मी पुरेशी मजसाठी भाग 11

खरंच लग्न टिकवणं ही फक्त स्त्री चीच जबाबदारी असते का? आणि पुरुषानं प्रेमिका ठेवली तरी मान्य का?


"दारू? " अंबिका अवाक होऊन म्हणाली. दारू हा शब्द ऐकताच गोंधळली. तिच्या मनात आलं मिसेस जाईने एखादा हेर तर नाही लावला मिस्टर जाई च्या मागे किंवा सेफ साईड म्हणून मिस्टर जाईने च सांगितलं यांना त्या रात्री बद्दल? म्हणजे आता आपली नौकरी नक्कीच गेली. तिचा गंभीर आणि रडवलेला चेहरा बघून मिसेस जाई सोफ्यावरून उठून तिच्या जवळ येऊन तिला म्हणाल्या,

"इतकी काय घाबरलीस? एखादी चोरी पकडल्या सारखी."

मिस्टर आनंद जाईचा चेहरा चिंतीत झाला.
त्या आणखी काही बोलणार तोच नेहा आली.
"May I come in sir?"

"Come in Neha." मिस्टर जाई म्हणाले. मग अंबिकाकडे वळून तिला बोलले,
"इथेच उभी राहणार कि काही कामही करणार आज ?"

"सॉरी सर. मी काम बघते." अंबिका पटकन केबिन च्या बाहेर गेली. तिने मनातल्या मनात नेहा ला वेळेवर आल्या बद्दल खूप धन्यवाद दिले. पण तिला समजत नव्हतं हा मुलगा इथे काय करतो. निशा च्या जागी मी लागली. याचं काम काय? ती त्याच्या कडे बघून विचार करू लागली.

"मॅम मी जिग्नेश !" तो नम्रतेने अंबिकाला म्हणाला.

"मग मी काय करू? अंबिका रागानं म्हणाली.

"काही नाही, बस मला थोडं काम शिकवा." तो म्हणाला.

"कसलं काम? मी एकटीच पुरेशी आहे इथे." अंबिका दुर्गा अवतार धारण करून म्हणाली.

"काय झालं अंबिका? का रागावतेय त्याच्यावर? "
मिस्टर जाईच्या केबिन मधून बाहेर आलेल्या नेहाने अंबिकाला विचारलं, "आई कशी आहे तुझी?"

"ती... ती ठीक आहे. पण तुम्ही याला का इथे बसवलं. मला कमी करायचा विचार आहे का सरांचा? मॅम तुम्ही प्लीज त्यांना समजवा मला खूप गरज आहे या नौकरी ची. आता यापुढे मी अजिबात खोटी बोलणार नाही आणि दारू ला तर हातही लावणार नाही." अंबिका एका दमात जे नव्हतं बोलायचं तेही बोलून गेली. नेहा ला काहीतरी गडबड वाटली. अंबिका आणखी काही बोलेल त्या आधी नेहाने तिच्या हाताला चिमटा काढला.
"मॅम...? " अंबिकाने हात चोळत प्रश्नांकित नजरेने नेहा ला बघितलं.

"इतकं पुरे इथे. बाकी माझ्या केबिन मधे गेल्यावर बोल." नेहा बोलली.

दोघीही नेहाच्या केबिन मधे जाऊन बसल्या.
"मॅम सांगा ना त्या जिग्नेश ला का तिथे बसवलं?" अंबिकाने परत विचारलं.

"अंबिका! काय हे? तु विसरलीस का? तु गरोदर आहेस. म्हणजे तु कधीही हेल्थ इशू पायी सुट्टी घेऊ शकतेस. मग आमची तारांबळ उडायची. म्हणून सरांनीच सुचवलं कि एखादा मुलगा अपॉइंट करायचा म्हणजे ताप नाही डोक्याला."

"म्हणजे खडूस टीचर ला माहितेय मी गरोदर आहे ते." अंबिका तोंडातल्या तोंडात बडबडली.

"काय म्हटलं तु?" नेहाने भुवया उंचावून विचारलं.

"काही नाही. म्हणजे मी..... मी म्हणत होते की मी अबॉर्शन करायचं ठरवलं आहे, उद्याच !" अंबिका घाबरत घाबरत उत्तरली.

