इंडिपेंडंट आणि डिपेंडंट.. अंतिम भाग

व्यथा कामाला जाणाऱ्या स्त्रियांची
इंडिपेंडंट आणि डिपेंडंट.. भाग ३


मागील भागात आपण पाहिले की सुमेधा घरकाम करण्यासाठी घरी राहिली आहे. आता बघू पुढे काय होते ते.


" तुझी प्रत्येक अट मंजूर." उत्साहात जयेश बोलला.

" विचार करून बोल. " सुमेधाने वॉर्निंग दिली.

" अग तुझ्याशी बोलताना कसला विचार करायचा?"

" बघ हं.."

"आता काही दाखवायचं नाही , बघायचं नाही. तू फक्त अट सांग."

" अट साधी सोपी आहे.. तू आठ दिवस घरकाम करून ऑफिसला जायचं."

" घरकाम करून ऑफिसला जायचं.. अरे हाय काय आणि नाय काय.. काय???? घरकाम करून ऑफिसला जायचं?" जयेशची भंबेरी उडाली.

" हो स्वयंपाकपाणी, भांडी, कपडे करून. ते ही आईबाबांची मदत न घेता." सुमेधा नखांना शेप देत होती.

" याची काय गरज आहे?" जयेश आवंढा गिळत म्हणाला.

" खूप गरज आहे. काय करतोस ते सांग?"

" अडला हरी..."

" काही म्हणालास?"

" माझी हिंमत?"

" मग झोपायच्या आधी गजर लावून झोप. उद्यापासून सुरुवात."

" उद्यापासून लगेच?"

" हो.."

उद्याच्या चिंतेत जयेश बेडवर आडवा पडला. पण टेन्शनने त्याला झोपच येईना. शेवटी त्याचा डोळा लागायला आणि गजर व्हायला एकच वेळ झाली.

" थोडा वेळ झोपू देत ना.. आत्ताच तर डोळा लागला होता." जयेश पुटपुटला.

" झोपायचं आहे तर झोप.. पण स्वयंपाक होईल का नऊपर्यंत?" सुमेधा पुटपुटली. तसे खाडकन जयेशने डोळे उघडले. डोळ्यावर पाणी मारून तो खुर्चीत बसला.

" थोडा चहा दे ना.. मग कामाला लागतो."

" नाही.. मी सकाळी उठून आधी दूध तापवते. मग स्वतःचा चहा करून घेते." वैतागतच जयेश उठला. एकाबाजूला त्याने दूध गरम करायला ठेवले. दुसरीकडे चहाचे आधण ठेवले. डोळ्यावर अजूनही झोप होती. चहा उकळला तरिही दूध का तापत नाही हे बघायला त्याने पातेले बघितले आणि चपापला. ते बहुतेक डोश्याचे पीठ होते. जयेशची उरलीसुरली झोप उडून गेली. त्याने पटकन ते बाजूला ठेवले. फ्रीजमधले दुधाचे पातेले शोधून चहा केला. तोपर्यंत आजी स्वयंपाकघरात आल्या होत्या.

" आज तू इथे??" त्यांना आश्चर्य वाटले.

" हो.. म्हटलं आज सगळ्यांना छानसा धक्का द्यावा. घे ना चहा घे. मी पोहे करायला घेतो."

" दे मी कांदे चिरून देते." आजी पुढे झाल्या आणि दरवाज्यामागची सुमेधाची मूर्ती जयेशला जाणवली.

" आई, आज तुम्ही दोघींनी काहिही करायचं नाही. सगळं मी करणार." बोलताना जयेशचा गळा दाटून आला. आपल्यावरील प्रेमाने आला असेल असं समजून आजी बाहेर गेल्या. जयेशने कांदा चिरुन पोहे केले. फुड प्रोसेसरमध्ये कणिक भिजवली. बटाट्याच्या काचर्‍या केल्या. तोपर्यंत लेक उठून आली होती. चहा घेऊन ती सिंकपाशी भांडी धुवायला उभी राहिली.

" काय करतेस?" सुमेधाला घाबरून जयेशने विचारले.

" मावशी नाहीत तर मीच सकाळी संध्याकाळी भांडी घासते आहे." ते ऐकून जयेशने सुस्कारा सोडला.

" बाबा, तुम्ही जर आईची कामे करणार असाल तर हुश्श करू नका. तुम्हाला अजून कपडे मशीनला लावायचे आहेत. कपड्यांच्या घड्या मी घालीन. झाडांना पाणी पण मी घालेन. पण प्लीज कचरा काढणे आणि लादी पुसणे.. मी करणार नाही." लेकीने सुनावले.

" भांडी करते आहेस तेच उपकार.." सगळे नाश्ता करत असताना जयेशला केर काढताना बघून आजींचं आईचं ह्रदय जरा हेलावले. पण मध्ये पडलो तर आपल्यावर येईल याची जाणीव ठेवून त्या गप्प बसल्या. एव्हाना जयेश आणि सुमेधाचं काहीतरी चाललं आहे याचा अंदाज दोघांनाही आला होताच.

