Jan 26, 2022
नारीवादी

मी पुरेशी मजसाठी भाग 2

Read Later
मी पुरेशी मजसाठी भाग 2


मी पुरेशी मजसाठी भाग 2


"तो विदेशी गेल्यावर एकटी पडणार तु." मधुरा म्हणाली.

"अजिबात नाही. माझे छंद आणि माझी नोकरी आहे माझ्या सोबतीला आणि जास्तच कंटाळा आला तर येत जाईल तुमच्याकडे नेमाडे साहेबांना ताप द्यायला." मिश्किल हसून, अंबिका उत्तरली

"चालेल, हमखास यायचं." मधुरा अंबिकाला दुजोरा देत म्हणाली, "नेमाडे साहेबांची मज्जा घेऊ आपण मिळून."

झालं असं कि अंकुर च्या कंपनीने त्याला कंपनीच्या नवीन प्रोजेक्ट साठी एक वर्ष वॉशिंगटनला पाठवायचं ठरवलं. पण अंकुरने घरी कोणालाच न सांगता परस्पर नकार दिला. पण त्याचे कपडे नीट ठेवतांना अंबिकाच्या हातात ऑफर लेटर पडलं. अंबिकाने त्याला विचारना केली असता अंकुरने, "तुला सोडून मी कुठेच जाणार नाही." अशी सफाई दिली.

अंबिकाला हे मुळीच रुचलं नाही. आधीच ती लद्दाख ट्रिप मुळे अंकुरवर रागावलेली होती. आपल्यामुळे मुलाचं वैवाहिक आयुष्य खराब होते कि अशी भीती तिला वाटू लागली. त्यात आता करियर बद्दलही त्यानं तसंच केलं.

तेव्हा अंबिकाने त्याची चांगली कान उघडणी केली, "या दिवसा साठी एक एक पैसा जमा करून, कर्ज घेऊन तुला रोबोटिक इंजिनियर व्हायचं होतं का? रोबोट रोबोट करून माझं डोकं खाल्लं. रात्रंदिवस एक करून स्कॉलरशिप मिळवली आणि आता छान ऑफर आली आहे तर जायचं नाही म्हणतोय."

"अगं तेच ना, मागील सहा वर्ष तुला एकटं सोडून IIMA ला होतो. तेव्हा तुला झालेला त्रास अनुभवला मी. आता जेव्हा सुनेच्या हातच खायचं आणि कुटुंबा सोबत राहायचे दिवस आहेत तुझे. अशात तुला परत एकटं सोडून परदेशीं एक वर्ष जाणं !" अंकुर खुर्चीत बसून म्हणाला, "मला हे अशक्य आहे."

"काय एकटं एकटं म्हणतोय. अरे कंटाळली मी तुझी आई बनून जगायला. आता थोडं मला माझंही आयुष्य जगू दे. माझ्या मन मर्जीने राहू दे आणि तुही राहा. उगीच गोचीड सारखा मला चिकटून राहू नकोस. सकाळी नाश्ता तुला आवडणार तो, जेवण तुला रुचेल ते, टीव्ही वर कार्यक्रम तूझ्या आवडीचा, थियेटर मधे सिनेमा तुझ्या हिरोचा, अंगावर कपडे तु म्हणशील ते! गिव्ह मी अ ब्रेक अंकुर. I want to live my life & enjoy my life without any burden. Now you have gotten married. My responsibility is fulfilled. ओके तेव्हा बस कर आता माझ्या पदरचं टोक पकडून चालणं. घुसमट होते माझी. आपल्याला मुलगा आहे म्हणून कितीतरी इच्छा मारल्या मी.... अरे तुला आणि सई ला असं गुळगुळीत, लाडात बघितलं कि माझं वाया गेलेलं तारुण्य आठवतं मला. कितीही नाही म्हटलं तरीही माझ्याच सुनेवर मुलावर जळते मी. त्रास होतो रे मला. " अंबिका तोंडाला येईल ते सर्व भडभड ओकू लागली. मन म्हणत होतं,
\"बस अंबिका इतकंही दुखवू नको पोराला कि परत ढुंकून बघणार नाही तुला.\"

तर मेंदू म्हणत होता,
\"बोल, आणखी धारदार बोल. अंकुर असा सहजा सहजी तुला सोडून परदेशीं जायला तयार होणार नाही.\"

"आई... " अंकुरचे डोळे भरून आले, "तुला इतका त्रास होतोय माझ्यामुळे. आठवतं मी पाच सहा वर्षाचा असेल. बाबा कामात असल्याची सबब देऊन तुझ्याशी बोलणं टाळायचे. तेव्हा तु मला म्हणाली होतीस,
\"बाळ काहीही झालं तरीही मला एकटं ठेवून कुठे जाशील नको आणि माझ्याशी बोलणं सोडू नको.\"
आणि आता तूच म्हणतेस तु कि तुला कंटाळा आला माझा. मी म्हणजे तूझ्या डोक्यावर असलेलं बर्डन. माझी आई अशी नव्हती. तु खूप बदलली आहेस."