"काय?" नेहा तिला समजावू लागली, "वेडी आहेस का तु? तुला माहितेय किती बायकांना लवकर मुल राहत नाही म्हणून किती त्रास सहन करावा लागतो. समाजात त्यांचं वावरणं कठीण होतं. नवरा बायकोत, घरात नेहमी वाद होतात. उदाहरण तर तूझ्या समोरच आहे आपल्या साहेबांचं. दुसरं उदाहरण त्या सारिकाचं. तिला तिन तिन ऑपरेशन करावे लागले, थेरपिज घेतल्या तेव्हा मुल झालं. त्यातही सासूबाई दुसरं मुल कधी म्हणून विचारायची. त्याने तिचा स्वभाव असा झाला आणि मी... मी मुल होत नाही म्हणून दत्तक घ्यायचं ठरवलं. त्यातही नातेवाईकांचे किती वांदे. आणि नंतर तिन चार वर्ष संस्थेत वाट बघितली तेव्हा मला मुलगी दत्तक मिळाली.

बाई तुला काही कष्ट न घेता दुसर्यांदाही मातृत्व मिळतेय तर तु नको म्हणतेय. खरंच देव पण ना ज्याला हवं त्याला देत नाही अन ज्याला किंमत नाही त्याला घे म्हणतो छप्पर फाडके."

"मॅम तसं नाही हो." नेहा चं इतकं मोठं लेक्चर ऐकून अंबिकाचा चेहरा पडला.

"मग कसं? आता नाशिक ला जायच्या तिन चार दिवसां आधी किती आनंदात मला बोलली होतीस फॅमिली कम्प्लिट होणार आहे म्हणून. मुलगी झाली तर जास्त चांगलं. मुलीचं नाव मृण्मयी ठेवेल. मी म्हटलं होतं इतकं कठीण नाव."

"बस मॅम बस !" अंबिका टेबल वर डोकं ठेऊन रडू लागली. "मी नाही ठेऊ शकत हे बाळ. मी या बाळाला तसं काहीच नाही देऊ शकणार जसा विचार केला होता. उगीच जन्म देऊन माझ्या सोबत या बाळाला संघर्षमय, बाप नावाचं छत नसलेलं आयुष्य नाही द्यायचं मला."

"अंबिका काय झालं?" नेहाने काळजीनं विचारलं. एका अनामिक भीतीने तिला गाठलं, "ललित काही बोलला का?"
"तेच ना मॅम तो काहीच नाही बोलला. तो जर काही बोलला असता तर गोष्ट इथपर्यंत पोहोचली नसती." अंबिकाने घडलेलं सगळं नेहाला सांगितलं.

"अंबिका सावर स्वतः ला. काहीही झालं तरी तु घटस्फोट घेतेय ही गोष्ट ऑफिसमधे कोणालाच कळता कामा नये. नाहीतर आजच तुझी ऑफिस मधून उचल बांगडी होईल. घटस्फोट फाईल झाल्यावर सहा महिने विचार करायला मिळतील. अजून तुमची काहीच प्रोसेस झालेली नाही. म्हणजे आपल्या हातात आणखी जवळपास एक वर्ष आहे. तेव्हा पर्यंत मी तुझ्या साठी एखादी चांगली नौकरी शोधते."

"धन्यवाद मॅम. मला माहित होतं तुम्ही समजून घेणार म्हणून." अंबिका रुमालला नाक पुसून म्हणाली.

"मी समजून घेईल गं. पण समाज नाही समजणार बरं. पावलो पावली टोचणी मारणार. तेव्हा झालंच तर परत विचार कर सर्व. कारण वाटतं तितकं सोपं नसतं एका घटस्फोट घेतलेल्या स्त्री चं जगणं." नेहा तिच्या हातावर हात ठेवून म्हणाली.

"काय बोलू?" अंबिका प्रश्नांकित झाली, "माझं आता काहीच नाही उरलं त्याच्या कडे. आणि ओढून ताणून मिळालेलं मला नको आहे. कधी तुटेल काही भरोसाच नाही."

"तेही आहेच म्हणा." नेहा थकलेल्या आवाजात म्हणाली.

"मी जाते मग सीटवर. मिसेस जाई ला शंका यायची नाही तर." अंबिका ओढणी, केस नीट करून म्हणाली.

