Mar 02, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

आभास - एक उणीव..

Read Later
आभास - एक उणीव..

              अन्वया आज घरात एकटीच होती. नेहमीप्रमाणे पुस्तकात डोकं खुपसून बसलेली. रोहिणीच्या मृत्यूनंतर घरात एकटं राहणं तिच्या जीवावर यायचं.

पण सांगणार कोणाला..?

आणि सांगून फायदा काय.. ?

            बारावीच्या एक्सामचा शेवटचा पेपर व्हायला अजून सहा दिवस बाकी होते. त्याआधी तर घरीही परतता येणार नाही. कशासाठी आपण इथे आलो असं मनातल्या मनात वाटत होतं. समोरच्या भिंतीवर लटकवलेला तिचा आणि रोहिणीचा हातात हात घालून मस्ती करतानाचा फोटो आठवून तिच्या डोळ्यांत पाणी येत होतं. गेली दोन  वर्षे जिने प्रत्येक क्षण मनापासून जगायला शिकवला त्या रोहिणीशिवाय आज घर सुनंसुनं वाटत होतं. 


उगीच आभास होती..

तुझ्या मधुर हास्याचे..

उगीच वाटते मनाला..

आकर्षण तुझ्या मैत्रीचे.. 


             विचार करून करून अन्वया थकून गेली. शेवटी ती उठून किचनमध्ये आली. तिने फ्रीज उघडला आणि फ्रिजमधील गार पाण्याची बॉटल काढली. 


"अनु... मला पण घेऊन ये गं.. तहानेने जीव जातोय..पण उठावस वाटत नाहीये. "  तिच्या कानावर हाक पडली. 


"हो आणते.. " अन्वया.  


             नेहमीप्रमाणे हसत अन्वया हॉलमध्ये आली. पण रोहिणी कुठेच नव्हती. अन्वया हातापायातील त्राण गेल्यासारखं सोफ्यावर बसली. 


साद घालते आहेस का मला..

सतत का आभास होती..

बोलावते आहेस का मला..

तुझ्याविना मी आहे एकटी... 


            अन्वयाने हातातील पाण्याची बॉटल टीपॉयवर ठेवून दिली. पाणीही प्यावंसं वाटत नाहीये तिच्याशिवाय.. जगणार कशी आहे मी ..? विचार करत करत अन्वया बाल्कनीत वाळत घातलेला टॉवेल आणायला बाहेर गेली. 


: "अनु, आज पुन्हा टॉवेल विसरले यार..आण ना लवकर थंडी वाजतेय.. " तिचा थंडीने कुडकूडणारा आवाज अन्वयाच्या कानावर पडला. 


             अन्वया हातात टॉवेल घेऊन धावत बाथरूम जवळ आली. बाथरूमला बाहेरून कडी होती. हातातला टॉवेल तिथेच टाकून अन्वया भिंतीला टेकून उभी राहिली. कालच बिल्डिंगसमोरील दुकानातून दूध पिशवी आणायला गेलेल्या रोहिणीला ट्रकने उडवलं होतं. त्यावेळी अन्वया बेडरूमच्या बाल्कनीतच उभी होती. अन्वया खाली जाईपर्यंत रोहिणीचा जागीच मृत्यू झाला होता. तिच्या शरीरात प्राण नव्हता पण चेहऱ्यावरच हसू तसंच होतं. अन्वयाला सगळा प्रसंग जसाच्या तसा आठवत होता. तिला दरदरून घाम फुटला होता. थोडासा मोकळा वारा लागावा म्हणून ती बेडरूमच्या बाल्कनीत जाऊन उभी राहिली. तिला रस्त्यावरून दुकानाकडे जाणारी रोहिणी दिसत होती. दुरूनच एक ट्रक येत असलेला दिसत होता. 


तुझ्याचसाठी जगते आहे..

तुला मरताना पाहू शकणार नाही..

खरंच आली आहेस ना तू..

मला आभास होणार नाही.. 


"रोहिणी... ssss " अशी एक किंकाळी अन्वयाच्या तोंडून बाहेर पडली. 

 

अन्वयाने रोहिणीला वाचवायला झेप घेतली आणि तिला ट्रकसमोरून बाजूला ढकलत तिने रोहिणीचा प्राण वाचवला होता." थँक्स अनु.. तू वाचवलं मला.. " रोहिणी तिला घट्ट मिठी मारत म्हणाली. 


" अशी थोडीच जाऊ देईन तुला.. तु माझी बेस्ट फ्रेंड आहे. कधी म्हणजे कधी मला सोडून जाऊ नकोस. " अन्वया. 


            त्या दोघी एकमेकांचा हात धरून रस्त्यावरून चालत होत्या. बिल्डिंगखाली मात्र लोकांची गर्दी जमली होती. एका मुलीचा बाल्कनीतून पडून मृत्यू झाला होता म्हणे ! 


कोणालाच का दिसत नाही..

माझा हात आहे तुझ्या हातात..

तू माझ्या सोबत असताना..

उणीव नाही कसलीच आयुष्यात..(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून केवळ मनोरंजनात्मक उद्देशाने लिहिण्यात आली आहे. कथेचा वास्तव जगातील कोणत्याही गोष्टीशी काहीही संबंध नाही. )


नक्की कळवा कथा कशी वाटतेय.. 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

T

.

.

//