मला हे जग बघायचं होतं 

Don't ignore the feelings of a mother

मला हे जग बघायचं होतं 

ती रात्री एकदम घाबरून ऊठून बसते ,आजच ती नव-याच्या सांगण्यावरून पिशवी रिकामी करून आली होती ,तिच्या मनात एक अपराधीपणाची भावना होती,ती चुकीचं वागत आहे ,हे तिलाही समजत होतं ,पण तिचं कुणीच ऐकायला तयार नव्हतं कारण ती गृहिणी होती ,तिचं स्वत:च असं काही आस्तित्व नव्हतं आणि या भावनेमुळेच कदाचित जिला तिने तिच्या गर्भातून उखडून टाकलं, ती तिच्या स्वप्नात येऊन तिला जाब विचारत होती 

गर्भ- आई मला तुझ्या उदरात वाढायच्ं होतं ,तू तर मला मुळा सकट उखडून टाकलं,असं का केलं 

आई-मला नव्हतं असं करायचं ,पण घरातल्यांपुढे माझं काहीच चाललं नाही गं,तुला माहित नाही बाळा ,असं करताना माझं मन आक्रंदत होतं,तू तर माझ्यातच होतीस ,तुला नाही जाणवलं का?

गर्भ-आई जाणवत होतं,त्यामुळे शेवट पर्यंत मला असं वाटतं होतं की ,तू मला या जगात आणण्यासाठी सगळ्यांशी लढ्शील ,पण माझी आशा फोल ठरली ,तू माझं आस्तित्वच नष्ट करून टाकलं 

आई-तुझी आई इतकी स्वतंत्र नाही की, ती असा निर्णय घेऊ शकेल.

गर्भ-मी जेव्हा तुझ्या उदरात आले ,तर मी किती स्वप्न पाहिली होती ,मी पृथ्वीलोकाबद्दल खूप ऐकले होते ,म्हणून मी तुमचे दोघांचे खूप आभार मानले ,कारण तुमच्या मुळे मला या जगात यायला मिळणार होते ,पण जसं जसं मी तुझ्या पोटात वाढत होते ,मला तुझ्यात एक अनामिक भिती जाणवायला लागली,तू बाबांना जीव ओतून सांगताना मी ऐकलं की,चेक नको करूया,जे व्हायचं असेल ते होईल ,पण ते तुझं ऐकतच नव्हते ,मी सुध्दा आत त्यांचा आवाज ऐकून खूप घाबरले होते.

आई-कोणत्या आईला असं वाटतं की,आपलं बाळ आपण स्वतः काढुन टाकावं,खूप त्रास होत होता की ज्याची तू सुध्दा कल्पना करू शकत नाही

गर्भ-मी ठरवलं होतं की,मी बाहेर आल्यावर बाबांना कधीच त्रास होऊ देणार नाही ,त्यांना अभिमान वाटेल माझा,असं काहितरी करायचं आणि सगळ्यांना दाखवून द्यायचं की,मुलीही मुलांइतक्याच कर्तुत्ववान असतात ,पण सगळं राहूनच गेलं 

आई-मला माफ कर ग्ं माझ्या सोन्या ,आता मी तुला माझ्या आयुष्यात नाही आणू शकत ,पण देवाला प्रार्थना करेन ,की पुढच्या जन्मी तुलाच माझ्या उदरात दे आणि तुला जन्म देण्याच सामर्थ्यही दे .

गर्भ-पुढच्या जन्माचं कुणी पाहिलय्ं ,पण आता मला वचन दे की,तू ताईला स्वत:च्या पायावर उभी करशील , तिला तुझ्यासारख्ं नको बनवू,तिच्या पंखात बळ भर ,जेणेकरून तिचे निर्णय घेण्याचे सामर्थ्य तिच्यात असेल , करशील ना आई माझ्यासाठी एवढं,अजून एक बाबांना माझा एक निरोप दे

मुलगा म्हणजे वंशाचा दिवा ,

पण मुलगी म्हणजे दिव्यातील वात ,

जी स्वत: जळून दोन घरांना प्रकाशित करते , 

वाती शिवाय दिवाही प्रकाशमान होत नाही,

जर आयुष्यात लख्ख प्रकाश हवा असेल,

तर दोन्ही जिवांचा सारखा सन्मान केला पाहिजे ,

मग स्वर्ग ही आयुष्यापेक्षा फिके वाटेल.

समाप्त

जर तुम्हाला मायलेकिचं संभाषण आवडलं असेल तर नावासहित शेअर करा आणि अभिप्राय अवश्य द्या .

हसत रहा,वाचत रहा आणि आनंदात रहा .

रुपाली थोरात