Feb 24, 2024
जलद लेखन

मृगजळ भाग तीन (द्रौपदी)

Read Later
मृगजळ भाग तीन (द्रौपदी)
मृगजळ भाग तीन

©® राखी भावसार भांडेकर


स्वयंवराचा दिवस उजाडला. सेविका माझ्या मागे-पुढे करत होत्या. माझी कांती अधिक उजळून निघावी म्हणून गुलाबजलात आणखी थोडे कमल पराग, केसर आणि चंदन, हळदीची उटी मला लावण्यात आली होती. लाल रंगाची जरीची साडी मला नेसवली होती. एका म्हाताऱ्या सेविकेने कस्तुरीची उटी माझ्या नाभीला लावली होती. बांगड्या, पाटल्या, कंगन, तोडे, बाजूबंद, मेखला, पैंजण, कर्ण फुल, नाकातली नथनी, केसांची पाच पेढी वेणी, त्यावरची सुवर्ण फुल आणि मोगऱ्याच्या वेण्या यांनी माझ्या सभोवती सुगंधांचं एक मोहक, उत्तेजक वलय निर्माण केलं होतं.

सर्व राजे स्वयंवर मंडपात स्थानापन्न झाले होते. ध्रीने मला स्वयंवराच्या व्यासपीठावर बोलावलं. त्याने उत्सुक सर्व नरेशांना स्वयंवराचे नियम समजावून सांगितले आणि स्पर्धा-मला जिंकण्याची चढाओढ सुरू झाली. त्या सभामंडपात जमलेल्या भारतातल्या बऱ्याचशा राजांना किंधरा धनुष्य जमिनीवरून वर सुद्धा उचलता आलं नाही. ज्या मुठभर राजांना उचलता आलं आणि ज्यांनी नेम धरला तो कधी करंगळी एवढ्या अंतराने, तर कधी आवळ्या एवढ्या अंतराने चुकला. कधी तीळा एवढ्या तर कधी मोहरी एवढ्या अंतराने हुकला होता.

शेवटी कर्ण उठला पण त्याचवेळी माझ्या बाजूला उभा असलेला ध्री एक पाऊल पुढे सरकला आणि बोलला "कर्णा तुझ्या कौशल्यामुळे तू किर्तिमान आहेस. पण एक सूतपुत्र माझ्या बहिणीला लग्नाची मागणी घालू शकत नाही, म्हणून अत्यंत नम्रपणे मी तुला आपल्या स्थानावर परत जाण्याची विनंती करतो."

त्यावर कर्णाने शांतपणे उत्तर दिलं, "मला अधीरथांनी वाढवलं हे खरं आहे, पण मी क्षत्रिय आहे परशुरामांनी अंत:चक्षुनी हे पाहिलं आणि त्याबद्दल मला शाप दिला. तो शाप आज मला सर्व क्षत्रियांबरोबर उभा राहण्याचा अधिकार देत आहे. मी या स्पर्धेत भाग घेणार आहे. आहे कुणाजवळ मला थांबवण्याची हिंमत? ध्रीने केवळ स्वतःची तलवार उपसली होती. त्याचा हात थरथरत होता. त्या क्षणी मला काय झालं कुणास ठाऊक पण मी बोलले. नुसतेच बोलले नाही तर अंगराजाला थेट प्रश्नच केला. "अंग नरेश माझा हात जिंकण्यापूर्वी मला तुमच्या वडिलांचं नाव सांगा! जिला स्वतःच्या कुटुंबापासून तोडून पतीच्या घराशी नातं जोडावं लागतं तिला पत्नी पद स्वीकारताना हे जाणण्याचा अधिकार नक्कीच आहे." त्या क्षणी मी ध्री ला वाचवलं. पण ह्या अपमानाची त्या कर्णाने नंतर शंभर पटीने परतफेड केली.

मला अर्जुनाने वरलं पण माता कुंतीच्या आदेशानुसार आता मी केवळ अर्जुनाचीच नव्हे तर पाचही पांडवांची भार्या होते. माझे अर्जुनावरच प्रेम मी कधीच व्यक्त करू शकली नाही आणि विसरूही शकली नाही.

मी आणि माता कुंती म्हणजे सासवा-सुना, म्हणजे एकच वंशाच्या वर्धनाची जबाबदारी असलेल्या दोन स्त्रिया. कुंतीला मिळालेल्या वरामुळे तिला देवांना कामापूर्तीसाठी बोलावणे सहज साध्य झाले. तोच नियम तिने मला लावला. तिच्या-कुंतीच्या अशा तऱ्हेच्या संततीच्या वंशाची जोपासना तिने मला पाच पांडवांशी विवाह करायला लावून माझ्याकडून करून घेतली.

आम्ही हस्तीनापुरला आलो आणि अर्ध राज्य म्हणून आम्हाला खांडवप्रस्थ मिळालं. त्याचं माझ्या पतींनी इंद्रप्रस्थ केलं. मोठा राजसु यज्ञ केला. त्या मयसभेत डोळ्यांना पाणी दिसायचं पण प्रत्यक्षात जमीन असायची, आणि जमीन आहे असं वाटतांना पाण्याचा स्पर्श व्हायचा. या गोंधळात दुर्योधनाची गफलत झाली आणि माझी विश्वासू दासी मदनिका त्याच्यावर हसली आणि ती सर्व हकीकत ती मला हसून हसून सांगत होती. पण दुर्योधनाने त्याचा विपर्यास केला आणि तोरण स्फटिका भावनात ते भयंकर द्युत घडले.

ज्या दिवशी तो कल्पनेपलीकडचा लाजिरवाणा प्रसंग घडला त्यादिवशी मी एक वस्त्रा, रज:स्वला होती. पण तरीही दु:शासनाने माझ्या केसांना धरून मला राज्यसभेत आणलं. माझी ती असाह्य विकल अवस्था बघून केवळ भीम गरजला. "दु:शासना द्रौपदीचे केस तु ज्या घाणेरड्या हाताने धरलेस ते हात मी तुझ्या धडा पासून वेगळा केल्याशिवाय राहणार नाही."

परंतु धर्मराजाच्या तिरप्या नेत्रकटाक्षाने भीम खाली बसला. पण कौरवांचा बीभत्स प्रकार थांबत नव्हता. पितामहांनी तो थांबवण्याचा निष्कळ प्रयत्न केला पण तेही हतबल ठरले. दुर्योधनाला आता अधिकच चेव चढला होता. द्युतातील विजयाच्या धुंदीत विवेक विसरलेला दुर्योधन दु:शासनाला म्हणाला

दुर्योधन "दु:शासना ‌माझ्या या दासीला माझ्या मांडीवर बसव." त्याने स्वतःची मांडी उघडी केली होती. रागाने संतप्त भिमाने त्याच क्षणी आणखी एक प्रतिज्ञा केली.

भीम "ज्या दु:शासनाने द्रौपदीच्या केसांना स्पर्श केला त्याचं वक्षस्थळ नखाग्राने फोडून मी त्याचं रक्त प्राशन करीन, आणि उन्नमत्त्तपणे भर सभेत उघडी मांडी दाखवणाऱ्या दुर्योधनाची मांडी माझ्या गदेने छिन्न-विछिंन्न करून टाकेन."
ध्री म्हणजे माझा भाऊ दृष्टद्युम्न.

*********************************************

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//