आदर्श माता,जिजामाता!( भाग १)

About Jijamata


आदर्श आई अन्
संस्कारांची महान ज्योती
अलौकिक इतिहास रचूनी
किर्ती मिळवली या जगती

आपला इतिहास स्त्रियांच्या कर्तृत्वाने उज्ज्वल आणि दैदिप्यमान कारकिर्दीने भरून आणि भारुन गेला आहे,तेवढीचं स्त्रियांच्या सामर्थ्यवान कामगिरीने इतिहासाची अनेक सुवर्णपाने रेखाटली गेली आहेत.माँ साहेब जिजाऊ यांनी तर त्यांचा इतिहास अत्यंत दैदिप्यमान आणि गौरवशाली असा बनविला आहे.
आपल्या हिंदू धर्माचे रक्षण करणारे युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापशाली संभाजी महाराज ह्या मराठ्यांच्या दोन छत्रपतींना घडविणाऱ्या विश्ववंद्य आदर्श राजमाता जिजाऊंना त्रिवार वंदन!

जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते झाले शिवराय ना शंभू छावा!

माँसाहेब जिजाऊ जन्माला आल्या त्यावेळी लखुजीराजे जाधवांनी पंचक्रोशीत घोड्यावरून मिरवणूक काढली व हत्तीवरून साखर वाटली .तो ओजस्वी आणि तेजस्वी दिवस म्हणजेचं १२ जानेवारी १५९८ .
सिंदखेडराजा येथील लखुजीराजे जाधव व म्हाळसाराणी उर्फ गिरिजाबाई यांच्या पोटी शिवभारताची महानायिका जन्माला आली.जिजाऊंना विविध भाषेचे शिक्षण त्यांचे मोठे बंधू दत्तोजी,अचलोजी ,राघोजी व बहादुरजी यांच्या बरोबर रामसिंग भाट ,कवी गोसावी नंदन व काही विद्वान यांच्या कडून मिळाले.जिजाऊंचे काका जगदेवराव व वडील लखुजीराजे यांचा सेवक असलेले गोमाजी पानसंबळे यांनी जिजाऊंना घोडेस्वारी, दांडपट्टा चालविणे,भालाफेक, तलवार बाजी तसेच त्यावेळी आवश्यक असलेले सर्व सैनिकी शिक्षण दिले.अशा आनंदमय व उत्साही वातावरणात जिजाऊंचे बालपण गेले.
जिजाऊंचा विवाह मालोजीराजे भोसले यांचे चिरंजीव शहाजीराजे भोसले यांचेशी डिसेंबर १६०५ साली मोठ्या थाटाने संपन्न झाला. पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता ,हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली,पहिले पथक जाधवांचे ,ज्याचे नेतृत्व दत्ताजीराव जाधव ,लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाईंचा भाऊ यांचे होते तर दुसरे पथक भोसले यांचे ,ज्याचे नेतृत्व संभाजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते.यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले.हे लखुजीराजे जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यास ठार केले.हे सर्व शहाजी राजांना समजताच ते समशेर घेऊन सासऱ्यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला.
या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले.नात्यांना,भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांमध्ये पुरेपूर उतरला होता.जिजाऊंना एकूण आठ अपत्ये झाली. सहा मुली व दोन मुले ,संभाजी व शिवाजी. संभाजी मोठा मुलगा तो वडिलांबरोबर राहत असे. जिजाऊंनी शिवनेरी किल्ल्यावर १९फेब्रुवारी १६३० साली शिवाजींना जन्म दिला.

' आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत'

