मी पुरेशी मजसाठी भाग 33

शेवटी जाई कन्स्ट्रक्शनला राम राम ठोकला अंबिकाने
अंबिकाचा समुपदेशनचा एक वर्षाचा कोर्स पूर्ण झाला आणि तिचं कॉलेजला जाणं बंद झालं. तसा शशिकांत विचलित होऊ लागला. चार पाच दिवस गेले नाही तो त्याचं मन खाण्या पिण्यात, PHD च्या अभ्यासात, कशातच लागेनासे झाले. त्याच्या मॉनिटर प्रोफेसरने त्याच्या मित्रांना सांगितलं त्याच्याशी बोलायला. कारण खूप कष्ट करून तो इथवर आलेला आणि शुल्लक कारणाने त्यांना त्याचं अभ्यासाचं नुकसान होऊ नये असं वाटत होतं. मित्रांनी त्याला अंबिकाशी सरळ सरळ बोलायचा सल्ला दिला,

"तु एकदा मनातलं सांगून तर बघ. होऊ शकतं त्या होकार देतील." एक मित्र म्हणाला.

"हो ना, नाहीतरी एकट्याच आहेत त्या. आपण काढलेल्या माहिती नुसार सासरचेच काय पण आई वडलांचीही सोबत नाही अंबिका मॅडमला." दुसऱ्या मित्राने जोर दिला.

"आणि तसंही आता कोणी एवढं वय वगैरे नाही बघत. सात आठ वर्षांनी तर मोठ्या त्या तूझ्या पेक्षा. तेवढी तर त्या सचिन तेंडुलकरची बायकोही आहेच त्याच्याहुन मोठी." तिसराही आपलं मत मांडून मोकळा झाला.

"तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण मला भीती वाटतेय कि मी त्यांना असलं काही बोललो, मनातलं सांगितलं तर त्या मैत्रीचं नातंही तोडतील आणि घटस्फोटित महिलांच्या मिटिंगला येणं बंद करतील." शशिकांत काळजीने म्हणाला, "तुम्हा लोकांना माहितेय, त्यांनी समुपदेशन सुरु केलं तेव्हा पासून दर मिटिंगला पंधरा विस नवीन स्त्रिया जोडल्या जात आहेत. मला माझ्या स्वार्थासाठी त्या बायकांचं नुकसान नाही करायचं आहे. म्हणून मी गप्प आहे."

"मग देवदास बनून फिरू नकोस नाहीतर नाईलाजाने आम्हाला अंबिका मॅडमला भेटायला जावं लागेल." तिघेही एक सुरात म्हणाले.

"ए भाऊ असलं काही करायचं नाही बरं का. उगाच त्यांना ताप नको." शशिकांत त्यांना म्हणाला, "मी लक्ष देतो स्वतःकडे. चला थिसीस पूर्ण करायचं आहे." तो पुस्तकात डोकं खुपसून म्हणाला. पण त्याचं मन अस्थिरचं अस्थिर होतं. शेवटी नको व्हायचं ते झालं. शशिकांतचं PHD साठी असलेलं थिसीस वेळेत पूर्ण झालं नाही म्हणून त्याला पॅनलने जबर वॉर्निंग दिली. पुढील एक महिन्याचा आगाऊ वेळ त्यांनी शशिकांतला दिला. त्यात थिसीस पूर्ण झालं नाही तर त्याला PhD मधून बाहेर करण्यात येणार असं सांगितल्या गेलं. मॉनिटर प्रोफेसरही नाराज झाले. मित्र त्याला नाना प्रकारे त्याला समजावू लागले. शशिकांत मात्र उशी छात्याशी कवटाळून बिछाण्यात पडला.

मित्रांनी शशिकांतच्या मोबाईल मधून चोरून अंबिकाचा मोबाईल नंबर घेतला आणि तिला शशिकांतची परिस्थिती सांगितली.

"अरे तुम्ही म्हणता ते ठीक आहे पण मी काय समजावणार त्याला. त्याच्या कोणा मोठ्याला सांगा ना." अंबिकाने त्याला समजावण्यासाठी साफ नकार दिला. कारण तिला परत त्याच्या मार्गात जायचंच नव्हतं. तेव्हा मित्र सरळ सरळ तिला बोलला.

"मॅम त्याचं आयुष्य आता तुमच्याशी जोडल्या गेलं आहे. त्याच्या प्रत्येक बिमारीचा इलाज फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता."

"म्हणजे?" अंबिकाने विचारलं.

"म्हणजे त्याला आवडता तुम्ही आणि जेव्हा पासून तुम्ही त्याला भेटणं, म्हणजे कॉलेजला येणं बंद केलं त्याला काहीच सुचत नाही ना अभ्यासात मन लागत आहे."

"पण मी त्याला कधीच तसली काही जाणीव होऊ दिली नाही उलट त्याचा इंटरेस्ट बघून मी जाणूनबुजून दूर झाली."

"त्याला कळतंय सगळं. पण वळत नाहीये म्हणून तुम्हाला म्हणतोय त्याच्याशी बोला, त्याला समजावा. म्हणजे तो परत आपल्या धैय्याकडे लक्ष देईल." मित्र बोलला. अंबिकालाही हे योग्य वाटलं. ती शशिकांतला भेटायला गेली. तिला बघताच तो चाचपडला.

"हाय, आज कसं काय येणं झालं? काही मदत हवी का?"

कितीतरी दिवसांपासून दाढी कटिंग न केलेला त्याचा भकास अवतार बघून अंबिकाने त्यालाच उलट विचारलं, "नक्की मदत कोणाला हवी आहे?"

"अवतारावर जाऊ नका. थिसीस मुळे वेळच नाही मिळाला न्हावी कडे जायला." तो चेहऱ्यावर हात फिरवत सावरा सावर करायचा प्रयत्न करत म्हणाला.

"मग झालं का थिसीस कम्प्लिट?" तिचा प्रश्न.

त्याला काय उत्तर द्यावं काही सुचेना. त्याने खाली मान घातली. त्याला शंका आली कि नक्कीच मित्राने हिचे कान भरले.

"नाही, थोड्या चुका झाल्यात. दुरुस्त करतोय. एक चार पाच दिवसात होईल पूर्ण." तो म्हणाला.

"तसं झालं तर फारच छान. पण असं किती दिवस खोटं बोलणार आहेस? मी तुझ्या समोर आहे. जे काही मनात आहे बोलून मोकळा हो." अंबिका.

"मला लग्न करायचं आहे तुमच्याशी." तो हिम्मत एकवटून म्हणाला.

"ओके, समजा झालं आपलं लग्न. पुढे काय?" ती

"पुढे काय म्हणजे? आपण गुण्या गोविंद्याने नांदू." तो

"इतकं सोपं असतं तर कशाला इतके घटस्फोट झाले असते शशी?" अंबिका एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाली, "हे बघ, वय, दिसणं वगैरे वगैरे यांचं मला काहीच घेणं देणं नाही, तुला माझ्यापेक्षा छान मुलगी मिळेल असले डायलॉगही मला मारायचे नाहीत. कारण मला आलेल्या अनुभवातून मी इतकं समजून चुकली आहे कि आयुष्य जगण्यासाठी लग्न अजिबात गरजेचं नाही. लग्न हा फक्त एक भाग आहे आपल्या जीवनाचा, त्याला पूर्ण जीवन बनवू नये. त्यामुळे तु पुढे कर लग्न, नको करू. मला काहीच करायचं नाही त्याचं. पण असं देवदास बनून तूझ्या धैय्याला सोडून देणं मला अजिबात पटत नाहीये.

तु माझ्यासाठी वेडा झालाय म्हणून मी होकार दिला. लग्न झालं. काही दिवस आनंदात गेले. मग परत तेच सगळं रहाटगाडं खेचण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही. प्लीज समजून घे. मी माझ्या वाटणीचं, चांगलं /वाईट वैवाहिक आयुष्य जगून घेतलंय. पण तुझ्यासाठी हीच सुरवात आहे. कितीही नाही म्हटलं तरीही तुला ते अनावधानाने तरी जाणवणारचं."

"मला माहित होतं कि तुम्ही असंच काही बोलणार म्हणून मी तुम्हाला नाही सांगितलं मनातलं माझ्या."

"आणि इकडे आपल्या धैय्याला पाठ दाखवतोय. इतरांची मनं जपण्यासाठी धडपडनारा तु साध्या शुल्लक भावनेत वाहून जातोय. हे मला मुळीच मान्य नाही शशिकांत. तूझ्या आईच्या आत्म्याला शांती मिळेल का अशाने?" अंबिका कळवळून बोलू लागली, "बरं जाऊ दे. आपण विज्ञान युगातील. ते आत्मा असतो नसतो कोणास ठाऊक. पण मी एक जिवंत व्यक्ती आहे. मला किती वाईट वाटतेय तुला माझ्यासाठी असं वागतांना बघून. समजतोय का तु?"

"मग लग्न करा ना माझ्याशी." तो

"परत तेच, अरे बाळा लग्न करूनही मी दुःखीच राहणार कारण हे असलं काही मी माझ्यासाठी ठरवलंच नाहीये ना. म्हणून म्हणतेय तु तुझ्यासाठी जे ठरवलं आहे त्यावर आपलं लक्ष केंद्रित कर." ती

"तुम्हाला विसरणं कठीण आहे."

"मी कधी म्हटलं विसर म्हणून. फक्त असं समज कि मुंबई हे तुझं धैय्य आहे. तु पुण्यावरून रेल्वेने मुंबईला जातोय. मी त्या प्रवासात तुला भेटलेली एक प्रवासी आहे. जी मुंबई यायच्या आधीच लोणावळ्याला उतरली. त्यात इतकं वाईट वाटून घेण्या सारखं काहीच नाही."

"कॉलेज मधील समुपदेशनाचे धडे माझ्यावरच अजमावताय तुम्ही." डोळे भरून आले तरीही मिश्किल हसत तो बोलला.

"इतकं समजतंय ना मग वेडेपणा सोड आणि अभ्यास कर."

"हो.. " तो मान होकारार्थी हलवून म्हणाला.

"चल मी जाते मग."

"येते म्हणा."

"हो बाबा येतेय. तुझ्या पूर्ण झालेल्या थिसीसचे पेढे खायला येतेय मी." इतकं बोलून अंबिका आपल्या रस्त्याला लागली.

तिला आता जाई कंस्ट्रक्शन मधेही काम करायचा कंटाळा आला होता. काही ना काही कारणाने सारिका, मिस्टर आनंद जाईची गोष्ट काढायची, मिसेस जाईने व्हाट्सअप वर मुलीचे फोटो पाठवलेत, किती गोड दिसतेय, त्यांचा संसार कसा फुललाय वगैरे वगैरे बोलायची. तेव्हा ते एक दिवसाचं बाळ परत परत तिच्या डोळ्यांसमोर यायचे. तिने अखेर नेहाच्या हातात तिचा राजीनामा दिला. नेहानेही थांबवलं नाही. फक्त नवीन नौकरी मिळाल्या शिवाय सोडून जाऊ नकोस इतकं बोलली.

अंबिकाच्या हाती चांगला दहा वर्षांचा अनुभव होता नौकरीचा. नव्याने डेव्हलप होत असलेल्या खराडी परिसरात एका नामवंत कंस्ट्रक्शन कंपनीत तिला एच आर ऍडमिनचा जॉब मिळाला. ती अंकुरला घेऊन तिकडेच शिफ्ट झाली. तेव्हा तो लग्नाचा अल्बम जाळून टाकायचं आलं होतं मनात पण तीच तर एक आठवणही होती आई बाबा, भाऊ, मैत्रिणी आणि आनंदाने जगलेल्या त्या क्षणांची. म्हणून पडिक राहू दिली घरात स्टोर मधे.

धन्यवाद !

तळटीप :
या कथेचा लेखिकेच्या आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.

लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : साभार गुगल वरून

🎭 Series Post

View all