"काळा नुसार खूप काही बदलतं. व्यक्ती आणि वस्तू सगळंच. मग मी का नाही बदलू?" अंबिका डोळे टिपत म्हणाली, "तु ही ऑफर स्वीकार आणि सईला सोबत घेऊन जा. माझं फिरायचं मन झालं तेव्हा सांगेल तुला. तिकीट काढून देशील माझं."

अंकुर काहीच बोलला नाही. आपली आई इतकी कशी बदलली त्याला कळतंच नव्हतं. कारण लहानपणी नेहमी अंबिका त्याला,
\"जिथ जाशील, मला सोबत नेशील. मग आपण तिथं खूप खूप फिरू. धम्माल करू.\" असं म्हणायची. तिच्या मनात आताही तेच होतं. पण काळा नुसार ती हेही स्वीकारायला शिकली होती कि लग्न झालेलं मुल हे फक्त आपल्याच मालकीचं नसतं. म्हणून त्याला स्वतंत्र सोडणंच योग्य.

"आई तुला सई किंवा तिची आई काही बोलली का?" अंकुर चा लाईट लागला.

"त्यांनी कशाला मला काही बोलायला हवं अंकुर?" अंबिकाने त्याला प्रति प्रश्न केला, "अरे मी तुला मोठं केलं, पहिलं ब्रेकअप झालं आणि पिऊन पडलास तेव्हा मी घरी आणून तुझी अंघोळ केली, समुपदेशन केलं. बारावीत मित्रांसोबत चोरून दारू पार्टीचा प्लान करत होतास तेव्हा महागडी व्हिस्की आणून तुमच्या पुढ्यात ठेवली, म्हटलं प्या किती प्यायची ते. पण आधी अभ्यास करा, मोठे व्हा. मग ! तुला वाईट मुलांपासून दूर ठेवलं, तूझ्या पायावर उभं केलं आणि चार माणसात उठून दिसावं असं रुबाबदार व्यक्तीमत्व शैली तुला दिली .

तूझ्या साठी काय योग्य, काय अयोग्य हे माझ्या शिवाय आणखी कोणाला चांगल्याने कळेल?"

"पण आई, तुला इथे एकटं राहणं खूप भारी जाईल. तुही चल सोबत. तसाही तुझा प्रायव्हेट जॉब आहे. सोडला तर काही मोठं नुकसान होणार नाही." अंकुर म्हणाला.

"तु परत सुरु झालास." अंबिका खवळली, "तुला कळत का नाही. मला काही दिवस फक्त अंबिका म्हणून जगायचं आहे. मिसेस पाटील किंवा अंकुरची आई म्हणून नाही आणि अडी अडचणीचं म्हणशील तर आजकाल सगळंच ऑनलाईन ऑर्डर करता येतं. बोर झालं तर तु बनवलेली सितारा (गप्पा मारणारी रोबोट डॉल ) आहेच माझ्याशी बोलायला. आणि पांडे काकू काकाही आहेत काही इमर्जंसी आली तर. ते कळवून बोलवून घेतील तुला."

"आई पण... "

"अंकुर मला काहीही झालं तरीही तुला भेटल्या शिवाय मरणार नाही मी."

"आई !" अंकुरचा चेहरा पुरता उतरला, "परत असं बोलायचं नाही. जातो मी सईला घेऊन वॉशिंग्टनला." अंकुर म्हणाला.

अंबिकाचे डोळे डबडब भरून आले. अंकुरच्या नजरेत आपले अश्रू येऊ नये म्हणून ती पटकन पलटून म्हणाली, "चला, आता मला निश्चिन्त मनानं जगता येईल. आज मी खूप आनंदी आहे."

अंकुर आणि सई एक वर्षा साठी वॉशिंग्टनला जाणार हे ऐकून सई खूप आनंदी झाली. तर डॉक्टर नेमाडेला हायसं झालं कि आता त्यांच्या जावईचं स्टँडर्ड वाढणार. त्यांनी सईला त्यांच्या साठी वॉशिंग्टन वरून आणायच्या वस्तूंची लिस्ट किमती सहित दिली. सईने तिकडे लक्षच दिलं नाही. ती आपली पॅकिंग करण्यात व्यस्त झाली.

अंकुरचं उदासीन वागणं तिला खूप खटकलं. तो तिच्याशी हसून बोलत होता. पण ते हसू खोटं खोटं होतं हे त्या दोघांनाही समजत होतं.

ऑफिस मधे अंकुर वॉशींग्टन ला जाणार, नवीन प्रोजेक्ट वर काम करणार. त्याचं परत प्रमोशन होणार. म्हणून सहकारी त्याला पार्टी मागत होते तर कोणी कोणी \"आता लोकं कशाला परत या देशात यायचे? हे झाले आता ग्रीन कार्ड वाले, प्रवासी भारतीय कि अवासीय भारतीय म्हणतात ते \" असं म्हणून चिडवू लागले.

अंकुरला मात्र रात्र रात्र झोप येत नव्हती. आईची खरंच इच्छा आहे का आपल्याला सोडून जगायची की आपण जावं म्हणून असं करतेय ती? हा प्रश्न त्याला भांडावून सोडत होता. अन शेवटी वॉशिंगटनला जायचा दिवस उगवला. आधी फ्लाईटने पुण्यावरून दिल्लीला जायचे होते. मग दिल्ली वरून डायरेक्ट वॉशिंग्टन साठी फ्लाईट होती.

त्या रात्री सईने पहिल्यांदा अंकुरला इतकं चिंतेत बघितलं. तिला खूप भीती वाटली त्याचं काय होणार वॉशिंग्टनला गेल्यावर आणि खास म्हणजे जेव्हा त्याला कळेल कि हे सगळं आपल्या आईने अंबिकाला आपली रेकॉर्डिंग ऐकवली म्हणून झालं. बापरे ! हा नक्कीच डिवोर्स देईल आपल्याला.

तिने मनातली शंका मधुराला सांगितली.

"आई मी काय म्हणते मी अंकुरला सगळं खरं खरं सांगून देते. आता तो फक्त रागवणार. पण जायच्या आधी सांगितलं म्हणून मला माफ सुद्धा करेल."

"बापा सारखीच बावळट आहेस." मधुरा तिच्या डोक्याला हलकं मारून म्हणाली, "अंबिका काही फक्त तूझ्या साठीच नाही पाठवत आहे त्याला . तर त्याने कंपनीने दिलेली इतकी मोठी ऑफर नाकारली, यावरून तो तिच्यात अति गुंतला आहे. याची प्रचिती तिला आली. म्हणून त्याला आपल्या पासून दूर करायचा निर्णय तिने घेतला. मी तिला तुझी रेकॉर्डिंग ऐकवण्याच्या आधी तिने मला ऑफर लेटर दाखवलं. तेव्हा तिच्या मेहनतीवर पाणी फिरवू नकोस. तुही तिथे छानसा एखादा प्रोजेक्ट हाती घे. खाली डोकं ठेऊ नकोस. स्वतःला आणि त्याला सांभाळ."

अंकुर आणि सई वॉशिंग्टन ला निघून गेले. भरलेलं घर एकदम खाली झालं. मधुराने अंबिकाला काही दिवस सोबत राहायला ये म्हटलं. पण अंबिकाने नम्रपने नाकारलं.

अंकुर चं लग्न झाल्यावर खूप काही आवरायचं राहून गेलं होतं. म्हणून तिने अडगळीच्या खोलीत गेली. जुन्या खूप साऱ्या वस्तू, फोटो अल्बम तिथे ठेवलेले होते. तिने त्यातला एक अल्बम उचलला. तिच्या लग्नाचा होता तो.

कितीतरी वेळा पासून थांबवून ठेवलेल्या गंगा जमुना तिच्या डोळ्यातून वाहू लागल्या. धुळीनं माखलेल्या त्या अलबमला तिच्या आसवांनी धुवून काढलं.

"आई मला अजून शिकायचं आहे. आताच तर MBA ला ऍडमिशन केली. मला जॉब सुद्धा करायचा आहे." घरात तिच्या लग्नाची चर्चा सुरु झाली तेव्हा एकवीस वर्षाची अंबिका आईला म्हणाली.

"बाळा आता पासून मुलगा बघायला सुरवात केली तर MBA पूर्ण होई स्तोवर लग्न जुळेल तुझं." आई तिला समजावून म्हणाली.

"अगं पण त्यानं मला जॉब नाही करु दिला तर? मला नाही बा जमणार चोवीस तास घरात बसून राहणं आणि सकाळ संध्याकाळ काय बनवायचं जेवायला म्हणून विचार करत बसणं." ती लाडात आईला म्हणाली.

त्यावर आई बोलली, "अगं वेडे त्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. जेव्हा नोकरी करशील, तेव्हा म्हणशील माझी आई म्हणायची तेच खरं."

"नाही म्हणणार मी आई असं काही." अंबिका जीभ दाखवून आईला म्हणाली होती.

MBA दुसऱ्या वर्षाला असतांनाच अंबिकाचं ललित सोबत लग्न जुळलं. ललित समृद्ध घरचा. काडीचा शौक नसलेला मुलगा बघून अंबिका आणि तिच्या घरच्यांनी होकार दिला. त्यात मुलगा पुण्यात जॉब करणारा म्हणजे अंबिकाला सुद्धा काही ना काही जॉब करता येईल. त्यामुळे अंबिका लवकर माहेर सोडावं लागल्याने दुःखी असली तरीही पुण्यात राहायला जाऊ म्हणून आनंदी होती. तेव्हा मोबाईल फोन आलेले असले तरीही त्यांचा वापर आताच्या इतका जास्त केल्या जात नसे. कारण एक मिनिटचा कॉल म्हणजे दहा रुपये गेलेच समजावे. म्हणून लग्ना आधी एक दोन वेळच बोलणं झालं. त्यातही आजूबाजूला घरची सर्व मंडळी. दोघांनाही फार अवघडल्या सारखं होई.

MBA दुसऱ्या वर्षाची परीक्षा होण्या आधीच अंबिकाचं लग्न झालं. तिच्या आई बाबांनी लग्नात कशाचीच कसर ठेवली नाही.

आणि सत्यनारायण पूजेचा दिवस उगवला. पूजा झाली. ललित उठला. त्याच्या बहिणीने कुंकवाची करंडी उचलतांना जाणूनबुजून दिव्याला धक्का दिला. दिव्यातली गरम फुलवात अंबिकाच्या पायावर पडली. तिला चांगलीच आग झाली.

"सॉरी सॉरी हा वहिनी. चटका लागला का तुला?" नणंद हेमाने आपल्या भावाकडे बघत विचारलं.

अंबिकाने ही वर ललितकडे बघितलं. पण ललितने लक्ष जाऊनही लक्ष नसल्याचं दाखवलं. म्हणून तीही काहीच बोलली नाही.

"अगं सोशिक हाय पोरगी. नाजूक नार नाही." आजोळ सासूबाई म्हणाली.

"यांनी काय मी नाजूक आहे कि सोशिक आहे हे माहित करण्यासाठी जाणूनबुजून माझ्या पायावर गरम फुलवात पाडली. कशी माणसं आहेत ही?" अंबिकाच्या मनात आलं.

अंबिकाला खूप वाईट वाटलं. आज आपली पहिली रात्र, मधु चंद्राची रात्र आणि हा नवरा किती कोरडा वागला आपल्या सोबत. तिच्या पायाची अजूनही आग होत होती.

रात्री आया बाया गंमती जमती करून अंबिकाच्या हातात दुधाचा ग्लास देऊन बाहेर गेल्यावर ललितने कुर्त्याच्या खिशातून मलम काढून अंबिकाच्या पायाला लावून दिला आणि म्हणाला,

"सॉरी गं, तेव्हा सर्वां समोर मी लक्ष दिलं असतं तर, बायको येताच गुलाम झाला तिचा असं बोलले असते ते. म्हणून दुर्लक्ष केलं मी."

अंबिका स्वतः शीच विचार करु लागली, "अरे चार चौघात च तर काळजी दाखवायला हवी ना, म्हणजे समोरील लोकांना वाटेल कि हा कदर करतो हिची तेव्हा हिला त्रास न दिलेलाच बरं. पण नवराच जर इतका कोरडा वागला तर कोण कदर करणार तिची सासरी.

ते आठवून अंबिकाला आणखीच रडू आलं.

क्रमश :

असं म्हणतात कि अति सवय, अति प्रेम कुठलंच चांगलं नाही. अंबिकाला ते कळतही होतं आणि वळतही होतं म्हणूनच तिने अंकुरला आपल्या पासून दुर पाठवलं.

बोटावर मोजता येईल इतक्याच पालकांना हे जमतं. कारण आपलं मुल आपल्याला विसरून जाईल हिच त्यांची सर्वात मोठी भीती असते. अन या भीती पायीच कितीतरी आई लोकं स्वतःच आपल्या पाल्याचा संसार उध्वस्त करतात.

मला वाटतं आपण आपल्या पाल्याला त्याच्या जोडीदाराच्या सुपूर्द करून त्याच्या संसारात लुडबुड न करता दुरून फक्त लक्ष ठेवावं.

असो अंबिकाने अंकुरला दुर देशी पाठवून दिलं भरारी घेण्यासाठी. पण आता ती कशी जगणार त्याच्या शिवाय? तिचं लग्न का आणि कसं तुटलं? तिचा नवरा, अंकुरचा बाप कुठे आहे?

या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

धन्यवाद !

तळटीप : या कथेचा लेखिकेच्या परस्पर आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.

धन्यवाद !

लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : वैयक्तिक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Archana Wasatkar

HR assistant

An optimistic person. Like to express myself through writing stories, articles & poems. Thank you