Login

तोतया वारसदार भाग ४५

“अरे, त्याने जे सर्टिफिकेट बनवून दिलं होतं, तेंव्हा बडेबाबू सुट्टीवर होते, आणि आधी बडेबाबूननी ??

तोतया वारसदार

पात्र रचना

बबन                       सारंग वकिलांचा चपराशी.

सुभाष गोखले                 बबनचा बार मधला मित्र.

भाग  ४५                  

भाग ४४   वरून पुढे  वाचा....

बबन सुभाषची वाट पहाट कॉफी हाऊस समोर थांबला होता. थोड्या वेळातच सुभाष आला. मग दोघं आत शिरले.

“काय सुभाष, काम झालं का?” – बबन.

“हो झालं एकदाचं. तू सुचवल्याप्रमाणे. जाऊन त्या क्लार्कला पटवलं. पण कामाचं स्वरूप  सांगीतल्यावर तोच हादरला. मग माझं काम खूप सोपं झालं.” – सुभाष.

“त्याला भीती कशाची होती? त्याचं नाव तर कुठेच आलं नव्हतं.” – बबन.

“अरे, त्याने जे सर्टिफिकेट बनवून दिलं होतं, तेंव्हा बडेबाबू सुट्टीवर होते, आणि आधी बडेबाबूननी नकार दिला होता. आणि आता जर बोर्डाचं पत्र त्यांच्या हातात पडलं असत, तर त्यांनी चौकशी सुरू केली असती आणि हा माणूस फासला असता त्यात. त्यामुळे तो घाबरला. त्यांच्या नोकरीवर पण गदा येऊ शकली असती.” – सुभाष.

“पण मग अशी परिस्थिती होती, तर त्याने हे सर्व कसं मॅनेज केलं?” – बबन.

“नाही माहीत. मी काही पत्र  घ्यायला गेलो नव्हतो. पत्र परस्पर बोर्डाला पाठवल्या  गेलं. त्यामुळे मला खरंच माहीत नाही. जाऊ दे, आपलं काम झालं ना, आपल्याला काय करायचं आहे? आपण तर जाम खुश आहोत. चल माझ्याकडून आज डोसा खिलवतो तुला. एंजॉय करो यार.” – सुभाष. बबनने पण मान डोलावली. मग डोसा खाता खाता बबनने विचारलं, “पण त्याला पैसे देण्याचं प्रॉमिस केलं असशील ना? मग आता तर पत्र मिळालं, तर मग पुन्हा जाणार आहेस का चंद्रपूरला?

“तुला वाटतं तेवढा तो माणूस मूर्ख नाहीये, पत्र डायरेक्ट बोर्डाला पाठवायचं म्हंटल्यांवर त्याने आधीच पूर्ण पैसे घेतले. एका दृष्टीने बरंच झालं. आता चंद्रपूरला जाण्याचं काहीच कारण नाही.” – सुभाष.

“हे काम तर झालं आता पुढचं पाऊल काय?” – बबन.

“आता यूनिवर्सिटी मधून डिग्री सर्टिफिकेट दुरुस्त करून आणायचं.” – सुभाष.

“मला हे समजत नाही, की मॅट्रिक चं सर्टिफिकेट हे बेसिक डॉक्युमेंट असतं, आणि ते आपल्या हातात आलं आहे, मग डिग्रीचा आटापिटा कशाला? राहू दे की तसंच. तू अविनाशचा मुलगा आहे हे तर या बोर्डाच्या दाखल्याने सिद्धच होत आहे.” – बबन.

“बबन इतकी वर्ष सारंग सरांसारख्या प्रख्यात वकिलाकडे काम करून सुद्धा, तुझ्या लक्षात येत नाहीये.” – सुभाष.

“सुभाष, तू असं कोड्यात बोलू नकोस. सरळ सरळ सांग,” – बबन.

