Login

तोतया वारसदार भाग 69

“सारंग साहेब, शोधल्याचं नाटक करून, कोणालाही न शोधता, तुम्ही ही इस्टेट सहज गिळंकृत करूच शकला असत?

 तोतया वारसदार

पात्र रचना

बबन                       - सारंग सरांचा चपराशी

सुभाष                      -बबनचा मित्र. कटातला भागीदार.

निशांत                      - शोधकर्ता

नयना                      - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर  

विश्राम आणि अनिल           - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी.

  साताऱ्याला  स्थायिक.

विनय                       - अनिलचा मुलगा सातारा.

श्रीरंग                       -महादेवराव - सखारामपंत – रंगनाथ – कावेरी –

  श्रीरंग

शंकरन                      - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा.

भाग  ६९                    

भाग ६८ वरुन पुढे वाचा .......   

बाबांना काहीच आठवत नव्हतं म्हणून त्यांनी आईशी लग्न करायला होकार दिला. मग माझा जन्म झाला. बाबांची तब्येत चांगली सुधारली होती आणि ते आता आजोबांना कामात मदत करत होते. असेच आनंदात दिवस जात होते.” शंकरन थांबला, “अजून एक चहा बोलावता येईल का? घशाला कोरड पडलीय.”

विनयनी लगेच एका माणसाला बोलावून चहा आणि समोसा आणायला सांगितला.

“पण तुमच्या वडीलांची स्मृति परत आली नव्हती तर, तुम्हाला इथला पत्ता आणि तुमच्या बहि‍णींची नावं कशी कळली?” विनयनी उत्सुकतेने विचारलं.

“सांगतो ना. हळू हळू बाबांना थोडं थोडं आठवायला लागलं. तस तसे ते आम्हाला सांगत गेले. काही काळ  गेल्यावर आम्हाला कळलं की ते नागपूरचे आहेत, आणि तिथे त्यांची बायको आणि तीन मुली आहेत. ही साधारण ६५-६६ सालातली गोष्ट आहे. त्यांना पत्ताच आठवत नव्हता. तरी सुद्धा आम्ही भारतात यायचं प्लॅनिंग करत होतो. पण एक दिवस बाबा आमच्या फील्ड वर फिरत असतांना पडले, डोक्याला जबर मार लागला होता. त्यांना हॉस्पिटल मधे अॅडमिट केलं पण नैरोबीला येऊन तसं करण्यात बराच वेळ गेला. ते जवळ जवळ २ महीने हॉस्पिटल मधे होते. तेंव्हा त्यांना विनायकराव आणि नागपूरचा पत्ता आठवला. त्यांनी आई कडून वचन घेतलं की ती नागपूरला जाऊन एकदा मुलींना भेटून येईल म्हणून. बाबा घरी आलेच नाहीत. संपलं सारं. १९७० मधे बाबा गेले. त्यानंतर साधारण १  वर्षांनी आजोबांना त्यांच्या मोठ्या भावाचं पत्र आलं की त्यांची प्रकृती अतिशय खराब झाली आहे म्हणून येऊन शेवटचं भेटून जा म्हणून.

मग आम्ही सगळे कालिकतला आलो. आजोबांचे भाऊ मरणासन्न अवस्थेत होते, निपुत्रिक होते, मूल व्हावं म्हणून त्यांनी तीन लग्न केली. आता फक्त तिसरीच बायको हयात होती, त्यांनी आजोबांकडून वचन घेतलं की ते आजीला सांभाळतील म्हणून. आजी बरीच तरुण होती, आजोबांची ती तिसरी बायको होती. आजोबांचे भाऊ गेल्यावर, आम्ही तिथेच राहिलो, आणि आजोबा नैरोबीला परत गेले. सर्व इस्टेट विकून ४-५ महिन्यानंतर परत भारतात आले. इथे बरीच मोठी नारळाची बाग होती आणि मोठा व्यापार होता. तो आजोबांनी सांभाळला. वाढवला पण. आता मीच सगळं बघतो आहे. आता आजोबा, काकू आजी आणि आई कोणीच नाहीयेत. मी, माझी दोन मुलं आणि एक मुलगी आणि बायको, असा आमचा साधा संसार आहे.” शंकरनने  त्यांची कथा संपवली.

“इतक्या वर्षा नंतर अचानक नागपूर कसं आठवलं?” सारंग सरांनी विचारलं.

“सारंग सर, तुम्ही? केंव्हा आलात.” – निशांत आश्चयऱ्याने म्हणाला.

“मी बराच वेळ झाला आलो आहे. यांची स्टोरी ऐकतो आहे. हूं, तर शंकरन साहेब, इतक्या वर्षा नंतर अचानक नागपूर कसं आठवलं?” – सारंग.

“हे कोण?” – शंकरन

“हे आमचे सर, सारंग वकील.” – निशांत.

“ओके. बऱ्याच वर्षांपासून ठरवतो आहे, पण काही ना काही कारणं निघत गेली, आणि जमलंच नाही. आता मी मुंबईला आलो होतो, कामासाठी, मग ठरवलं की यावेळेस नागपूरला जायचंच. आणि आलो.” – शंकरन

“म्हणजे तुम्ही जाहिरात वाचून नक्की आला नाहीत?” – सारंग.

“मला या निशांतनी आत्ताच सगळी हिस्ट्री सांगितली, म्हणून तुम्ही सुद्धा हा प्रश्न विचारलं त्याचा राग आला नाही. पण पुन्हा सांगतो, मला जाहिराती बद्दल काहीच माहिती नाही. पण मला एक गोष्ट समजली नाही, की जेंव्हा विनायकरावांची  मुलं आहेत, आणि त्यांच्याशी कॉनटॅक्ट पण झाला आहे, तर हा जाहिरात देण्याचा उद्योग का करता आहात तुम्ही?” – शंकरन

“कारण विनायकरावांनी मृत्युपत्रात तसा उल्लेख केला आहे म्हणून. बरं ते असो. तुम्ही तयार आहात का ही इस्टेट ताब्यात घ्यायला?” – सारंग.

“माझं स्पष्ट मत असं आहे की, विनायकरावांनी जेंव्हा लिहून ठेवलं तेंव्हा त्यांना आपली मुलं कुठे आहेत ही माहितीच नव्हतं, पण आता जर त्यांच्याशी संपर्क झालाच आहे तर इतरांचा त्यावर मुळीच हक्क पोचत नाही. मी गोखले असलो तरी सावत्र मुलगा आहे. त्यामुळे माझा तर अजिबातच हक्क असणार नाही. नाही सारंग साहेब, मी या घोळात पडू इच्छित नाही. देवदयेने माझ्या जवळ भरपूर आहे.” – शंकरन.

“शंकरन साहेब, इतक्या साऱ्या गोखल्यांचा पत्ता लागला, पण एकही जण तयार नाही. खुद्द विनायकरावांची मुलं सुद्धा नाही म्हणताहेत. सगळ्यांचं असं मत पडलं की ह्या इस्टेटीवर जी मिळकत होईल, ती  कुणा धर्मदाय संस्थेला दर वर्षी देत जाऊ. आता बोला. मी माझ्या आयुष्यात पैशया साठी भांडणारे खूप लोकं बघितले, पण नको म्हणणारे गोखलेच. एकच नाही सर्वच्या सर्व. हे सर्व विचित्र आहे. माझी तर मतीच गुंग झाली आहे. कहर म्हणजे आता तुम्ही सुद्धा नाही म्हणता आहात.” -सारंग

शंकरन हसला, म्हणाला,

“सारंग साहेब, शोधल्याचं नाटक करून, कोणालाही न शोधता, तुम्ही ही इस्टेट सहज गिळंकृत करूच शकला असता. पण तुम्ही तसं केलं नाही. सर्व गोखल्यांना शोधण्याच्या कामात कुठलीही कसर ठेवली नाही. असं तुम्ही का केलं? तुम्ही एकटे नव्हते, तिघं होता. कोणाच्याच मनात विचार आला नाही इस्टेट बळकावण्याचा? का बरं?” – शंकरन.

सारंग सर हसले. म्हणाले,

“संस्कार, शंकरन साहेब, संस्कार. एवढं एकच कारण आहे. आमच्या मनाची बैठकच अशी आहे, की आम्ही दुसऱ्याच्या संपत्तीचा अपहार करण्याचा विचारही करू शकत नाही. विनायकराव आम्हाला वडीलांच्या जागी होते.” – सारंग.

