Login

मीच माझी शिल्पकार.भाग १

Self motivationl,inspiration woman story.

मीच माझी शिल्पकार.भाग १

गोड गोजिरी,
लाज लाजरी, 
ताई तू होणार नवरी!
तालासुरात गाणे गुणगुणत महेशने रसिकाच्या भोवती नाचत फेर धरला होता.
 "काय रे दादा मला नुसतं चिडवतच राहणार आहेस की माझ्या लग्नाची काही तयारी पण करणार आहेस? की असा तसाच विवाह उरकून मोकळा होणार आहेस?"

"या महेशच्या एकुलत्या एक बहिणीचा विवाह आहे माझ्या ऐपतीप्रमाणे थाटामाटातच होणार. वऱ्हाडी प्रस्थान,मंडप, आचारी, सजावटकार, पुरोहित, फुले,अक्षदा सारे काही सारेकाही वेळेच्या आधी हजर होणार आहे.आपल्या बंधू राजाने संपूर्ण तयारी लक्षपूर्वक करून घेतली आहे. आता फक्त प्रतीक्षा आहे ती भाऊजींना आमच्या भगिनीच्या गळ्यात वरमाला टाकायची ....हो"........महेश कमरेत वाकून रसिकाला उजव्या हाताने मुजरा करत म्हणाला.

रसिका त्याच्या मुजऱ्याकडे पाहून खुदकन हसली.रसिका च्या डोक्यावर हात ठेवत डोळ्यातलं पाणी लपवत महेश बोलला नेहमी अशीच हसत रहा.


आजाराचे निमित्त होऊन वडील गेल्यानंतर आईवर भार येऊ न देता स्वतःच्या कष्टाने सारे पैलून धरले होते त्याने. रसिकाला ही पित्यासारख्या मायेने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले होते तिला सुखात ठेवेल असा जकातदार साहेबांचा चिरंजीव प्रताप रसिका साठी योग्य वाटला म्हणून स्वतः विवाह योग खटपटी ने जुळवून आणला ,पण काही दिवसांवर आलेला तिचा विवाह,आणि त्यामुळे बहिणीच्या होणाऱ्या विरहाने हळवा झाला.

रसिका उत्साही आणि महत्त्वाकांक्षी विचारांची,हरहुन्नरी. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेची गटप्रमुख अगदी लिलया सांभाळणारी,सर्वांना मदत करणारी, यथायोग्य मार्गदर्शन करणारीे त्यामुळे तिच्या आसपास लहान-मोठ्या मैत्रिणींना त्याचबरोबर प्राध्यापकांनाही तिचा आदरपूर्वक अभिमान होता.एकदा का रसिकावर जबाबदारी सोडली किती निश्चिंत यशस्वीपणे पार पडेल याची खात्री सगळ्यांना असायचीे. प्रत्येकाच्या डोळ्यात भविष्यातील यशस्वी रसिका तरळायची.पण आपल्या बद्दलचे आसपासच्या लोकांचे विचार, गृहीतके सगळेच सत्यात येतात असे होत नाही कारण सत्य साकारणारे व्यक्ती भिन्न असते.काळाच्या ओघात अथवा भोवतालच्या वातावरणात ती हरवत जाते.


रसिकाला प्रताप मनापासून आवडला होता जणू  स्वप्नातला राजकुमार तिला भेटला, नाजूक पण राजबिंडे रूपावर रसिका भाळली,त्या सोबतच सर्व काही जुळून आल्याने तिच्या मनास अनामिक हुरहुर लागली.घरातील खणखणत असलेल्या फोनच्या आवजाने भानावर आली.

हॅलो. ..." मी प्रताप जकातदार बोलतोय"
नाव ऐकताच मीना वहिनीने काही न बोलता फोन रसिका कडे दिला.
हॅलो... मी प्रताप बोलतोय"
"तू....तुम्ही का फोन केलात?दादाशी बोलायचंय का?थांबा मी बोलावते दादाला."रसिका गोंधळून बोलली.
"थांबा थांबा मला तुमच्याशीच बोलायचे आहे, उद्या मी काही कामानिमित्ताने तुमच्या शहरात येतोय.मला भेटायला येऊ शकता का?"

"हो.....म्हणजे नाही....घरी काय सांगू?
"त्याची चिंता तुम्ही नका करू मी सकळी बोलतो तुमच्या दादा सोबत.मग तर याल?रॉयल कॅफेमध्ये ठीक बारा वाजता भेटूया."
"अं हो चालेल."
"अजून एक सांगायचंय या एकाच जन्मात तुमची साथ नकोय मला तर...........…हॅलो...... हॅलो.....

"हॅलो ...हॅलो.......तुमचा आवाज येत नाही बरोबर ?"

बरं बरं ....आता फोन ठेवतो ,उद्या भेटल्यावर सविस्तर बोलूया.
फोन ठेवला आणि रसिकांच्या हृदयाचा ठोकाच चुकला उतरलेला चेहरा पाहून.मीना वहिनीने विचारलेही,
"काय हो वन्स पहिल्याच फोनमध्ये भांडलात की काय भावजिंसोबत सोबत?"

