Login

गरूडाची झेप घेईल मी.

माझ्या जीवनाचा प्रवास.
माझी कहाणी एकदम साधी सरळ आहे. आत्मचरित्र मध्ये सर्वांचं काही ना काही रोमांचक किंवा वाचावं असं वाटणार असतं पण माझं तसं नाही कारण प्रत्येक आत्मचरित्र वेगळं असतं तसंच माझं आहे. मी मुळचा पुण्याचा इथेच जन्मालो आणि इथेच वाढलो, शिकलो आणि हीच माझी कर्मभूमी. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक नाट्यमय वळण येतात तशी माझ्या आयुष्यात आलीच त्यात वेगळं काही नाही पण त्याने मला घडवलं. मी खूप कमी बोलणारा अजूनही तसाच पण माणसे जोडायला आत्ता शिकत आहे. माझे बालपण जास्त हे सुट्टीत गावाकडेच गेले त्यामुळे फिरणं असं कुठे झालेच नाही. बहीण भावासोबत घालवलेला क्षण मात्र मला खूप अमूल्य आहे. सोबतीला माझ्या मात्र मी पुस्तक नक्की न्यायचो कारण लहानपणापासून तेच माझे मित्र होते. मला खेळणं , टिव्ही पाहण्यापेक्षा पुस्तकात रमण्याची जास्त आवड होती आणि अजून ही आहे. पुस्तक हातात असताना मला कशाचीच गरज भासली नाही. 

मी शाळेत असताना ही शांतच होतो आणि विशेष नाही पण शालेय जीवनात मी एक दोन स्पर्धेत भाग घेऊन द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळावला आहे ते पण राज्यस्तरीय स्पर्धेत. पुढे कॉलेज सुरू झाले पण तिथेही मी शांतच पण जीवलग मित्र मात्र खूप भेटले. त्यांच्या सोबत अल्प सहवास लाभला जो खूप सुंदर आहे. बारावीच्या वेळेस बाबांना ॲटक आला, बाबा बरे झाले पण मग इथूनच माझ आयुष्य अनाकलनीय घटनेने बदलून गेले माझी बारावी झाली आणि बाबांच्या सेवेसाठी मी कॉलेज बाहेरून केले पण माझा अभ्यास चालू होताच पण कॉलेज मधील इतर गोष्टींशी संपर्क दुरावत चालला होता.आणि मित्रांसोबत ही. शेवटी ज्या गोष्टींची आपल्या कल्पना ही नको असते ते माझ्या बाबतीत घडलं माझ्या बाबांच निधन झाले २०१५ साली आणि माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा आधार हरपला.‌ मला डगमगून चालणार नव्हते कारण आईला संभाळून घर व शिक्षण पूर्ण करायचे. काम करत करत कसेतरी बी.ए‌. पूर्ण केले आणि शिक्षणाला नंतर कायमचाच निरोप दिला व पूर्ण वेळ काम करू लागलो मी‌.

माझे पुढे शिक्षण घेऊन शिक्षक होण्याचे स्वप्न हरवून गेले, कारण सगळी घरची जबाबदारी माझ्यावर होती मीच फक्त घरातला कर्ता असल्याने पण या नैराश्यातून बाहेर येण्यासाठी त्यावेळी मला आधार भेटला लिपीचा. आधी वाचक, मग लेखक म्हणून प्रवास सुरू झाला. भयकथा प्रतिलिपी वर लिहू लागलो, नवीन होतो मी  पण वाचकांना माझ्या कथा आवडू लागल्या मग मी थांबलोय नाही आणि रहस्यकथा स्पर्धेत मला द्वितीय क्रमांक मिळाला ही माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट होती. हळूहळू कविता करायला लागल़ो, नवीन काव्यप्रकार शिकलो आणि त्यातच माझा पहिला सामूहिक काव्यसंग्रह शिंपल्यातले शब्दमोती प्रकाशित झाला त्यावेळी आईच्या हातात माझे पुस्तक देताना आणि ती माझी लिहिलेली कविता वाचताना तिला खूप आनंद झाला. माझ्या आईने, बाबांनी मला नेहमी सपोर्ट केला कधी रागावले नाहीत उलट प्रोत्साहन दिले. बाबा आज असते तर हे यश‌ पाहून त्यांना आनंद झालेला मला पहायचा होता पण ते भाग्यात नव्हते. 

पुढे माझा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला रंग जीवनाचे.‌ या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याला मी आईला आवर्जून नेले. आईच्या नजरेसमोर माझा कवी म्हणून सत्कार करण्यात आला आणि आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले हा क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि तो कायम आठवणीत राहील. मी नेहमीच वेगवेगळ्या काव्य स्पर्धेत भाग घेण्याचा प्रयत्न करतो कारण मला त्यातून शिकायला मिळेल जिंकण्याची इच्छा नंतर पण आधी माझी शिकण्याची इच्छा असते तसेच स्वतः मध्ये सुधारणा होऊन अजून चांगले लिहिता आलं पाहिजे हाच माझा ध्यास आहे. एक लेखक म्हणून मला जो मान मिळतो आहे तो मी स्वप्नात ही पाहिला नव्हता मला जेव्हा प्रशस्तीपत्रक किंवा सत्कार झाला कवी म्हणून माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला त्यानें कुठेतरी एक लेखक म्हणून मी सुखावलो, माझ्या आईच्या चेहऱ्यावर अभिमान पाहताना मला खूप आनंद झाला. आईचे खुप कौतुक केले सर्व जणांनी.  त्यासाठी मला काही करता आले ही गोष्टच माझ्यासाठी अमूल्य आहे. 

मला अजून खूप शिकायचे आहे आणि माझे स्वतःचे एक स्वतंत्र पुस्तक प्रकाशित करण्याची इच्छा आहे ज्याला वाचकांनी भरपूर प्रतिसाद द्यावा हीच सदिच्छा आहे. मी लवकरच त्या दिशेने वाटचाल करणार आहे आणि एक लेखक/ कवी म्हणून शिकत शिकत माझा लेखनाचा प्रवास असाच अविरतपणे सुरू ठेवणार आहे.