Jan 26, 2022
नारीवादी

मी पुरेशी मज साठी भाग 1

Read Later
मी पुरेशी मज साठी भाग 1
कादंबरी - मी पुरेशी मजसाठी

ही कथा आहे, \"वाट्याला आलेल्या दुःखातही, सुख शोधणाऱ्या\" एका स्त्री ची,

\"ज्याला जे हवं, ते मिळो\" असं म्हणून समाधानाने विवाहित असूनही, पर स्त्री च्या प्रेमात पडलेल्या नवऱ्याला सर्व बंधनातून स्वतंत्र करणाऱ्या मुक्ताची.

ही कथा आहे आई आणि बापाची भूमिका चोखपणे निभावण्याचा प्रयत्न करत एकटीनेच मुलाला वाढवलेल्या
जिजाऊची, आई अन मुलाच्या भावस्पर्शी नात्याची.

प्रेम तर आहे पण ते आदर्श टांगणीला ठेऊन नको असलेल्या प्रेमिकेची.

ही कथा आहे या शतकातल्या चूल मूल या पलीकडे जाऊन, पुरुषांना स्पर्धा देत घराबाहेर काम करणाऱ्या नोकरदार स्त्री ची.

आपल्या नवऱ्याला नादी लावेल अशी बला समजून टोमणे मारणाऱ्या इतर सौभाग्यवती स्त्रियांकडे हसून दुर्लक्ष करत जगणाऱ्या स्वामिनीची.

ही कथा आहे सर्वांच्याच नजरेत या ना त्या कारणाने खुपणाऱ्या या युगातील स्वावलंबी स्त्री ची.

तिची प्रशंसा करण्यासाठी ती देत गेलेल्या कारणांची, तिच्या व्यक्तीमत्वापुढे झुकावं लागलेल्या या समाजाची.... ही कथा आहे तिची.... हविहवीशी वाटली तरीही मिळवणं अशक्य असलेल्या मनस्वीची !

ही कथा नवीन नाही पण वाचकाला खिळवून ठेवेल अशी नक्कीच आहे. जगण्याला एक नवीन आशय देणारी आहे.

आशा आहे तुम्हाला ही कथा कादंबरी नक्कीच आवडेल. आणि हो कथा जरी गंभीर वाटत असली तरीही हसवणारे हलके फुलके क्षणही खूप येतील आपल्या वाट्याला. तेव्हा काळजी नसावी.

वाचा तर मग....

मी पुरेशी मजसाठी - भाग पहिला

"काकू, आई कुठे बाहेर गेली आहे का?" एक वर्षा नंतर पुण्यात आईला भेटायला आलेल्या अंकुरने शेजारील श्रीमती पांडे काकूंना विचारलं. अंकुरला दारात बघताच पांडे काकूची तळपायातील आग मस्तकात गेली.

"किती वेळचा फोन लावतोय तिला. उचलत नाही आहे. आज वाढदिवस ना तिचा म्हणून बघा आवडीचा मोगऱ्याचा गजरा, पेठा आणि पिस्ता कलरचा सलवार सूट आणला आहे तिच्यासाठी. सईने सरप्राईज पार्टीही अरेंज केली आहे तिच्या साठी. पण तीच घरी नाही. तुम्हाला नक्कीच सांगितलं असेल ना तिने कुठे जातेय म्हणून. सांगा ना कुठे गेली ती?" अंकुरने परत विचारलं.

"मसणात !" साठी पार पांडे काकू जोरात कडाडल्या.

अंकुर काकुळतीने बोलला "काकू?"

"तुझ्यासारखा, बायको आली म्हणून माय ला विसरणारा मुलगा असल्यावर आणखी कुठे जाणार ती?" एव्हाना पांडे साहेबही काकू कोणावर इतकी भडकली ते बघायला बाहेर आले.

"अंकुर ?"

"काका तुम्ही तरी सांगा आई कुठे आहे ते?" अंकुरने पांडे साहेबांना विनंती केली.

"तुम्ही या नालायकाला अंबिका च्या जवळ नेलं तर बघा घरात घेणार नाही तुम्हाला मी." काकूने काकांना धमकी दिली.

ते काकूला सावरत म्हणाले, "मुलगा आहे तिचा आणि तिचा किती जीव आहे माहितेय ना याच्यात? त्या पायी तिनेच स्वतः पासुन दूर केलं तिला. हेही विसरलीस का तु? उलट मला तर वाटतंय योग्य वेळेवर आलाय अंकुर. हा जवळ असला तर लवकर बरी होईल ती."

"काका काकू, असं कोड्यात का बोलताय? काय झालं आईला? कुठे आहे ती?" आपल्या आईला काहीतरी झालं आहे हे सत्ताव्वीस वर्षाचा अंकुर समजून चुकला.

एक वर्षा आधीच सई आणि अंकुरचा प्रेम विवाह झालेला. माय लेकाची अतुट, घनिष्ठ बॉण्डिंग बघून अंकुरची कॉलेज फ्रेंड सई जाम इंप्रेस झालेली. तिला वाटलं होतं जो मुलगा त्याच्या आईची इतकी काळजी घेतो, तो बायकोला किती जपणार. आणि म्हणूनच तिच्या आई बाबाचा विरोध असूनही सईने अंकुर सोबतच लग्न करायचा हट्ट धरला.

सई एका सधन कुटुंबातील मुलगी आणि अंकुर मध्यम वर्गीय, त्यात आई व्यतिरिक्त इतर कुटुंबियांचा अता पता नाही. सईचे बाबा लग्नाला होकार द्यायला तयारच नव्हते.

अंबिकाने अंकुरला त्याला सई बद्दल नक्की काय वाटतं?

तो उत्तरला, "नितळ प्रेम. पण तुझा अपमान सहन करून मला ते नको आहे. तेव्हा त्या वाटेला आपण जाऊच नये असं मला वाटतं."

अंबिका बोलली, "एकदा प्रयत्न तर करूया. म्हणजे नंतर पस्तावा नको. सई मलाही खूप आवडली."

ती अंकुरला घेऊन नेमाडे कुटुंबाला भेटली. सईच्या आईला अंबिका समंजस आणि प्रेमळ वाटली. पण अंकुरची अंबिका बद्दल असणारी ओढही तिच्या नजरेतून सुटली नाही. पण सई म्हणाली, " कोणत्या मुलाला त्याच्या आई बद्दल ओढ नसते. बाबा तर पन्नासचे झाले तरी अजूनही आजीच्या कुशीत डोकं ठेऊन झोपायला बघतात."

राहला प्रश्न डॉक्टर नेमाडे म्हणजे सईच्या बाबांचा. तर त्यांनी सरळ अट मांडली , "या एक वर्षात अंकुरला एक तर सरकारी जॉब किंवा लाखात पगार मिळाला तर लग्न होईल नाहीतर नाही."

अंकुरच कॅम्पस सिलेक्शन टॉप च्या मल्टी नॅशनल कंपनीत झालं आणि त्यांना हिरवा कंदिल दाखवावाच लागला.

पण लग्न झालं आणि सईला आई मुलाचं जे बॉण्डिंग आवडलं होतं त्याचाच वीट आला. कारण अंबिकाने कितीही त्या दोघांना एकटं सोडायचा प्रयत्न केला तरीही अंकुर काही तिला एकटं सोडेना. आपलं लग्न झालं म्हणून आई एकटी पडू नये म्हणून काही ना काही कारण शोधून तो आईला जवळ बोलवेच नाहीतर स्वतः तिच्याकडे जाऊन बसे. नव वधू सईला राग येणं साहजिकच. पण ती काही वाईट मनाची नव्हती म्हणून काही राग न दाखवता, बोलता तिने अंकुर तिला जास्त वेळ देईल, तिला समजून घेईल याची वाट पाहायचं ठरवलं.

पण हद तेव्हा झाली जेव्हा अंबिकाने अंकुर व सई साठी हनिमून प्लॅन केला. दोघांना लद्दाखला पाठवायची तजवीज केली. पण अंकुर, अंबिका त्यांच्या सोबत लद्दाखला आली तरच तो जाईल या एका शर्ती वरच लद्दाख ला गेला. सईची खूपच तडफड झाली. पण अंकुर सोबत वाद घालून काही उपयोग नव्हता. उलट तो आई साठी आपल्यालाच सोडेल ह्याची सईला फुल्ल गॅरंटी. म्हणून लद्दाख वरून पुण्याला परत येताच ती तिच्या आई बाबाला भेटायला माहेरी गेली. कमीत कमी आई जवळ मन मोकळं करता येईल.

