इडली.. सुगरणीचे काम कि आळशी गृहिणीचे..
"आई.. आज पण इडली?" नीलने तोंड वाकडे करत विचारले..
" बाळा.. आज रविवार आहे.. मग मेनू कसा बदलणार?" सुमेधा त्याला समजावत म्हणाली..
"पण आई कधीतरी मेनू बदलायला काय हरकत आहे.." प्रज्ञा मस्का मारत म्हणाली..
" आठवड्याचे सहा दिवस तुमच्या आवडीचाच तर मेनू असतो.. मग एक दिवस इडली खाल्ली तर काय हरकत आहे?" सुमेधाने विचारले..
" हरकत अशी काही नाही ग.. आणि आमची काय हिंमत हरकत घ्यायची.. पण मला असे वाटते कि इडली बनवणे म्हणजे आळशी बायकांचे काम आहे.. तू एवढी सुगरण, चटपटीत.. आणि दर रविवारचा पूर्ण दिवसाचा मेनू इडली. शोभत नाही ग."
इतका वेळ हे संभाषण ऐकणारा सुशांत मध्ये बोलला..
" आणि आमच्या पोटाला पण झेपत नाही.." नील मनातल्यामनात बोलला.
" हे बघा आपले आधीपण या विषयावर बोलणे झाले आहे. मलाही एकच दिवस मिळतो माझे छंद पूर्ण करायला.. त्यातही रविवारी आपण आपल्या मावशींना सुट्टी देतो.. हाच मेनू मला सुटसुटीत वाटतो.. दिवसभराच्या इडल्या करून ठेवल्या कि मी माझी कामे करायला मोकळी."
" तेच तर म्हणतोय, हा मेनू खूपच सोपा आहे.. तू जरासा अवघड मेनू बनव.." सुशांतने सुचवले.
" इडली सोपी आहे?" सुमेधाने आश्चर्याने विचारले..
" मग.. त्याच्यासारखी सोपी रेसिपी नाही.. पीठ इडलीपात्रात लावायचे कि झाली इडली.. अरे हाय काय नि नाय काय.." सुशांत बोलतच होता.. सुमेधाच्या चेहर्यावरचे बदलणारे भाव बघून मुले त्याला खुणावत होती.. पण तो ऐकतच नव्हता..
" अरे इडली काय? मी अशी अशी करीन.." सुशांत चुटकी वाजवत म्हणाला..
" खरे?" सुमेधाने विचारले..
" मग.. मी कॉलेजला असताना काय इडल्या केल्या होत्या.."
" हो का? सासूबाई तर सांगत होत्या तुला चहाही कधी जमला नाही.. कधी साखरच विसरायचास तर कधी चहापावडर.. "
" हि आईपण ना काहिही सांगत असते.." सुशांतने ओठ घट्ट मिटले..
" हो.. पण ते चहाचे.. मी इडलीचे म्हणतो आहे.."
"म्हणजे तुझे म्हणणे आहे इडली करणे सोपे आहे?" सुमेधाने परत कन्फर्म केले..
" हो.. अगदी.."
" मग मी एक प्रपोजल देते.. तू आणि तुला हवे असल्यास मुलांनी इडल्या बनवून दाखवायच्या.. त्या जर जमल्या तर मी रविवारचा मेनू बदलीन. नाहीतर मग इडल्याच.. चालेल?"
" हो.." सुशांत म्हणाला..
" बाबा..." मुले ओरडली..
" तुम्ही नका काळजी करू.. मी आहे ना?"
" अजून एक गोष्ट.. भांडी आणि ओटा तुम्हालाच आवरायचा आहे.."
" बस एवढेच.. अरे मी कामाला घाबरत नाही.."
" पण आम्ही घाबरतो ना.." प्रज्ञा पुटपुटली..
शनिवार उगवला आणि सुरुवात झाली एका संघर्षाची..
त्या संघर्षांत कोण यशस्वी होईल ते बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा