मी पुरेशी मजसाठी भाग 30

आयुष्यातील एक मोठं पर्व संपलं !


बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि ऑपरेशन थियेटर बाहेर असलेला लाल लाईट बंद झाला. अंबिकाचं ऑपरेशन करून बाळ बाहेर काढण्यात आलं होतं. मिस्टर आनंद जाई आणि मिसेस जाई खुर्चीतुन उठले. एक नर्स हॉस्पिटलच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यात बाळाला लपेटून त्यांच्या जवळ घेऊन आली. तिच्या पाठोपाठ गंभीर चेहरा असलेल्या डॉक्टरही बाहेर आल्या आणि खुर्चीत बसल्या. त्या खूपच थकलेल्या आणि टेंशनमधे दिसत होत्या. त्यांना असं बघून मिस्टर आनंद जाईला खूप भीती वाटली. त्यांच्या मनात कितीतरी प्रश्न एकामागे एक आले.

नर्सने बाळ मिसेस जाईच्या हातात दिलं.
"अभिनंदन मॅडम ! मुलगी झाली. लक्ष्मी आली हो तुमच्या घरी." नर्स आनंदाने म्हणाली. इवल्याशा बाळाला कसं घेऊ कसं नाही हे बघत, प्रयत्न करून, काळजीने आपल्या दोन्ही हातात अलगद घेतलं. बाळाच्या मुठीत आपलं बोट बघून मिसेस जाईच्या डोळ्यातून परत गंगा जमुना वाहू लागल्या. त्यांनी डोळे मिटून मनोमन प्रार्थना केली,

"मान्य करते कि अनावधानाने का होईना मी खूप वाईट चितलं अंबिकाचं. देवा क्षमा कर मला आणि बरं कर तिला लवकरात लवकर."

"अंबिका कशी आहे." मिस्टर आनंद जाईने डॉक्टरला विचारलं, "ती बरी आहे ना?"
डॉक्टरने मानेनंच होकार दिला. पण मिस्टर आनंद जाईला समजलं नाही. त्यांनी परत डॉक्टरला विचारलं,
"बाळाची आई ठीक आहे ना?"
"हो त्या ठीक आहेत. डॉक्टर मॅडम ने प्रयत्नांची पराकाष्ठा लावून वाचवलं त्यांना. हे डॉक्टर मॅडमचं आजचं सहावं ऑपरेशन. खरं तर त्या घरीच जाणार होत्या पाचवं ऑपरेशन झाल्यावर. पण ही केस इतकी क्रिटिकल होती कि त्यांना असं सोडून जाणं बरं नाही वाटलं कारण काही झालं असतं तर लोकांनी डॉक्टरची लापरवाही असंच म्हटलं असतं. तुम्हीही तमाशा करायला मागे पुढे बघितलं नसतं. तुम्ही लोकं साधं पेशंटचं बीपी कंट्रोल मधे राहणार याची सुद्धा काळजी नाही घेऊ शकत. डॉक्टरची मात्र चुकी नसतांनाही त्यांना शिव्या द्यायला, मारायला मागे पुढे बघत नाही." नर्स तावा तावात बोलली.

"यापुढे असं होणार नाही. तुम्ही प्लीज अंबिका बद्दल खरंखरं सांगा." मिस्टर आनंद जाई शांतपने म्हणाले.

"धोक्याच्या बाहेर आहेत. शुद्धीवर आल्या कि भेटा बाळाच्या आईला." नर्स म्हणाली. मग डॉक्टरकडे वळली, "मॅम चला मी हेल्प करते तुम्हाला."

"आनंद बघ ना पिल्लू किती गोड आहे." मिसेस जाई मिस्टर आनंद जाईला म्हणाल्या, "अगदी तुमच्यावरच गेली हं नाकी डोळी."

"हो !" मिस्टर आनंद जाईनी त्यांना विचारलं, "तुम्ही ठीक आहात ना?"

"हो आता मी अगदी ठीक आहे आणि अंबिकाही लवकरच ठीक होईल. तुम्ही काळजी नका करू." मिसेस जाई म्हणाल्या. शांतता पसरली.

अंबिका शुद्धीवर आली तसं नर्सने मिस्टर आनंद जाईला कळवलं. दोघेही बाळाला घेऊन तिच्या जवळ गेले.

"अंबिका आम्ही धन्य झालोय आज. मनापासून आभार." मिसेस जाई अंबिकाला म्हणाल्या, "आम्ही तुला जे काही उणंदुणं बोललो त्याबद्दल क्षमस्व."

"काळजीपोटीच बोलल्या हो तुम्ही. माझंच काही चुकलं असेल तर माफ करा मला." अंबिका त्यांना म्हणाली.

त्यांना असं बघून मिस्टर आनंद जाईला खूप बरं वाटलं. नर्सने जास्त बोलू नका अशी ताकीद देऊन त्यांना बाहेर काढलं.

सहा दिवसांनी अंबिकाला सुट्टी झाली. अर्थातच ती तिच्या राहत्या फ्लॅटवर परत गेली. आईला सुखरूप घरी आलेलं बघून अंकुर सुखावला. मिसेस जाईनी स्वतः अंबिका वरून भाकर तुकडा ओवाळून तिला आत घेतलं.

थोडा आराम झाल्यावर अंबिका तिचं सामान पॅक करू लागली. हे बघून मिसेस जाई तिला म्हणाल्या,

"तुला हा फ्लॅट, हे शहर सोडून कुठेही जायची गरज नाही."

अंबिकाच्या चेहऱ्यावर प्रश्नांकित भाव जमा झाले, "मॅम तुम्हाला आता कदाचित प्रायश्चित भावनेने मी इथे राहावं असं वाटत असेल पण काही दिवसांनी तुमच्या मनात परत माझ्या विषयी संशय निर्माण होईल आणि तुम्ही माझा द्वेष करणार. त्या पेक्षा मी आताच इथून गेलेलं बरं असं मला वाटतं."

"हो, म्हणूनच आम्ही काहीतरी ठरवलं आहे अंबिका." मिस्टर आनंद जाई तिथे आले, "बाळाला घेऊन आम्ही कायमचे अमेरिकेत जातोय. तिथे बाबाला आमची गरज आहे आणि आम्हालाही तुम्हाला त्रास देण्यापेक्षा हे योग्य वाटतंय."

"पण.... " अंबिका

"पण काय गं ! आता तुमच्या दोघां समोरच बोलते. तु कुठेही गेलीस तरीही आनंद तु ठीक आहेस कि नाही यासाठी शोध घेतीलच तुझा. त्यापेक्षा त्यांना माहित असलेलं बरं नाही का? म्हणून उगाच तुझी परवड करणं म्हणजे स्वतःच्या संसारात आग लावणं हे समजून चुकलेय मी." मिसेस जाई म्हणाल्या.

अंबिका आणि मिस्टर आनंद जाईनी एक नजर एकमेकांना बघितलं आणि भरल्या डोळ्यांनी दोघंही स्मित हसले. त्यांना कळून चुकलं त्यांची सोबत इथवरच. हेच त्यांच्या आयुष्याचं सत्य आणि त्यांनी याचा कधीच स्वीकार केलेला. पण तरीही एकमेकांना बघता येत होतं, दुरूनच पण अनुभवता येत होतं. आता तेही होणार नाही. त्यांची नजर जणू एकमेकांना सांगत होती,

"काही गोष्टींचं माधुर्य त्या अधुऱ्या राहण्यातच असतं,
सगळंच पूर्णत्वास जाण्यास जन्म घेत नसतं,
अन प्रेम तर आधीपासूनच त्यागाचं भुकेलं असतं."

नाही का?"

"डॉक्टरने सांगितलं तसं दोन महिने आराम घे आणि नंतर नेहाची असिस्टंट म्हणून ऑफिस जॉईन कर. बाकी नेहा आहेच तुझं मार्गदर्शन करायला. यापुढे संजय इथला सर्व कारभार बघणार." मिसेस जाई तिला म्हणाल्या, "उद्या सकाळच्या फ्लाईटने आम्ही दिल्लीला आणि मग वॉशिंग्टनला जातोय. तेव्हापर्यंत सांभाळ पिल्लूला." मिसेस जाईने बाळ अंबिकाला देऊ केलं. पण अंबिकाने नाकारलं.

"नको मॅम, जे माझं नाही त्याची आस का लावू? आता ती तुमचीच आहे. माझा काहीच संबंध नाही तिच्याशी. सांभाळा स्वतःला आणि सरांना. परत भांडू नका एकमेकांशी." अंबिका हसून दोघांना म्हणाली.

"नाशिककर काळजी घ्या." मिस्टर आनंद जाई म्हणाले आणि फ्लॅट मधून बाहेर पडले. मिसेस जाईही बाळाला सांभाळून त्यांच्या पाठोपाठ गेल्या.

अंबिका कितीतरी वेळ त्यांच्या पाठमोऱ्या आकृत्या बघत बसली. दुधानं तिची छाती जड झाली होती. तिला खूप ठणकत होतं. पण काही वेळा साठी तिच्या सर्व जाणिवाच संपल्या होत्या जणू.

आयुष्यातील एक मोठं पर्व संपलं !

"अंबिका, अगं ए अंबिका दार उघड." पांडे काकूचा जोर जोरात दार ठोकायचा आवाज अंबिकाच्या कानावर पडला. तशी ती भूतकाळातून वर्तमान काळात परतली. अल्बम बाजूला ठेऊन. डोळे पुसत तिने दार उघडलं.

"अगं काय करत होतीस इतक्या वेळची बेल आणि दार वाजवतेय. किती घाबरली मी." पांडे काकू म्हणाल्या.

"आत या, बसा. बोलू आपण." अंबिका शांततेत त्यांना म्हणाली.

"तु रडत होतीस का?" तिला निरखून बघत त्या बोलल्या, "कशाला रडतेय? तुझा तो बायकोचा शेपूट असलेला पोरगा गेला तुला सोडून तरी आम्ही आहोत ना तुला सोबत द्यायला." काकू आत येऊन म्हणाल्या, "एक काम कर दोन जोडी कपडे घे आणि आमच्या घरीच ये राहायला काही दिवस."

आता अंबिकाला हसू आवरलं नाही.

"काहीही काकू, एका भिंतीचं अंतर आपल्या घरात आणि कपडे घेऊन राहायला बोलावताय."

"हा मग तशीच ये. माझे गाऊन घालशील." काकू

"किती भोळ्या ना तुम्ही?" अंबिका त्यांना मिठी मारून म्हणाली.

"म्हणून तर मुलांनी असं छळले गं. पण अंकुरला बघून वाटलं नव्हतं कि तोही त्यातलाच निघेल." काकू

"काकू मी पाठवलं हो त्याला त्याची प्रगती व्हावी म्हणून." अंबिका.
"होहो जसं काही इथे पुण्यात प्रगती झालीच नसती त्याची. चांगला लाखात पगार होता इथे त्याला. पण त्या सईला माय लेकाचं प्रेम पाहावल्या गेलं नाही. म्हणून अशी खेळी खेळली बघ ती." काकू ठणकावून म्हणाल्या.

"काकू असं काहीच नाही." अंबिका त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करत होती.

"हो हो घे पोराची बाजू. पण माझेही केस असेच पांढरे नाही झाले बरं का?" काकू म्हणाल्या तसं अंबिका समजली कि यांना समजावलं तरीही या समजण्याच्या तयारीत नाहीत. म्हणून तिने विषयांतर केलं.

"काकू आज ते मराठी सिरीयल बघणार आहे का तुम्ही?" अंबिकाने विचारलं.

"कोणतं गं?" काकूला काही आठवलं नाही.

"अहो ते नाही का त्यात सुबोध भावे आहे." अंबिका उत्साहाने म्हणाली.

"तुला पाहतो रे का ?" काकूनी आठवून विचारलं.

"हो हो तेच. या मुलांच्या धामधूमीत बघितलंच नाही बघा किती दिवस झाले." अंबिका तक्रारीच्या सुरात म्हणाली, "मी येईल हं संध्याकाळी बघायला. आपण मिळून बघू."

"हो हो नक्कीच ये. मी ना मस्त गरम गरम कढी, भजी आणि पुलाव बनवते."

"हो हो चालेल." अंबिकाही चेहरा प्रफुल्लित करून म्हणाली.

"बरं मी तयारीला लागते. तु अजिबात त्या अंकुरचा विचार करू नकोस आणि ये फ्रेश होऊन." पांडे काकू बोलल्या आणि आपल्या घरी गेल्या. अंबिका दार लावून हाताने चेहरा झाकून विचारांच्या डोहात शिरली.

"कसं विचार नाही करू अंकुर बद्दल. माझ्या एका चुकीनं त्याचं स्वप्न उध्वस्त झालं होतं. पण तरीही सांभाळून घेतलं त्यानं मला. अगदी लहान वयातच पोक्तपणा आला त्याला. कधी कधी वाटतं माझ्यामुळे इतर मुलांसारखं नॉर्मल लहानपण जगूच नाही शकला तो."

क्रमश :
तळटीप :
या कथेचा लेखिकेच्या परस्पर आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.

लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : साभार गुगल वरून

🎭 Series Post

View all