Jan 29, 2022
नारीवादी

मी देवी पाहिली

Read Later
मी देवी पाहिली

मी देवी पाहिली 
सिद्धी भुरके ©®

    सायली सकाळपासून नाराज होती. दरवर्षी अगदी मनापासून नवरात्र उत्सव साजरी करणारी ती.. यावर्षी तिला कुमारिका पूजनासाठी कुमारिका भेटेना. आता परिस्थिती पण तशीच आहे. कोरोनामुळे कोणी आपल्या लेकींना बाहेर पाठवायला तयार नाही आणि या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणाला घरी बोलावण्याचा आग्रह करता येईना. सायलीला वाटत होते, "मलाच पदरात देवाने मुलगी दिली असती तर किती बरं झालं असतं..तिचीच मनोभावे पूजा केली असती.. "पण नशिबापुढे कोणाचं काय चालणार. असच हिरमुसलेल्या चेहऱ्याने ती बाजारात फुलं आणायला गेली. सगळी खरेदी करून घरी येत असताना गाडीतले पेट्रोल संपले. पेट्रोल पंप थोडाच दूर असल्याने ती गाडी ढकलत नेत होती. मार्गात जरा सामसूम रस्ता आल्याने ती घाबरली. देवीचे नाव घेऊन गाडी ढकलू लागली पण तितक्यात तिला बाजूला असणाऱ्या झाडीतून कसला तरी आवाज आला. तिने नीट ऐकलं तर तिला बाळाच्या रडण्याचा आवाज वाटला तो. आजूबाजूला कोणी नसल्याने ती दुर्लक्ष करून पुढे जाऊ लागली. पण आता अजूनच स्पष्ट आवाज येऊ लागला तिला. परंतु तो आवाज झाडीतून येत असल्याने तिची पुढे जायची हिंमत होत नव्हती.

         सायलीला कळेना कि कोणाचं बाळ इथे या झाडाझुडपात रडतय.. शेवटी कशीबशी हिंमत करून तिने गाडी एका बाजूला लावली आणि ती त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागली. थोडंसं पुढे जाऊन बघते तर खरंच एक तान्हं बाळ तिथे रडत होतं. सायलीने आसपास पाहिलं तर त्या बाळाजवळ कोणी नव्हतं. तिने आवाजही दिला.. "कोणी आहे का??  कोणाचं आहे हे बाळ?? " पण काहीच उत्तर मिळेना. ती  बाळाच्या जवळ गेली. तिने पटकन त्या बाळाला उराशी कवटाळलं. तसं त्या बाळाने रडणं थांबवलं. सायलीने त्या बाळाकडे पाहिलं.. अवघं तीन चार दिवसाचे असेल ते बाळ.. खूप गोंडस.. आणि गोरंगोरं पान होतं.. त्या बाळाच्या डोळ्यात बघून सायलीला ही मुलगी असावी असं वाटलं.. ती बघते तर खरंच नवजात बालिका होती ती.

         सायलीला आता काही सुचेना. कोणाचं आहे हे बाळ??कुठे घेऊन जाऊ हिला?? कोणी या कोरोनाच्या वातावरणात असंच रस्त्यावर बाळ ठेवलं?? ही मुलगी आहे म्हणून तर ना कोणी टाकलं असेल?? असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात येऊ लागले. सायलीची गाडी सुद्धा पेट्रोल नसल्याने बंद पडली होती. त्या बाळाचं काय करावं तिला काही समजत नव्हतं. तिने पटकन नवऱ्याला फोन लावला आणि तिथे बोलवून घेतलं. नवरा येईपर्यंत तिथेच एका बाजूला सायली बाळाला घेऊन उभी होती. रस्ता सामसूम असल्याने तिला भीती सुद्धा वाटत होती. सायली त्या बाळाला घट्ट छातीशी धरून उभी होती. थोड्या वेळात तिचा नवरा म्हणजेच साहिल तिथे येतो.
"साहिल.. बरं झालं तू आलास.. अरे बघ ना हे बाळ.. मला वाटतंय मुलगी आहे म्हणून कोणीतरी इथेच टाकून गेलंय तिला.. " सायली म्हणते.
"हम्म.. बहुतेक असंच असावं.. आपण हिला आधी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ.. आणि मग पोलिसांना कळवू.. "साहिल बोलतो.
"हा ठीक आहे.. चल.. " सायली त्याच्यासोबत हॉस्पिटल मध्ये जाते.

     झाडाझुडपात ठेवल्याने त्या बाळाला थोडं लागलेलं असतं.. शिवाय भुकेने ते बाळ तळमळत असतं. डॉक्टर बाळाला मलमपट्टी करतात आणि सायलीकडे दुधाची बाटली सुपूर्त करतात. इतक्या वर्षाने नवजात बाळाला दूध पाजायची वेळ आल्याने सायली जरा बावरते... पण बाळाचा चेहरा बघून त्याच्या तोंडाला बाटली लावते. बाळ अगदी समाधानाने दूध पिऊन सायलीच्या मांडीतच झोपून जातं. सायली त्या बाळाकडे एकटक बघत असते. किती गोड असते ती मुलगी दिसायला.. छान जावळ असतं डोक्यावर.. गुलाबी गुलाबी गाल असतात.. सायलीला वाटतं कि,  "कोणाची इच्छा होईल इतक्या गोंडस बाळाला असं टाकून द्यायला??  नक्कीच तो माणूस म्हणून घायच्या लायकीचा नाहीये.. " तितक्यात तिथे पोलीस येतात.

      साहिल आणि सायली पोलिसांना घडली घटना सांगतात. पोलिसांना सुद्धा वाटतं कि मुलगी जन्माला आल्याने तिला असं टाकून दिलं असणार. पोलीस त्या बाळाच्या आईवडिलांचा शोध सुरु करतात. पण तोपर्यंत बाळाला हॉस्पिटलमध्येच इलाजासाठी ठेवण्यात येतं.  सायलीचं अजिबात मन नसतं त्या बाळाला सोडून जायचं. त्या दोन तीन तासात तिला त्या बाळाचा लळा लागलेला असतो. उद्या पुन्हा येऊ भेटायला असं साहिल सायलीला समजावतो आणि ते दोघे घरी जातात.

         रात्रभर सायलीला डोळा लागत नाही. सतत त्या बाळाचं गोंडस रूप तिला दिसत असतं. ती सकाळी लवकरच उठते.. सगळी पूजेची तयारी करते. सकाळी सकाळी साहिलसोबत घराबाहेर पडते. मार्केटमधून थोडीफार खरेदी करून ते दोघे हॉस्पिटलमध्ये जातात. बाळ छान तिथल्या नर्सच्या हातून दूध पीत असतं.. ते बघून सायलीला बरं वाटतं. तितक्यात डॉक्टर येतात.
"डॉक्टर.. आता बाळ कसं आहे..?? तिला लागलेलं बरं आहे का आता?? " सायली काळजीने विचारते.
"हो हो.. बाळ बरं आहे.. एक दोन दिवसात जखम पण भरेल.. " डॉक्टर सांगतात.
"डॉक्टर.. मला तुम्हाला एक विचारायचं होतं.. मी या बाळाची पूजा केली तर चालेल का?? " सायली जरा घाबरत विचारते.
"पूजा??कसली पूजा?? " डॉक्टर गोंधळतात.
"पाय धुवून.. फक्त औक्षण करणारे.. बास.. " सायली बोलते.
"अच्छा अच्छा.. ठीक आहे.. करा.. " डॉक्टर सायलीला परवानगी देतात तशी ती खुश होते.

