तोतया वारसदार
पात्र परिचय –
महादेवराव. – गोखले घराण्याचा मूळ पुरुष. वेळणेश्वर. कोकण.
विनायकराव - महादेव गोखल्यांची सहावी पिढी
- महादेवराव – सखाराम- भास्कर – वसंत – विनायक.
- विनायक नागपूरला स्थायिक.
धनशेखर – पोलिस इंस्पेक्टर
भाग १
त्या दिवशी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सुशीलाने विनायकरावांच्या घराची बेल दाबली. चार वेळा बेल दाबल्यावर सुद्धा आतून काहीच उत्तर आलं नाही, हे बघून तिने घरं भोवती चक्कर मारली. कदाचित विनायकराव मागच्या अंगणात असतील या विचाराने ती घराच्या मागच्या अंगणात गेली. कधी कधी ते मागच्या बगीच्यात सकाळी सकाळी फिरायचे, पण आज ते तिथेही नव्हते. सगळं कसं शांत होतं. सशीलाला जरा आश्चर्यच वाटलं, पण मग पुन्हा समोर येऊन जवळच्या किल्लीने दार उघडलं. आत काहीच हालचाल दिसली नाही, तिला जरा आश्चर्यच वाटलं, साधारणत: नेहमी या वेळेस समोरच्या हॉल मधे विनायकराव पेपर वाचत असायचे, पण आज हॉल मधे कोणीच नव्हतं. त्यांना पेपर वाचताना चहा लागायचा, मग सुशीला त्यांना प्रथम चहा करून द्यायची आणि मग बाकीच्या कामांना हात लावायची. पण आज विनायकराव समोर हॉल मधे नव्हते, तिला वाटलं की तब्येत बरी नसेल, म्हणून ती बेडरूम मधे गेली. बेडरूम मधे विनायकराव झोपले होते. तिने विनायकरावांना आवाज दिला. “ आजोबा, उठता ना, बरं वाटत नाहीये का आज? थांबा मी चहा करून आणते.” विनायकरावांनी काहीच उत्तर दिलं नाही म्हणून ती आणखी जवळ गेली आणि तिने हाक मारली. पण तरीही उत्तर आलं नाही, म्हणून तिने त्यांना हलवलं आणि तिच्या अंगावर एकदम शहाराच आला. विनायकरावांच शरीर एकदम थंडगार पडलं होतं. विनायकराव आता या जगात नाही हे लक्षात यायला तिला वेळ लागला नाही. ती घाबरली, तोंडातून शब्द फुटेना, तश्याच घाबरलेल्या अवस्थेत ती धावत बाहेर आली. रस्त्याच्या पलीकडे शृंगार बुटीक होतं त्या दुकानात धापा टाकतच शिरली.
“अंजली मॅडम लवकर चला.” सुशीलानी धापा टाकतच म्हंटलं.
“अग, काय झालं? एवढी घाबरलीस कशाने?” अंजलीने विचारलं.
“ते समोरच्या घरातले आजोबा” सुशीलाला तेवढं सांगताना सुद्धा धाप लागली.
“अग काय झालं ते नीट सांग, काय झालं आजोबांना?” – अंजली.
पण सुशीला काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती, तिने अंजलीचा हात पकडला आणि म्हणाली “आधी चला लवकर.”
अंजली तिच्या बरोबर घरात आली आणि तिने विनायकरावांना बघितल्यावर तिच्या लक्षात आलं की सर्व संपलं आहे. मग तिने सुशीलाला विचारलं की “आजोबांचा कोणी मित्र किंवा नातलग तुला माहीत आहे का?” सुशीलाने नाही म्हणून मान हलवली मग अंजलीने फारसा विचार न करता, पोलिसांचा 100 नंबर फिरवला.
कंट्रोल रूम मधून माहिती मिळाल्यावर जवळच्या पोलिस स्टेशन चे इंस्पेक्टर धनशेखर आपल्या ताफ्या सह लगेच पोचले. प्राथमिक तपासणी झाल्यावर पोलीसांच्या लक्षात आलं की हा घातपात किंवा आत्महत्येचा प्रकार नाहीये. इंस्पेक्टर साहेबांनी मग बरोबर आलेल्या पोलिसांना सांगितलं की सर्व घर तपासा, काही मिळतंय का ते बघा, आणि मग त्यांनी अंजली कडे मोर्चा वळवला.
“फोन तुम्ही केला ?” – इंस्पेक्टर धनशेखर.
“हो. मी इथे आल्यावर हा प्रकार बघितला आणि तुम्हाला फोन केला.” – अंजली.
“तुम्ही कोण ? नाव गाव, पत्ता काय ?” – इंस्पेक्टर धनशेखर..
“मी मागच्याच गल्लीत राहते, आणि या घराच्या समोर माझं शृंगार बुटीक नावाचं दुकान आहे.” – अंजली.
“आजोबांचा मृत्यू झाला आहे हे तुम्हाला कसं कळलं ? तुम्ही रोज इथे येता का?, आजोबांशी तुमचं काय नातं आहे ?”. – इंस्पेक्टर धनशेखर.
“माझं आणि आजोबांचं काही नातं नाहीये, ही सुशीला आजोबांच्याकडे काम करते. ती आज सकाळी माझ्या दुकानात धापा टाकत आली आणि मला ओढत इथे घेऊन आली. ती खूप घाबरली होती, म्हणून मीच तुम्हाला फोन केला.” – अंजली
“सुशीला, आजोबांना सर्वात प्रथम तूच पाहीलंस ?” – इंस्पेक्टर धनशेखर.
“हो. साहेब.” – सुशीला.
“सकाळपासून काय काय घडलं ते सविस्तर सांग.” – इंस्पेक्टर धनशेखर.
“मी नेहमी प्रमाणे कामाला आले, घंटी वाजवून सुद्धा दार ऊघडलं नाही तेंव्हा मागच्या दारी बघायला गेले. मला वाटलं की आजोबा बगीच्यात असतील म्हणून, पण तिथेही ते नव्हते म्हणून मी पुन्हा समोर आले, आणि जवळच्या किल्लीने दार उघडलं. नेहमी आजोबा समोरच्या हॉल मध्ये पेपर वाचत असतात, पण आज नव्हते. मला वाटलं की त्यांची तब्येत बारी नसेल, म्हणून मी बेडरूम मध्ये गेले, तर सगळं शरीर थंडगार पडलं होतं म्हणून मी धावत जाऊन अंजली मॅडमला बोलाऊन आणलं.” सुशीलाकडून सगळं ऐकून घेतल्यावर इंस्पेक्टर साहेब म्हणाले “ तू किती वर्षांपासून आजोबांच्या कडे काम करते आहेस?”
“१० वर्ष झाले साहेब.” – सुशीला.
“आजोबांचे कोणी नातलग, मित्र यांची काही माहिती आहे का? आजोबांच्या कडे कोण कोण येत होतं, याबद्दल काही माहिती आहे का ?” – धनशेखर.
“साहेब, गेल्या १० वर्षात कोणी मित्र किंवा नातलग येतांना मी तरी पाहीले नाहीत. पण डॉक्टर प्रशांत दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी यायचे आणि तपासून जायचे. आता या वेळेस मागच्याच रविवारी येऊन, सगळं काही ठीक आहे असं सांगून गेले साहेब. काही काळजी घ्यायची असेल तर मला सांगून जायचे. पण या वेळी त्यांनी काही सांगितलं नाही. कोणी वकील साहेब यायचे पण ते अधून मधूनच, जेंव्हा आजोबा बोलवायचे तेंव्हा.” – सुशीला
“काय नाव वकील साहेबांचं ?, आणि कशा बद्दल बोलणी चालायची, काही कल्पना आहे का ?” – धनशेखर.
“नाही साहेब, ती पलीकडे लायब्ररीची खोली आहे तिकडे बसून कामं चालायची. मी फक्त चहा द्यायला जायची. आणि नाव नाही माहीत साहेब, आजोबा त्यांना वकील साहेब असंच म्हणायचे” सुशीलाने सांगितलं.
“अजून कोणी येत असेल तर आठव जरा.” – धनशेखर.
“अजून एक साहेब यायचे. पण ते सुद्धा अधून मधूनच यायचे. आजोबा त्यांना सीए साहेब म्हणायचे. त्यांचंही नाव माहीत नाही साहेब. ते बरेच कागद पत्र घेऊन यायचे आणि आजोबांच्या सह्या घ्यायचे.
“ठीक आहे, सुशीला, आणि अंजलीबाई तुम्ही, नाव, पत्ता आणि फोन नंबर देऊन ठेवा. जरूर पडली तर तुम्हाला फोन करू. अंजलीबाई तुम्ही जाऊ शकता.” – इंस्पेक्टर
“सुशीला,” अंजली गेल्यावर, इंस्पेक्टर साहेबांनी पुन्हा सुरवात केली. “या तीन मजली घरात किती खोल्या आहेत ?”
“साहेब १९ खोल्या आहेत पण हॉल, बेडरूम, लायब्ररी आणि किचन एवढ्याच वापरात आहेत बाकीच्या बंद करून ठेवल्या आहेत.”
“रोजची साफ सफाई फक्त याच चार खोल्यांची होते का?” – इंस्पेक्टर धनशेखर.
“हो साहेब, बाकीच्या तीन महिन्यातून एकदा साफ कराव्या लागतात. एकदा दिवाळीच्या वेळेस साफ केल्या जातात.” – सुशीला.
“ठीक आहे. अजून काही सांगण्यासारखं आहे का? जरा आठवून पहा.” इंस्पेक्टर साहेब म्हणाले.
थोडा वेळ सुशीला विचारात पडली, म्हणाली “ साहेब, दोन एक महीने झाले असतील, आजोबांनी तिघांनाही बोलावून घेतलं होतं, आणि बराच वेळ लायब्ररीत बैठक चालली होती.”
“काही कल्पना आहे का, बैठकीत काय झालं ते?” – इंस्पेक्टर
“नाही साहेब, मी फक्त चहा आणि नाश्ता घेऊन गेले होते. पण काही तरी गंभीर विषयावर चर्चा चालली होती. हे पक्कं.” सुशीला म्हणाली.
“अजून काही?” पण सुशीला जवळ आता सांगण्यासारखं काहीच नव्हतं, म्हणून ती गप्प बसली.
“ठीक आहे सुशीला जा तू. पण जरूर पडली तर पुन्हा बोलावू तुला” इंस्पेक्टर साहेबांनी सुशीलाला जायला सांगितलं.
ते फोटोग्राफर ची वाट पहात होते, ते पण येऊन पोचले. त्यांचं काम संपता संपता अॅम्ब्युलन्स पण आली. बॉडी शव चिकित्सा करण्यासाठी पाठवल्यावर, त्यांनी सर्व खोल्या तपासायला आपल्या टीमला सांगितलं.
बाकी खोल्यांमध्ये तर काही विशेष सापडलं नाही, पण लायब्ररी मधे डॉक्टर, वकिल आणि CA च्या नावाने काही फाईल्स मिळाल्या. आणि एक खासगी असं लिहिलेली फाइल मिळाली. त्या त्यांनी पंचनामा करून ताब्यात घेतल्या, आणि घर सील करून पोलिस स्टेशनला गेले.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा