असंभव भाग 02

Twisted love story

 असंभव भाग 2 

     काही बोलायच्या आतच तिने मला धावत्या ट्रेनमधून ढकलून दिलं.. ती जे बोल्ली ते खरं ठरलं‌. तिने मला अखेर मारून टाकलं.. मी एका रूळावर मृत अवस्थेत पडून राहिलो.. त्या रावीने मला तिच्या फायद्यासाठी मारून टाकलं..

तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की ती कोण ? तिने मला मारून का टाकलं ? तिचं माझ्या आयुष्यात काय एवढं महत्त्व ? त्यासाठी वर्तमानकाळातून भूतकाळात जावं लागेल..

त्या दिवशी ऑफिसमधलं काम उशीरा आटपून मी ठाण्यातून लोकल ने दादरला रात्री अकरा सव्वा अकरा वाजता आलो.. रेल्वे स्टेशन पासून माझं घर २० मिनीटांच्या अंतरावर असल्याने मी उगाच रिक्षा करून पैसे उडवत नाही.. घरापासून ते दादर रेल्वे स्टेशन पर्यंत चालत येतो नि चालत जातो. एखाद्या वेळी कामाला जायला उशीर झालाच तर रिक्षेने वगैरे जातो.त्या रात्री अकरा वाजता मी दादर रेल्वे स्टेशन कडून चालत घराकडे निघालो . धो धो पाऊस कोसळत होता. पाऊस थांबण्यासाठी मी पावसाला ५-६ शिव्या घातल्या . अर्धा मी छत्रीमध्ये भिजलो होतो.. एका गल्लीतून जात होतो.. त्या गल्लीत माणूस काय कुत्र देखील नव्हतं.. आणि ती समोरून फाटलेल्या ड्रेसमध्ये धावत ओरडत पावसात भिजत आली.. हे नक्की काय घडतंय हे कळण्यासाठी मी तसाच स्तब्ध उभा होतो.. मला वाटलं की एखाद्या चित्रपटाचं , मालिकेचं शूटिंग सुरू आहे. तिची एन्ट्रीच माझ्या आयुष्यात तशी झाली. “ वाचवा वाचवा ” असं ओरडत माझ्या आयुष्यात आली होती.. पावसात चिंब भिजलेली होती. शरिरावर जखमा व कपडे फाटलेले होते.. मला काहीच कळत नव्हतं की हिला काय झालंय.. ती माझ्यापाशी त्या गल्लीत मदत मागण्यासाठी आली..कोण होती ? कुठून आली ? हिच्या बाबतीत नक्की काय झालंय हेच कळत नव्हतं.. ती धावत आली . प्लीज हेल्प , वगैरे असं म्हणत आली.. अगदी फिल्मी एन्ट्री. ती खूप घाबरलेली होती. मला येऊन ती धडकली. मी पडणार इतक्यात मी तिला लगेच सावरलं.... मी तिला पाहता क्षणी तिच्याकडे आकर्षित झालो होतो.. नंतर दुसऱ्या क्षणी लक्षात आलं की आपलं लग्न झालं असून आपल्याला मुलं आहेत...

ती – ते .. ते..

ती काळोख्या वाटेकडे हात दाखवत बोलू लागली..

ती – ते.. मारताय्त मला. माझ्या पाठी लागल्येत.. मला वाचवा.

‌ती मुलगी एका चांगल्या श्रीमंत घरातील वाटत होती.. तिच्यामागे कोण लागलं‌ असावं असा मी एक क्षणीक विचार केला.. म्हटलं काहीतरी मोठं प्रकरण असावं.. काही मवाली माणसं.. गुंड वगैरे हिच्या मागे लागली असावीत.. बरं त्यांना मारण्याएवढी माझी शरीरयष्टी अजिबात नव्हती.. घरात एक डास मारत नाही तर त्या गुंडांना काय मारणार ? मी आधी एक दिर्घ श्वास घेतला.. त्या मुलीला म्हटलं..

मी – हे बघा , काळजी करू नका. तुम्ही मेन रोड ला जा.. सेफ राहाल तुम्ही.. हवंतर ही छत्री घ्या.. आणि ही पाण्याची बाटली घ्या..

