मी पुरेशी मजसाठी भाग 09

अंबिका चा ललित बद्दलचा निर्णय योग्य आहे का?

मी पुरेशी मजसाठी भाग 09

मयुरीने अंबिका ला सांगितलं,
"मी आणि ललित खूप आधी पासून ओळखतो एकमेकांना. तुझं स्थळ नसतं आलं तर आमचंच लग्न झालं असतं."

बी कॉम पदवी पर्यंत शिक्षण झाल्यावर ललित नौकरी करायला पुण्यात आला. सोबतच अकाउंटशी संबंधित एक कम्प्युटर कोर्स त्यानं जॉईन केला. तो ज्या इन्स्टिटयूट मधे कम्प्युटर कोर्स ला जायचा मयुरी ही तिथेच HR संबंधित काम्पुटर कोर्स ला यायची. हाय हॅल्लो करता करता यांची छान मैत्री झाली. मयुरी एम बी ए HR साठी तयारी करत होती. तिने ललितला एम बी ए फायनान्स करायचा सल्ला दिला. एम बी ए फायनान्स केल्यावर ललितचं प्रोफाइल अपग्रेड झालं. त्याला प्रमोशन मिळालं आणि पगारही वाढला.
"बोल मयुरी काय देऊ तुला? काय करू मी तुझ्यासाठी?" ललितने खुशी खुशीत तिला विचारलं.

"लग्न कर माझ्याशी." ती उत्तरली.

"मला काही प्रॉब्लेम नाही. तूझ्या सारखी हुशार, शिकलेली, सुशील, सुंदर आणि सर्वगुण संपन्न मुलगी मिळणे हे माझं अहो भाग्य." ललित गांभीर्याने म्हणाला, "पण तुझे बाबा 3-4 लाख रुपये हुंडा देतील का?"

"अरे ते नाही देऊ शकणार इतका हुंडा. हे तुलाही माहित आहे आणि मी म्हणते, मी आहे ना कमवायला. मी एम पी एस सी आणि इतर सरकारी जॉब साठी प्रयत्न करतेय. मला आत्मविश्वास आहे मी लवकरच परीक्षा पास होऊन सरकारी अधिकारी बनणार." मयुरी आत्मविश्वासाने म्हणाली.

"तसं झालं तर आपण लवकरच लग्न बंधनात बांधले जाऊ. पण तरीही जास्त आशा नको ठेऊस माझ्या कडून. मी आई बाबा पुढे जाऊ नाही शकत. त्यात आपली जातही वेगळी." ललितने तिला स्पष्ट सांगितलं.

अशातच ललित साठी अंबिकाचं स्थळ आलं. अंबिकाचे बाबा, भाऊ, वहिनी सरकारी कर्मचारी. अंबिका ही छान, सुंदर व शिकलेली सुशील मुलगी. नौकरी करू इच्छित असलेली.

ललित ने आई ला मयुरी बद्दल कल्पना दिली. पण तिने स्पष्ट नकार दिला. म्हणाली,
"हे बघ, माणसाने एक तर आपल्या जातीतच लग्न करावं नाहीतर धनाढ्य घरी ! तु म्हणतोस ती मुलगी या दोन्हीतही बसत नाही. मग कशाला त्रास करून घेतोय स्वतः ला आणि आम्हालाही. तुझे बाबा तर माहित आहेत ना कसे आहेत. तु असं काही केलं तर सर्वात आधी मलाच धारेवर धरतील. तसाच तर माझा आणि माझ्या माहेर च्यांचा उठता बसता उध्दार करत असतात. नंतर तर मला सुखाने एक घास खाऊ नाही देतील ते. म्हणून म्हणतेय विसर त्या मुलीला आणि अंबिका सोबत लग्न कर. आपल्याला हवी तशीच मुलगी आहे आणि हुंडाही चांगला मिळेल, सासरा येता जाता पोरीला भरल्या हातानेच पाठवणार. म्हणून तुलाही पुढे इतका त्रास जाणार नाही."

ललित खाली मान घालून शांतच बसलेला बघून आईने परत विचारलं, "काय म्हणतो?"

"ठीक आहे आई. मी तुझ्या शब्दा बाहेर नाही जाणार." ललितने आईला शब्द दिला. त्यालाही वाटलं प्रेम जरी विचार करून जडत नसलं तरीही लग्न विचार करूनच करावं.

मयुरी ला जेव्हा कळलं कि ललितने तिच्या ऐवजी पैशाला निवडलं तिने त्याला खूप पैसा कमवून दाखवायचं ठरवलं. सरकारी नौकरी मिळवण्यासाठी ती जिद्दीने अभ्यास करू लागली. ती दिल्लीला RBI बँक मधे ऍडमिन ऑफिसर म्हणून लागली.

ललित सरकारी PSU त नौकरी लागल्यावर दिल्लीला गेला असता ऑफिशीयल कामा निमित्त त्याचं बँकेत जाणं झालं आणि तिथे त्याची मयुरी सोबत भेट झाली. ती तर वाटच बघत होती त्याची परत भेट व्हायची. दोघांनी एकमेकांची जुजबी विचारपूस केली.

"अभिनंदन इतकी छान पोस्ट मिळाल्या बद्दल." ललित मयुरी ला म्हणाला.

"धन्यवाद !" मयुरी

"एखादा छान मुलगा बघून लग्न कर आता." तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसलं नाही म्हणून तो म्हणाला.

"तु करशील माझ्याशी लग्न !" तिने विचारलं.

"आता गंम्मत नको उडवू माझी. तुझ्या समोर तर मुलांची रांग लागेल तुझ्याशी लग्न करायला." तो नाराजीनं म्हणाला.

"पण त्या रांगेत तु नसशील ना." मयुरी त्याच्या जवळ येऊन म्हणाली, "तु इतकी घाई नव्हती करायला हवी होती लग्नाची. नाहीतर आज आपण दोघं... "

मयुरीच्या केबिनच्या दारावर कोणीतरी टकटक केलं.
"May I come in mam?"

ललित खुर्चीतुन उठून तिला म्हणाला, "मी जातो. सी यु !"

"I will wait for you." ती त्याच्या हातात तिचं व्हिजीटींग कार्ड देऊन म्हणाली.

त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. तिचा लाखात येणारा पगार, पॉश एरियात तिने घेतलेला फ्लॅट, तिचं उंची राहणीमान पाहता अंबिका तिच्या समोर त्याला अगदी गबाळ वाटु लागली. आपल्या आईचं ऐकून उगीच अंबिका सोबत लग्न केलं असं त्याला सारखं वाटे. ते तो मयुरी ला बोलूनही दाखवी.

"मला अजूनही तूच हवा आहेस." एका रात्री बाहेर हॉटेलात जेवतांना मयुरी त्याला म्हणाली, "नाहीतरी तु इथे एकटाच राहतोस. आपण सोबत राहु माझ्या फ्लॅटवर, नवरा बायको म्हणून."

त्यालाही नाही म्हणवलं नाही. दोघेही सोबत नवरा बायको प्रमाणे राहू लागले. सर्व ठीक होतं. पण मयुरीला दिवस गेले. येणाऱ्या बाळा साठी, त्याला बापाचं नाव देता यावं म्हणून मयुरीने ललित ला अंबिका शी बोलून तिच्या कडून बॉण्ड पेपर वर सही घेऊन तिची, मयुरी आणि ललित च्या नात्यावर हरकत नसल्याचं प्रमाणपत्र बनवून घ्यायला तगादा लावला.

खरं तर त्या बद्दल बोलण्या साठीच ललित पुण्यात थांबला होता. पण अंबिका च्या लाघवी रूपा समोर काहीच बोलू शकला नाही.

"मला माहित आहे तुला खूप आघात बसला असेल, ललितने तुझा विश्वासघात केल्यासारखं वाटत असेल." मयुरी अंबिकाला स्वतः च्या पोटावर हात ठेऊन म्हणाली, "प्लीज ललित ला माफ कर. माझ्या पोटातील बाळा साठी तरी."

अंबिका ला वाटलं सांगावं मयुरीला कि बाळ तर तिच्याही पोटात आहे, त्याचं काय? पण ती आज पार थिजली होती. जमिनीत रुजून परत उगवण्याची वाट बघत होती.

"हे बघ आम्ही दोघेही अंकुरचं सगळं करू. तुला आणि त्याला कशाचीच कमतरता भासू नाही देऊ. तु फक्त आमच्या ऑफिस मधे जाऊन उगीच तमाशा करू नकोस आणि बॉण्ड पेपर वर लिहुन दे कि तुझी आमच्या नात्यावर काहीच हरकत नाही." मयुरी एका दमात बोलून गेली.

अंबिका ला तिच्याच विचारात गुंग असल्याच बघून पाणी पिऊन ती परत बोलू लागली,
"वाटलंच तर तुला एकटं वाटु नये म्हणून मी ललित ला दर महिन्यात पुण्याला पाठवत जाईल. बघ मी माझं प्रेम तुझ्या सोबत वाटायला तयार आहे. आणखी काय हवं तुला? आता तर हो म्हण." मयुरी ने तिला कळवळून विनंती केली.

"मी तशी खूप समजदार आहे. ऐकून घेते, सोशिक आहे. पण नवरा बायकोच्या नात्याच्या बाबतीत खूपच स्वार्थी आहे. मला माझा नवरा वाटता येणार नाही." अंबिका बोलली.

"म्हणजे तु बॉण्ड वर सही करणार नाहीस?" मयुरीने रागाने विचारलं.

"नाही. मला असं अर्ध अधुरं नातं नको आहे ललित सोबत. मी त्याला घटस्फोट देईल. त्यांना घटस्फोट चे पेपर तयार करायला सांग आणि पाठव मला. मी सही करून देईल." अंबिका खुर्चीतुन उठून म्हणाली,
"टेंशन घेऊ नकोस. मी तुमच्या ऑफिस मधे कधीच पाय ठेवणार नाही. काळजी घे."

अंबिका दारातून पाय बाहेर ठेवणार तोच ललित आला, "वा अंबिका ! इतकी घाई मला घटस्फोट द्यायची? तुही कोणीतरी शोधून ठेवला वाटतं पुण्याला माझ्या पाठी मागे." ललित तिला म्हणाला, "कमीत कमी अंकुरचा तरी विचार कर."

"प्रत्येकाला आपल्या सारखंच समजू नये मिस्टर ललित. मी एकटीच माझ्यासाठी पुरेशी आहे.

तसं तर तुम्ही जसे वागलात माझ्याशी, मी तुम्हाला कशाचंच स्पष्टीकरण द्यायला नको. पण तुमच्या मेंदूला शांतता मिळावी म्हणून देतेय. तुम्ही आता मृगजळ आहे आमच्या साठी. म्हणून खोटी आशा लावून काय उपयोग? बाकी अंकुरचा विचार करूनच घटस्फोट घ्यायचा विचार पक्का केला आहे मी. तो जसा जसा मोठा होईल, तसं त्याला बापाची ओढ जास्त लागेल. तो तुमच्या सोबत बोलायचा, राहायचा हट्ट करेल. जे तुमच्यासाठी अशक्य असेल. मला विचारेल, बाबा आपल्या सोबत का नाही राहत? मी काय उत्तर देणार त्याला? खोटं सांगितलं तर तो विश्वास करणार नाही. खरं सांगितलं तर आयुष्यभर तुमचा राग करेल आणि स्वतः चं रक्त जाळेल. त्यातून त्याला येणारे नैराश्य मी सहन नाही करू शकणार आणि तुमचा राग राग करेल, तुम्हाला, मयुरी ला, तुमच्या बाळाला शिव्या श्राप देईल, मी ती बनेल जी मला कधीच बनायचं नव्हतं. आपसूकच आपल्यात वाद वाढतील. कदाचित आपण एकमेकांचे कट्टर शत्रू बनू. एकमेकांना कोर्टात खेचू. आपल्या तिघांचंच नाही तर आपल्या मुलांचं आयुष्यही नरक होईल. त्यापेक्षा आताच तुम्हाला आमच्या आयुष्यातुन दूर केलेलं बरं. म्हणजे मला तुमच्या कडून काहीच आशा राहणार नाही आणि अंकुर ला कधी बापाची ओढ काय असते हेच समजणार नाही." अंबिकाने गळ्यातले मंगळसूत्र त्याच्या हातात ठेवत स्पष्टीकरण दिलं.

"अगं पण आपल्या आई बापाचं काय? त्यांना काय स्पष्टीकरण देणार तु?" ललितने तिला विचारलं.

"स्वतः ला किती कम्फर्टेबल ठेवणार मिस्टर ललित?" अंबिका मिश्किल हसली, "माझ्या आई बाबांना मी बघून घेईल. राहली गोष्ट तुमच्या आई बाबाची तर आता पर्यंत इतकं लक्षात आलंय माझ्या की लाखात कमावती सून मिळतेय हे कळल्यावर तुमच्या घरच्यांना आपल्या घटस्फोटाचं दुःख अजिबात होणार नाही. कटू आहे पण सत्य आहे राव." अंबिकाने डोळ्यात आलेलं पाणी ओढणीनं टिपलं आणि फ्लॅट बाहेर पडली.

