Feb 24, 2024
जलद लेखन

मृगजळ भाग दोन(द्रौपदी)

Read Later
मृगजळ भाग दोन(द्रौपदी)
मृगजळ भाग दोन


©® राखी भावसार भांडेकर


महाराज द्रुपदाने यज्ञ केला त्यातून मी आणि दृष्टद्युम्न अशी जाणती मुले त्यांना मिळाली. मी वर्णाने सावळी पण यज्ञकुंडातल्या ज्वालेसारखी तेजस्वी. माझे स्वतःचे नाव कृष्णा-कल्याणी, द्रुपद कुळातली म्हणून द्रौपदी, पांचालांची राजकन्या म्हणून पांचाली, यज्ञसेन द्रूपदाची मुलगी म्हणून याज्ञसेनी. माझ्या पित्याने खरंतर गुरुद्रोणांचा सुड घ्यायचा म्हणूनच या यज्ञाचा घाट घातला. त्यातही त्याला ध्री सारखा शूर, लढवय्या, युद्धकला निपुण पुत्र प्राप्त झाला, पण त्याचा हात धरून मीही यज्ञकुंडा बाहेर अवतरली. पिताश्रींसाठी ही इष्टापत्ती होती. माझ्या स्वयंवराच्या सौद्यात त्यांना कुशल धनुर्धर जावई हवा होता, म्हणूनच माझ्या विवाह करिता त्यांनी इतका कठीण स्वयंवराचा पण योजला होता. त्यांना ही खात्रीच होती की, हा स्वयंवराचा पण केवळ अर्जुनच पूर्ण करू शकेन आणि मग तो आचार्य द्रोणांशी कधीही सख्य करू शकणार नाही.

स्वयंवराच्या अगदी दोन एक महिने आधी मी माझ्या दायीमासह आमच्या पांचाल नगरीच्या बाहेर असलेल्या अरण्यात, वास्तव्यास आलेल्या साधू बाबांकडे माझे भविष्य जाणून घ्यायला गेले होते. आधी दायीमाने खूप आढेवेढे घेतले पण नंतर तिने हार मानली.

ऋषींचे वास्तव्य असलेल्या त्या वटवृक्षांच्या बनात पोहोचायला आम्हाला आधी पालखीत बसून नगराबाहेर पडावं लागलं. मग एका गळक्या होडीत बसून आम्ही एक सरोवर ओलांड आणि शेवटी अंग खीळखीळ्या करून टाकणाऱ्या बैलगाडीतून सहा तासांचा प्रवास आम्हाला करावा लागला. त्यामुळे मला सामान्य जणांच्या जीवनाचा आणि चिवटपणाचा अंदाज आला. कदाचित तीच माझ्या भावी जीवनाची नांदी असावी.

त्या ऋषींची चर्या अतिशय विलक्षण होती. अनेक दशकांच्या तपश्चर्येने त्यांचा चेहरा रापला होता. पूर्ण चेहरा झाकून टाकणाऱ्या दाढीतून खोल गेलेले पण तेजस्वी असे लाल पाणीदार डोळे चमकत होते. त्यांची चर्या फार गंभीर वाटत होती. मी त्यांना प्रणाम केल्यावर त्यांनी स्मित केले.

ऋषी "तुला तुझं भविष्य जाणून घ्यायच आहे हो ना बालीके?"

द्रोपदी "मी बालिका नाहीये. माझ्या जन्माच्या वेळी सांगितल्याप्रमाणे मला इतिहासावर माझी छाप पहायची आहे. खरंच का मी समस्त आर्यवर्ताची भाग्यविधाती होणार आहे हे जाणून घ्यायचे आहे."

ऋषींनी केवळ मंद स्मित केले. त्यांच्या धुपारण्याच्या विस्तवावर त्यांनी राळ, डिंक, कडूनिंब आणखीन काही विशिष्ट पदार्थ घालून धूर निर्माण केला, त्यात मला काही भविष्यवाणी ऐकू आल्या.

"तुझ्या काळातील पाच सर्वोत्तम योद्धांशी तू लग्न करशील. अनेक राण्यांची तू साम्राज्ञी बनशील. अगदी देवी देवतांना देखील तुझा हेवा वाटेल. तू दासी बनशील. स्वतःच्या जादून सगळ्यांना मोहन टाकणाऱ्या एका भव्यप्रसादाची तु मालाकीण होशील आणि नंतर तू तो प्रसाद गमावूनही बसशील. सर्वात भयंकर विनाशकारी युद्धाचे कारण म्हणून लोक तुझं नाव आठवतील.

अनेक दुष्ट राजांचे मृत्यू तू घडवून आणशील. तसेच तुझ्या मुलांचे आणि भावाचाही. तुझ्यामुळे लाखो स्त्रिया विधवा होतील. खरोखरच तू इतिहासावर आपली मुद्रा उमटवशील. तुझ्यावर प्रेम करणारे असतील पण त्यांची तुला नेहमी ओळख पटेलच असं नाही. तु ज्याच्यावर प्रेम करशील त्याचं प्रेम तुला मिळणार नाही आणि जो तुझ्यावर प्रेम करेल त्याचं प्रेम तुला कधीच कळणार नाही."

ही आकाशवाणी ऐकून मी अगदी सुन्न झाले. ऋषी मला समजावत होते.

ऋषी "याज्ञसेनी नियती माणसाला अप्रिय गोष्टी करायला भाग पाडते. माझा दुःखी, म्लान चेहरा बघून त्यांनी मला उपदेशाच्या चार गोष्टी सांगितल्या.

ऋषी "राजकन्ये तुझ्या आयुष्यात तीन धोक्याचे क्षण येतील. पहिला तुझे लग्न होण्याच्या काही क्षण आधी त्यावेळी तू मनात असूनही मौन धारण कर. त्या क्षणी कुणालाही प्रश्न विचारू नकोस.

तुझे पती आयुष्यात सर्वोच्च स्थान भोगत असताना येईल. त्यावेळी तुझ्या हसण्याला आवर घाल आणि शेवटी कल्पनाही करता येणार नाही इतका लाजिरवाणा प्रसंग तुझ्या आयुष्यात येईल तो तिसरा क्षण असेल. त्यावेळी मनातला शाप बाहेर पडू देऊ नकोस. त्यामुळे कदाचित तुझ्यावर येणाऱ्या आपत्तींची तीव्रता कमी होईल."

त्यांनी एका जाडजूड भूर्जपत्राच्या पुस्तकाकडे नजर टाकली आणि स्वतःची मयूर पंख लेखणी उचलली.

मी उत्सुकतेने विचारले "तुम्ही काय लिहिताय?"

त्यांनी वैतागून उत्तर दिले "तुझ्या आयुष्याची कथा, तुझ्या पाच नवऱ्याची कथा, कुरुक्षेत्रावरील महान भयंकर युद्धाची कथा! आता तू जाऊ शकतेस."

मी निमुटपणे चालायला लागले. दायीमा मला विचारत होती, "काय झालं? काय भविष्य आहे तुझं?" पण मला काहीच बोलावसं वाटत नव्हतं. तिला काहीच सांगावसं वाटत नव्हतं.

बैलगाडीत बसल्यावर मला जाणवलं ऋषींच्या काळाची गती वेगळी होती. वटवृक्षाच्या त्या दाट बनात अंधुक प्रकाशात दोन आकृती होत्या एक ते ऋषी आणि दुसरी गजमुख धारण केलेली! कदाचित ते व्यास मुनी होते. मला निरखून बघायला देखील वेळ न देता बैलगाडी खडखड करत निघाली होती.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//