इंडिपेंडंट आणि डिपेंडंट.. भाग २

व्यथा कामाला जाणाऱ्या स्त्रियांची
इंडिपेंडंट आणि डिपेंडंट.. भाग २

मागील भागात आपण पाहिले की सुमेधाच्या कामवाल्या मावशी येणार नाहीत म्हणून सुमेधाला टेन्शन आलं आहे. आता बघू पुढे काय होते ते.


" हे काय? तुला आज कामाला जायची घाई नाही?" आरामात पेपर वाचत बसलेल्या सुमेधाला जयेशने विचारले.

" नाही.."

" का? ऑफिसने भरपगारी सुट्टी दिली की काय?"

" सुट्टीच आहे.. पण भरपगारी नाही तर बिनपगारी." पेपरमधून नजर वर न करता सुमेधा म्हणाली.

" म्हणजे? काही समजेल असं बोल ना." वैतागून जयेश म्हणाला.

" मी नोकरी सोडली आहे." सुमेधा म्हणाली.

" अशी अचानक? मला न विचारता?" जयेशला धक्का बसला.

" तुला काय विचारायचे? तूच काहीतरी बोलला होतास ना? कामाला जाणाऱ्या बायका घरकामासाठी डिपेंडंट वगैरे वगैरे. मग मला काय दोन दोन गोष्टी झेपणार नाहीत. माझीही चाळीशी आलीच की आता. सो मी आता ठरवलं आहे डिपेंडंट व्हायचं. तुला चहा हवा आहे?" सुमेधाचं वागणं बघून जयेशला खरंच चहाची फारच गरज होती. काहीच जास्त न बोलता तो ऑफिसला निघून गेला. तो संध्याकाळी घरी आला तोपर्यंत सुमेधाने नोकरी सोडल्याची बातमी घरात सगळ्यांना समजली होती. आता घरात ताजं, आयतं खायला मिळणार म्हणून मुलं खुश होती. तर सूनबाई बाहेर गेल्यावर जे गॉसिपिंग करायला मिळायचे ते मिळणार नाही म्हणून आजी नाराज होत्या. घरात जे चालले आहे त्याच्याशी काहीच संबंध नसल्यासारखे आजोबा मात्र चहाच्या प्रतिक्षेत होते.

आठ दिवस झाले तरी सुमेधा कामाला जात नव्हती. कामवाल्या मावशी परत आल्या होत्या तर तिने त्यांना कामावरून काढून टाकले होते. त्यामुळे खरंच सुमेधाने नोकरी सोडली आहे यावर जयेशचा विश्वास बसू लागला.

"सुमेधा, तू वीजबिल भरलं नाहीस का?" वैतागलेल्या जयेशने सुमेधाला विचारले.

" मी कशी भरणार?" मठ्ठपणे सुमेधाने उत्तर दिले.

" इतके दिवस कशी भरत होतीस? तसेच."

" तेव्हा मी कामाला जात होते. माझ्याकडे पैसे होते. आता मी जात नाही."

" अग पण काहीतरी सेव्हिंग असेल ना? त्यातून भरायचे की?"

" बँकेतले पैसे कंपनीला दिले. नोटीस पिरियड पूर्ण केला नाही म्हणून."

" तुझ्याकडे तेवढेच पैसे होते?"

" हो.. आणि उरलेले माझी म्हातारपणाची सोय म्हणून ठेवले आहेत. त्याला तर मी हातही लावणार नाही. पाय वर कर."

" काय?" जयेश जोरात ओरडला.

" पाय वर कर.. केर काढायचा आहे." घरकाम करण्यासाठी सुमेधा घरी राहिली आहे हे त्याला पटत नव्हते. पण बोलायची सोय नव्हती.

" बाबा, माझा मोबाईल फुटला. नवीन घ्यावा लागेल." कॉलेजला जाणाऱ्या लेकीने हुकूम सोडला.

" असा कसा फुटला?"

" ते बसमध्ये चढताना हातातून पडला." जयेशने पटकन हिशोब केला. नवीन मोबाईल म्हणजे वीस हजाराचा फटका. लेकाच्या नवीन शालेय वर्षाची सुरुवात म्हणजे ॲडमिशन, पुस्तके, गणवेश याचा खर्च. थोरलीचे ॲडमिशन झाले होते म्हणून ठिक होतं. हे सगळे घरातले खर्च सुमेधा करत होती म्हणून त्याच्यापर्यंत येत नव्हते. हा खर्च बघून त्याचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती.


" जयेश, ही औषधांची लिस्ट. मागवतोस ना ऑनलाईन?" आजींनी लिस्ट जयेशच्या हातावर टेकवली. पाच हजार.. जयेशच्या डोक्यात आकडे फिरू लागले.

" या महिन्याचा सोसायटीचा चेक दिला नाहीस का? सेक्रेटरी सांगत होते." आजोबा म्हणाले.

" जाताना मला भाजी आणि दूधासाठी पैसे ठेवून जा." सुमेधाने सांगितले. सगळ्यांना हो हो म्हणून जयेश बेडरूममध्ये गेला. तिथे कॅल्क्युलेटर घेऊन बसला. सगळा हिशोब केला. महिन्याचा पगार संपूनही वर पैसे लागणार होते. त्याला सुमेधाचा प्रचंड राग आला. आता यावेळेस नोकरी सोडायची काय गरज होती? ते ही भलेमोठे पैसे भरून. पण त्याने रागावर नियंत्रण ठेवायचे ठरवले.
रात्री सुमेधा बेडरूममध्ये आल्यावर त्याने प्रेमाने विषय काढला.

" सुमेधा, मी काय म्हणतो घाईघाईत कश्याला असे निर्णय घ्यायचे? म्हणजे बघ हं.. मुलांचे शिक्षणाचे वाढते खर्च, आईबाबांच्या औषधाचा खर्च. म्हणजे माझा पगार पुरेसा आहे.. पण तरिही." सुमेधा गप्पपणे बेडवर चादर टाकत होती.

" आता तुला आरामाची गरज आहेच. पण मग तुझं ते सेकंड होमचं स्वप्न जरा मागे पडेल बस. कारण मुलं काही कमवत नाही. आईबाबांकडे पैसे मागणं मला योग्य वाटत नाही. मग.." जयेशने जाणूनबुजून वाक्य अपूर्ण सोडलं.

" म्हणजे तुला मी कामाला जायला हवंय. ठीक आहे. पण माझी एक अट आहे." सुमेधा म्हणाली.


काय असेल सुमेधाची अट? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all