मी आणि कॅप्टन

अनुभव कॅप्टन बनून काम करण्याचा ??


मी आणि कॅप्टन ! दूर दूर पर्यंत काहीच संबंध नाही. अगदी प्राथमिक शाळेतही मी कधी कॅप्टन पद भुषवलेलं नसल्याने जेव्हा संजना मॅडमने घोषणा केली कि

"ज्यांना कॅप्टन बनायचं आहे त्यांनी निसंकोच मेसेज करा." मी त्यांना मेसेज टाकला,

"प्लीज मला कॅप्टन पद देऊ नका."
झालं उलटंच. ते कॅप्टन पद माझ्याच गळ्यात पडलं.


संघातील सर्व कार्यकर्ते जवळ जवळ ईरा आणि माझ्यासाठीही नवीनच. मग कोण काय करेल? कसं करेल? वगैरे वगैरे गोंधळ सुरु झालेला. ईश्वर यांना मागील वर्षीच्या स्पर्धेचा चांगला अनुभव. त्यांनी आपल्या अनुभवाने छान काम केलं. पण ते एकटं किती सांभाळणार? संघात आणखी कोणीतरी चांगलं अनुभवी असणं खूप गरजेचं म्हणून कि काय टीम ईराने आपली लाडकी कवयित्री पूनम लोखंडे आणि लेखिका डॉक्टर सुनीता चौधरी यांना आमच्या शिवतेजा या संघात समाविष्ट केलं आणि खऱ्या अर्थाने संघात तरारी आली.

हा, मी थोडी घाबरली होती, \"या दोघींना आपल्याला सांभाळून घेता येईल का म्हणून?\" कारण दोघीही उच्च प्रतिचं लिखाण करणाऱ्या आणि एकदम बिनधास्त. पण खरं सांगू का? त्यांनीच मला खूप सांभाळून घेतलं आणि कॅप्टन पदाचा काडीचाही अनुभव नसलेल्या मला ही स्पर्धा पुर्णत्वास न्यायला विशेष सहकार्य केलं.

प्राजक्ता हेदेची, \"मायेचा पदर\" आणि आर्या पाटीलची, \"तिची सौभाग्यलेणी\" कविता भारीच, मनात रुजली. सुवर्णा कांबळेनी शाळेचं काम सांभाळून दिलेलं पाठबळ व प्रियंका हिचा सहभाग महत्वपूर्ण ठरला.

आर्या अमोल (का एक झाले ऊन सावली ), कविता वायकर (सागराला ओढ किनाऱ्याची) आणि ईश्वर त्रिंबक आगम (गुप्तहेर जना) यांच्या कादंबरीने मनं जिंकली. कादंबरी लिखाणाचा पहिला वहिला श्रीकांत (आयुष्याच्या वळणावर) यांचा प्रयत्नही वाखाणन्या जोगा होता. पण त्यात सातत्य नसल्याने संघालाच नाही तर त्यांनाही स्वतःला खूप त्रास झाला व त्यामुळे उडालेला गोंधळ तर सांगायलाच नको.

कमी माझ्या नेतृत्वातही होतीच. ऑफिस, घर, मुलाची परीक्षा आणि संघात उडणारे छोटे मोठे वादळ, यात मलाच नीट ताळमेळ बसवता आलं नाही. म्हणून काही चुकीचे निर्णय घेतल्या गेले आणि संघांचे नुकसान झाले. त्याबद्दल मी संघातील सर्वांना माफी मागते.

बाकी बोलायचं आमच्या कॅप्टन्सच्या संघा बद्दल तर त्या सर्वांच्या संपर्कात येणं म्हणजे सौभाग्य माझं. अगदी "बिग बॉस" चा फिल आला त्यांच्या सहवासात ??. खरंच ना इतर वेळी खूप खेळीमेळीचं वातावरण पण स्पर्धा म्हटली कि सर्व एकदम कॉम्पिटेटिव्ह मोड मधे जायचे. तेव्हा खूप भारी वाटायचं. त्यांचा तो जोश आणि उत्साह बघून वाटायचं हो आपण खरंच एका खूप मोठ्या स्पर्धेत आहोत. आपल्याला आणखी खूप काही करायचं आहे. एका पेक्षा एक उत्कृष्ट लेखक लेखिका असलेल्या मेघा अमोल, सारिका, प्रशांत कुंजीर, पार्थ, राघव, अश्विनी मिश्रीकोटकर या सर्व कॅप्टन्सने मला आपल्यात सामावून घेतलं म्हणून मी त्यांची आभारी आहे.

त्यात आपल्या निशा थोरे आणि संजना मॅडम होत्याच संघात सलमान खानचा फिल द्यायला ?. पण त्या दोघींचेही खूप खूप कौतुक करायला हवं. रात्र दिवस काही न बघता आम्ही त्यांना प्रश्न विचारून भांडावून सोडायचो. त्या मात्र शांततेत सर्व शंकांचे निरासन करायच्या.

मला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली ती वाचकांनी नियमित माझ्या लिखाणाला दिलेल्या प्रोत्साहनमुळे. वाचक मन लावून वाचतात म्हणून लिहायची उर्मीही येते.

ईरा टीमच्या सर्व सदस्यांना खूप खूप धन्यवाद. स्पर्धा विजेत्यांचे अभिनंदन आणि इतरांना पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा !

खरं तर कॅप्टन म्हणून मी निकाल यायच्या आधीच माझं मनोगत लिहायला हवं होतं पण ईरा चॅम्पियन्स ट्रॉफीचा निकाल आणि आमची हिमालय वारी एकाच वेळेत आल्याने मला मनोगत लिहायला वेळच मिळाला नाही म्हणून लिहायला उशीर झाला.

धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार