मी पुरेशी मजसाठी भाग 27

अंकुरला कसं समजवेल अंबिका त्याच्या बापा बद्दल?


अंकुरच्या हातातील फुगे व्यवस्थित एकमेकांना बांधून त्याच्या हातात परत देऊन अंबिका फ्लॅटच्या दाराचे कुलूप काढून अंकुरला आत घेऊन, कडी लावून सरळ आत किचन मधे गेली. मिसेस जाईने मागल्या वेळी ते डॉक्टर कडे गेले तेव्हा दहा प्रेगा न्यूज ची दिलेली पाकिटं फ्रिजमधे जशीच्या तशीच होती. अंबिका एक पाकीट घेऊन प्रेग्नेंसी टेस्ट करायला बाथरूमात शिरली. दोन रेषा उमटून आल्या. अंबिका खरंच गरोदर होती.

त्या दोन रेषांना बघून तिला हसू का रडू असं झालं. आज रात्र आपली हक्काची आपल्या मुलांसोबत म्हणून तिने सकाळी मिसेस जाईला फोन करून बातमी द्यायचं ठरवलं. पण सारिकाच्या चमची दिव्याने अंबिकाला वॉशरूम मधे उलट्या करतांना बघितलं होतं. तिने किंचितही वेळ न गमावता सारिकाला फोन लावला. पण तिने फोन उचलला नाही. म्हणून मग दिव्याने तिला मॅसेज केला. सारिका साईटवर कलाईन्ट मिटिंग मधे असल्याने तिने दिव्याचा मॅसेज संध्याकाळी घरी गेल्यावर वाचला. तसं तिने मिसेस जाईला कॉल केला आणि त्यांचं अभिनंदन केलं.

त्यांना काही कळलं नाही ही कशाबद्दल अभिनंदन म्हणतेय म्हणून तिने कारण विचारलं. सारिकाला समजलं की अंबिकाने मिसेस जाईला अजून सांगितलेलं नाही. तिने या गोष्टीचा फायदा उचलून त्यांना अंबिका विरुद्ध भडकवलं.

"मॅम सांभाळून राहा. ती अंबिका स्वतः कडे नीट लक्ष देत नाहीये आणि तुम्हालाही काही सांगत नाही. असं ती मुद्दाम मिस्टर आनंद जाई समोर स्वतःला लाचार आणि तुम्हाला दोषी दाखवण्यासाठी करतेय."

"असं काही नाही आणि असेल तर मला येतं सांभाळता. तुम्ही कुठे काही बोलू नका आणि कामात लक्ष द्या." मिसेस जाईने सारिकाला दम दिला खरा पण तिला माहित होतं की आता मिसेस जाई अंबिकावर खेकसणार मस्त. यातच ती खुश होती.

मिसेस जाईने मिस्टर आनंद जाईला अंबिका बद्दल बोलायला फोन लावला. पण ते मिटिंग बद्दल संजय सोबत बोलत असल्याने त्यांनी मिसेस जाईचा कॉल उचलला नाही आणि असं काही पहिल्यांदा झालेलं नव्हतं. ते कामा बद्दल बोलत असले की कोणाचाच कॉल घेत नसत. पण अंबिका आयुष्यात आल्यापासून मिसेस जाई जास्तच असुरक्षित झाल्या सारख्या वागू लागल्या. त्यांना माहित होतं अंबिकाला मिस्टर आनंद जाईमधे रुची नाही. पण मिस्टर आनंद जाईला तिच्यात रुची वाढली तर? त्यांना वेगळीच शंका आली.

त्यांनी ड्रॉयव्हरला गाडी काढायला सांगितले आणि अंबिकाचं घर गाठलं. ती अंकुर साठी उपमा बनवत होती तेही नाकाला रुमाल बांधून. कारण तिला अन्नाचा खूपच वास येत होता आणि त्यामुळे परत परत मळमळ व्हायचं.

बेल वाजली. अंबिकाने उपमा मंद आचेवर ठेऊन दुर्बीण मधून बघितलं. समोर मिसेस जाईला बघून तिला जरा टेंशन आलं की यांना चपराशी किंवा आणखी कोणाकडून कळलं का उलटी झाली, मळमळ वाटतेय म्हणून? पण नाकावरचा रुमाल काढून लगेच तिने स्वतःला नॉर्मल करून त्यांना आत घेतलं आणि म्हणाली,

"बसा, मी गॅस बंद करून येतेय."

अंबिकाने आत जाऊन गॅस बंद केला. ट्रे मधे अंकुर साठी उपमा आणि मिसेस जाई साठी पाण्याचा ग्लास घेऊन आली. मिसेस जाईने ग्लास उचलला पण पाणी न पिताच बाजूला ठेवला. अंबिकाने अंकुर समोर प्लेट ठेऊन त्याच्या हातात चम्मच दिला. मिसेस जाई काही बोलणार तोच अंकुर ओरडला,

"ममा पाणी."

अंबिकाने पटपट जाऊन त्याला पाण्याचा ग्लास दिला. तिची ती धावपळ बघून मिसेस जाईचं डोकं सरकलं.

"अंबिका त्याला एखादं कार्टून लावून दे. मला महत्वाचे बोलायचे आहे." मिसेस जाईने ऑर्डर सोडला. अंबिकाने टीव्ही वर कार्टून चॅनेल लावलं. अंकुर शिन चॅन बघत उपमा खाऊ लागला.

"सॉरी मॅम अंकुरमुळे तुमचा खूप वेळ घेतला मी. कसं काय येणं झालं या वेळी?" अंबिकाने त्यांना विचारलं.

तेव्हा त्यांना वाटलं चांगलं खडसावं हिला. पण आतापर्यंत त्यांना कळलं होतं की अंबिकाला जास्त बोलणं म्हणजे आपलंच नुकसान करून घेणं. म्हणून त्यांनी सगळं काही प्रेमाने आणि समजूतदारपने बोलायचं ठरवलं.

"असूदे, तु आधी चेयर घेऊन बस." मिसेस जाई तिला म्हणाल्या.
अंबिका त्यांच्या समोर खुर्ची घेऊन बसली.

"असंच म्हटलं फोनवर विचारपूस केल्या पेक्षा तुलाच येऊन भेटावं. म्हणून आली." मिसेस जाईनी तिला विचारलं, "कशी आहेस तु?"

"छान आहे. काल रात्री रात्रभर झोप नाही लागली म्हणून की काय आज सकाळ पासून जरा मळमळ होतेय बस." अंबिका आता यांना कसं सांगू मी गरोदर आहे म्हणून या विचारातच त्यांना म्हणाली.

"मग मला का नाही सांगितले तु? उलटी, मळमळ ही सगळी गरोदरपणाची लक्षणं आहेत. आपण डॉक्टर कडे गेलो असतो ना? आताशी आठच वाजलेत चल." मिसेस जाई खुर्चीतून उठत म्हणाल्या.

"मला काही सुचलंच नाही. ऑफिस मधेही खूप बिझी होते. मग अंकुर आणि नंतर.... " अंबिका बोलता बोलता थांबली. ही बाई आता आपली वाट लावणार. तिच्या मनात आलं. त्या मात्र कान देऊन ती काय म्हणते ऐकत होत्या.

"मॅम मी गरोदर आहे. मी घरी करायची टेस्ट केली घरी आल्या बरोबर. अंकुरला भरवून नंतर कळवणार होते तुम्हाला." अंबिका डोळे लावून बोलून गेली.

"अंबिका जी गोष्ट ऐकण्यासाठी माझं हृदय तडपत आहे. माझा जीव जळत आहे आणि कान आतुरतेने वाट बघत आहेत ती मला तुझ्याकडून मी न विचारताच मिळायला हवी होती असं नाही वाटत का तुला?" मिसेस जाईने संतापून विचारलं, "की तुला सांगायचंच नव्हतं मला?"

"नाही असं काहीच नाही. मला माफ करा." अंबिका कळवळुन म्हणाली. तेवढ्यात अंकुरने जवळ येऊन तिच्या तोंडात एक चम्मच उपमा घातला आणि परत शिन चॅन बघू लागला. अंबिकाला मात्र अगदी मळमळून आलं. खाली पसरलेल्या खेळण्यांमधून कशीतरी वाट काढत अंबिका वॉश बेसिन जवळ गेली. हे बघून मिसेस जाईचं डोकं आणखीच ठणकलं.

अंबिकाला उलटी झाली नाही. फक्त कावश्या येत होत्या. ती चेहरा धुवून मिसेस जाई जवळ आली. त्या कोणाशी तरी फोन वर बोलत होत्या.

"मला अर्ध्या तासात दिलेल्या ऍड्रेस वर पाच वर्षाच्या मुलाला बघायला ट्रेनिंग घेतलेली बाई हवी आहे. पगाराची चिंता नको. तुम्ही फक्त चांगली पोक्त आणि कामुस बाई द्या." त्यांनी विविध कामांसाठी मॅनपॉवर पुरवणाऱ्या एका कन्सल्टन्सीला फोन करून सांगितलं.

"मॅम सॉरी !" अंबिका परत त्यांना म्हणाली. कारण तिला माहित होतं तिचा राग त्या मिस्टर जाईवरही काढू शकतात. म्हणून ती जास्त आगतिक झाली होती.

"अंबिका बस झालं. उगाच टेंशन नको घेऊ." त्या आपला राग शांत करून तिला खुर्चीत बसवून म्हणाल्या, "हे बघ मी तुझ्या भल्या साठीच म्हणतेय. सकाळपासून तुला उलट्या, मळमळ होतेय. तु ऑफिसला गेली, आली. तुला रस्त्यात कुठे चक्कर वगैरे आली असती तर? आणि घरीही किती धावपळ करतेय. म्हणून मी ट्रेनिंग घेतलेल्या बाईला बोलावलं आहे. ती आता तुमच्या सोबतच राहणार. ओके !"

अंबिकाला हेही नको होतं. बाई घरात ठेवणं म्हणजे दिवसभर मॅडमचा जासूस सोबत असणं. पण आता नाही म्हणणं ही आग लावणार होतं. म्हणून ती काहीच बोलली नाही.

"मी उद्याची अपॉइंटमेंट घेतलीय डॉक्टरची. पिकअप करते अकरा वाजता." मिसेस जाई

"ऑफिस मधून?" अंबिका

"तु इतक्या वाईट परिस्थितीत ऑफिसला जाणार? उद्या पासून ऑफिसला जाणं बंद." मिसेस जाई

"मॅम मी फक्त गरोदर आहे. मला काही रोग नाही झालेला. प्लीज माझं स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका. तुम्ही असंच काहीतरी करणार म्हणून मन झालं नाही माझं तुम्हाला सांगायचं." अंबिका वैतागून बोलली.

"ते समजलं मला. पण आपल्यात झालेला करार लक्षात ठेव. बाळाला काही झालं तर बघ. की खरंच बाकी म्हणतात तशी बाळाच्या बापावरच नजर आहे तुझी?" मिसेस जाईही वैतागल्या.

"मॅम तुम्ही.... " अंबिका डोक्याला हात लावून खाली बसली.

मिसेस जाईला वाटलं आपण उगाच जास्त बोलतोय. बाळ सुखरूप आपल्या ताब्यात येईपर्यंत हिला झेलावं लागेलच. मग बाळ आणि आनंदला घेऊन अमेरिकेत निघून जाऊ किंवा हिला पाठवून देऊ दूर कुठेतरी.

"तुला जसं हवं तसं राहा. टेंशन घेऊ नकोस आणि माझ्या कडून काही लपवू नकोस. मी फोन करते सकाळी. सांगशील कुठून पिकअप करू तुला." मिसेस जाई समजदारीचा आव आणुन म्हणाल्या, "फक्त बाई ठेव अंकुरला बघायला. प्लीज."

"ओके !" अंबिका थकली होती त्यांना नाही म्हणून म्हणून.

थोड्या वेळात कन्सल्टन्सी कडून पाठवलेली एक पस्तिशीतली बाई, प्रमिला, कन्सल्टंसीच्या रिप्रेझेंटेटिव्ह सोबत अंबिका कडे आली. मिसेस जाईने तिला अंकुर आणि अंबिकाकडे नीट लक्ष द्यायला आणि इतर काही इंस्ट्रक्शन्स दिले व त्या निघून गेल्या.

अंबिकाने एक ग्लास निंबू शरबत पिलं. तिला छान वाटलं. तिला काहीतरी चटपटीत खायचं मन झालं. तिने फोडणीच्या शेवळ्या बनवल्या. सोबत निंबाचं लोणचं घेतलं. तिला छान वाटलं. बंद ठेवलेल्या बेडरूम मधे प्रमिलाची राहण्याची सोय झाली.

दिवस एका मागे एक जात होते. मिस्टर आनंद जाई दुरूनच पण खूप काळजी घेत अंबिकाची. तिला दगदग होऊ नये याकडे लक्ष देत होते आणि त्या दोघांच्या हालचालीवर लक्ष द्यायचं काम सारिका & टीम करत होती.

अंबिकाला सहावा महिना लागला. नवीन वर्ष आलं. अंकुर पाच वर्षाचा झाला. प्रमिला आणि अंबिका दोघींना भांडावून सोडू लागला.

अंबिकाने वाढदिवशी त्याला नवीन कपडे घालून, वर्गात (kg 1) वाटायला चॉकलेट्स देऊन शाळेत पाठवलं.

अंबिका ऑफिस मधे कामात असतांना दुपारी तिला प्रमिलाचा फोन आला,
"माझे बाबा कुठे आहेत? मला वर्गात मित्र विचारत होते, तुझ्या बाबाने काय दिलं बर्थडे गिफ्ट. पण मला तर त्यांनी काहीही दिलं नाही. मला बाबा पाहिजे. मी विचारीन त्यांना. बाबा... " अंकुर रडू लागला.

"मॅडम मी काय करू?" प्रमिलाने विचारलं.

"प्लीज त्याला विसर पडेल असं कर काही." अंबिका म्हणाली.

"पिझ्झा बनवते तुम्ही शिकवलं तसा." प्रमिला म्हणाली.

"हो आणि हॉट चॉकलेट." अंबिकाचा गळा भरून आलेला. तिने फोन ठेवला.
"बाबा बाबा, मी कुठून आणुन देऊ तुला बाबा. तो सोबत असता तर कशाला असं काही झालं असतं? आणि लोकंही... त्यांना बापच घेऊन देतांना दिसतो. आई नाही दिसत का?" अंबिका स्वतःशीच गहिवरून बोलली.

क्रमश :
तळटीप :
या कथेचा लेखिकेच्या परस्पर आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.

लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : साभार गुगल वरून

🎭 Series Post

View all