मी पुरेशी मजसाठी भाग 26

प्यार है या सजा, ऐ मेरे दिल बता | तुटता क्यूँ नहीं दर्द का सील सिला
अंबिकाला दिवस गेल्याने चक्कर येऊ शकते हे ऐकताच मिस्टर आनंद जाई भारावून गेले. त्यांना वाटलं बाहेर जाऊन घट्ट मिठी मारावी अंबिकाला आणि प्रेमाने ओठ टेकवावे तिच्या कपाळावर. ते जागेवरून उठून उभेही झाले. पण लगेच नेहाच्या आवाजाने भानावरही आले. \"आपल्या मनात आलं ते वाईट नाही परंतु प्रॅक्टिकली अयोग्य आहे\" हे स्वतः ला मनोमन समजावून सांगत ते परत खुर्चीत बसले.

"सर तुम्ही ठीक आहात?" नेहाने मिस्टर आनंद जाईला विचारलं, "मी ही गोड बातमी जाई मॅडमला देते." असं म्हणून अंबिकाने मिसेस जाईचा नंबर काढला.

"नेहा थांबा." मिस्टर आनंद जाई नेहाला म्हणाले, "त्यांना आताच नका सांगू."

"पण का सर? तुम्हाला तर माहित आहे ना त्या किती उत्साही आहेत या बातमी साठी. किती आतुरतेने वाट बघत आहेत या बातमीची?" नेहा त्यांना म्हणाली.

"ते सगळं ठीक आहे नेहा. मी त्यांना दोष नाही देत. पण त्या अंबिकाला त्रासून सोडतील ती गरोदर आहे हे कळताच. तसंही अजून कन्फर्म नाही झालं आहे मग कशाला नसती उठाठेव करायची?

तुम्ही तिला अंबिकाच्या तब्येती बद्दल सांगताच ती डॉक्टरची वारी करेल आणि तसं काही नसलं तर स्वतःही निराश होईल आणि अंबिकालाही तिची बोलणी ऐकावी लागतील. तेव्हा राहू द्या." मिस्टर आनंद जाई नेहाला म्हणाले.

"ओके सर पण अंबिकाला चेकअप तर करायला हवं ना !" नेहा म्हणाली.

"नेहा माझा मॅडमला न सांगायचा उद्देश तुम्हाला नीट कळला नाही वाटतं. आम्हाला अंबिकाला ताप होईल असं काही नको आहे. मी तुमची काळजी समजतोय. पण तिचं तिलाच कळू द्या ती गरोदर आहे की नाही. आपण फक्त दुरून निरीक्षण करा आणि काही त्रास होतोय तिला असं दिसताच मदतीला तत्पर राहा. होईल तितके दिवस तिचं स्वातंत्र्य जगू द्या तिला." मिस्टर आनंद जाई म्हणाले.
"ओके सर ! मी मिटिंगची तयारी करते." नेहा खुर्चीतून उठली. पण जागीच थबकली.

"आणखी काही?" मिस्टर आनंद जाईने विचारलं.

नेहाच्या मनात आलं, विचारावं की ती मिटिंगच्या तयारीत व्यस्त असेल आणि जिग्नेशही आला नाही. मग अंबिकाकडे लक्ष कोण देणार? आणखी कोणाला सांगणंही ठीक नाही.

पण तिला वाटलं न विचारलेलंच बरं. मिस्टर आनंद जाईने काहीतरी विचार केलेला असेलच याबाबत.

"नाही सर. मी कॉल करते सर्व आयोजन झाल्यावर." नेहा बोलली आणि केबिन बाहेर निघाली. अंबिका पेपर फाईलिंग करत होती.

"मॅम तुम्ही कधी आल्या?" नेहाला बघून तिने विचारलं.

"तु तोंड हाताने झाकून बसली होती तेव्हा. तब्येत बरी नाही का?" नेहाने प्रति प्रश्न केला.

"हो, थोडं अजीर्ण झालं. झोप नाही येत आहे काही दिवस झालेत. त्यामुळे होत असेल." अंबिका फाईल मधे डोकं खुपसून अनावधानाने बोलून गेली, "भडभड उलटी झाली सकाळी आल्या आल्याच. त्यात चिडचिडही होतेय आणि अंकुरचे प्रश्न वेगळेच. काही कळत नाही काय होतंय माझ्या सोबत?"

नेहाची शंका पक्की झाली. मिसेस जाईला सांगायचं नाही, हिला विचारायचं नाही. असं कसं चालणार? हिला काही झालं तर? डॉक्टरकडे जायला सांगू का? या विचाराने नेहाचा चेहरा गंभीर झाला. तिची गंभीर मुद्रा बघून अंबिकाने तिला विचारलं, "मॅम सगळं ठीक आहे ना?"

"हो गं, ठीक आहे. तु डॉक्टरला दाखव बरं. लहानगा अंकुर असतो तुझ्या सोबत. असं चक्कर येणं ठीक नाही." नेहा हसायचं नाटक करून तिला म्हणाली.

"इतकं काही झालं नाही पण जाईल तुम्ही म्हणताय तर." अंबिकाच्या फिक्या पडलेल्या चेहऱ्यावर स्मित पसरलं, "तुम्हीही जास्त काळजी करू नका."

"नाही करत गं. पण ही अचानक ठरलेली मिटिंग. तिचा विचार करत होती. बोलू नंतर. काळजी घे स्वतःची." नेहा तिच्या केबिनकडे वळली.

अंबिका परत आपलं पेपर फाईलींग करू लागली. मिस्टर आनंद जाई केबिनच्या दाराच्या काचेतून तिला बघत होते. (आतल्या माणसाला बाहेरचे दिसे. बाहेरच्याला आतलं काहीच दिसत नव्हतं.)

"किती निरागस, लोभस, आपल्याच विश्वात दंग ! अंबिका, आधी का नाही भेटलो आपण? किती सुंदर विश्व् असतं ना आपलं? आपण आणि आपली दोन मुलं. अगदी दृष्ट लागण्या सारखाच संसार असता ना आपला? कदाचित म्हणूनच नशिबाने अशा वेळी भेट घडवली आपली जेव्हा एकत्र येण्याचा काही चान्सच उरला नाही." या विचाराने मिस्टर आनंद जाईचे डोळे भरून आले. त्यांनी काचेवर हात टेकवून आपले डोळे मिटले.

स्वतःला धीर देत डोळे उघडले तर समोर (काचेच्या त्या बाजूला) अंबिका होती. ती दारावर हात ठेवून, भरल्या डोळ्यांनी विचार करत होती,

"मला माफ करा सर. तुमच्या भावना माहित असूनही दुर्लक्ष करते. कारण त्या कितीही पवित्र असल्या तरीही मी त्यांना वाव दिला तर मीही कोणाचा तरी संसार मोडायला कारण ठरणार. मला तसं काहीच होऊ द्यायचं नाही. खरं तर मला मी भोगत असलेलं दुःख आणखी कोणाला द्यायचं नाही आहे. या यातना माझ्या पर्यंतच सीमित राहिलेल्या बऱ्या. इतकंच !"

तिनेही डोळे मिटले, तसे तिच्या डोळ्यातील पाणी गालावर ओघळून टपटप खाली पडू लागलं. मिस्टर आनंद जाईला वाटलं दार उघडून ओंजळीत झेलून घ्यावे ते अनमोल अश्रू ! पण..... पण....
या पण ने बांधून होते हात त्यांचे,
या पण ने घायाळ झाले हृदय ज्यांचे,
आता कितीही प्रयत्न केला
तरीही एकत्र न येणार होते मार्ग त्यांचे,
जाणीव ही असूनही,
मन एकमेकांत गुंतले होते ज्यांचे !

फोन खणखणला तशी अंबिका भानावर आली. नेहाचा फोन होता. तिने मिटिंगच्या काही डिटेल्स मिस्टर आनंद जाईला मेल केलेल्या. त्या approve करून त्यांना मेल परत हवा होता. म्हणून नेहाने अंबिकाला तो मेल मिस्टर आनंद जाईला दाखवायला सांगितला.

अंबिकाने डोळे पुसून, चेहरा नीट करून केबिनच्या दारावर टकटक केलं. मिस्टर आनंद जाईला ती दिसली. ते पटकन खुर्चीत जाऊन बसले.

"यस कम इन !"

स्वतःला असंच फाईल चाळत बिझी दाखवायचा प्रयत्न करण्यासाठी ते एक फाईल सरळ आहे की नाही, न बघताच हातात घेऊन बसले.

काही दिवस पूर्वी जी चूक तिने केली होती तीच चूक त्यांना करतांना बघून तिला हसू आलं. ती ओठ दाबून हसू लागली. पण तिचं हसू मिस्टर आनंद जाईच्या नजरेतून काही लपलं नाही.

"नशिककर सर्कस नाही इथे कुठेही आजूबाजूला मग का हसताय?" मिस्टर आनंद जाईने अंबिकाला विचारलं.

"सॉरी सर ती फाईल...." अंबिका त्यांनी उलट्या पकडलेल्या फाईलकडे बोट दाखवून म्हणाली, "मला नव्हतं माहित पुणेकरांनाही उलटं वाचता येतं."

"पुरे !" चोरी पकडली गेली हे बघून त्यांनी फाईल होती तिथे ठेऊन दिली, "बोला काय झालं?"

अंबिकाने त्यांना नेहाच्या फोन बद्दल सांगितलं. मिस्टर आनंद जाईला हवा असलेला बहाणा मिळाला.

"बस PC समोर आणि मला मेल वाचून दाखव." त्यांनी अंबिकाला ऑर्डर देऊन चपराशीला बोलवायची बेल वाजवली व दोघांसाठी सॅन्डविच आणि मस्तानी मागवली.
अंबिकाने मिस्टर आनंद जाईला पूर्ण मेल वाचून दाखवला. त्यांनी तिला हवे त्या चेंजेस साठी रिप्लाय करायला सांगितले. ते बोलत होते तसे ती टाईप करत होती. चपराशी दोघांसाठी मस्तानी घेऊन आला.

‘’बाकी मस्तानी आणि सॅन्डविच खाल्यावर सांगतो.’’ मिस्टर आनंद जाई तिला म्हणाले. तिने तेही टाईप केले आणि विचारले, ‘’सर पुढे ?’’

हे बघून त्यांच्या रुबाबदार, गंभीर चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले. आपण काय टाईप केले हे बघून अंबिका गडबडली. मिस्टर आनंद जाईला काय म्हणायचे आहे तिच्या लक्षात आले. तसा तिने ड्राफ्ट सेव्ह करण्यासाठी माउसवर हात ठेवला. अगदी तेव्हाच मिस्टर आनंद जाईने सुद्धा त्याच उद्देशाने उठुन माउसवर हात ठेवला. त्यांचा हात अंबिकाच्या हातावर. दोघांच्या हृदयाची स्पंदनं वाढली.

मनात विचित्र वादळं उठलेलं. तरीही कोणी काहीच बोललं नाही. हातही तसेच होते.

"सर आणखी काही हवं?" चपराशीने सॅन्डविच आणि मस्तानी टी टेबल वर ठेऊन विचारलं.

मिस्टर आनंद जाईने तिच्या हातावरचा हात न काढताच draft सेव्ह केला आणि हँडवॉश करून सोफ्यावर जाऊन बसले. अंबिका आपल्या खुर्चीतच बसून होती. चपराशीने तिच्यासाठी आणलेलं सॅन्डविच आणि मस्तानी तिच्या पुढ्यात ठेवलं. अंबिकाला त्याच्या वासानेच मळमळ झालं.

"यातलं थोडं तुम्ही घ्या. मला जाणार असं दिसत नाही." अंबिका चपराशीला म्हणाली.

"पण मॅडम हे तर तुमचं आवडतं व्हेजिटेबल सॅन्डविच आहे. नेहमी हेच मागवता तुम्ही. आज सकाळ पासून ना तुमची लक्षणं काही ठीक नाही दिसत आहे. अगदी माझ्या गरोदर बायको सारखं करताय तुम्ही. डॉक्टर कडे जा बरं."

इतकं बोलून चपराशी डिश आणायला गेला.

"याचा तर विसरच पडलेला आपल्याला. खरंच आपण गरोदर आहोत का?" या विचाराने पोटाला हात लावत अंबिकाने चोर नजरेनं मिस्टर आनंद जाईकडे बघितलं. तेही तिरप्या नजरेनं तिलाच बघत होते. तिने पटपट अर्धा सॅन्डविच संपवला आणि मस्तानीचा ग्लास हातात घेतला. तिने मन होत नसूनही जबरदस्तीने मस्तानी खाणं सुरु केलं. एक दोन चम्मच पोटात गेले अन तिला जोरात उलटीची उबाळी आली. तिने वॉशरूम मधे जाऊन भडभड खाल्लेलं सगळं ओकून दिलं. तिला जास्त त्रास होतोय का हे बघायला मिस्टर आनंद जाई उठून वॉशरूम जवळ गेले. पण ती व्यवस्थित बाहेर येतेय हे बघून लगेच मोबाईल कानाशी लावून बोलायचं नाटक करू लागले.

