स्वातंत्र्य...!!!

हृदयस्पर्शी कथा..
"काऊ, हे मी काय ऐकत आहे? तू त्या राजेश बरोबर सिनेमा पाहायला गेली होतीस?" कावेरीची आई फोनवरून आपल्या लेकीला विचारत होती.

"हो आई, दोन महिने ऑफिस मध्ये कामाचा व्याप खूप वाढल्याने निवांत वेळ मिळतच नव्हता. या आठवड्यात थोडीशी निवांत होते म्हणून मी गेले होते. विशेष म्हणजे मी आईंना सांगून गेले होते.." कावेरी आईला म्हणाली.

"काय? तुझ्या सासूने कशी परवानगी दिली तुला?"

कावेरी वर आईचा प्रश्नांचा भडिमार चालूच होता.

कावेरी, तिची पंधरा वर्षांची मुलगी आणि सासूबाई रंजना मुंबई मध्ये स्वतंत्र राहत होत्या.

कावेरीचे लग्न झाल्यानंतर वर्षाच्या आतच गोड बातमी मिळाली आणि मुलीचा जन्म होण्याआधी पती निघून गेला.  निघून नाही; सासूबाईंनी हाताला धरून बाहेर काढले होते आणि कावेरीच्या पाठीमागे गेली पंधरा वर्षे खंबीर उभ्या होत्या.

कावेरी ने एकल पालकत्व खूप धाडसाने निभावले होते. आपल्या मुलाला कायम आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करायची. तिला कधी एकटेपणाची जाणीव होऊ दिली नाही. सगळ्या संकटांना धीराने तोंड देत होती.

तेवढ्यात कावेरी च्या सासुबाई कावेरी च्या रूममध्ये आल्या.
कावेरी चा पडलेला चेहरा पाहून त्यांनी ओळखले,
काहीतरी झाले आहे..
सासूबाईंनी विचारण्या आधीच कावेरी म्हणाली,
"आईला कोणीतरी सांगितले की, मी आणि राजेश एकत्र रात्री बाहेर गेलो होतो."

सासूबाई काहीच बोलल्या नाहीत. आज कावेरीच्या मनात राजेश बद्दल नक्की काय भावना आहेत त्या त्यांना जाणून घ्यायच्या होत्या.

"आई, मला राजेश चा सहवास आवडतो. मन मोकळे करण्यासाठी कोणीतरी आहे., मला समजून घेणारे कोणीतरी आहे, तो माझ्या मनातील भावना लगेच ओळखतो..!"

"मी जेव्हा माझी नवी ओळख निर्माण करत होते किती त्रास सहन केला होता. सगळ्यांना तोंड देत आज इथपर्यंत आले आहे. आई केवळ त्यावेळी तुमची साथ होती म्हणून मी माझी स्वतः ची स्वतंत्र ओळख निर्माण करू शकले. वाईट याच गोष्टी चे वाटते की, माझी आई देखील आज मला समजून घेत नाही." कावेरी ने आपले मनातील निर्मळ भाव व्यक्त केले.

यावर सासूबाई खूप धीराने म्हणाल्या,
"हो कावेरी बाळा,तुला नवी नाती स्विकारण्याचे स्वातंत्र्य आहे. भूतकाळ दूर लोटून नवं आयुष्य सुरू करण्याचं स्वातंत्र्य आहे. मी कायम तुझ्या पाठीशी आहे. राजेश कडे आज तू फक्त मित्र म्हणून नाही तर जीवनसाथी म्हणून विचार करत असशील तरी माझा पाठिंबा आहे. पुढील आयुष्य तू आनंदात घालवाव. माझा आणि मुलीचा देखील विचार करू नकोस. ती आता सज्ञान आहे."
कावेरीने आपल्या सासूबाईंच्या खांद्यावर डोके ठेवून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

©® आरती संभाजी सावंत
लेख आवडल्यास like, comment and share करायला विसरू नका.