“अरे वकील लोक कुठलेही प्रश्न केंव्हाही विचारू शकतात. आणि अनुभवांमुळे त्यांना कोणचा प्रश्न केंव्हा विचारायचा हे कळतं. त्यांचं टाइमिंग जबरदस्त असतं. आपण सामान्य माणसं, अचानक आलेल्या वेगळ्याच प्रश्नाला आपण गोंधळतो, आणि त्यांना हवं असलेलं उत्तर देऊन बसतो. असे अनेक सापळे असतात त्यांच्या पोतडी मधे. समोरचा माणूस हमखास अडकतो बघ त्यामध्ये. त्यातून सारंग सर पडले फौजदारी वकील, ते या बाबतीत एक्स्पर्ट आहेत. त्यांना माझ्या बोलण्या मधे थोडी जरी फट मिळाली, तरी ते माझ्या क्षणार्धात चिंध्या चिंध्या करून टाकतील. असं होऊ नये म्हणून हा सारा उपद्व्याप आता कळलं?” – सुभाष.

“अरे, एकदा तू अविनाशचा मुलगा आहेस, हे बोर्डाच्या सर्टिफिकेट वरून सिद्ध झाल्यावर तुझ्या डिग्रीचा प्रश्न उपस्थित होतंच नाही. सारंग सरांना काय पडली आहे, तू किती शिकला आहेस याची?” – बबन.  

“बबन, तू विसरतो आहेस की आपला क्लेम करोडो रुपयांचा असणार आहे. इतकी मोठी संपत्ती सारंग सर सहजा सहजी कोणाच्या हातात जाऊ देतील? ही माणसं फार प्रामाणिक आहेत, नाहीतर सर्व संपत्ती आपसा मधे वाटून नसती का घेतली? वारसदार शोधण्याचा आटापिटा कशाला केला असता. आणि त्या साठी लाखों रूपयांचा खर्च कशाला करत बसले असते? नुसतं एवढंच नाही, ते माझी सुद्धा सर्वकष चौकशी करायला निशांतला सांगतील असा माझा अंदाज आहे. मग आता सांग, डिग्री वर बापाचं नाव वेगळंच दिसलं तर काय होईल? आपले सगळे प्रयत्न पाण्यात जातील. छोटीसी सुद्धा फट रहायला नको. फूल प्रूफ प्लॅन असायला पाहिजे.” – सुभाष.

“हूं, आता आलं लक्षात. तू बरोबर बोलतो आहेस. मग आता पढे काय?” – बबन.

“आता यूनिवर्सिटी. जाऊन अर्ज द्यायचा सुधारित डिग्री सर्टिफिकेट साठी. महिना तरी लागेल पण काम होऊन जाईल. बोर्डाचं सर्टिफिकेट असल्याने प्रॉब्लेम येणार नाही. असं मला वाटतं.” – सुभाष.

“इतका वेळ लागेल? उशीर नाही का होणार?” – बबन.

“सुदैवाने आपल्या जवळ भरपूर वेळ आहे. निशांत आत्ता वाराणसीला गेला आहे, मग नाशिक, मग घराचा जीर्णोद्धार, किमान सहा महीने तरी आहेत आपल्या हातात. आपली सर्व बाजूने तयारी झाली, की मग ठरवू क्लेम केंव्हा ठोकायचा ते.” – सुभाष.

“मी त्या बद्दलच विचार करत होतो, जर सारंग सर म्हणाले, की तुम्हाला कसं कळलं की इथे संपत्तीचं वाटप सुरू आहे म्हणून? तर काय उत्तर द्यायचं ते तयार करून ठेव. “बबनने सांगितलं”, असं नाही सांगता येणार.” – बबन.

“हूं, मी यावर बराच विचार केला आहे, पण अजून उत्तर सापडलं नाहीये, बघूया जेंव्हा वेळ येईल तेंव्हा.” – सुभाष

बबन काही बोला नाही. त्यांच्या जवळ पण उत्तर नव्हतं. तो गप्प बसला. मग मीटिंग संपली.

