Login

इडली.. सुगरणीचे काम कि आळशी गृहिणीचे.. अंतिम भाग

इडली बनवणाऱ्या नवर्‍याची कथा


इडली.. सुगरणीचे काम कि आळशी गृहिणीचे.. अंतिम भाग


सुशांतने गॅस बंद केला.. त्याने पात्र उघडले.. ते खाली करपले होते.. पण इडल्या सुरक्षित होत्या.. त्याने इडल्या बाहेर काढल्या.. काढताना ते भांड गरम असावे हे फक्त विसरला.. त्यामुळे त्याने हात भाजून घेतला.. झालेल्या इडल्या बघायला सगळेच उत्सुक होते.. त्याने इडली बाहेर काढली.. ती पांढरीशुभ्र लुसलुशीत न होता हिरवीगार टणक झाली होती.. नीलने ती हातात घेतली..
"बाबा हे तर टेनिसच्या बॉलसारखे झाले आहे.."
" अरे रंगावर जाऊ नका.. चव बघा चव.." सुशांत उसन्या उत्साहाने बोलला..
"आधी आईला देऊ.." हुशार नील वदला..
" नाही.. ज्याने केले त्याचाच मान.." हुशार मुलाची हुशार आई बोलली..
आवंढा गिळत सुशांतने इडली खायचा प्रयत्न केला.
" ईईई.." असे म्हणत त्याने इडली फेकली.. ती नेमकी समोरच्या काचेच्या ग्लासला लागली आणि तो ग्लास फुटला..
" याला म्हणतात मऊ लुसलुशीत इडल्या.." सुमेधा हसत म्हणाली..
सुशांतचा चेहरा फोटोजनिक झाला होता..
"हि इडली मी नाही खाणार.." नीलने नकार दिला..
" मी ही नाही.." प्रज्ञाने भावाच्या सुरात सुर मिळवला..
" मग आता?"
" आता? पटकन कालच्या पोळ्या उरल्या आहेत.. त्यांचा चिवडा करून देते.. चालेल.."
" हो..."
सगळ्यांचा नाश्ता झाला.. सगळे शांत झाल्यावर सुमेधाने विषय काढला..
" तुम्हाला इडलीचा खूपच कंटाळा आला आहे हे कळले मला.. पण आज जसे तुम्ही तिघे एकत्र आलात तसेच दर रविवारी माझ्यासाठी आलात तर आपण मेनू बदलू नाही का शकणार? पण तुमच्यासाठी रविवार हा सुट्टीचा वार आणि माझ्यासाठी कामाचा.. तुम्ही कधीच इतकेवेळा सांगूनही मला मदत करायचा नाहीत म्हणून मी हे करत होते.. एकदा हि सोपी इडली चटणी सांबार करून ठेवले कि दिवसभर मी बाकीच्या गोष्टी करायला मोकळी.." सुमेधा सोपी या शब्दावर जोर देत म्हणाली..
" पण आता जर तुमची तयारी असेल तर तसे सांगा.."
" हो आई.. सॉरी आई.. नक्की आई.." असे म्हणत मुले सुमेधाला चिकटली..
पण मोठे बाळ अजूनही तोंड फुगवून बसले होते. त्याला बघून सुमेधा म्हणाली..
" चला.. तुमचा एक टास्क तर पूर्ण अयशस्वी झाला आहे.. आता त्याचा उरलेला भाग किचन स्वच्छ करून भांडी घासून ठेवा.. मी स्वयंपाकाला लागते.."
ती भांडी बघून मुले आणि सुशांत हैराण झाले..
" बाबा सोप्या इडलीची एवढी भांडी?" नीलने विचारले..
" आणि हे आळशी गृहिणीचे काम?" प्रज्ञाचा प्रश्न..
यावर काहीच न बोलता सुशांतने भांडी घासायला सुरुवात केली.. मनात पक्का निश्चय करून कि यापुढे कोणताच पदार्थ बनवायला सोपा असतो असे म्हणायचे नाही आणि ते बनवणाऱ्या गृहिणीला तर आळशी अजिबातच म्हणायचे नाही..

हि काल्पनिक कथा कशी वाटली ते सांगायला विसरू नका..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all