Login

तोतया वारसदार भाग ५०

“हो, मी सुधाकर गोखलेच बोलतो आहे. मीच फोन केला होता. आत्ताच मला दिनकर गोखले यांच्या संदर्भात एक म??

तोतया वारसदार

पात्र रचना

निशांत                      शोधकर्ता.

दिनकर                      सखाराम पंताचा भाऊ, महादेव रावांचा मुलगा.

सुधाकर गोखले                निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले.

विशाखा                     सुधाकररावांची बायको.

भाग  ५०    

भाग ४९  वरून पुढे  वाचा....

“काही करू नको, निशांत वाराणसीचं काम उरकून इथेच आला आहे. आमची त्या बद्दलच मीटिंग चालू आहे. तू तिथेच साताऱ्याला थांब. निशांत आणि तुला वेळणेश्वरला जायचं आहे. तुमच्याच गावी. निशांत तुला साताऱ्याला जॉइन होईल.” – सारंग.

“अरे, काय सांगता काय? आवडेल मला तिथे जायला. पण निशांतने एकट्यानेच वाराणसीचं काम केलं? आणि ते ही एवढ्या लवकर?” – रोहन

ते सगळं, तुला निशांत भेटला की सांगेलच. उद्या तो इथून निघेल आणि परवा सकाळी महाराष्ट्र एक्सप्रेस ने साताऱ्याला पोहोचेल. मग दोघे मिळून तुमचा वेळणेश्वरचा  कार्यक्रम ठरवा.” – सारंग.

“ठीक आहे. निशांतची वाट पाहतो.” – रोहन.

*****

निशांत कानपुर वरुन निघाल्यानंतर दोन दिवसांनी सुधाकर गोखल्यांची बायको आणि मुलं मामा कडे सुट्टी घालवून रत्नागिरीहून, कानपुरला परतली. आधी रत्नागिरीला काय मजा केली यांचा सुरवाती पासून अगदी सविस्तर वृत्तान्त मुलांकडून ऐकून झाला, मग रात्री बायकोने त्यात भर घातली. तो दिवस सुधाकररावांचा खूप आनंदात गेला.

दुसऱ्या दिवशी ड्यूटि वरून आल्यावर, चहा पिता पिता, गोखल्यांनी निशांत आणि त्याच्या कामाबद्दल सविस्तर सांगीतलं. त्यांनी निशांतला मदत करण्यासाठी कसा पुढाकार घेतला, धावपळ केली पण सगळी मेहनत निव्वळ कॅमेरा न मिळाल्या मुळे कशी पाण्यात गेली, आणि निशांतला हात हलवतच नागपूरला जावं लागलं. हे सगळं विस्ताराने सांगीतलं. “बिचारा खूपच निराश झाला होता.” गोखले शेवटी म्हणाले.

विशाखा, म्हणजे सुधाकररावांची बायको, जरा विचारात पडली होती.

“काय ग कसला एवढा विचार करते आहेस?” – सुधाकरराव

पण गोखल्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून विशाखाने खोदून खोदून पुन्हा एकदा सगळे डिटेल्स विचारून घेतले. गोखले नवलच करत होते, की इतका अगदी  बारीक सारिक तपशील विचारण्या सारखं काय आहे या विषया मधे. पण ते काही बोलले नाहीत आणि जे विशाखा विचारात होती त्यांची उत्तरं देत होते. पूर्ण समाधान झाल्यावर, ती जरा विचार करत होती,  मग थोड्या वेळाने, विशाखाला कंठ फुटला. म्हणाली, “ मी काय म्हणते, ऐकता का जरा”

“अग मघापासून मी वाटच पाहतो आहे तुझ्या बोलण्याची. निशांतच्या गोष्टी मधे तुला अचानक इंट्रेस्ट कसा आला तेच कळत नाहीये. तूच सांग.” – गोखले.

