"मी यशोदा रे"

संस्कार
"मी यशोदा रे"
आई, मिताली सांगत होती सुरेंद्र ने काकूंना घरातून हाकलून दिले.
ताई इथे आल्या, पण का?
हे तर मलाही माहिती नाही.
मला वाटले नेहमी प्रमाणे कंटाळा आला की येतात तश्याच आल्या असतील.
मिताली ला कोणी सांगितले?
अदितीने.
आता ही आदिती कोण?
सुरेंद्र ची बायको मेघना, तिची आदिती मैत्रिण आहे.
मिताली ची आणि तिची कशी ओळख!
आई, ते तर मलाही माहिती नाही. गावी गेल्यावर जातात एकमेकींकडे. तिकडे झाली असेल मैत्री.
काकु कुठे आहे?
देवघरात पूजा करते. आणि तुझे बाबा?
सकाळचा नियमित फेरफटका मारायला गेले.
बर!
मिताली ला बोलावं!
मिताली मी हे काय ऐकते?
कश्या बद्दल बोलता तुम्ही आई?
तुला काल कोणाचा फोन आलेला?
बोल पट्कन!
आदिती चा!
कोण आदिती?
तुझी आणि तिची कशी ओळख?
ती मेघना ची मैत्रिण आहे.
आपण गावी गेलो तेव्हा मैत्री झाली. नंबर घेतले एकमेकींचे.
आदेश सांगतो ते खरे आहे?
हो आई!
काय सांगितले तीने?
जरा व्यवस्थित सांग!
सुरेंद्र काकूंना म्हणतो सगळी प्रॉपर्टी माझ्या नावाने कर. अर्थात यात मेघना चा सुध्दा हात असणारच!
ते आहेच.
पुढे!
काकु म्हणाल्या मी आताच तुम्हाला काही देणार नाही.
माझ्या खर्च मीच करते. उलट जास्तच देते.
वेळ आल्यावर तुम्हालाच देणार आहे.
तर तो खूप भांडला काकुंसोबत. काकूंच्या अंगावर धाऊन गेला.
आदिती सांगत होती. चार महिने झाले ती दोघे काकूंना खूप त्रास देत आहे.
काकु गुपचूप सगळे सहन करतात.
आदिती ने मेघना ला खूप समजावून सांगितले. सासू आहे तुझी असे करू नको.
तुझे सासरे जाऊन सहाच महिने झाले. त्या आधीच खूप खचून गेल्या आहे. तर तिने तिच्याशी बोलणेच बंद केले.
काल आदिती आपल्या, म्हणजे काकूंच्या दारावरून जात होती. तर अंगणात काकु बसलेल्या दिसल्या. तिला मेघना चा स्वभाव माहिती आहे. म्हणून ती हळूच काकु जवळ गेली.
काकु रडत होत्या.
मग ती रिक्षा करून त्यांना तिच्या घरी घेऊन गेली.
मेघना घरात नव्हती हे अजून चांगले झाले.
काकूंना दोन दिवस झाले या नालायक लोकांनी जेवण सुध्दा दिले नव्हते.
तिने काकूंना जेवू घातले. आणि मग थोडे दिवस आपल्याकडे जायला सांगितले.
काकु काल घरी गेल्या आणि सकाळच्या पहिल्या गाडीने कुणालाही न सांगता इकडे निघून आल्या.
बर!
यातलं काही काकूंना कळता कामा नये.
पण आई सुरेंद्र असा कसा वागू शकतो?
तो त्याचा प्रश्न आहे!
काकु जोवर काही सांगत नाही तोवर त्यांना कुणीच काही बोलायचे, विचारायचे नाही.
कळल?
पण आई, त्यांचा मुलगा असताना आपण का त्यांना ठेऊन घ्यायचे.
काकु म्हणून, नात्याने तू सुध्दा त्यांचा मुलगाच लागतो.
एकत्र होतो तेव्हा आईच्या मायेनं तुझ सगळ करत होत्या.
आठवत का?
लागण आणि असणं यात खूप फरक आहे आई !
आदेश या विषयावर मला आणि बाबांना दोघानाही चर्चा नकोय.
बाबांशी माझे बोलणे झाले नाही. तरी सुद्धा मी त्यांच्या वतीने हे सांगते.
त्या सांगितलच सगळ, त्यानंतर बघू.
आज जवळ जवळ चार महिने झाले. सुरेंद्र चा साधा फोन सुध्दा आला नाही.
तसे त्यालाही माहिती आहे आई काकांकडे जाणार म्हणून.
मिताली ली च्या डोक्यात चक्र सुरू झाले. ती सासूबाईंना म्हणाली, आई काकु तर जायचे नावच घेत नाही. चार महिने झाले.