"हो जा." नेहाच्या डोक्यात काहीतरी आलं. तिने जाणाऱ्या अंबिकाला थांबवलं "थांब अंबिका."

"काय झालं मॅम?" अंबिकाने विचारलं.

"पूर्ण ऑफिसला माहितेय तु गरोदर आहेस. तु आपण होऊन अबॉर्शन केल्याचं कळलं तर सर्वांना गॉसिप करायला विषय मिळेल. त्यापेक्षा दोन दिवस सुट्टी माग आणि सांग कि गर्भाची वाढ हवी तशी होत नाहीये म्हणून डॉक्टरने गर्भपात करायला सांगितलं आहे." नेहा अंबिकाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, "कोणतंही पाऊल उचलन्या आधी व्यवस्थित प्लॅन करायला शिक आता. तेव्हाच जीवनाचा हा प्रवास तुला एकट्याने करणं शक्य होईल."

"हो मॅम ! थँक्यू, तुम्ही नसत्या तर माझं काय झालं असतं?" अंबिका डोळ्यात पाणी आणुन म्हणाली.

"काहीच नाही रडू बाई. कारण मी नसतं तर आणखी कोणी असतं." नेहा तिच्या डोक्यावर गमतीने चापट मारून म्हणाली.

अंबिकाने बरोबर नेहाने समजावलं तसंच केलं. आईलाही तेच सांगितलं. आईचं मन मानलं नाही. शेवटी डॉक्टर नी तसं सांगितलं तेव्हा आईने जास्त हरकत घेतली नाही पण आईला काहीतरी गडबड आहे हे पक्क झालं. ती काही बोलली नाही पण अंबिका च्या हालचालीवर पूर्ण लक्ष ठेऊन होती. न राहवून तिने ललितला फोन लावला. पण त्याच्यात हिम्मतच नव्हती काही बोलायची त्यांच्याशी. म्हणून त्यानं फोन उचलला नाही.

एका दुपारी डिवोर्स नोटीस पोस्टाने अंबिका च्या घरी आली. आईनेच घेतली. त्यांचं इंग्रजी इतकं चांगलं नसलं तरीही त्यात लिहिलेला डिवोर्स नोटीस हा शब्द त्यांना समजला आणि त्यांनी लगेच अंबिकाला फोन करून घरी बोलावून घेतलं.

"काय गं आई घाईत बोलवलं. नाशिक ला सगळं ठीक आहे ना?" अंबिकाने पायातील मोजे काढत विचारलं.

"तु ठीक आहेस का सांग आधी?" आईने प्रति प्रश्न केला.

"हो मी ठीकच आहे. तुला काय झालं असं विचारायला?" अंबिका
"हे बघ." आईने अंबिकाच्या हातात नोटीस दिली, "यामुळेच गर्भपात केलास ना तु? मी खरंच खूप मूर्ख माय आहे. तूझ्या सोबत राहूनही तुझं दुःख समजून नाही आलं मला." आईचे डोळे पाणावले.

"आई !"

"तु दिल्लीची तिकिटं काढ. मला जाब विचारायचा आहे जावई बापूला. असं कस आम्हाला काही न बोलता नोटीस पाठवली त्यांनी? नवरा बायकोत वाद होत असतातच म्हणून का नोटीस पाठवते कोणी?" आई वाळलेले कपडे घडी करत म्हणाली, "मी बाबा आणि दादा दोघांना सांगते. सर्वच जाऊ तिकडे. दुसरी ठेवली कि काय देवाला माहित?"

अंबिका शांतच ! अंकुर सोबत हवेचा बॉल खेळतेय बघून आई तिच्यावर ओरडलीच, "तो ललित तूझ्या आयुष्याचा खेळ खेळतोय आणि तु काय मुलाबरोबर खेळतेय. चल बाबाला फोन लाव."

"आई काही उपयोग नाही त्याचा." अंबिका अंकुरच्या पुढ्यात अबकड चे ठोकळे जुळवायला देऊन आईला म्हणाली.

"म्हणजे?" आईने बोलली, "त्याच्या बापाला जाब द्यावा लागेल."

"आई मला माहित होतं नोटीस येईल म्हणून. खरं तर मीच म्हटलं मला घटस्फोट हवा म्हणून." अंबिकाने अखेर आईला सगळं सांगून टाकलं.

