प्रेम करते मी तुझ्यावर..

प्रेम करते मी तुझ्यावर..

प्रेम करते मी तुझ्यावर, हे सिद्ध मला करावे लागेल का? 

माझ्या प्रेमाची ग्वाही माझ्या डोळ्यातून तुला टिपता येणार नाही का? 


प्रत्येक शब्द गुंफते मी तुझ्याचसाठी, 

पण तू मात्र यापासून अनभिज्ञ राही नेहमी.. 


वाटतं कधीकधी कळतं तुला सारे, 

उगाच मला छळण्याचे करतोस बहाणे..


सांग एकदाचे खरे, 

समजूनही न समजण्याचे ढोंग झाले तुझे पुरे.. 


कारण तुझ्यासारखे स्पष्ट प्रेम व्यक्त करणे मला जमेना.. 

पण माझ्या मनातलं प्रेम तुलाही का शोधता येईना? 


सांग ना रे एकदा, मनातलं गुपित माझ्या, तुला अजून कळले नाही का? 

माझ्या कवितेचा नायक तूच आहेस, हे तुला समजले नाही का? 


कारण थकले रे मीही, मनातलं प्रेम मनातंच साठवून, कायम अबोल राहून.. 

कर ना तूच एकदा प्रयत्न, नजरेस नजर भिडवत घे माझ्या डोळ्यातले प्रेम उमजून.. 


कारण पाहताच तुला मी होते अबोल, करते मी विषयाची टाळाटाळ.. 

बोलायचे असते बरेच मनातले पण करते चर्चा वायफळ.. 


कठीण आहे का रे? तुझ्यासाठीही माझे अव्यक्त प्रेम समजून घेणे.. 

मनातलं सारं गुपित जाणून घेत मनकवडा बनणे.. 


कारण तुझ्यात मी गुंतले, तुला कळता कळेना.. 

माझ्या कवितांमध्ये दडलेलं प्रेम तुला अजूनही उमगेना? 


म्हणून वाटतं; मी तुझ्या प्रेमात आहे, कदाचित तुला कळणार नाही..

पण अव्यक्त राहून मला तुझ्या प्रेमाला मुकायचे नाही.. 


म्हणून करत आली आहे मी जगजाहीर प्रेम माझे प्रत्येक कवितेतून, 

फक्त एकदाच बघ त्या कवितेत आपल्या नात्यास साचेबद्ध करून.. 


बघ मनस्वी माझ्या कविता वाचून,  

 हळूहळू घेशील मग तू माझ्या मनातलं गुपीत सहज   ओळखून.. 


मग तुलाही दिसेल त्या कवितेच्या नायकात तू अन् नायिकेत मी, 

मग बघ लगेच येईल रुळावर आपल्या प्रेमाची गाडी.. 


✍️

✨❣️श्रावणी ❣️✨