सई आईच्या मांडीवर डोकं ठेऊन रडत आपली कर्म कहाणी सांगत होती.

"आता रडून काय उपयोग?" तिचे बाबा (मल्टी नॅशनल बँकेचे जनरल मॅनेजर डॉक्टर नेमाडे) म्हणाले, "तुला म्हटलं होतं ना पस्तावशील त्या भिकारी मुलासोबत लग्न करून."

"अहो नेमाडे, काय हे?" सई ची आई, मधुरा त्यांना समजावून बोलली, "मुलगी आनंदात आहे आपली तिथे. फक्त अंकुरच आई प्रेम इतर मुलांपेक्षा थोडं जास्त आहे."

"थोडं जास्त, अगं अति आहे अति. हनिमूनला कोणी आईला घेऊन जातं का सोबत?" श्रीयुत नेमाडे म्हणाले. सई अजूनच रडू लागली.

"तु काय मुर्खा सारखी रडतेय? अंकुर सोबत लग्न करायचा निर्णय मला सांगितला तेव्हाच बोलली होती ना तुला मी", सईची आई तिला समजावू लागली, " अंकुर \"मम्माज बॉय \" आहे. त्या दोघांचा एकमेकांत खूप जीव आहे. आणि का नसेल अंकुरने त्याच्या आईला खूप जवळून कष्ट करतांना बघितलं आहे, तिचं एकटेपन अनुभवलं आहे. तो तिला कधीच एकटं पडू देणार नाही. तुला होकार देतांनाही त्यानं हिच अट ठेवली होती ना कि काहीही झालं तरीही सर्वात आधी आई नंतर बाकी सगळं."

"अगं हो, पण म्हणून मला कुठे माहिती होतं कि हा हनिमूनला सुद्धा आईला घेईल?" सईने उठून नाक पुसायला आईचा पदर नाका जवळ नेला.

"भिकारचोट सवय इथे नको. अकरा हजाराची साडी आहे ती, ड्रायक्लीनला दोन हजार लागतात तिला. रुमाल घे." गणित विषयात Phd असलेल्या डॉक्टर नेमाडेंच्या श्रीमुखातून बाहेर पडलं.

"बाबा!" सई चांगलीच चिडली, "इथे तुमची मुलगी रडतेय, दुःखी आहे आणि तुम्ही किती calculative बोलताय. तुम्हाला माहितेय तुमच्या अशा प्रत्येक गोष्टीत पैशाचा उल्लेख करण्याला कंटाळली आहे मी ! त्या अंकुर ची आई माझी सासूबाई भिकारी असेल पण कधीच असं बोलली नाही. म्हणून म्हणून मी अंकुर सोबत लग्न केलं. मी फक्त त्याच्याच नाही तर त्याच्या आईच्याही प्रेमात पडली. मला खूप प्रेम दिलं तिने. खूप चांगली बाई आहे ती तशी. Simple living, high thinking म्हणतात ना तशी. तुम्हाला तिच्या तळ पायाची सरही येणार नाही."

"हो ना मग का रडतेस तिच्या पायी ?" डॉक्टर नेमाडेनि प्रश्न केला.

"आई !" सईने रडत रडत परत डोकं सौं नेमाडेच्या पदरात खुपसलं आणि नाक ढर ढर पदरात मोकळं केलं.

"गेले दोन हजार." डॉक्टर नेमाडेनि विचार करून करून गुळगुळीत झालेल्या त्यांच्या टकल्यावर हात मारला.

"नेमाडे, तुम्ही जा बरं इथून, नाहीतर मी ही साडी खराब झाली म्हणून दुसरी बावीस हजाराची साडी खरेदी करेल." सईच्या आईने हुकूम सोडला.

"अरे आठवलं. उद्या एक महत्वाची मिटिंग आहे. मी तयारी करतो त्याची. तुम्ही चालु द्या तुमचं." श्रीयुत नेमाडे पैसे खर्च होतील हे ऐकून तिथून निसटले.

मधुराने सईला मन भरून रडू दिलं. मग म्हणाल्या,
"उठ, फ्रेश हो. मी ताईला मस्त पोहे आणि कॉफी बनवायला सांगते."

