अनैतिक भाग एक

स्वतःसाठी जगणाऱ्या एका स्त्रीची गोष्ट Story Of Immoral Love Relationship
अनैतिक भाग एक

“आल्या का बाईसाहेब, बाहेर मजा मारुन? यापुढे हे या घरात चालणार नाही! अगं जरा तरी लाज वाटू दे! जनाची नाही तर मनाची तरी ठेव!! बाहेर तोंड मारताना तुला काहीच वाटलं नाही का ग?” अमित चिडून मधुलीच्या अंगावर धावुन गेला.

त्याचा स्वतःवर उठलेला हात तिने हवेतच करकचून अडवला आणि जोरात ती त्याच्यावर खेकसली “समजतोस कोण रे तू स्वतःला? स्वतःच्या तोंडाला आणि हाताला आवर घाल. नैतिक आणि अनैतिक या गोष्टींवर आपण न बोललेलंच बरं! आधी स्वतःच्या आयुष्यात तू काय माती खाल्ली आहेस ते बघ आणि नंतर माझ्यासमोर नैतिकतेच्या गप्पा मार, मला सभ्यता शिकवण्याचा निदान तू तरी प्रयत्न करू नकोस! माझं आयुष्य मला जसं वाटेल तसं मी जगेन. मी काय करावं आणि कसं वागावं हे सांगणारा तू कोण?”


“मी कोण? हे विचारताना तुझी जीभ नाही का झडली? तुझ्यासारखी बेताल, उठवळ आणि बाजार-बसवी बाई मी उभ्या जन्मात बघितली नाही! स्त्री या शब्दाला तू म्हणजे कलंक आहेस!” अमित रागारागाने तोंडात येईल ते बडबडत होता. मधुलीही आज प्रचंड चिडली होती आणि त्याचा प्रत्येक मुद्दा खोडून काढत होती.

“मी बाजार-बसवी, मी उठवळ आणि तू? दुनियेतले सगळे सद्गुण तर तुझ्यातच आहेत ना! स्वतःला काय तू रामाचा दुसरा अवतार समजतोस का! एक सोडून आतापर्यंत चार ठिकाणी तू तोंड मारलं आहेस, अरे नालायक माणसा, माझ्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या आणि माझ्याशी मैत्रीचं खोटं नाटक करून, माझ्याच सुखी संसाराला आग लावणाऱ्या त्या हलकट बाईशी अनैतिक संबंध ठेवताना कुठे गेला होता तुझा हा पापभिरूपणा आणि सभ्यतेचा तकलादू बुरखा? एक गोष्ट लक्षात ठेव, मी सहन करणाऱ्यांपैकी नाही! तुला राहायचं असेल तर आपल्या मुलांचा केवळ बाप म्हणून तू इथे, या माझ्या घरात, परत एकदा सांगते माझ्या घरात तू राहू शकतोस. पण नवरा म्हणून माझ्यावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करू नकोस! तू तुझ्या आयुष्यात जी थेरं केली आहेस, जे शेण खाल्ल आहेस ना, त्यानंतर तुला तो अधिकार नाही. अजून एक गोष्ट लक्षात ठेव! हे घर मी घेतलं आहे, माझ्या पगारातून या घराचे हप्ते कटतात, त्यामुळे कायदेशीररित्या हे घर माझंच आहे. आज माझ्यावर हात उचलला तर उचलला, यानंतर जर अशी हिम्मत पुन्हा केलीस ना तर मी तुला सरळ पोलिसात घेऊन जाईन समजलं?” अमित रागाने दरवाजा आपटून घराबाहेर निघून गेला तर मधुली आतल्या खोलीत जाऊन पलंगावर ढसाढसा रडायला लागली.

तिच्या आयुष्यात आतापर्यंत जे काही झालं,तो तिचा सगळा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला.


©® राखी भावसार भांडेकर. नागपूर

सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.