मी पुरेशी मजसाठी भाग 38

अंबिका आणि मिस्टर आनंद जाई वाचेल का या प्रसंगातून?


मिस्टर आनंद जाईच्या अपघाताची बातमी वाचून अंबिकाला राहवलं नाही. तिने नेहाला कॉल करून त्यांच्या बद्दल विचारलं.

"हॅल्लो !" नेहा पलिकडून बोलली.

"नेहा मॅम बोलत आहेत ना?" अंबिकाने विचारलं.

"हो गं बाई. आवाज बसलाय माझा. कशी आहेस?" नेहाने तिला विचारलं.

"सर कसे आहेत? कोणत्या दवाखान्यात भर्ती आहेत?" अंबिकाने उलट प्रश्न विचारला.

"बरे आहेत, सिटी हॉस्पिटल मधे." नेहाने सांगितलं. पुढे ती आणखी काही बोलत होती. पण अंबिकाला ते ऐकण्यात काहीच रस नव्हता.

"मॅम मी बोलते नंतर तुमच्याशी. किंवा हॉस्पिटलला या ना तुम्ही. सरांना बघायला मदत होईल मला." अंबिका मनोमन स्वतःला धीराने घ्यायला समजावत म्हणाली.

"येतेय मी. पोहच दहा पर्यंत." त्या म्हणाल्या, "तशी मी वाटच बघत होती तुझ्या कॉल ची."

"मी येतेय." इतकंच बोलून अंबिकाने फोन ठेवला.

होईल त्या स्पीडने आवरून ती सिटी हॉस्पिटलला पोहोचली. नेहाही आलेली. वयाची साठी ओलांडलेली आणि जवळपास पूर्णच केस पांढरे झालेली नेहा आधी अंबिकाला ओळखूच आली नाही. दोघी आत शिरत होत्या तोच काहीतरी आठवून अंबिका ने नेहाचा हात दाबला.

"काय झालं?" नेहाने विचारलं.

"मला समिधा बद्दल माहित आहे आणि आम्ही ओळखतो एकमेकींना. पण तिला माझ्या भूतकाळा बद्दल अजिबात कल्पना नाही." अंबिका.

"काय तु समिधा ला भेटली आहेस. पण कसं काय? मिसेस जाईला माहित आहे?" नेहाने आश्चर्याने विचारलं.

"हो, मिसेस जाईला माहित आहे हे. कसं? काय? ते मी सांगेल आरामात. आधी फक्त इतकं लक्षात घ्या. तिला मी तिची जन्मदात्री आई आहे हे माहित व्हायला नको. तेव्हा प्लिज काही बोलू नका तसलं." अंबिका.

"ठीक आहे. मला मिसेस जाईची भीती वाटतेय पण घेऊ सांभाळून." नेहा बोलली.

दोघीही आत गेल्या. नेहाने व्हिजिटर्स फॉर्म भरला. मिस्टर आनंद जाई ऑपरेशन थियेटर मधे होते. त्यांच्या गालावर चांगला मार बसलेला. हाड टिचलेलं. त्याची प्लास्टिक सर्जरी सुरु होती.

समिधाला घरी फ्रेश व्हायला पाठवून दिलेलं होतं तर मिसेस जाई आणि त्यांची असिस्टंट ऑपरेशन थियेटर समोर खुर्चीत बसून होते. हे सर्व बघून अंबिकाला विस वर्ष पूर्वी तिला वाचवतांना स्वतः वर घेतलेला वार आणि त्या नंतर त्यांचं कोमात जाणं वगैरे आठवलं.

"मॅम, गुड मॉर्निंग." नेहा मिसेस जाईला म्हणाली, "मी थांबते इथे. तुम्ही कॅन्टीन मधे जाऊन या प्लीज."

"इच्छा नाही गं कशाचीच." मिसेस जाई थकलेल्या सुरात म्हणाल्या, "काही ना काही सुरूच आहे बघ आनंद मागे भारतात परतलो तेव्हापासून. मी म्हटलं होतं, जाऊ दे ती जमीन किंवा संजय बघत होता सगळं. पण ऐकायला तयारच नाही. आता बघ काय झालं ते."

"आपल्या हातात नसतात काही गोष्टी. पण तुम्ही तरी तब्येतीला सांभाळायला हवं ना तुमच्या. कि सर ठीक होताच तुम्हाला भरती व्हायचं आहे?" नेहा मिसेस जाईला लाडाने रागवत म्हणाली.

"जाते बाई मी. रागावू नको." मिसेस जाई कॅन्टीन कडे गेल्या. तसं नेहाने रिसेप्शन वर तिच्या फोन ची वाट बघत असलेल्या अंबिकाला बोलवून घेतलं. ऑपरेशन होऊन मिस्टर आनंद जाईला त्यांच्या रूम मधे नेण्यात आलं.

त्यांचा अर्धा चेहरा बँडेजने झाकलेला बघून अंबिकाला रडू आलं. तिला \"तुला पाहते रे\" च्या काही ओळी आठवल्या.

हाक देता तुला, साद जाते मला
वेगळे प्रेम हे, वेगळा सोहळा
कोण जाणे जीवनाचा खेळ आहे हा कसा
चेहराही तूच माझा, तूच माझा आरसा
तुला पाहते रे, तुला पाहते रे !

"अंबिका, आता जा तु. मिसेस जाई केव्हाही येतील. तुला बघितलं तर खूप तांडव करतील आणि परत कधीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत." नेहा, मिस्टर आनंद जाईला एकटक बघत असलेल्या अंबिकाला म्हणाली. ती मात्र किंचितही जागेवरून हलली नाही. हे बघून नेहा तिचा हात पकडून तिला दवाखान्याच्या बाहेर घेऊन गेली.

"मॅम कशी विवंचना आहे ना. दोन क्षणही त्यांच्या जवळ बसून त्यांना बघू नाही शकत मी, त्यांचा हात हातात घेऊ नाही शकत. इतकं कोणतं मोठं पाप केलं मी?" अंबिका रडत नेहाला बोलली.

"माझ्या कडून झालं तर तेही करेल मी. पण आता जा तु. ऑफिसची अर्धी मंडळी तुला ओळखते आणि त्यांच्या समोर तु व समिधा आमने सामने आल्या तर खूप त्रास होईल सर्वांना. म्हणून प्लीज जा अंबिका." नेहा अंबिकाला हॉस्पिटलच्या दारात सोडून आली.

अंबिका जड पावलाने टॅक्सीत जाऊन बसली. तिला खूप रडावंस वाटत होतं. नेहाने जरी तिला, मिस्टर आनंद जाई धोक्या बाहेर आहे असं सांगितलं होतं तरी तिने डॉक्टरला बोलतांना ऐकलं होतं, "मिस्टर आनंद जाईच्या मणक्याचेही ऑपरेशन करावे लागणार आणि ते जरा रिस्कीच आहे.

आयुष्यातून खूप महत्वाचं कोणीतरी जातंय असं सारखं तिला वाटत होतं. ती तासन तास एकाच जागी बसून एकटक कुठेतरी शून्यात बघत राहायची. फोनलाही ती हो नाही पेक्षा जास्त उत्तर देत नव्हती. ऑफिस मधून रजा घेतली होती. कोणी तिला भेटायला घरी आलं तर त्याला,

"मला ठीक वाटत नाही, एकांत हवा आहे." असं सांगून पाठवून द्यायची. अंबिका खूप तणावात गेली. तिची तहान भूक हरपली. तिला दिवस रात्र कशाचंच भान उरलं नव्हतं. पांडे काकूला तिची अवस्था बघवल्या जात नव्हती. त्यांना तिच्या भूतकाळातील मिस्टर आनंद जाई नावाच्या चॅप्टर बद्दल काहीच माहिती नव्हती. त्यामुळे हे सर्व अंकुर तिला एकटं टाकून गेला म्हणूनच झालं असं वाटत होतं. त्या सतत अंकुरला दोष द्यायच्या. कारण त्यांची मुलंही शिकायला म्हणून परदेशीं गेली ती दहा बारा वर्ष होऊनही मायदेशी परतली तर नाहीच पन साधं त्यांची भेट घ्यायला वर्षातून एकदा तरी यावं असं त्यांना वाटत नव्हतं. दोन तिन वर्षातून एखाद वेळी आलेच तर जुन्या मित्र मंडळीत रमायचे कारण पांडे काकू सतत त्यांच्या मागे तगादा लावायच्या,
"आता आपल्या देशातच राहा. आपली मायभूमी ही आपलीच असते आणि परदेश ते परदेशच."

शेवटी एक दिवस त्यांना त्यांच्या मुलांनी सरळ सांगून दिलं, "आम्हाला ग्रीन कार्ड मिळालं आहे म्हणून आम्ही आता तिथलेच नागरिक. हा आमचा देश नाही. तुम्हाला आम्ही हवे असणार तर या इकडे."

त्यांच्यातील जनरेशन गॅप रुंदावली आणि तेव्हापासून पांडे काका काकूनी आस सोडली मुलांची. दोघेही आपापल्या नौकरीतून निवृत्त झालेले, घरदार, बँक बॅलन्स सगळंच व्यवस्थित. स्वतःला सामाजिक कार्यात आणि मित्र मंडळीत गुंतवून घेतलं त्यांनी.

अंबिका जाई कन्स्ट्रक्शन सोडून पांडे काकूच्या शेजारी इकडे राहायला आली आणि त्यांना तिच्या रूपात मुलगी मिळाली तर अंबिकाला आई बाबा मिळाले.

पांडे काका सोबत मिळून काकू आपल्या परीने अंबिकाला हसवायचा, बोलतं करायचा प्रयत्न करत होत्या. सोबतच जेवत होत्या. पण अंबिका तितक्या पुरतं चेहऱ्यावर हसू आने.

एका दिवशी त्या असंच अंबिकाला संध्याकाळी जेवायला बोलवायला गेल्या. ती दार उघडायला उठली. सकाळपासून तिला छातीत कसं तरीच होत होतं. तिला वाटलं होतं ऍसिडिटी झाली असेल म्हणून तिने ऍसिडिटीची गोळीही घेतली होती. तिला खूप थकवा जाणवत होता.

अंबिका दार का उघडत नाहीये म्हणून पांडे काकूचा जीव घाबरू लागला. त्यांनी दार आणखी जोरात वाजवलं. आवाज ऐकून आजूबाजूला राहणारी मंडळी बघायला आली. अंबिका कशीतरी दारात पोहोचली आणि लॅच उघडलं. पण तिच्या डोळ्यांपुढे अंधारी आली आणि ती दारातच पडली.

सर्वांनी तिला उचलून गाडीत ठेवलं आणि दवाखान्यात नेलं. डॉक्टरने तिला तपासताच तिला मायनर हार्ट अटॅक आल्याचं निदान केलं. तिच्यावर उपचार सुरु झाले पण ती कशालाच रिस्पॉन्स देईना. पांडे काकूची हालत रडून रडून बेजार झाली म्हणून शेजाऱ्यांनी त्यांना घेऊन पांडे काकाला घरी परत पाठवलं.

धन्यवाद !

तळटीप :
या कथेचा लेखिकेच्या आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.

लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : साभार गुगल वरून

🎭 Series Post

View all