातला. सकाळी चार वाजण्याच्या सुमारास लावणीचा फड संपला आणि सारे रसिक एका वेगळ्याच अवस्थेत परतले. जातांना बहुतांशी प्रेक्षक विश्वास, भरोसे, ग्रंथ, इंद्रायणी हे सारे विसरले. त्यांच्याकडे साधा कटाक्ष न टाकता सर्वजण निघून गेले. काही वेळाने दोन्ही तंबुतील मंडळी जागी झाली. सर्वत्र पसरलेल्या निरव शांततेचा अंदाज घेत सारे तंबुच्या बाहेर आले. सर्वांनी इंद्रायणी नदीकडे दूरवर नजर टाकली. पण नदीमध्ये कुठे एखादे पुस्तक काय पण नदीच्या पाण्यावर कुठे कागदाचा साधा तुकडाही दिसला नाही. इंद्रायणी मातेला हात जोडत विश्वास आणि भरोसे समोरासमोर आले. कुणाला काही समजायच्या आत दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. ते पाहून सारे अचंब्यात पडले.
"आपला प्रयोग..."
"एकशे एक टक्के यशस्वी झाला..." भरोसेंचे वाक्य विश्वासाने पूर्ण केले.
"ह... हे... म- म्हणजे?" एका जणाने विचारले.
"हा सारा आमचा डाव होता. सरकार दप्तरी चाललेला सावळा - गोंधळ आम्हाला सर्वांसमोर उघड करायचा होता."
"अहो, पण मग कादंबरी कुणाची ?"
"दोघांचीही..." सौ. भरोसे विश्वासाने म्हणाल्या.
"काय झाले, तुम्हाला सांगते, या कादंबरीचे एक प्रकरण भरोसे यांनी तर दुसरे प्रकरण विश्वासरावांनी लिहिलेय."
"दोघांनी ठरविल्याप्रमाणे अगोदर भरोसे यांच्या नावाने ती कादंबरी प्रकाशित झाली आणि बक्षीस-प्राप्त ठरली." 
"त्यानंतर चार-पाच महिन्यांपूर्वी तीच कादंबरी पात्रांची नावे बदलून विश्वासभाऊजींनी स्वत:च्या नावावर छापली." 
"भरोसेभाऊजींप्रमाणे आमच्या यांनीही शासनाचा पुरस्कार पटकावला." 
"गंमत म्हणजे आमच्या दोघांच्याही निवडीच्या वेळी एकच निवडसमिती होती. त्याच निवडसमितीने दोन वर्षांपूर्वी ज्या पुस्तकाची पुरस्कारासाठी निवड केली त्याच समितीने त्याच पुस्तकाला यावर्षीही पुरस्कार जाहीर केला आहे. कुणीही पुस्तके वाचत नाहीत. फक्त जवळची माणसं निवडली जातातः हेच आम्ही सिद्ध केले. पुरस्काराची आम्ही साहित्यिक मंडळी चक्क खरेदी करतो."
"म्हणजे तुम्ही दोन लाख रूपये." 
"कुठे? कुणाला दिले? पुरस्कार मिळाल्यावर दोन लाख रुपये देईन असे आश्वासन दिले होते. 'रात गई, बात गई।' देईन भरोसे म्हणाले. 
"मी तरी वेगळे काय केले? भरोसेंनी पुरस्कार मिळाल्यावर त्या साहेबांना तोंड दाखविले नाही. मीही भरोसे यांच्या पावलावर पाऊल ठेवत केवळ आश्वासन दिले. आज हे सारे महाभारत घडल्यावर ते साहेब माझे तोंडही पाहणार नाहीत. आहे का नाही गंमत?" 
         विश्वास धसे अत्यंत आत्मविश्वासाने बोलत असताना त्यांची ती सारी चर्चा त्यांच्या नकळत सज धज के चमके यांचा चमू आणि छायाचित्रकार कॅमेऱ्यात अलगद टिपून स्टुडिओत पाठवत होता. 'अॅड ही अॅड' ही वाहिनी तो सारा वृत्तान्त मसाला लावून प्रक्षेपित करत होती...
                                                                    ००००
                                                                      नागेश सू. शेवाळकर, पुणे.
                                                                      संपर्क ९४२३१३९०७१.