"आई पण माझं आणि अंकुरच काय?" सईचं डोकं अजून ठणकत होतं. तिने आईला विचारलं, "करायचं तरी काय म्हणजे अंकुर आणि मला थोडीशी प्रायव्हसी मिळेल किंवा काही दिवस एकट्याने राहायला मिळेल. त्याच्याशी किंवा अंबी आईशी भांडायचं नाही गं मला. पण असंच घडलं, तो प्रत्येक वेळी अंबि आईला आमच्यात आणत गेला तर माझा तोल जाऊन माझ्या रागाचा फुगा फुटायचा आणि मग आमचं नातं तुटलंच म्हणायचं."

यावर मधुरा तिला म्हणाली, "तु आता जे बोललीस. ते परत बोल. माझ्या फोन मध्ये रेकॉर्डिंग कर आणि निश्चिन्तपने खाऊन पिऊन घरी जा. मी करते सर्व ठीक."

"काय करणार तु?" सईने आईला परत प्रश्न केला, "तु अंकुरला प्लीज हे काही बोलू नकोस आणि अंबी आईला तर मुळीच नाही. शेवटी आई आहे ती अंकुरची. सून आपल्याला मुलापासून तोडू पाहतेय असा गैरसमज झाला तर?"

"बावळट, ती अंबी आई आहे आणि तु म्हणतेस तशी चांगल्या मनाची आहे म्हणून तिलाच ऐकवने योग्य. ती समजून जाईल. आता तु जास्त डोकं खपवू नकोस आणि शांत राहा." मधुराने सईला समजावून घरी पाठवून दिलं. रात्रीच अंबिकाला सकाळी भेटायचं आहे म्हणून मॅसेज केला.

दुसऱ्या दिवशी सईची आई (मधुरा ) आणि अंबिका सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक च्या बहाण्याने मगर पट्टाच्या इराणी कॅफेत भेटल्या. दोन मस्का बन पाव आणि मसाला चहा घेऊन पुढ्यात बसल्या. मधूराने सईची रेकॉर्डिंग अंबिकाला ऐकवली.

"मला वाटलंच होतं असं होईल." अंबिका बोलली, "मी किती म्हटलं अंकुरला मी नाही येत सोबत तरीही त्याने एक ऐकलं नाही माझं. बिचाऱ्या सईचा खूप हिरमोड झाला माझ्यामुळे. I am really sorry. पण यापुढे अशी पाळीच येणार नाही असं कारण मिळालं आहे मला."

अंबिका बोलतच होती अन मधुरा पन्नाशीत पदार्पण करत असलेल्या तरीही नितळ कांतीच्या, गहू वर्णीय अंबिकाला गोड हसून बघत होती.

"तुम्ही अशा का बघताय मला? माझ्यावर विश्वास ठेवणं कठीण वाटतंय ना? नवऱ्यानं टाकलेली, मुलाला सांभाळून नोकरी करणारी, एकटी समाजात वावरत आलेली, मी खूप manipulative कॅरेक्टरची असं वाटतंय का तुम्हाला?" अंबिकाने निरागसपने मधुराला विचारलं.

"मुळीच नाही. तसं वाटलं असतं तर माझं एकुलतं एक कोकरू तुझ्या पदरात टाकलं असतं का?" मधुरा उत्तरली.

"मग?" अंबिकाचा प्रति प्रश्न.

"मनात विचार आला कि तु इतकी मोह रहित कशी? आधी नवऱ्याला हवं त्या स्त्री जवळ जाऊ दिलं अन समाजाचा रोष पत्करला. आता मुलालाही सई साठी स्वतः पासुन दूर पाठवायचं म्हणतेस."

"कारण मला माहितीये, मी पूरेशी आहे मज साठी ." अंबिकाचे डोळे भरून आले पण तिच्या ओठांवर मात्र समाधानाचं स्मित होतं.

क्रमश :

तर आपली कथा नायिका कोण आहे आणि काय असेल आपल्या नायिकेची कथा? हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल. पण अंबिका अंकुरला सई सोबत आपल्या पासुन दूर राहायला कसं तयार करेल? त्यांनतर ती अशी अचानक कुठे गायब झाली असेल? अंकुर? त्याला अंबिका परत भेटेल का? सर्व प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा आणि हो, कसा वाटला पहिला भाग नक्कीच कमेंट करून सांगा.

तळटीप : या कथेचा लेखिकेच्या परस्पर आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.

धन्यवाद !

लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : वैयक्तिक
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Archana Wasatkar

HR assistant

An optimistic person. Like to express myself through writing stories, articles & poems. Thank you