शिवाजींच्या बाबतीत ही गोष्ट अगदी खरी ठरली.
शहाजीराजांबरोबर लग्न म्हणजे एका कर्तबगार,शूर धाडसी, प्रसंगी धोका पत्करण्याची तयारी असलेल्या महत्त्वकांक्षी वीर पुरुषाला जीवनभर साथ देण्याचे व्रत! पौर्णिमेसारखे सुख,आनंद उपभोगणे व अमावस्येसारखे दुःख ही भोगणे !नखशिखांत सौभाग्यलेणी ल्यालेल्या,वज्रचुडे घातलेल्या जिजाऊसाहेबांचे सौभाग्य सदैव पणाला लागलेले. वडील, भाऊ यांचे निजामशहाने भर दरबारामध्ये दगाबाजीने केलेले खून,पुण्यावर गाढवाचा नांगर फिरविणे,सख्या जाऊबाईंना मोगल सुभेदाराने पळवून नेणे,शहाजीराजांचे अपमान हे सर्व त्यांनी भोगले.शहाजीराजांना निजामशाहीच्या नावाखाली स्वतंत्र राज्य स्थापण्याला यश आले नाही व आदिलशाहने त्यांना नवीन ,मोठी जहागिरी देऊन बंगळूरला पाठविले. भरपूर दागिने लेऊन,भरजरी रेशमी वस्त्रे घालून, चांगले गोडधोड खाऊन शहाजीराजांसोबत बंगळूरात ऐश्वर्यात जीवन जगणे त्यांना सहज शक्य होते. पण त्यांचा पिंडच वेगळा होता.
मुसलमान बादशहांनी हिंदूवर चालविलेले जुलूम,स्त्रियांवरील अत्याचार यामुळे त्या अस्वस्थ,बेचैन होत्या.रंजल्या गांजल्या सामान्य माणसाला या त्रासामधून सोडवण्यासाठी आपले राज्य, स्वराज्य हवे या विचाराने भारलेल्या जिजाऊसाहेबांनी सुखाने,आनंदाने बंगळूरात शहाजीराजांसोबत राहायचे सोडून पुण्याच्या फक्त ३६ खेड्यांच्या जहागिरीमधून स्वराज्य निर्माण करण्याचे वेडे व्रत स्विकारले.
इ.स.१६३९ ते १६४७ या काळात शहाजींनी पुण्यात झांबरे पाटलाकडून जागा विकत घेऊन 'लाल महाल ' नावाचा राजवाडा बांधला. जिजाऊ व शिवाजी यांचा मुक्काम लाल महालातच होता.जिजाऊंच्या आज्ञात शिवाजी आपल्या सवंगड्यासोबत युद्धकला शिकू लागले . दऱ्याखोऱ्यात फिरू लागले.शेतकऱ्यांची मुले शिवाजींचे मित्र बनले .सर्वांवर जिजाऊंची मायेचा नजर होती.शिवाजींसह सर्व जण जिजाऊंच्या आज्ञेत वागत होते.
शिवाजी राजे १४ वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली.अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली.निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती.अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. त्यांच्यावर संस्कार घडवले. शिवरायांना गोष्टी सांगितल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या, सीतेचे हरण करणाऱ्या दृष्ट रावणाचा वध करणारे राम,बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता ! अशा प्रत्येक गोष्टीत त्यांनी पराक्रमी पुरुषाला भगवंताचे स्थान दिले,तर स्वातंत्र्याला ध्येयाचे स्थान दिले.
प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकचं असते, जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे,ही त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण होती.आणि त्यासोबत आपण - समाज,तू आणि मी ही पारतंत्र्यात आहोत ही प्रत्येक कथेनंतर दिलेली जाणीव होती. कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा झाली, ती जिजाऊंच्या या संस्कारांमुळेचं,राजांना घडविताना त्यांनी फक्त रामायण, महाभारतातील गोष्टी नाही सांगितल्या तर शेजारी सदरेवर बसून राजकारणाचे पहिले धडेही दिले.

"रामकृष्णाच्या कथा सांगुनी जिजाऊ
शिकवी राजनीती।
तलवार बिचवा समोर ठेवूनी राजमाता
सांगे युद्धनीती।।
आई भवानी कौतुकाने म्हणती
पाहून शिवबाची प्रगती।
लवकर मोठा हो रे बाळा अधिर मी
तलवार देण्या तुझ्या हाती।।"

शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाचं जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकविली.समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचं धाडस दिलं. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईनं लक्ष ठेवलं. शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगात शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले.अफजलखानाला भेटीला जातांना जिजाऊंनी शिवरायांना सल्ला दिला,
" सिऊबा,बुद्धीने काम करणे,अफजलखानास मारोनी संभाजीचे ऊसने घेणे,सिऊबा जाणे,राजकारण फत्ते करून येणे."

शिवराय मोहिमांवर असताना, खुद्द जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत . आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत . सदरेवर बसून तंटे सोडवत . शहाजीराजे बंगळूरात वास्तव्यास असताना शिवाजीराजांच्या आई व तसेच वडिलांची ही जबाबदारी जिजाबाईंनी मोठ्या कौशल्याने पेलली.सईबाईंच्या निधनानंतर संभाजी राजांची ही संपूर्ण जबाबदारी उचलली. राजांच्या प्रथम पत्नी सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते.त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती. राजाचांही त्याला पाठिंबा होता. या धर्म राजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या . एवढेचं नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना ,बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राजसोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले.या संपूर्ण प्रकरणात त्यांची दूरदृष्टी व सहिष्णुता दिसून येते.
राजांच्या सर्व स्वाऱ्यांचा ,लढायांचा तपशील त्या ठेवत . त्यांच्या खलबतात ,सल्ला मसलतीत भाग घेत . राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याच्या धुरा सांभाळत. तोरणा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर डागडुजी प्रसंगी सुवर्ण मुद्रा आणि सुवर्ण मूर्ती सापडल्या तेव्हा जिजाऊंनी शिवरायांना सांगितले की , देवदेवतांच्या मूर्ती देवघरात ठेवून त्यांचा स्वराज्यासाठी काही एक उपयोग होणार नाही. देवदेवतांची पूजा करून स्वराज्य उभं करता येत नाही. स्वराज्य स्थापन करणं हेचं देवकार्य आहे. कर्तव्य हाच तर आपला खरा धर्म आहे. ध्येयासाठी अविरत प्रयत्न करणं हीच तर आपली पूजा. मानवता,माणूसकी जपणे,रयतेची काळजी घेणे म्हणजेचं देवपूजा करणे . सुवर्ण मूर्ती वितळून त्याचा पैसा रयतेच्या कामी खर्च करा. या जिजामातेच्या क्रांतिकारी, बुद्धिनिष्ठ ,युगपरिवर्तनकारी आदेशानुसार सुवर्ण मूर्ती वितळून टाकण्यात आल्या . जिजामाता खऱ्या स्वातंत्र्योपासक होत्या.