इंदी

Indi

#इंदी

बऱ्याच दिवसांनी इंदीला आज निवांत वेळ मिळाला. मुलगा,सून आपापल्या जॉबला गेले होते. अहो त्यांच्या मित्रांसोबत चार दिवसाच्या सहलीला गेले होते. कोरोनाने अशक्त झालेली ती,तिला त्रास होऊ नये म्हणून छोट्या आशिषला सुनेने तिच्या आईकडे सोडले होते. आशिषने जाण्यापुर्वी एक भेटकार्ड दिलं इंदीला. मुखप्रुष्ठावर त्याने कोरोनाशी फाईट करून त्याला पळवून लावणारी फायटर इंदी चितारलेली. आतमधे वेलकम आज्जी लिहिलेलं. ते भेटकार्ड अमुल्य होतं इंदीसाठी. इंदीने ते जपून ठेवलं,तिच्या साडीच्या घडीत.

अजुनही अंगातला अशक्तपणा काही कमी झाला नव्हता.  अधुनमधून धाप लागायची तिला. एरवी आजारातून बरी झाली की नातेवाईक बघायला यायचे तिला. यावेळी मात्र सर्वांनी फोनवरच काळजी घ्या,लवकर बरं व्हा असं सांगितलं तिला. आजारच तसा तो माणूसघाणी. 

इंदीने मनाशी विचार केला,असो चार पावसाळे पोराबाळांत जास्त जगायला मिळाले हे का कमी आहे! एरवी हातभर अंतर राखून रहाणारी सून,इंदीला त्या अवस्थेत पाहून किती हवालदील झाली होती. इंदीचा मुलगा कैवल्य तसा भित्राच पण सुनेने सगळी सुत्रं तिच्या हाती घेतली. सासऱ्यांना धीर दिला. पैशाची व्यवस्थाही तिनेच केली. नर्स सांगायची इंदीला,म्हणायची,"ताई,तुम्ही खरंच भाग्यवान म्हणून तुम्हाला अशी सून मिळाली."

इंदी टेरेसमधे गेली. सगळी झाडं कशी तरारुन आली होती. पिवळीधम्मक शेवंतीही कशी फुलली होती! इंदीने तिला आंजारलंगोंजारलं. या शेवंतीशी तिचं जवळचं नातं. तिची आजी या पिळ्याधम्मक शेवंतीची वेणी भल्यामोठ्या अंबाड्यावर घालायची. इंदीला आजी आठवली,सुरकुतल्या हातांची. किती छान चव होती आजीच्या हाताला! ती जात्यावर गायची त्या ओव्या इंदीच्या कानात घुमू लागल्या. काय गोडवा होता आजीच्या गळ्यात! 

तिला उंचेपुरे कोट,टोपी घातलेले आजोबा आठवले,धोतराचं एक टोक हातात धरलेले,फणसासारखे आजोबा,दुपारी पाय दाबायला लावणारे. इंदी काही मिनिटं पाय दाबायची आणि आजोबांचे डोळे मिटले की हळूच आमराईत पळायची. आमराईतला तो थंडावा,ती आंब्याच्या पानांची सळसळ,ती थंड वाऱ्याची झुळूक आणि मधुनच धपकन पडणारे पिवळेधम्मक आंबे.

इंदीला खाली फेऱ्या मारत असलेली बेडेवहिनी दिसली. किती भरभरुन बोलायची आधी बेडेवहिनी तिच्याशी. कैवल्यचं लग्न झाल्यापासनं जरा जास्तच. जणूकाही सुनेला कसं धाकात ठेवावं याचं ट्रेनिंग देण्यासाठी नेमणूक झालेली तिची. कोणाची सून किती वाजता घरातून बाहेर पडते,कोणते कपडे घालते,किती वाजता परत येते..सगळ्या खडानखडा बातम्या तिला. 

इंदीच्या सुनेच्या आधुनिक पेहरावावरून बेडेवहिनींनी बरंच सुनावलं होतं इंदीला पण इंदी त्याकडे लक्ष देत नसल्याने बेडेवहिनींनी इंदीची गणना ढ सासवांत केली होती. इंदीने बेडेवहिनींना साद घातली पण बेडेवहिनी जरा हसल्यासारखं करुन आता कोरोना लगेच तिच्या अंगावर पडतो की काय या भीतीने तिथून जवळजवळ पळालीच. इंदीला जाम हसू आलं बेडेवहिनीच्या वागण्याचं नि ढ सासूबाई होण्याचा अभिमानही वाटला.

इंदीने आईवडिलांना फोन लावलेला सकाळी. सगळं क्षेमकुशल आहे म्हणून खात्री करुन देऊनही दोघंही भांबावून गेलेले. आईला किती आनंद झालेला तिला स्क्रीनवर पाहून. बोटांनी चाचपडत होती तिच्या चेहऱ्याला. वडिलांच्या डोळ्यात सगळ्या भावना ओथंबून भरल्या होत्या. 

इंदीने ठरवलं,आज छान तयार व्हायचं. तिने मोरपिसी साडी काढली,सोनेरी बुट्ट्यांची. ब्लाऊज जरा चुरगळलेलं. त्यावर इस्त्री फिरवली. केसांची छान बटवेणी घातली. साडी नेसून तयार झाली आणि सगळ्या सग्यासोयऱ्यांना ती लाईव्ह येतेय असं कळवलं. वेळ कळवली.  

तोवर जरा हलकाफुलका आहार घेतला नि बसली स्क्रीनसमोर. सगळे गुड मॉर्निंग, कशी आहेस विचारत होते. हाय,हेलो करत होते. सगळ्यांची नावं,मेसेजेस पाहून इंदी सुखावत होती. म्हणत होती,देवाने एवढी सुंदर,भावनाप्रधान माणसं दिलेत माझ्या अवतीभवती. अशी कशी एक्झिट घेईन मी. तुम्हा सगळ्यांचे आभार नाही मानत,तुमच्या ऋणात रहायला आवडेल मला. विशेष वाटलं माझ्या सुनबाईचं,मला वाटायचं अगदी अवखळ आहे पोर. काही समजत नाही पण कुठून एवढा पोक्तपणा आणलान देव जाणे. गेल्याजन्मीचं तिचं माझं नातं असणार नक्की. 

इतक्यात सुनेचा मेसेज आला,लव्ह यू आई. इंदीने त्या शब्दफुलांवर बोटं फिरवली नि पाणावल्या डोळ्यांनी म्हणाली लव्ह यू बेटा. 

गीता गजानन गरुड.