" वाजले किती ग?" कचरा काढताना जयेशने विचारले.

" नऊ.." आजोबा म्हणाले.

" नऊ? माझी साडेनऊची ट्रेन आहे." जयेश किंचाळला. कसेतरी पटापट काम आटपून तो ऑफिसला पळाला. या धावपळीत नाश्ता करायचा राहिलाच होता. न झालेली झोप आणि कामाने दुखणारे अंग त्यामुळे ऑफिसच्या कामात त्याचे लक्ष लागत नव्हते. त्यावरून त्याने बॉसची बोलणीही खाल्ली. दुपारी ऑफिसमध्ये जेवताना त्याला घरच्या जेवणाची आठवण आली. आता त्याला समजले की सुमेधाला काय सांगायचे होते ते. घरी जाऊन परत कामं करण्याची त्याच्या अंगात ताकद नव्हती. त्यामुळे घरी जातानाच त्याने पावभाजीची ऑर्डर दिली होती. घरी गेल्यावर त्याच्या अंगात शूज काढायचे सुद्धा त्राण नव्हते.

" घ्या.." सुमेधाने समोर चहा ठेवला.

" तू चहा केलास? मग ती अट?"

" तुला जमणार आहे का अजून सात दिवस?" सुमेधाने हसत विचारले.

" नाही ग.. नाही. येताना मी मावशींशी बोलून आलो आहे. त्या उद्यापासून कामाला येणार आहेत. पाचशे रूपये पगारवाढ आणि आठवड्यातून एक दिवस सुट्टी."

" काय? " आठवड्यातून एक दिवस सुट्टी ऐकताच आजीच ओरडल्या. "मग त्या दिवशीचे काम कोण करणार?"

" आई, त्या दिवशीचं काम आपण सगळे मिळून करू."

" पण हे अचानक?"

" आई, आज सकाळी मला समजले की आपल्याला जी कामे सोपी वाटतात ती तेवढी सोपी कधीच नसतात. त्या कामाचे महत्त्व म्हणून मावशींचा पगार वाढवला आणि त्यांचे थोडे कामही. म्हणजे त्या पैशाच्या बाबतीत तरी इंडिपेंडंट राहतील." जयेश सुमेधाकडे बघत म्हणाला.

" पण मग इंडिपेंडंट बायकांचं कामवाल्या बायकांवर डिपेंडंट असण्याचे काय?" सुमेधाने तिरकस बघत विचारले.

" त्याचं काय आहे ज्या इंडिपेंडंट बायका घरकामासाठी कामवाल्या बायकांवर डिपेंडंट असतात त्यांचे नवरे मात्र पैश्यासाठी त्यांच्यावर डिपेंडंट असतात. तू काम सोडलं आहे असा जो भास निर्माण केलास त्याबद्दल तुझ्या ऑफिसमध्ये फोन केल्यावर समजले मला. तर जी गोष्ट तुम्हाला मला समजवायची होती ती मी समजून घेतली आहे." कान पकडत जयेश म्हणाला. " खरंतर घरची कामे करून हसतमुखाने ऑफिसला जाणं तिथून येऊन परत घरातल्या गोष्टी बघणं हे सोपं नसतं हे एका दिवसातच समजलं मला. यापुढे माझ्याकडून तरी तुझी कामं कशी कमी होतील याचा मी नक्की प्रयत्न करेन."

" मी न कुरकुरता अभ्यास करून तुझं काम कमी करेन.." पार्थ म्हणाला.

" मी माझ्या कपड्यांचा पसारा आणि बाकीचाही पसारा आवरत जाईन." पियु म्हणाली.

" मी बसल्या बसल्या भाजी नीट करून देत जाईन." आजी म्हणाल्या.

" मी न मागता चहा पित जाईन. " आजोबा म्हणाले आणि सगळे खो खो हसू लागले.


कामावर जाणाऱ्या बायका आणि त्यांना घरकामाला लागणारी मदत.. म्हटलं तर गंभीर विषय. पण कधी कधी त्याचे महत्त्व समजत नाही. घरची सगळी कामे आटोपून ऑफिसला वेळेत जाणे, तिकडची कामे करणे, ट्रेन,बस, रिक्षा यातला गर्दीचा प्रवास करून घरी येणे. आल्यावर मुलांचा अभ्यास घेणे, रात्रीचा स्वयंपाक करणे.. या सगळ्यात ती जर वरकामासाठी दुसर्‍या स्त्रीची मदत घेत असेल तर ती चुकते? खरंतर अश्यावेळेस ती दुसर्‍या स्त्रीला आत्मनिर्भर बनवत असते. कारण अनेक घरकाम करणाऱ्या बायकांनी ही कामं करून आपल्या मुलाबाळांना शिकवलं आहे, आपलं घर सावरलं आहे. मग या बायकांना इंडिपेंडंट करण्यासाठी ती जर यावर डिपेंडंट राहिली तर तिचे चुकले?


कथा कशी वाटली ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all