अंबिका जाऊन तिच्या जागेवर बसली. चपराशीला नींबूपाणी बनवायला सांगितले. तो काहीतरी बोलणार तोच अंबिकाने त्याच्यावर डोले वटारले. तो मुकाट नींबूपाणी तिच्या समोर ठेउन निघून गेला.
तिचे नींबू पाणी पिउन झाल्यावर मिस्टर आनंद जाईने परत डिक्टेशन दिले. मेल पाठवून झाला. पाच वाजले होते. आणखी फक्त तीस मिनिट मग ती घरी जाणार या विचाराने तिला बरे वाटले. पण मिस्टर आनंद जाई असे होउ देण्याच्या मूड मधे दिसत नव्हते. त्यांनी मीटिंग मधे द्यायला स्पीच लिहिणे सुरू केले. अंबिका होतीच टाइप करायला. साड़ेपाच वाजले. घरी जायची वेळ झाली. अंबिकाची परत परत घड्याळ कड़े जाणारी नजर हेरून मिस्टर आनंद जाई तिला म्हणाले,

‘’नाशिककर घरी जायची काळजी करू नका. मी ड्रॉप करून देईल.’’

अंबिकाला म्हणायचे होते, नको मी माझी जाईल. पण मिस्टर आनंद जाईने तिला बोलायचा चान्सच दिला नाही. तिच्या कडून एकदा पूर्ण स्पीच वाचून घेतल्यावर त्यांनी चपराशीला अंबिका आणि त्यांची बॅग कार मधे नेऊन ठेवायला सांगितली.

अंबिकाला त्यांच्या मागे मागे जाऊन कार मधे बसल्या शिवाय दूसरा पर्याय उरला नाही. अंकुरला पिकअप करून ते करिष्मा सोसायटीकडे निघाले. आता पर्यंत बऱ्याचदा या ना त्या कारणाने अंकुर, मिस्टर आनंद जाईला भेटलेला त्यामुळे त्याला ते छान ओळखिचे झालेले. त्यात वाढत्या वया सोबतच त्याचे बदबडनेही वाढलेले. त्याला आज काय वाटलं कुणास ठाऊक. त्याने मिस्टर आनंद जाईला सरळ विचारलं,

"तुम्ही माझ्या आईला नाशिककर का म्हणता?"

"कारण ती नाशिकची आहे." मिस्टर आनंद जाई उत्तरले.

"पण आईने तर मला कधीच तिथे नेलं नाही." अंकुर म्हणाला. मग विचार करून त्याने परत विचारलं, "माझे बाबाही तिथेच आहेत का?"
बाबा हा शब्द ऐकताच अंबिकाला तिच्या कानात कोणी लाव्हा टाकल्या सारखं झालं. तिचा चेहरा आणखीनच पडला, अंगात आग लागली.
त्याने परत विचारलं, "सांगा ना माझे बाबा तिथेच का?" त्याच्या पाठीत दोन धबके लावायची तिला इच्छा झाली. पण मन म्हणालं का? कशासाठी? त्याचा काय दोष.
तिने तिच्या मुठा आवळल्या.

मिस्टर आनंद जाईलाही टेंशन आलं. त्यांनी रस्त्यात अंकुरचं ध्यान भटकेल असं काही दिसतं का बघितलं. त्यांना एक फुगेवाला दिसला तसं त्यांनी कार थांबवून दहा बारा फुगे अंकुरला दिले. फुगे बघून अंकुरला बाबाचा विसर पडला.

करिष्मा सोसायटी आली. पाठमोऱ्या माय लेकाला बघून मिस्टर आनंद जाईच्या मनात आलं, "आजचं मिशन फत्ते झालं !"

क्रमश :
तळटीप :
या कथेचा लेखिकेच्या परस्पर आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.

लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : साभार गुगल वरून

🎭 Series Post

View all