        सायली लगेच पिशवीतून ताम्हण, हळद कुंकू, निरांजन वगैरे काढते. सुरवातीला बाळाचे नाजूक पाय गरम पाण्याने धुते.. मग पायांना हळद कुंकू लावते.. बाळाचे औक्षण करते आणि बाळाला सोबत आणलेले नवीन कपडे, ब्लॅंकेट वगैरे वगैरे देते. बाजूला उभ्या असणाऱ्या नर्सला पण कौतुक वाटतं...
"अहो ताई कमाल आहे तुमची.. पोटच्या पोरीप्रमाणे तुम्ही बाळाची काळजी घेत आहात.. तिच्यासाठी किती काय करत आहात.. नाहीतर दुसरीकडे या बाळाचे आईवडील.. कसा जीव झाला असेल त्यांचा या बाळाला टाकून द्यायचा..?? "नर्स बोलते.

"माहित नाही.. पण कालपासून एक वेगळंच नातं जोडलं गेलं आहे या बाळासोबत.. अहो कालपर्यंत खूप वाईट वाटत होतं मला कि नवरात्रात मला कुमारिका पूजन करता येणार नाही याचं.. पण हे बाळ भेटलं.. जणू काही आईभवानीच आली कुमारिका बनून.. माझी मनोकामना पण पूर्ण केली तिने.. या बाळात मला त्या आई जगदंबेचं रूप  दिसतंय.. "सायली डोळे पुसत म्हणाली.

      तितक्यात पोलीस तिथे त्या बाळाच्या आई वडिलांना घेऊन येतात. आपलं बाळ व्यवस्थित आहे हे बघून त्या बाळाची आई पटकन जाऊन बाळाला जवळ घेऊन रडू लागते..
"साहेब..जा याला घेऊन.. बेड्या ठोका याला.. यानेच माझं बाळ रस्त्यावर टाकलं.."बाळाची आई रडतरडत पोलिसांना सांगत होती. त्या आईला तिसरी सुद्धा मुलगीच झाल्याने रागाच्या भरात तिच्या नवऱ्याने ते बाळ रस्त्यावर टाकून दिलेलं असतं.

         आज एकविसाव्या शतकात मुलगी झाली म्हणून अशी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडू शकते यावर सायलीचा विश्वासच बसत नाही. आज बाहेर नवरात्राच्या निमित्ताने देवीची पूजा केली जाते.. स्त्री शक्तीचा जागर केला जातोय.. आणि या बापाला त्या बाळातील आई दुर्गा दिसेना.. या गोष्टीचे सायलीला फार वाईट वाटते.
"ताई तुमचे खूप उपकार झाले.. तुमच्या रूपाने आई जगदंबा धावून आली माझ्या बाळाच्या रक्षणासाठी.. " बाळाची आई सायलीचे आभार मानते.

"अहो मला फार मोठेपणा देताय तुम्ही.. या बाळाच्या निमित्ताने मलाच आई जगदंबा भेटलीये.. हिच्यामुळे माझा नवरात्र उत्सव साजरा झालाय..या कुमारिकेच्या रूपात आज  त्या देवीची पूजा करायचं भाग्य लाभलं मला.. " सायली डोळे पुसत बोलते.. एकदा डोळेभरून त्या बाळाला बघते.. पुन्हा तिला छातीशी कवटाळते आणि यावर्षीच्या आगळ्यावेगळ्या कुमारिका पूजनाने धन्य होऊन समाधानाने घरी जाते.
       आज बाळाच्या आईला सायलीमध्ये देवी दिसते.. तर सायलीला बाळाच्या रूपात देवी दिसते.. ती आई जगदंबा दोघींच्या मदतीला वेगवेगळ्या रूपात धावून आलेली असते...

वाचकहो कथा कशी वाटली ते मला नक्की सांगा.. कथा काल्पनिक आहे..आवडली तर like आणि कंमेंट नक्की करा. धन्यवाद.
सिद्धी भुरके ©®

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Siddhi Gautam Bhurke

Interior designer

Hello everyone.. My self Mrs.siddhi Bhurke. I'm an interior designer and a co owner at studio intelize. I'm a trained bharatnatyam dancer. And a proud mommy of two years old daughter.. Recently I've started writing blogs..