“सांगते, जरा मला जुळवा जुळव करू द्या. हूं, माझ्या खापर पणजोबांचे आजोबा, शांताराम भिडे हे पण ५७ च्या युद्धाच्या वेळेस कानपुरलाच होते. त्यांचा त्या युदघात  सक्रिय सहभाग होता. तात्या टोपे महाराजांच्या नेतृत्वाखाली  जे सैन्य लढत होतं, त्यातल्या एका तुकडीत हे पण एक होते. त्यांच्या तुकडीत, त्यांच्या बरोबर आणखी एक जण होता, दिनकर गोखले. ज्यांच्या बरोबर या शांतारामांची  पुढे घनिष्ठ मैत्री झाली. युद्ध संपल्या नंतर शांताराम त्यांना आपल्या बरोबर नीवेन्डीला घेऊन आले. नीवेन्डीला आमचं घर होतं. दिनकर राव काही वर्ष नीवेन्डीलाच होते. पुढच्या काळात  केंव्हा तरी म्हणजे नेमकं केंव्हा आठवत नाही, आमची मंडळी नीवेन्डीहून रत्नागिरीला स्थायिक झाली. शांताराम आजोबांनी त्यावेळेचे त्यांचे अनुभव एका वहीत लिहून काढले. ती वही आमच्याकडे आहे. प्रत्येक पिढी त्याचं भक्तिभावाने पारायण करते. त्यात दिनकर रावांचा उल्लेख आहे, बऱ्याच वर्षांपूर्वी मी ती वही वाचली होती, त्यामुळे  मला आता निटसं आठवत नाही. कोणी सांगावं कदाचित हेच ते दिनकर राव असतील, ज्यांना शोधण्यासाठी तुम्ही एवढा आटा पिटा केला. तुम्ही निशांतला माझ्या भावाशी संपर्क करायला सांगा. त्याला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत, आणि त्याच्या जवळ ती वही पण आहे.” – विशाखा.

“तू आत्ता जे सांगते आहेस, ते खूपच आश्चर्यकारक आहे. निशांत बिचारा निराश होऊन गेला वापस नागपूरला. चांगला मुलगा आहे. ज्या निष्ठेने तो काम करतो आहे, ते खरंच कौतुकास्पद आहे. इतक्या मोठ्या संपत्तीचे वारसदार शोधतो आहे, पण त्याला स्वत:ला अजिबात मोह पडलेला नाही. मी आत्ताच सारंग सरांना फोन करतो आणि त्यांना अपडेट देतो. नक्कीच त्यांना आनंद होईल. तुझ्या भावाला पण नंतर फोन करतो, आणि त्याला सांगतो की निशांतचा फोन येईल म्हणून.” – गोखले. विशाखाने संमती दर्शक मान डोलावली.

“हॅलो, सारंग सर आहेत का? मला त्यांच्याशी महत्वाचं काही बोलायचं आहे.”- गोखले.

“सारंग सर कोर्टात आहेत, अजून ऑफिस मधे आले नाहीत. मी बबन बोलतो आहे, ऑफिस चा प्यून. काय काम होतं मला सांगा, मी निरोप देईन.” – बबन.

“मला त्यांच्याशीच बोलायचं आहे सात वाजेपर्यंत येतील का ते?” – गोखले.

“हो सात पर्यन्त येतील. मी सांगतो त्यांना कोणाचा फोन होता म्हणून सांगू?”- बबन.

“हा नंबर घे लिहून. आणि त्यांना सांग की कानपूरहून फोन आला होता म्हणून. अर्जंट  आहे म्हणावं.” आणि गोखल्यांनी फोन ठेऊन दिला.

“सारंग वकील नव्हते का ऑफिस मधे? कोण बोललं मग?”- विशाखा.

“त्यांचा प्यून होता लाइन वर.” – गोखले.

“मग तुम्ही तुमचा नंबर तर दिला पण नाव सांगायला विसरले, सारंग सरांना कसं कळेल की कोणी फोन केल होता ते?” – विशाखा.

“विसरलो नाही. मुद्दामच नाही सांगीतलं. गोखल्यांच्या कोट्यावधीच्या संपत्तीचा खेळ आहे, उगाच ऐऱ्या गैऱ्या माणसाला सगळी माहिती देणं धोक्याच ठरू शकतं म्हणून जरा सावधगिरी बाळगली. अजून काही नाही.” – गोखले.

सारंग कोर्टातून  आल्यावर बबनने त्यांना कानपूरच्या फोन बद्दल सांगीतलं आणि नंबर पण दिला. “अजब माणूस होता सर तो, नाव पण सांगीतलं नाही, नुसताच नंबर दिला. आपले तर कानपूरचे कोणीच पक्षकार नाहीयेत, मग हा माणूस कसं म्हणाला की अर्जंट काम आहे म्हणून?” – बबन.

“अरे जाऊ दे, अर्जंट असेल तर तोच समोरून फोन करेल. सोड पिच्छा.” – सारंग.

नंतर फारसं काम नव्हतं म्हणून सारंग घरी गेला. बबन पण ऑफिस बंद करून गेला. त्याला माहीतच नव्हतं की निशांत कानपूरला पण जाऊन आला आहे म्हणून. त्याला फक्त वाराणसी बद्दलच कल्पना होती. घरी जातांना सारंग विचार करत होता, की कानपूर वरुन फोन म्हणजे नक्कीच सुधाकर गोखल्यांचा असला पाहिजे. त्यांना काहीतरी महत्वाची माहिती मिळाली असेल, म्हणूनच फोन केला असावा. बबनला नाव सांगीतलं नाही कारण बहुधा इतकी महत्वाची माहिती त्यांना शेयर करायची नसेल कदाचित. सारंग घरी गेल्यावर, फ्रेश होऊन त्याने बबनने दिलेला नंबर फिरवला.

“हॅलो, मी नागपूरहून सारंग वकील बोलतो आहे, तुम्ही दुपारी फोन केला होता मला. त्यावेळी मी कोर्टात होतो. आपण सुधाकर गोखले का?” – सारंग.

“हो, मी सुधाकर गोखलेच बोलतो आहे. मीच फोन केला होता. आत्ताच मला दिनकर गोखले यांच्या संदर्भात एक महत्वाची माहिती मिळाली, तुमच्या शोध कार्यात कदाचित काही मदत होईल असं वाटलं म्हणून, ती तुम्हाला सांगण्यासाठीच फोन केला होता. निशांत आहे का तिथे? तो नाशिकला जाणार होता म्हणून विचारलं.” – गोखले.

“निशांत तर नागपूरात नाहीये, पण तो सांगत होता की तुम्ही खूप मदत केली त्याला. ओळख पाळख नसलेल्या माणसासाठी तुम्ही जे अपरिमित कष्ट घेतले, त्याबद्दल तो खूप भरभरून बोलत होता. खूप खूप आभार तुमचे गोखले साहेब.” – निशांत.

“मला तो मुलगा आवडला. खूप कष्टाळू आणि विनम्र आहे तुमचा निशांत. आणि एक गोष्ट विसरता तुम्ही, काम गोखल्यांचच होतं, मग मी मदत करायलाच पाहिजे.  नाही का?” – गोखले.

“आता तुम्ही असं म्हंटल्यावर  मी काय बोलणार? बरं तुम्ही काय सांगणार होता? कसली माहिती?” – सारंग.

मग गोखल्यांनी त्यांना विशाखाने जे सांगीतलं होतं ते सारंग सरांना सांगीतलं. सर्व ऐकल्यावर सारंग सर म्हणाले, “मी आता साताऱ्याला फोन करून कळवतो. निशांत उद्या दुपार पर्यन्त तिथे पोहोचेल. तुम्हाला काय वाटतं त्याला तुमच्या मेहुण्याला फोन करायला सांगू, की आधी तुम्हाला करायला सांगू?” – सारंग.

“मला फोन करायची काहीच गरज नाहीये. माझं आणि विशाखाच्या  भावाचं बोलणं झालंय. त्यालाच फोन करू द्या किंवा त्याला थेट रत्नागिरीलाच जायला सांगा. तो या कामासाठी कानपूरला येऊ शकतो, तर रत्नागिरीला नक्कीच जाऊ शकेल.” – गोखले.

“तुम्ही म्हणता तसंच करतो. निशांतला सांगतो की आधी फोन करून केंव्हा भेटायला येऊ असं विचार आणि मग सरळ रत्नागिरीला जाऊन भेट. बघ काय माहिती मिळते ते.” – सारंग.

मग सारंगनी साताऱ्याला फोन लावला. विश्राम आणि दिनेश अजून यायचे होते. रोहन होता, त्याला सारंगने अपडेट दिलं आणि निशांत आल्यावर माझ्याशी बोलायला सांग असा निरोप दिला.

दुसऱ्या दिवशी दुपारी निशांत साताऱ्याला पोचला. रोहनने त्याला सारंग सरांचा निरोप दिला. मग संध्याकाळी त्याचं आणि सारंग सरांचं बोलणं झालं. मग रात्री जेवण झाल्यावर बैठक भरली आणि ठरलं की रोहन आणि निशांत उद्या रत्नागिरीला जातील.

दिनेश म्हणाला “आमची गाडी आणि ड्रायव्हर घेऊन जा म्हणजे काही अडचण येणार नाही.”

“अरे नको, त्यापेक्षा टॅक्सी बूक करून दे, कारण  जर तिथून अजून कुठे जायचं असेल तर तुमची गाडी अडकून पडेल. उगाच तुमचं खोळंबा व्हायचा, नकोच ते. टॅक्सीच बरी. तू फक्त बूक करून दे.” – निशांत.

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com