किती दिवस आपण त्यांचा भार सोसायचा?
कसला भार?
मिताली काय बोलते तू हे?
आदेश चे सुध्दा हेच म्हणणे आहे आई?
तो तुम्हाला बोलत नाही. पण मनात तेच आहे.
तुम्हाला काकु जड होते का?
तसे नाही आई!
पण आपल्या मागेही आपले व्याप आहेत.
ठीक आहे!
रात्री आदेश आल्यावर बोलते.
काकु तासनतास देवपूजा करायच्या.
मिताली मनात म्हणायची, काय उपयोग त्या पूजेचा?
स्वतःचा मुलगा आईला सांभाळू शकत नाही.
पण काही असो, काकूंचा स्वभाव खूप चांगला आहे. माझा तसा परिचय कमीच. पण आई भरभरून कौतुक करत असतात काकुंचे.
या अर्थी सुरेंद्र आणि मेघना च चुकीचे वागत असणार. आदिती ला सुध्दा मेघना चा स्वभाव आवडत नाही. पैश्याची हावरट नुसती.
रात्री आदेश घरी आला. सगळ्यांची जेवण आटोपली. अंतरा आदेश ची आई, मिताली आणि आदेश ला म्हणाल्या जेवल्यावर झोपायच्या आधी आमच्या रूम मध्ये या.
काकूंची रूम बाहेरच्या बाजूंनी होती. त्या तिकडे गेल्या की इकडे फिरकत सुध्दा नसत.
सगळे जेवल्यावर रूम मध्ये गेले.
आदेश आणि मिताली, मी आणि बाबांनी एक निर्णय घेतला.
कोणता?
मी ,बाबा आणि काकु आम्ही मागच्या बाजूने दोन खोल्या आहेत तिकडे राहायला जातो.
तुम्ही दोघे पुढच्या बाजूने राहा!
उगाच का तुम्ही आमचा भार सोसायचा?
आई ! काय बोलते तू हे?
मला तुमचा भार होते. हे मी आणि मिताली कधीच बोललो नाही. ते माझे कर्तव्यच आहे.
म्हणजे तुम्हाला दोघांना काकु जड झाली.
असेच ना!
पण आम्हाला नाही!
माझ्यासाठी आणि तुझ्या बाबांसाठी काकु खूप महत्वाची आहे.
आई अग पण त्यांना मुलगा आहे ना!
मग हा तुझा अट्टाहास का?
याचे कारण माझ्याकडे नाही. या उपर काही स्पष्टीकरण मी देऊ शकत नाही.
ठीक आहे आई. राहू दे काकूंना. आपण सोबत राहू. काकु साठी तुम्ही आमच्या पासून वेगळे राहणार मग माझ्यात आणि सुरेंद्र मध्ये काय फरक?
ठीक आहे!
पण पुन्हा यावर चर्चा मला चालणार नाही.
Ok बोलून सगळे झोपायला गेले.
असेच दोन महिने निघून गेले. एक दिवस अंतरा तिच्या मोठ्या जावेशी बोलत होती. तेवढ्यात आदेश आला. दार बंद होते, पण बोलण्याचा आवाज येत होता. त्याला वाटले आई आणि काकु बोलत आहे, तिकडेच जावे. तो दार वाजवणार आईचे शब्द त्याच्या कानावर पडले.
ताई ! मला वाटते आदेश ला सांगावे तो माझा नाही तर तुमचा मुलगा आहे.
कधी कधी त्याला वाटते काकु इथे येऊन राहिल्या तर मलाच त्यांना सांभाळावे लागेल.
त्याला जर कळले तो तुमचा मुलगा आहे तर त्याच्या डोक्यात असे विचार येणार नाही.
आता आताशी जरा कुरकुर करतो.
तो असे काही बोलला की मला खूप त्रास होतो.
नाही अंतरा तू त्याला काही सांगणार नाही.
तुला माझी शपथ आहे!
ताई, खरच आता ती वेळ आली. त्याला खरे काय ते सांगायची.
नाही !
आदेश माझा मुलगा आहे हे त्याला कधीच सांगु नको!
माझी शपथ मोडू नको.
माझे जे व्हायचे ते होऊ दे.
तशीच वेळ आली तर जाईन मी गावी. राहील एका कोपऱ्यात.
तूच त्याची आई आहे आणि तेच सत्य त्याला माहित आहे.
जा तू आता, जास्त चर्चा करू नको.
भिंतीला कान असतात.
आजवरचे गुपित, गुपित राहू दे.
इतक्यात आदेश ने दार वाजवले.
त्याला समोर बघून दोघी गोंधळून गेल्या.
आदेश काकु समोर बसला.