वहिनीस काहीही उत्तर न देता रसिका तिच्या अंथरुणावर जाऊन बसली.असं काय झालं असेल?रसिका गहन विचारात पडली.मी आवडले नसेल का त्यांना? मग आधीच नकार का नाही दिला त्यांनी? विवाह सोहळ्याची सगळी तयारी झाल्यावर माशी कुठे शिंकली ?हुंड्याच्या  बाबतीत असावे का? पण त्यांचे वडील तर म्हणाले होते की देवाच्या कृपेने आम्ही खाऊन पिऊन सुखी आहोत. आम्हाला फक्त गृहलक्ष्मी हवी.बाकी काही नको.
की काही दुसरे कारण असेल? रसिकाच्या मनात असंख्य प्रश्नांचे वादळ उठले. दादा वहिनी सांगावे का? आईस बोलावे का याबद्दल?सर्व बाजूंनी योग्य माणसे मिळावे म्हणून दादाने किती शोधाशोध धावपळ केली शेवटी मनासारखे स्थळ मिळाले म्हणून किती खुश आहे तो. त्याला प्रतापरावांचे बोलणे सांगितले तर कोलमडून जाईल तो.उद्या भेटून काय तो सोक्षमोक्ष लावून मग सांगणे योग्य ठरेल.चांगले बघतेच उद्या...ठरलेले लग्न मोडणे हा काय पोरखेळ वाटला का प्रतापराव जकातदारांना?अंगावर चादर घेऊन बळेेच झोपायचा प्रयत्न रसिका करत होती. पण चित्त थाऱ्यावर नसताना डोळा कसला लागतोय?


रसिकाला भेटण्यासाठी सकाळीच प्रतापरावांनी फोन करून महेश दादा कडून परवानगी घेतली.
रसिकाने साधासाच असलेला फिकट गुलाबी कुर्ता,निळ्या  रंगाची जेगिन्स त्यावर कानाशीच नाजूक मोत्याचे कानातले घातले .गळ्यातला स्टोल नीट सावरत चालतच रॉयल कॅफेत येऊन पोहोचली. सर्वत्र नजर फिरवली पण प्रतापराव काही दिसेना म्हणून एका टेबल जवळची खुर्ची ओढून वाट पहात बसली.

अवघ्या पाच दहा मिनिटात रसिकांसमोर प्रताप येऊन बसला पण रसिका विचारात एवढी गर्क होती की प्रताप आपल्यासमोर बसलाय हेही तिला कळाले नाही.
 रसिकाच्या डोळ्यासमोर प्रतापने चुटकी वाजवलीे
" हॅलो राजकुमारी कुठे हरवलात?कसला इतका गहन विचार चालू आहे?
" तुम्ही.... तुम्ही ...कधी आलात?केव्हाची वाट बघते मी."
 "मी मघशीच आलो जेव्हा तुमची विचार चिंतनात समाधी लागली होती" 
"माफ करा, माझे लक्ष नव्हते."

लग्न ठरल्यापासून दोघांची अशी भेटीची पहिलीच वेळ असल्याने दोघांना काय बोलावे सुचेनासे झाले. बोलायचे खूप होते पण शब्द फुटेनासे झाले.

रसिकाने हळूच नजर उचलून प्रतापकडे पहिले किती छान दिसतात हे,अरेच्या यांनी पन फिकट गुलाबी शर्ट आणि ब्लू जीन्स घातलीय ,त्यांच्या रूपाला छान शोभतेय.असं मनमोहक रूप पाहूनच भाळलोयआपण.पण आता काय उपयोग? मनात विचार चालू असतानाच रसिकाने पुन्हा प्रताप कडे पाहिले त्या क्षणी प्रतापने ही.... दोघांची  एक नजर झाली  आणि रसिका ओशाळली.तिने लाजून मान खाली वळवलीे.प्रतापला तीच ओशाळने समजले.

"आज काय नुसते नजरेनेच बाण सोडून घायाळ करणार आहात का?की काही बोलणार पण आहात?
"आम्ही काय बोलणार तुम्हीच म्हटले होते काल भेटल्यावर सविस्तर बोलूया."
" तुम्हाला असं तर नाही म्हणायचे की आता  मनसोक्त बोलून घ्या,लग्नानंतर तोंडास कुलूप लावून तुम्हास फक्त आमचं ऐकावे लागेल."प्रतापने विनोदात म्हटले.

"म्हणजे तुम्ही या लग्नाला तयार आहात? "रसिकाच्या प्रश्नाने प्रताप बुचकळ्यात पडला.
" मी समजलो नाही?"
"तुम्हीच तर काल फोनवर म्हणालात की या एकाच जन्मात तुझी साथ नकोय... पुढचा आवाज आला नाही  म्हणून भेटून सविस्तर बोलूयात?"
 रसिका कशाबद्दल बोलते प्रतापच्या लक्षात आले पण सरळ उत्तर देईल तो प्रताप कसला.