मनात विचार आला की पैसे सुध्दा द्यावेत.. पण नंतर घरात गेल्यावर बायको शिव्या घालेल म्हणून नाहीच दिले.. कोण कुठली ही मुलगी ? उगाच का म्हणून तिच्यावर विश्वास ठेवू ? स्वत:चा स्वार्थ शोधत मी  तिला जरा दूर लोटलं आणि तिथून पळ काढू लागलो.. पावलं जरा जोरात पटापट टाकू लागलो... पावसात भिजत जात होतो.. डोळ्यात तिच्याविषयी भीती जेवढी होती ना तेवढीच तिच्याविषयी काळजी वाटली.. एक एकटी मुलगी आहे ती.. खरंच तिच्या जीवावर कोण कुठलं असेल तर ? तिला मदत करूयात का ? पण आपण नकोत्या भानगडीत सापडलो तर ? उगाच आपलं नाव खराब व्हायचं.. जाऊदे नकोच.. त्या बाई ऐवोजी जर पुरूष असता तर ठिक. मी मदत केली असती पण एक मुलगी आणि एक विवाहीत पुरूष एकत्र ? समाज काय म्हणेल ? भलेही आपण चांगल्या भावनेने मदत करू तिला पण डेंजर काहीतरी प्रकरण असेल ना तर फुकटचा जीव जाईल आपला.. आणि ह्या विचारांत घराकडे जाताना ती पाठून आली..

ती – प्लीज मला वाचवा.. मला मारून टाकतील हो ते..

मी तिच्या विचारात कधी सोसायटीच्या गेटजवळ आलो तेच कळलं नव्हतं आणि त्यात ही कधी मागून आली तेच कळत नव्हतं.. मी तिच्यापासून माझी नजर लपवत विचारलं..‌

मी – तुम्ही इथे ?

ती – मला प्लीज हेल्प करा.. मी पाया पडते तुमच्या..‌

मी – मॅडम , तुम्ही प्लीज पोलिस स्टेशनमध्ये वगैरे जा..

ती – नाही जाऊ शकत हो मी..

अखेर मला तिची दया आली..

मी –  को.. कोण मारणार आहे तुम्हाला..

ती – ते.. ते‌. कुत्रे ..

मी – काय ? एका रस्त्यावरच्या कुत्र्यांना तुम्ही एवढ्या घाबरला आहात का ?

सगळंच काही मला वेगळं वाटलं.. बरं तिचा आणि माझा शत्रू एकच.. तिला जशी कुत्र्यांची भीती तशीच मलाही..‌

मी – तुमचे हे कपडे सुध्दा कुत्र्यांनीच फाडले का ?

ती – ह..‌हो..हे कुत्रे साधेसुधे नाहीत.. लांडगे आहेत.. एक सुंदर मुलगी दिसली की तिला फाडून खातात.

आता हे काय नवीन बोलत होती ? मी आधीच ओलाचिंब होऊन तिथे थांबलो होतो.. तोच तिने मला मिठी मारली..

ती – काही कुत्रे छेड काढताय्त माझी. प्लीज वाचवा मला..

आता कळालं की प्रकरण काय आहे ते.. पण पहिलं तिला आपल्यापासून दूर केलं. आधीच सोसायटीच्या गेटवर मी उभा . आणि माझ्या मिठीत ती. बायकोने किंवा सोसायटीतील कोणी बघितलं तर मग वाटच लागेल.. त्या मुलीची काही जण छेड काढत असणार हे कळालं होतं मला.. तिच्या डोळ्यात मात्र एक वेगळंच गूढ दडलेलं होतं..तिला त्या माणसांपासून वाचवणं गरजेचं होतं.. पण करायचं काय ? घरात घेऊन जाऊ का ? नको सोसायटीमध्ये चर्चेला उधाण येईल...

मी – हे बघा .. मी तुम्हाला धीर देऊ शकतो.. बाकी हेल्प नाही करता येणार मला.. बाय..

आणि मी सोसायटीत प्रवेश केला. माझ्या ब्लॉकच्या गॅलरीत बघतो तर बायको माझ्याकडे खुन्नस देऊन बघत होती.. त्या मुलीने मारलेली मिठी बायकोने बघितली असेल का ह्या विचारात हळूहळू पायऱ्या चढू लागलो.. मी एक क्षण मागे वळून पाहिलं तर ती मुलगी सोसायटीत येऊ लागली.. हृदयाचे ठोके वाढू लागले.. एक क्षण वाटलं की माझा आणि माझ्या बायकोचा ह्या मुलीमुळे घटस्फोट घडणार.. ती जिन्यात आली आणि पुन्हा तिने एक गच्च मिठी मारली..
क्रमश :

लेखक – पूर्णानंद प्रमोद.