काकु मला खर खर सांग. मी कोण आहे?
म्हणजे?
नाही कळले?
मुद्द्याचे बोलतो!
मी नेमका कोणाचा मुलगा आहे?
अरे तू अंतरा आणि अविनाश भाऊजी चा मुलगा आमचा लाडका आदेश.
तुला का शंका आली?
अंतरा चे आणि अविनाश भाऊजी चे तुझ्यावर प्रेम नाही का?
तुला असे प्रश्नच कसे पडतात रे?
नाही काकु !
तु खोटं बोलते.
नाही रे राजा!
मग त्याची आई म्हणाली, बस मी सांगते.
आमच्या लग्नाला बरीच वर्ष झाली, पण बाळ होत नव्हते. आमचे दोघांचे रिपोर्ट पण नॉर्मल होते.
तुझी आजी तुझ्या बाबांना म्हणायची हिला सोडून दे. दुसरे लग्न कर. तर बाबा तयार नव्हते. रोज यावरून भांडणे होत होती.
मग बाबा म्हणाले, मी एखाद मुलं दत्तक घेतो. पण बायको सोडणार नाही. तेव्हा आजीने पुन्हा आकांडतांडव केला.
तो तुझा अंश असणार का?
कोणाचेही पोर मी या घरात येऊ देणार नाही?
घराचं घरपणच संपल होत.
तेवढ्यात काकूंना दुसऱ्या बाळाची चाहूल लागली.
तशी काकु माझ्याकडे आली, म्हणाली अंतरा मला दुसरे बाळ होणार.
ताई खूप खूप अभिनंदन.
अभिनंदन तुझे अंतरा.
हो ताई!
मी पण काकु होणार!
नाही यावेळी तू आई होणार!
म्हणजे?
माझी अशी इच्छा आहे हे बाळ जन्म झाल्या बरोबर मी तुझ्या ओटीत घालते.
काय!
हो अंतरा!
मला खात्री आहे तू त्याला खूप प्रेम आणि संस्कार देशील.
बोल तू तयार आहेस का?
ताई मी तयार आहे, पण आई?
तु तयार आहेस ना!
बाकी मी बघते !
मला खूप आनंद झाला.
लगेच सगळे घरात असताना त्यांनी सगळ्यांसमोर हा निर्णय सांगितला.
दुसऱ्या कुणाचे , त्या पेक्षा घरचेच म्हणून आजी खुश झाल्या.
काकुकडे मीआता विशेष लक्ष देऊ लागली.
आम्ही दोघीच असलो की मी ताईच्या पोटाला कान लावून तुझ्याशी गप्पा मारायची.
म्हणायची, बाळा ही "देवकी". पण मी नक्की "यशोदा" होईल. तुझ्यासाठी, तुझ्या सुखासाठी वाटेल ते करू.
तु लगेच जोरजोरात हालचाल करायचा.
तेव्हा मी म्हणायचे या देवकीला कधी अंतर द्यायचे नाही. शेवटी ती जन्मदात्री आहे. तु अजुन जोरात हालचाल करायचा. जणू म्हणायचा.
मी माझ्या दोन्ही आईचा सन्मान करेन.
दिवस भरले, तुझा जन्म झाला.
ताईने तुला न बघताच माझ्या ओटीत घातले.
एकत्र असताना तुझे लाड, हट्ट सगळे पुरवले. पण मुलगा म्हणून नाही तर पुतण्या म्हणून.
तुला माझ्या ओटीत घातले आणि स्वतःची नाळ मुलगा म्हणून तुझ्यापासून कायमची कापून टाकली.
लोक मला वांझोटी म्हणायचे. हे शब्द कानावर पडले की माझ्यापेक्षा ताई च जास्त दुःखी व्हायच्या.
मला सवय झाली होती असे टोमणे ऐकायची.
माझं दुःख कमी करण्यासाठी देवकी ने आपला कृष्ण या यशोदेच्या ओटीत घातला.
मी तुझी आई नाही रे बाळा. "मी तर यशोदा".
खरी आई ही, जीच्या उदरात तू वाढला. " देवकी "....
आता तूच ठरव.
"देवकी"
की
"यशोदा"
का दोन्ही?????
काकु तू ग्रेट आहेस. चुकलो मी, मला माफ कर....
आदेश ने आपले दोन्ही हात पुढे करून देवकी आणि यशोदा, म्हणजेच काकु आणि आई दोघींना मिठी मारली.

©️®️
लेखाचे सर्व हक्क लेखिकेचे आहे. कृपया लेख नावानिशी शेअर करावा. परवानगी शिवाय वाचन, अभिवाचन करू नये.

सौ.प्रभा कृष्णा निपाणे
कल्याण.