"ठीक आहे तेच बरं होईल. मग तुला काय काय हवं ते आताच सांग. पेपर बनवल्यावर उगाच हे नाही दिलं ते नाही दिलं असं करायला वेळ घालवण्यात अर्थ नाही." ललित म्हणाला.

"मला नको हो काहीच तुमच्या कडून. जितकं दिलं तितकं पुरे. विचारल्या बद्दल धन्यवाद." मागे न पाहताच बोलली, "घटस्फोट चे कागद लवकरात लवकर पाठवा."

"अंबिका" मयुरीने आवाज दिला. तसं अंबिका च्या मनात धस्स झालं. आता ही काय बोलेल? अंबिका वरून जरी संयम दाखवत असली तरी आतून ती पार कोलमडली होती. तिला लवकरात लवकर तिथून, त्या सोसायटी मधून, त्या शहरातून बाहेर पडायचं होतं.

"मी तुझी जन्मभर ऋणी राहणार. हे तुझं सामान तु विसरलीस." ललित साठी अंबिकाने आणलेल्या भेटवस्तू तिला परत देत मयुरी म्हणाली.

अंबिका त्या वस्तू घेऊन काहीच न बोलता आसू पुसत, गळ्याशी आलेला आवंढा गिळत पुढे चालू लागली. संध्याकाळ झाली होती. तिला रस्त्याच्या कडेला एक गरीब, कितीतरी ठिकाणी ठिगळं लावलेला, तरीही छिद्र दिसणारा कोट घातलेला म्हातारा हसून बागडुन त्याच्या आठ दहा वर्षाच्या नातवाला घास भरवंतांना दिसला. त्यांना बघत ती तिथंच थबकली.

"तुमको भी खाना है? पर अब एक दो निवाला ही बचा है | कोई ना खालो|" तिचा केविलवाणा चेहरा बघून म्हातारा आपुलकीने म्हणाला.

"मेरी भूक मर गई है बाबा |" ती म्हणाली.

"तो कुछ परेशानी है |" त्या म्हाताऱ्याने विचारलं.

"हा | मेरे पास ये कुछ सामान है | इसका मुझे कोई काम नहीं| फिर भी इसका बोझ ढो रही हूँ | आपको देखा तो सोचा आपके काम आयेगा |" अंबिकाने ब्लेझर, घड्याळ, टाय, बेल्ट सर्व वस्तू म्हाताऱ्याला दाखवल्या.

"ये तो बहोत महंगा दिख रहा है |" म्हातारा त्या वस्तू बघून म्हणाला.

"दीदी ये तो बहुत सुंदर है | दादा मै ये सब पहनुगा |" नातू आनंदी होऊन उड्या मारू लागला.

"हाँ बेटा आपको देखकर ही मै इधर खिंची चली आयी | आप रख लो ये सब|" अंबिका त्या मुलाच्या डोकयावर हात ठेऊन म्हणाली.

"लेकिन मै इसके बदले तुम्हे कुछ नहीं दे सकता बेटी |" म्हातारा म्हणाला.

"बाबा बस दुआ किजीये मेरे लिये की मै आनेवाले कल का सामना कर सकू |" इतकं म्हणून अंबिका आसू पुसत पुढे चालू लागली. तिची तहान भूक हरपली. तिला पुण्याला जाऊन अंकुरला छातीशी लावून खूप खूप रडायचं मन होत होतं.

बस स्टॉपवर उभी राहून रेल्वे स्टेशन ला जाण्यासाठी बस किंवा ऑटो शोधू लागली. तोच तिच्या चेहऱ्यावर एका चारचाकी गाडीने फ्लॅश मारला अन ती जागेवरच थांबली.

क्रमश :

कसं असेल अंबिकाचं पुढील आयुष्य? कोण असेल त्या गाडीत? ती खरंच घटस्फोट घेईल का? तिच्या आई बाबाचं काय रियॅक्शन असेल? ती समाज काय म्हणेल? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्कीच वाचा.

धन्यवाद !

तळटीप : या कथेचा लेखिकेच्या परस्पर आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.

लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : गुगल वरून

🎭 Series Post

View all