“करेक्ट आहे. तेच संस्कार आमच्यावर पण झाले आहेत. प्रश्न मिटला.” – शंकरन

“बरं शंकरन साहेब, सगळे इथे जमणार आहेत, एक छान गेट टूगेदर होणार आहे. तुमची पण उपस्थिती कुटुंबासहित प्रार्थनीय आहे.” – सारंग.

“केंव्हा आहे हे गॅदरिंग?” – शंकरन

“पुढच्या आठवड्यात म्हणजे ८ तारखेला एक एक करून जमायला सुरवात होईल. १५ दिवसांचा कार्यक्रम आहे. हे  १५ दिवस आपलं घर नागपुरातल्या एक मोठ्या हॉटेलच्या हाती सोपवलं आहे. २४ तास सेवा. मालमत्ते विषयी मिटिंगा होतील आणि सर्वानुमते जो निर्णय घेतला जाईल, त्या प्रमाणे पुढची दिशा ठरेल. कदाचित दोन तीन लग्न सुद्धा फायनल होतील. सगळे सहकुटुंब येणार आहेत. १५ दिवस नुसती धमाल उडणार आहे. मुख्य म्हणजे आजवर कोणीच कोणाला ओळखत नव्हतं त्या सगळ्यांच्या भेटी होतील, सगळी आपलीच माणसं आहेत. आपसातले नाते संबंध अजूनच घट्ट होतील. शंकरन साहेब, तुम्ही यायलाच पाहिजे.” – सारंग.

‘इच्छा तर खूप होते आहे, पण कसं जमतंय ते बघावं लागेल.” – शंकरन

साहेब, इंग्लंड वरुन लोकं येत आहेत, अमेरिकेतून येत आहेत, सातारा, कारवार, गोकर्ण, वेळणेश्वर, सूरत आणि कानपूर वरुन सुद्धा येत आहेत. तुम्ही पण यायलाच हवं. खर्चाची काळजी करू नका. ती जबाबदारी आमची.” – सारंग.

“अहो, खर्चाचा प्रश्न नाहीये, कालीकत असं कितीसं दूर आहे? पण आमचा व्यवसाय आहे, त्याचं जरा बघावं लागेल.” – शंकरन.

“अहो, विनायक रावांच्या मुलांचा इंग्लंड मधे, विश्राम आणि अनिलचा साताऱ्या मधे, सान्यांचा सूरत मधे आणि लक्ष्मणचा गोकर्ण मधे संगळ्यांचाच व्यवसाय आहे. त्यांची व्यवस्था करूनच ही सगळी मंडळी १५ दिवसांसाठी इथे येत आहेत. सर्वांच्या ओळखी होतील, १५ दिवस मजेत जातील, म्हणून सगळे येणार आहेत. विनायकरावांच्या इस्टेटीची कोणालाच पडली नाहीये.” – सारंग.

“ओके. पटलं मला तुमचं म्हणण. येतो आम्ही. शक्यतो ८ तारखेलाच पण नाहीच जमलं तर ९ तारखेला आम्ही पोहोचू. बरं आता मी निघू?” – शंकरन.

“निघू काय म्हणता आहात? आता आपण सगळेच जेवायला जाऊ. तुमची भेट सेलीब्रेट करू. चला.” – सारंग.

जेवण झाल्यावर शंकरन आपल्या हॉटेल वर गेला. बाकी मंडळी हॉटेलच्या दारात जरा वेळ बोलत बसली.

“तुला काय वाटतं निशांत?” – सारंग.

“१०० टक्के गोखले. याने पण संपत्ति नाकारली. गोखल्यांच्या पंगतीत अगदी फिट बसतो आहे.” – निशांत.

“अरे हो, एक सांगायचंच राहिलं. एक पत्र आलं आहे, आणि खरं म्हणजे मी ते दाखवायलाच आलो होतो. पण इथे वेगळीच स्टोरी सुरू होती, मग मी विसरून गेलो. पण आता दाखवतो. इंट्रेस्टिंग पत्र आहे.” – सारंग.

सारंग सरांनी निशांतला पत्र दाखवलं.

“हे तर जाहिरात वाचून पाठवलेलं पत्र आहे. म्हणजे अजून एक गोखले!” – निशांत.

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com