"हो माफ करा मला. बाबांनी मला शिक्षणासाठी दिल्लीला पाठवले तिथूनच मला एका कंपनीत ती मिळाली.मग मी तिथेच रमलो. ती मला खूप खूप आवडायची.अगदी समरसून गेलो एकमेकांत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सोबत असू आम्ही.तिकडेच राहायचा विचार होता पण घरचा व्यवसाय सांभाळायला कोणी तरी हवे म्हणून बाबांनी मला बोलावून घेतले.आमच्या बाबांची निर्णय माझ्यासाठी नेहमीच शिरसावंद्य असतो.मग आलो सर्व सोडून.पण अजूनही ओढ आहे.इकडे मन रमत नाही."

रसिकाने रागीट कटाक्षाने प्रताप कडे पाहिले.तिचे डोळे संतापाचे निखारे ओतत होते.जरा चिडूनच ती बोलू लागली  "म्हणून ठरलेले लग्न मोडायला निघालात? आणि हे आत्ता बोलताय तुम्ही?दादाने सगळी तयारी करून ठेवलीय आपल्या लग्नाची.आधी का मुग गिळून गप्प बसले होतात तेव्हा नाही आठवली का ती?तुम्हाला रमवणारी?ठरलेले लग्न मोडणे काय सागर गोट्यांचा खेळ वाटला तुम्हास?"


रसिकाचा रुद्रावतार बघून प्रताप घाबरला. शांत स्वरात म्हणाला "माझं बोलणं नीट ऐकून तरी घ्या."
"आता अजून कसले दिवे उजाडायचे राहिले...... तुमच्यासारख्याने मनमौजी वागायचे आणि आम्ही काय फक्त ऐकून घ्यायचे?मी आत्मसम्मानी आहे.मलाही माझं स्वतंत्र मत आहे.अन्याय सहन करणाऱ्यातली नाही."

"अहो ..हो.. हो.. मी काय बोललो ते नीटसे ऐकले नाही तुम्ही ?थांबा समजावतो या एकाच जन्मात तुमची साथ नकोय तर पुढील सात जन्म काय जन्मोजन्मी तुमचीच  साथ हवी आहे असे बोललो होतो मी पण मध्येच फोनचे आवजात अडचण आली आणि तुम्हास पूर्ण ऐकू आले नाही त्यामुळे हा सगळा घोळ झाला."
"बर...बर... ठीक आहे मग त्या तुम्ही रमलेल्या तिचे काय?"
"अच्छा ती होय?इथे अडले होय घोडं? मला तर काहीतरी जळाल्याचा वास येतोय,कॅफे तली कॉफी जळतेय का?"
खोडकर हसत प्रतापने रसिका कडे पाहिले.

" हो जळतेय मी.काय म्हणायचे तुम्हाला? आम्हा स्त्रियांचं असंच असतं एकदा का एखादा माणूस हृदयात बसलं ना तर ती त्यास सावलीसारखे साथ देते अन्यथा वाऱ्यालाही समोर उभी करत नाही"
"म्हणजे आम्ही आपल्या हृदया पर्यंत पोहोचलो आहे?" प्रतापने मिश्कील प्रश्न केला.
रसिकाने प्रेमळपणे रागीट कटाक्ष टाकला.

" अहो मी जरा फिरकी घेत होतो तुमची...मी रमलेली ती म्हणजे माझी नोकरी  जी मला शिक्षणानंतर लगेच मिळाली.दुसरी तिसरी कोणी नाही माझ्या आयुष्यात. पहिली आणि शेवटची एकच जी माझ्यासमोर आहे." हळूहळू रसिका चा संताप ओसरू लागला .स्वतःचेच चिडून उद्गारलेले शब्द आठवून तिला अपराधी वाटू लागले. "पण असली कसली ही थट्टा? कालच मी हे दादावहिनीला सांगितले असते तर अनर्थ घडला असता.आम्हाला मुळी बोलायचेच नाही तुमच्या सोबत"... लटक्या रागाने रसिका मान वळवून बसलीे.

प्रताप कान पकडून उभा राहात म्हणाला "चुकलं हो आमचं या पामराला माफी मिळावी राजकन्येकडून....
 "हे काय करताय आधी खुर्चीवर बसा बघू , सगळे आपल्याकडेच बघत आहेत. बघू देत इथे बसलेल्या सगळ्यांनी कधी ना कधी बायकोसमोर कान पकडले असतीलच अथवा भविष्यात कान पकडतीलही त्यात मी काय वेगळा?


रसिकाचा आत्मसन्मान आपल्याला दिसलाच असेल...कथेची सुरवात कशी वाटली आपणास?
भेटू पुन्हा.....


©
आपल्याच परिचयाच्या 
शब्द उपासक
गायत्री चौधरी.