"मूर्ख आहेस तु. अगं असं कसं इतक्या सहजा सहजी सोडतेय त्याला?" आईने तिला दोन्ही खांद्याला पकडून खल खल हलवलं, "लग्नाची बायको असतांना पर स्त्री सोबत संबंध ठेवले, तिला गरोदर केलं आणि तरीही तु त्याला तसंच सोडतेय."

"मग काय करू? तमाशा करून फक्त आमच्या तिघांचंच नाही मुलांचं मानसिक आरोग्य खराब करू?" अंबिकाने विचारलं.

"निदान त्याच्या आई बापा ला तर पोराचे करतूत कळू दे त्यांच्या ! नाहीतर म्हणतील मुलीनेच शेण खाल्लं आणि नाव आमच्या मुलाचं घेतेय." आई काळजीनं म्हणाली, "हा समाज एकट्या बाईला नाही जगू देत गं अंबे. समजून घे. नाहीतर ती मयुरी म्हणाली तसं राहा इथे. कमीत कमी घटस्फोटित म्हणून डाग नाही लागणार तुझ्यावर?"

"आई माझा निर्णय झाला आहे. तु प्लीज काळजी करू नकोस. मी समजून चुकली आहे आणि तुही समज स्त्री ही मुळातच सक्षम असते. तिला कोणाचीच गरज नसते गं जगायला.
पुरुषांना तरी पावलो पावली कोणीतरी हवं असतं त्यांचं ऐकायला, त्यांचं करायला, त्यांचा राग ओढावून घ्यायला, त्यांचं मनोरंजन करायला, शैय्या सोबतीला. पण स्त्री, ती तिची पुरेशी असते तिच्या साठी. पुरुषाचं प्रेमच सुरु होतं शारीरिक आकर्षणा पासुन अन स्त्री चं अंतःकरणातून.

मला घृणा येतेय ललित ची आई. आता त्याच्या नावाचं कुंकूही कपाळी नको मला. म्हणून उगाच जिद्द करू नको. मी याबाबतीत कोणाचंच ऐकणार नाही." अंबिका बाथरूम मधे बसून रडू लागली.

आई चांगलीच विचार चक्रात अडकली. सर्व पाहुन, चौकशी करूनच लग्न लावलं मुलीचं ललित सोबत. तरीही असं का घडलं? कुठे चुकलो आपण? काहीच तर कसर सोडली नाही. भरपुर हुंडा दिला. चांगली सोय केली. येता जाता पोरीला भरल्या हातानंच पाठवलं. पहिलाच मुलगा झाला. सोन्या सारखा संसार. अजून काय हवं जिवाला? का झालं असं? इतक्या सालस मुलीच्या मागेच का असं लागलं?

आईने अंबिकाच्या बाबा आणि दादाला बोलवून घेतलं. त्यांनी अंबिकाला खूप समजावलं. पण अंबिकानं तोंडातून ब्र ही काढला नाही. मग गोष्ट तिच्या सासरी गेली. गावात दोन्ही परिवाराची आणि मध्यस्ती माणसांची मिटिंग भरली. ज्यात ज्यांच्या बद्दल मिटिंग भरली त्यातील एकही उपस्थित नव्हता. त्या दोघांना यांच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं. नातेवाईकांचंच आपलं एकमेकांना हातवारे करू करू बोलणं, उणी दुणी काढणं झालं. ललित आणि अंबिकावर आरोप प्रत्यारोप झाले, त्यांचं चारित्र्य हननही झालं. आया बायांची शिवीगाळ आणि रडारड झाली. माणसं हमरी तुमरी वर आली एकमेकांना ठोकून काढायचं तेवढं उरलं होतं.
इकडे मिटिंग वर मिटिंग सुरु होत्या. तिकडे पुण्याला फॅमिली कोर्टात ठरलेल्या दिवशी अंबिका आणि ललित हजर झाले. जजने दोघांना सहा महिने फेर विचारा साठी दिले.

क्रमश :
माझं इतर लिखाण वाचण्यासाठी माझ्या फेसबुक पेज #अर्चनाच्या_रचना_माझ्या_लेखणीतून ला लाईक आणि फॉलो नक्की करा.
धन्यवाद !

तळटीप : या कथेचा लेखिकेच्या परस्पर आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.

लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : साभार गुगल वरून

🎭 Series Post

View all