मला ही जगायचं

स्त्रीच्या जन्माचे स्वागत व्हावे. तीला सन्मान आणि आदराची वागणूक दिली गेली पाहिजे.

मला ही जगायचं


विषय... स्त्री ला समजून घेणं खरंच कठीण असतं का हो?

फेरी... राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा

©®प्रज्ञा बो-हाडे

नाशिक टिम

...

            एक स्त्री जीचं जीवन तिच्या कुटूंबाच्या अवतिभवति फिरत असतं. सतत कुटूंबाचं भलं कस होईल, ह्याचा ध्यास उराशी बाळगून स्वत:ला विसरुन घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे घरातील सदस्यांना त्यांच्या कार्यात मदतीचा हातभार लावत असते. आपलं घर आणि घरातले वातावरण आनंदी, हसतं-खेळतं कस राहिल या करता तिच्या वेगवेगळ्या कल्पना आखण्याचा उपक्रम नेहमीच सुरू असतो. कोणी आजारी पडू नये, जीवनसत्व,प्रोटिन, प्रथिने असा पौष्टिक आहार जेवणात सामाविष्ट असतो. मुलांच भविष्य उज्वल व्हाव या करता मनाचा विचार न करता आपली हौस-मौज बाजूला सारुन त्यांना उपयोगी वस्तू कश्या पुरवता येतील याचा प्रयत्न सुरु असतो. आई-वडिल, सासू-सासरे, नणंदा, दिर अशी अनेक नाती जपत ती नात्यांना प्रेमाच्या धाग्यात गुंफत असते.


स्वत:ची चूक नसताना देखील वाद टाळले जावे म्हणून अपमान सहन करत राहते. आपलं मत मांडाव अस तीला वाटत असते, पण तीला सगळेच आपण घेतलेल्या निर्णयात गृहित धरुन तीचही मत तेच असणार अशी चुकीची समजूत करुन घेत असतात.

               

लहानपणा पासूनच घरात अनेकदा भेदभाव दृष्टीस पडतो. मुलाला चांगले अन्न पौष्टीक सकस आहार देण्यात येतो. तेच मुलींच्या बाबतीत मात्र रात्रीचे उरलेले अन्न खायला देण्यात यायचे. मुलाचा जन्म झाला तर घराला वंश मिळाला. त्याची आनंदाची बातमी सर्वत्र क्षणात पसरली जाते. मुलगी झाली तर घरातल्यांना आनंद न होता. आपल्यावर असणारं ओझ वाटू लागते.

मुलाच बारस थाटामाटात पार पाडले जाते, परंतु मुलीने जन्म घेवून जणू काही गुन्हा केला असचं वाटू लागते. जन्म घेणे आपल्या हातात नसते. हे का कळू नये. मुलींना शिकवून काय करायचे. पुढे लग्न झाल्यावर तीला कपडे, भांडी, आणि जेवणच बनवायचे. हि वृत्ती कधी बदलणार...??

स्त्रीयांना उच्च शिक्षण घेवून, अनेक मोठ्या हुद्यांवर काम करण्याचे सामर्थ आहे. त्यामध्ये त्या यशस्वी होत आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. तो तीला मिळाला कि स्त्री च मन सहज समजू शकते.

         

स्त्री ला समजून घेण कठिण अजिबात नसते. तीला तीच्या आवडीच्या कामा करता दिवसभरातून वेळ दिला जावा हि घरातल्या सर्वच सदस्यांची जबाबदारी आहे. तीला सतत आपल्या कामां करता गृहित न धरता स्वावलंबी बनून प्रत्येकान आपली कामे केली पाहिजे.

तीला ही मोकळा श्वास घेवूद्या. आपल्या मना प्रमाणे तीला ही वागण्याचा अधिकार आहे. सतत तीला हे करु नको, ते करु नको. बोलायचे टाळा. प्रत्येकाला आपलं हित समजत असते. सतत डोक्यावर टांगती तलवार ठेवली तर...., तीच्या डोक्यात नको त्या विचारांना क्षणात थारा मिळून नैराश्याने ती ग्रासली जाते.

स्त्री विविध कलागुणांची खाण आहे. गायन, नृत्य, चित्रकला अश्या विविध क्षेत्रात ती आपली कला सादर करताना दिसत आहे. परंतु, पुढे लग्न झाल्यावर अनेक जबाबदा-यांमधून पुढे जात असताना, नकळत या कला मागे पडत जातात. तीला तीचे छंद जोपासताच येत नाही. स्त्री ला स्वत:करता थोडा वेळ मिळवून देत असताना प्रोत्साहन आणि पाठिंब्याची साथ आवश्यक असते. वस्तुस्थिती मात्र निराळीच पाहायला मिळते. तुला काय जमणार आहे. नको करु उगाच. वेळ आणि क्लास लावून त्याचे शिक्षण घेण्यात नुसता पैसा वाया घालवशील.

              

स्त्री ला समजून घेताना तीला सन्मानाची, आदराची वागणूक दिली जावी. तीचही बोलण विचारात घेतल जाव. मुलगा - मुलगी भेद न करता समान वागणूक दिली जावी. मुलगा जर...., घराण्याचा वंश असेल तर....., मुलगी घराण्याची ज्योत आहे.
मुलगी दोन्ही घराची जबाबदारी स्विकारते.

             

या गोष्टी आता बदलल्या आहेत. कोणीही आजच्या काळात भेदभाव करत नाही. हे विधान सत्य जरी असले तरी आजही स्त्रीयांचा छळ केला जाण्याचे चित्र पाहायला मिळते. लग्न जमवताना आजही हुंडा वेगळ्या प्रकारे का होईना मागितला जातो.

मुलीकडची परिस्थिती गरिब म्हणून तीला नको तेवढ्या कामाचा बोज दिला जातो. त्या शिवाय तीची सुटका होणं शक्य नसते. लग्नानंतर अनेक वर्ष स्त्री ला गर्भ राहिला नाही तर....., मुलीलाच जबाबदार धरले जाते. तीच्या बरोबर घटस्फोट घेण्यात येतो. तीच्या आयुष्याला गालबोट लावून इकडे दुस-या विवाहाचा संपन्न सोहळा सजवला जातो.

कधी बदलणार हि मानसिकता...???

               

   संसारात कधी भांडण झाल्यास सगळी चूक तुझीच आहे. तू अस बोलायला नको होतं. मग माझाही बोलण्यावरचा ताबा सुटला. प्रत्येक वेळी स्त्री च चुकीची नसते. तीच्या कामाचे कधीच कौतुक घरात केले जात नाही. तीच्या वाट्याला सतत अपमानाचे बोल कानी पडत असतात. 


तीच्यातही प्रत्येक कार्य प्रचंड उर्जेने परिपूर्ण करण्याची ताकद सामावली आहे. त्याकरता तीला आपल्या कडून मायेच्या शब्दांची साथ हवी आहे. घाबरू नको, होईल सगळ छान. तुला हे नक्कीच जमणार हि तीच्या विषयी वाटणारी आत्मियताच तीच्या मध्ये जिद्दीचे बळ निर्माण करते. आणि ती त्या झुंजीत विजयी ठरते.

मुलांप्रमाणेच स्त्री देखील विजयाची पताका आपल्या कुटूंबात फडकवू शकते. तीला मानाने गौरवले गेले पाहिजे. तीच्या जन्माचे स्वागतच व्हायला हवे. तीचे बारसे, वाढदिवस दणक्यात साजरे झाले पाहिजे.


              

मुलीच्या येण्याने घर हास्यांन फुलतं. तीच्या इवल्याश्या पायातल्या पैंजणाच्या आवाजाने तीची चाहूल लागते. दिवसभर घरात तीच्या बोबड्या स्वरांनी घराला घरपण लाभतं. घर समाधानाने भरुन पावते. सुखाची परिभाषा मुलीच्या येण्याने समजते. ती क्षणभर जरी घरात नसली तरी घर खायला उठते. घरात भकासपणा आणि रिकामा पणा जाणवायला लागतो.

आनंदाचा झरना तू
वात्सल्याची किमया
मनातल्या भावनांना
हदयात साठवून ठेवणारी.....
सुखाची बरसात तू
तेजस्वी तेचा तारा तू
समाधानाची ग्वाही तू
सत्यातला खरेपणा तू
आकांक्षाचे पंख मिळावे तुजला
व्हावा तुझा सन्मान
हिच प्रार्थना सर्वांना!!!

ज्यांना तुझ मन समजले, त्यांना समजून घेण्यास खरचं तू अजिबात कठिण नाहीस.