मला माझा अधिकार हवाय....

सासूने आमच्यावेळी असं नव्हतं ही चौकट सोडून बाहेर यावं आणि सुनेचाही विचार करावा


" सुधा, सहा वाजता ये मग ठरलेल्या ठिकाणी. आज काय सांगणारेस घरी आईला ? " सुधाने काढून ठेवलेले पेन, रुमाल, पाकीट उचलत राजेशने बेडरूमच्या बाहेर पडायच्या आधी सुधाला विचारले.

" मी येणार नाहीये...." सुधा

राजेश थबकला, " का गं? बरी आहेस ना? काही काम आहे का सहा वाजता? उद्या जाऊया का ? "

" राजेश , मला माझा अधिकार हवाय...." सुधा म्हणाली.

" म्हणजे ? मला नाही कळलं..." राजेश

" मला कंटाळा आलाय असं चोरून भेटायचा. तू सांग ना आईंना की आम्ही दोघे फिरायला जाणार आहोत म्हणून. मी दरवेळी का खोटं बोलायचं? आपण चोरी करतोय का ? " सुधा

" अच्छा....आज अचानक काय झालं तुला ?  का रुसली आज राणी? लग्नाला पाच वर्षे झाली आपल्या, 1bhk घर, आपलं बोलणं होत नाही म्हणून आपण एक दिवस बाहेर भेटतो....हे नवीन आहे का तुला? " राजेशने विचारलं.

" घर लहान आहे म्हणून नाही राजेश, आईंना आपण सोबत वेळ घालवलेला आवडत नाही म्हणून आपण बाहेर भेटतो...चोरून. बरोबर ना ? " सुधाने थेट प्रश्न केला.

" हे बघ, तिच्या मनात काय आहे ते मला माहित नाही पण सोड ना....का तेच धरून बसते? नाही आवडत तिला आपण सोबत असलेलो. तुला माहित आहे, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते...." राजेश

" हो रे, पण का असं? म्हणजे तू आणि मी घरीसुद्धा एकत्र बोलत बसलो तर हमखास ह्या येणार, काहीतरी काम काढून तुला बोलावून घेणार. रात्री वेगवेगळी कारणं काढून तुला बाहेरच झोपायला लावणार. कुठे जेवायला बाहेर जायचं किंवा कार्याला जायचं तर त्या येणारच....एवढंच नाही तू मला गिफ्ट दिलंस काही , तरी मी ते माझ्या आईने दिलंय असं दाखवायचं....का ? मला कंटाळा आलाय ह्या सगळ्याचा....." सुधा डोळे पुसत म्हणाली.

" अगं पण काय फरक पडतो ? ती जुन्या विचारांची आहे. त्यांच्यावेळी नव्हतं असं नवरा बायकोचं नातं म्हणून तिला नाही पटत हे सगळं पण माझ्या बाजूने मी कमी पडतोय का काही ? " राजेशने समजुतीच्या सुरात विचारलं.

" हो, तू कमी पडतोय मला माझा अधिकार द्यायला. तू कमी पडतो आहेस आईंना त्या जुन्या विचारांच्या चौकटीतून बाहेर काढायला. मी कधीच आईंचा अवमान करत नाही, करणारही नाही. आपण त्यांची नक्कीच काळजी घेऊ पण आई मुलाच्या नात्याएवढं नवरा बायको हे ही नातं महत्वाचं नाही का? आमच्यावेळी नव्हतं असं ही चौकट सोडून त्यांनी आता बाहेर यायला हवं ना? मी नवीन विचारांची, नव्या जमान्यातील असले तरी कधी चालीरीती म्हणून तर कधी त्यांच्या समाधानासाठी न पटणाऱ्या गोष्टी करते ना? मग मी तर देवाब्राम्हणांच्या साक्षीने केलेली बायको आहे तुझी. मी तुझ्याबरोबर वेळ घालवला तर तो माझा हक्क आहे, तू आणलेलं गिफ्ट हे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे, मी रात्री तुझ्या कुशीत झोपणं ही तुझी आणि माझी गरज आहे, हे त्यांना कळत नाही का ? नसेल कळत तर आपण जाणीव करून द्यायला हवी. \"आमच्यावेळी नव्हतं असं\" ही चौकट निदान नवरा बायकोच्या नात्यासाठी तरी त्यांनी ओलांडलीच पाहिजे..... त्यांना दुखावणे हा हेतू नाही पण एक पत्नी ह्या नात्याने मला माझा अधिकार मिळालाच पाहिजे. मी खोटं बोलून बाहेर येणार नाही. तू किंवा आपण दोघे मिळून आईंना सांगू आणि फिरायला जाऊ...."

काय वाटतं तुम्हाला, राजेशने आईला सांगावं \"आमच्यावेळी नव्हतं असं\"च्या चौकटीतून बाहेर यायला ? राजेशने सुधाला तिचा अधिकार द्यावा ?

©️®️डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर