इंडिपेंडंट आणि डिपेंडंट

व्यथा कामाला जाणाऱ्या स्त्रियांची
इंडिपेंडंट आणि डिपेंडंट


" काय हे मावशी? तुम्ही म्हणाला होता पंधरा दिवसांनंतर याल. जाताना तुम्ही तिकीटही दाखवून गेला होता. मग अचानक काय झाले? " सुमेधाचा आवाज चढला होता.

" तिकीट बदलले? इतर वेळेस तुम्हाला तिकिटं मिळत नाहीत, यावेळेस बदलून मिळाले? "

" ताप आला? अहो तुमचा ताप ऐकून मला ताप भरेल आता."

" ऑफिसमधून सुटी घ्यायची? आम्हाला अशी न सांगता सुट्टी नाही घेता येत. आम्हाला पाच मिनिटं जरी उशीर झाला तरी हाफ डे लागतो. तुम्ही आज येणार म्हणून मी कामही केली नाहीत. हॅलो.. हॅलो.."
बहुतेक समोरून फोन ठेवला गेला होता. सुमेधा अगदी रडकुंडीला आली होती. आणि जयेश सोफ्यावर बसून मजेत चहा पित अधूनमधून तिचं एकतर्फी संभाषण ऐकत होता.

" अजून चार दिवस मावशी येणार नाहीत." सुमेधा म्हटलं तर स्वतःशीच म्हटलं तर जयेशशी बोलली. मावशी येणार नाहीत हे ऐकून इतकावेळ जप करणाऱ्या सासूबाईंची अचानक कंबर दुखायला लागली म्हणून त्या जरा आडवं व्हायला म्हणून आत गेल्या. परत एकदा चहा मिळेल का असं विचारायला आलेले सासरेबुवा काहीच न बोलता आत गेले. भांड्यांचा ढीग, घरभर झालेला कचरा आणि ऑफिसला होत असलेला उशीर. सुमेधाला रडू येऊ लागलं.


" इंडिपेंडंट बायका कामासाठी घरवाल्या बायकांवर डिपेंडंट असतात." जयेश जोरात बोलला.

" काय म्हणालास?" रागाने सुमेधाने विचारले.

" काही नाही ग.. वॉट्सॲपवर कोणीतरी मेसेज पाठवला तो वाचला."

" हो का? काय अर्थ होतो या मेसेजचा? " सुमेधाचा पारा चढत होता.

" हेच की ज्या बायका पैशांसाठी स्वावलंबी असतात त्या घरकामासाठी मात्र परावलंबी असतात." जयेश अजूनही मस्करीच्या मूडमध्ये होता.

" हो का? मग पुरूषांचं काय?"

" काय म्हणजे? त्यांचा आणि घरकामाचा संबंध काय असतो? बरं मी निघतो आहे ऑफिसला. डबा झाला असेल तर दे. मी कपडे करून येतो."

"आणि ही घरातली कामं?" सुमेधाने विचारले.

" ती तू करायचीस.." हसत जयेश म्हणाला.

" आणि ऑफिसमध्ये काय सांगू?"

" दे काहिही कारण.. नाहीतरी ऑफिसमध्ये तुला काम तरी काय असते? इकडची फाईल तिकडे आणि तिकडची इकडे." जयेश म्हणाला.

" हे करण्यासाठी ऑफिस ढीगभर पगार देतं मला?"

" मला काय माहीत? मी जातो.. नाहीतर मला उशीर होईल." जयेश तिथून गेला.

डोळ्यातलं पाणी पाठी परतवत सुमेधाने मनाशी एक निर्णय घेतला.

काय असेल सुमेधाचा निर्णय? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all