दुसऱ्या दिवशी सुभाष लंच टीम मधे यूनिवर्सिटी मधे गेला. सगळी चौकशी करून अर्ज दिला आणि फी पण भरून आला. साधारण महिन्या भरात डिग्री घरपोच येईल असं त्या सांगण्यात आलं. आता महिनाभर वाट पाहण्या व्यतिरिक्त काहीच करायचं नव्हतं.

त्यावेळेचा सदुपयोग म्हणून त्याने तीन चार वाचनालयांची फी भरून सदस्यता घेतली.  बांगलादेश च्या सुरवातीच्या काळा वर असलेली पुस्तकं आणून, त्या वेळच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास सुरू केला. मध्येच एकदा बबनशी भेट झाली, तेंव्हा बबन म्हणाला, “IAS साठी सुद्धा मुलं एवढा अभ्यास करत नसतील,”

“करावाच लागेल, IAS ची परीक्षा दोनदा तीनदा देता येत. इथे दूसरा चान्स मिळणारच नाहीये. जे काही होईल ते एकदाच. मालामाल किंवा जेल. तुला काय आवडेल?”– सुभाष.

“ए बाबा, तू सारखा सारखा जेल चा विषय का काढतोस? तुला काही आत मधून जाणवतेय का? भीती वाटत असेल, आणि आत्मविश्वास नसेल, तर आपण नको जाऊया पुढे. काही विपरीत घडायच्या अगोदरच आपण थांबू.” बबन.

“बबनशेठ इतके भावनेच्या प्रवाहात अडकू नका. मी गंमत केली. मला आत्मविश्वास नसता तर इतकी मजल मी मारलीच नसती. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आहे ना, मी सर्व सांभाळून घेईन.” – सुभाष.

“सुभाष, तुझ्या ओळखीचा कोणी वकील आहे का?” – बबन.

“वकील? कशाला?” – सुभाष.

“सारंग सरांसमोर जाण्या अगोदर थोडी रंगीत तालीम केली तर कसं?” – बबन.

“त्याने काय साध्य होणार आहे?” – सुभाष.

“म्हणजे असं की, वकील लोक कसे प्रश्न विचारतात, त्यांची पद्धत काय असते, ते विरुद्ध बाजूने असतील तर कसे विचार करतात, हे कळून येईल आणि जर काही फटी आढळल्या, तर त्या बुजवता येतील. म्हणजे जर फूल प्रूफ प्लॅन तयार करायचा असेल, तर हे करावं असं मला वाटत.” – बबन.

सुभाष जरासा विचारात पडला मग म्हणाला, “हो यार, तू म्हणतो ते बरोबर आहे. आपल्याला प्रश्नोत्तरांची अजिबात सवय नाहीये. पण कोणाला गाठायचं? कोण तयार होईल या असल्या फ्रॉड कामात मदत करायला? शोधावाच लागेल.”

“तुझ्या ओळखी बऱ्याच आहेत, मग त्यात एखादा वकील पण असेल ना.” बबन

“ते आहे रे, पण सगळे आपल्याच वयाचे, सारंग सरांच्या सारखा विचार करणारा अनुभवी वकील पाहिजे आपल्याला. तो कुठून आणायचा? तुझ्या माहितीत आहे का कोणी?” – सुभाष.

मी काय सांगू? मला बरेच माहीत आहेत, पण मी विचारल्यावर पांच मिनिटांच्या आत सारंग सरांना फोन जाईल. मग? तूच पहा.” – बबन.

“बघावं लागेल. पण जर असा कोणी अनुभवी मिळालाच, तर त्याला सर्व कल्पना द्यावी लागेल, मग त्याने सुद्धा जर हिस्सा मागीतला तर काय करायचं?” – सुभाष.

“नाही, ही रिस्क नाही घेता येणार. कारण त्याने हिस्सा जरी मागीतला नाही, पण चुकून कोणाजवळ बोलला आणि ते सारंग सरांपर्यंत पोचलं, तर सगळंच संपेल. फूल स्टॉप” – बबन

“बघू, विचार करू, घाई घाईने काही करू नये हे उत्तम.” – सुभाष.  आणि मीटिंग संपली.    

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

0

🎭 Series Post

View all