मृगजळ अंतिम भाग (द्रौपदी)

द्रोपदीचे कुणावर प्रेम होते?
मृगजळ भाग चार


©® राखी भावसार भांडेकर

त्या युगांताच्या दिवशी माझ्यासाठी, माझ्या शिलासाठी केवळ भीम कळवळला. केवळ त्याने माझ्यासाठी त्या दोन प्रतिज्ञा घेतल्या.

मी मात्र आयुष्यभर अर्जुनावर प्रेम करत राहिले. त्याच्यासाठी झुरत राहिले. स्वयंवराचा पण अर्जुनाने जिंकल्यावर एकापाठोपाठ एक याप्रमाणे पाच जणांशी माझा विवाह झाला. तेव्हा मला किती वेदना झाल्या असतील ते धर्माला कळले नसेल का? पण मी मन मारले. कृतीत तरी पाचात कधीही भेद केला नाही. पण मन कधीच पूर्ण मारता येत नाही. कृती समतोल ठेवता येते पण मनातून पाचांवर अगदी मापून सारखे प्रेम करणे शक्य असतं का? मी अर्जुनावर जास्त प्रेम केले तर त्यात नवल काय? पण प्रेम केले म्हणजे काय? तर जन्मभर त्याच्यासाठी झुरले हेच ना! पण माझ्या प्रेमाला कधी प्रतिसाद मिळाला होता का? सुभद्रा, उलुपी, चित्रांगदा अर्जुनाने किती स्त्रियांवर प्रेम केले? पण हे तरी खरे का? अर्जुनाने कोणातरी स्त्रीला आपले हृदय दिले होते का? स्त्रियांनी अर्जुनावर प्रेम केले, पण अर्जुनाचे हृदय कृष्णावर जडले होते. अगदी पूर्वीपासून इंद्रप्रस्थ बसवण्याच्या आधीपासून. मला माहिती होते की, अर्जुन आणि कृष्ण घटका घटका बोलत बसायचे. एकमेकांचे हृद्गत एकमेकांना सांगण्यासाठी. अर्जुनाचे मन कोणीही बाई जिंकू शकली नाही. प्रतिसाद न मिळताही मी कुणासाठी तरी झुरावे, कोणीतरी माझ्यासाठी जीव टाकावा……. असं कोणीतरी होतं का माझ्या आयुष्यात? आणि मग एकदम धक्का बसल्यासारखे माझे मन थांबले.

तो कर्ण होता का? कदाचित त्याच्या मनात माझ्याविषयी अभिलाषा होती पण तो ते कधी व्यक्त करू शकला नाही, उलट माझ्या अपमानाचा पुरेपूर सुड त्याने द्युतगृहात उगवला. मग कोण माझ्यासाठी झुरला? आणि एकदम लख्ख वीज चमकावी तसं मला जाणवलं.

जन्मभर माझ्यासाठी जीव टाकणारा भीम होता! स्वयंवर मंडपाच्या बाहेर अर्जुनाच्या बरोबरीने शत्रूंशी लढाई करणारा भीम, सभेमध्ये मला आणली तेव्हा थोरल्या भावाचे हात जाळायला निघालेला भीम, मी दमली की कळवळणारा भीम, माझ्यासाठी सुवासिक कमळे आणायला धावलेला भीम,दु:शासनाचे रक्त पिणारा भीम, रक्ताने माखलेला हातांनी माझी वेणी घालणारा भीम, किचकाचा वध करणारा भीम! एक ना दोन किती गोष्टी आठवाव्या? जशी मी तसा तो! संतापणारा, चिडणारा, भरभरून प्रेम करणारा! जशी मी भूमिकन्या तसा तो भूमिपुत्र भीम!

स्वर्गरोहणाच्या त्या शेवटच्या क्षणी सूर्य आणि माझ्यामध्ये काहीतरी आलं. मंदखोल आवाजात भिमाने मला विचारलं "द्रोपदी!" माझ्या आणि भिमाच्या मध्ये अर्जुन, नकुल, सहदेव मेलेले होते. तो फरफटत, धापा टाकीत कष्टाने माझ्यापर्यंत पोहोचला. मी जिवंत आहे असे पाहून त्याने अडखळत विचारलं "काय करू तुझ्यासाठी?" आयुष्यभर विचारलेला, अगदी ह्या क्षणी निरर्थक, गैरवाजवी प्रश्न होता त्याचा! पण त्या अंतिम क्षणी मला खरं प्रेम गवसलं! अर्जुनाच्या प्रेमाच्या मृगजळातून उमललेलं प्रेमकमळ. मी म्हणाले "पुढल्या जन्मी पाचातला थोरला भाऊ हो! तुझ्या आसऱ्या खाली आम्ही निर्भयपणे आनंदात राहू." आणि मी देह ठेवला.


******************************************************

संदर्भसूची

1. मृत्युंजय, लेखक शिवाजी सावंत.

2. राधेय, लेखक रणजित देसाई.

3. व्यासपर्व, लेखक दुर्गा भागवत.

4. युगांत, इरावती कर्वे.

5. ती मयसभा, चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी.



🎭 Series Post

View all