असंभव

Twisted Love story

मी गौतम चंद्रकांत चव्हाण. एक मिडल क्लास म्हणजे मध्यमवर्गीय मराठी माणूस. दादर येथे जुन्या सोसायटीमध्ये वन बीएचके फ्लॅट मध्ये राहतो..‌घरात मी , माझी आई आणि माझी बायको कौमुदी तसंच मला दोन १० वर्षांची मुलं. कौस्तुभ आणि गौरी. रोज लोकल ने ठाणे – दादर असा प्रवास करणारा मी सभ्य सुसंस्कृत घरातला एक मर्द मराठी माणूस. ठाण्यात एका ऑफिसमध्ये चांगल्या पदावर नोकरी करतो‌ हातात महीन्याचा १५ हजार रुपये पगार. कसंबसं घर चालवण्याचा प्रयत्न करतो. कमावणारा घरात मी एकटाच. माझं वय ३८ . बायको आणि मी समान वयाचे. तसा मी स्वभावाने फार कंजूस माणूस. सध्या माझी एवढी ओळख बास झाली ना ? असो. तुम्ही विचार करत असाल की कथेची नायिका तर रावी आहे तर मग हा गौतम काय करतोय.. तर मी ह्या कथेचा नायक. दिसायला सुंदर नसलो तरी आहे तसा सांभाळून घ्या मला.

           तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करून नायिकेला शोधत आहात ना ? रावीला ? कोण असेल आता ही रावी ? काय असेल आता हे नवं रहस्य ? सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार.

          आज मी ऑफिसच्या कामासाठी मुंबईतून ट्रेनने कोल्हापूरला जात होतो. ट्रेन फारच सुसाट वेगाने धावत होती. एकदा ही फाईल कोल्हापूरला मिस्टर चावला यांना दिली आणि त्यांनी सह्या केल्या की मी झालो एकदाचा मोकळा.. खूप निवांत होतो. हातात घेतलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यावर माझं प्रमोशन होणार होतं. मी खूप खास्ता खाल्या होत्या . अनेक लोकांचे अपमान सहन करत मी माझ्या आयुष्याचा रथ ओढत होतो. बायकोला कॉल करण्यासाठी मी फोन खिशातून काढला.. मोबाईलला रेंज अजिबात नव्हती. पुन्हा फोन खिशात ठेवून दिला. कंटाळा तर खूप आला होता. मुलांची आठवण येत होती. कोल्हापूरला पोहचायला अजून ५ तास बाकी होते. आता रात्रीचे १२ नक्कीच वाजले होते. मी टॉयलेटला जाऊन आलो. सीटवर बसायला जात असताना त्या बोगीतल्या प्रत्येक सीटकडे माझी नजर गेली. सगळेच प्रवासी शांतपणे झोपी गेले होते. मी सुद्धा निमूटपणे जाऊन माझ्या सीटवर जाऊन बसलो. खिडकीतून बाहेर बघू लागलो. बाहेर अंधूक प्रकाश दिसत होता. आकाशात चंद्र दिसत होता. माझे केस वाऱ्याने उडत होते. मी प्रमोशनची स्वप्न बघू लागलो. एकदा प्रमोशन झालं की पगार थेट २५,००० झाला असता. आईच्या , बायकोच्या , मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच हे स्वप्न बघत होतो. खूप साथ दिली होती बायकोने माझी. आई आजारी असताना स्वत:चे दागिने गहाण ठेवले होते. एकदा हे प्रमोशन झालं की पहिले दागिने सोनाराकडून सोडवून आणायचे होते. आईला एका मोठ्या डॉक्टरांकडे नेऊन हृदयाचं ऑपरेशन करायचं होतं.‌मुलांना छान छान कपडे घ्यायचे होते. दिवाळी जवळ आली होती. गेले दोन वर्ष मी मुलांसाठी एक नविन कपडा खरेदी केला नव्हता. कपडा काय कंपास बॉक्स सुध्दा खरेदी केला नव्हता. मिळालेले पैसे असे उडवत राहीलो. मला आता काहीच नको. जे हवं होतं ते आयुष्यात कधीच मिळालं नाही. तो म्हणजे मान-सन्मान. स्वत:च्या घरात कधी राजा सारखा वावरलो नव्हतो तो जगात काय वावरणार ? विश्वास मी या जगात माझं कुटुंब सोडून कुणावरही ठेवणं मी काही कारणांमुळे बंद केलं.

मी सहज जुन्या आठवणींना साद घालत बसलो होतो. माझं लग्न , आईचं आजारपण , बाबांचं जाणं , माझं लफडं. लफडं ? हे काय बोलून बसलो ? लफडं नाही प्रेम. नाही नाही प्रेम सुध्दा नाही.. आकर्षण. ती एक अप्सरा . ती आयुष्यात आल्यावर माझं बदलत चाललेलं आयुष्य आणि... आणि .. पुढे काय ? मला काहीच आठवत का नाहीये ? मी गुन्हा केला होता का तेव्हा ? मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो... नशिबानं नोकरी टिकली नाहीतर ह्याच ट्रेनमध्ये त्या अप्सरेमुळे मला भिक मागावी लागली असती . बापरे ! आज मला हे सगळं कसं आठवतंय ? मला हे काही आठवत नव्हतं ! काय झालं आज असं नक्की ? मी गोळी आज घेतली नाही ह्याचा हा परिणाम असेल का ? माझं डोकं का एवढं दुखतंय ? तिचं माझ्या आयुष्यात येणं वगैरे आज सगळंच आठवत आहे मला.

मी डोळे मिटून शांतपणे झोपी गेलो. कधी डोळा लागला कळलं देखील नाही. कधीनव्हे तर आज मी एवढा झोपी गेलो होतो. एवढ्यात ट्रेन एका क्रॉसिंग साठी थांबली. आजूबाजूला जंगलच जंगल.. मला जाग आली जराशी. कुठलं स्टेशन आलं हे पाहायला मी इकडे तिकडे बघतो तर घनदाट जंगल . बहुतेक सिग्नलसाठी थांबली असावी असा विचार करून मी पुन्हा तिचा विचार करत झोपी गेलो.. आता तुम्हाला प्रश्न‌ पडला असेल की ती कोण ? ती म्हणजे रावी . काही महिन्यांपूर्वी माझ्या आयुष्यात आली होती. मी पुन्हा गाढ झोपी गेलो. घोरू लागलो. ट्रेन पुन्हा सुसाट वेगाने धावत होती. अचानक कोणीतरी मला हाक मारली.

ती गौतम !

मी तसाच घोरत होतो. तिने जरा मला जोरात हाक मारली .

ती गौतम !

आवाज ओळखीचा वाटला. खरंतर ट्रेनमध्ये कोणीच ओळखीचं नव्हतं. मी हळूहळू डोळे चोळले व जागा झालो . पाहतो तर काय साक्षात रावी. माझे पाय थरथरू लागले. तिला पाहून वाटू लागलं की मरूदे त्या कुटुंबाच्या इच्छा , मरूदे प्रमोशन ..‌पण ही इथे कशी ?

मी तू.. तू कशी इथे ?

ती मी तुला सांगितलं होतं ना ?

मी मला नाही आठवत काही..

ती लक्ष्य आहे माझं तुझ्यावर !

तिने माझा हात धरला.. ती मला खेचत बोगीच्या दारापर्यंत घेऊन आली‌ . मी खूप घाबरलो. तिचे डोळे बरंच काही सांगून जात होते.

ती तू माझा होऊ शकत नाहीस ना ? तर तू कुणाचाही होऊ शकत नाहीस हे त्यावेळी मी बोललेलं वाक्य मी आज खरं करून दाखवते. तू मला गृहीत धरलंस. तुला वाटलं की मी तुला विसरून गेले पण तसं काही झालं नाही. माझं लक्ष्य होतं तुझ्यावर..

मी काही बोलायच्या आतच तिने मला धावत्या ट्रेनमधून ढकलून दिलं.. ती जे बोल्ली ते खरं ठरलं‌. तिने मला अखेर मारून टाकलं.. मी एका रूळावर मृत अवस्थेत पडून राहिलो.. त्या रावीने मला तिच्या फायद्यासाठी मारून टाकलं..

क्रमशः

लेखक पूर्णानंद प्रमोद मेहेंदळे.